(मा.अध्यक्ष श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवालेकडून गाडीची नुकसान भरपाई रक्कम रु.6,11,630/-मिळावी, मानसिक शारिरीक त्रासाबाबत रु.2,00,000/-मिळावेत, अर्जाचा खर्च मिळावा व या रकमांवर रक्कम प्रत्यक्ष फिटेपावेतो 12% व्याज मिळावे या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाले यांनी पान क्र.40 लगत इंग्रजी भाषेमध्ये लेखी म्हणणे व पान क्र.47 लगत मराठी भाषेमध्ये लेखी म्हणणे व पान क्र.41 व पान क्र.42 लगत प्रतिज्ञापत्रे सादर केलेली आहेत. अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः मुद्देः 1. अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय 2. सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?-होय 3. अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमपोटी व्याजासह रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय? ---होय 4. अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय?-- होय 5. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवालेविरुध्द अंशतः मंजूर करणेत येत आहे. विवेचनः याकामी अर्जदार यांनी पान क्र.50 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे तसेच सामनेवाला यांचे वतीने अँड.ए.आर.साठे यांनी युक्तीवाद केलेला आहे. अर्जदार यांचे वाहनास सामनेवाले यांनी विमा पॉलिसी दिलेली आहे ही बाब सामनेवाले यांनी त्यांचें लेखी म्हणणे कलम 4 मध्ये मान्य केलेली आहे. अर्जदार यांनी पान क्र.9 लगत व सामनेवाला यांनी पान क्र.44 लगत सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स कम पॉलिसी शेडयुल दाखल केलेले आहे. सामनेवाले यांचे लेखी म्हणणे व पान क्र.9 व पान क्र.44 लगतचे सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स कम पॉलिसी शेडयुल याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांचे गाडी चोरीची घटना दि.19 व 20 डिसेंबर 2009 चे दरम्यानचे रात्री झालेली असून तक्रार प्रथमतः 03/01/2010 रोजी पोलिसांकडे करण्यात आली. वाहन चोरीनंतर चोरीबाबतची माहिती पोलिसांकडे कळविण्यास 14 दिवसांचा व सामनेवाला यांचेकडे कळविण्यास 81 दिवसांचा उशीर झालेला आहे. त्यामुळे विमापॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग झालेला आहे. सामनेवाला यांनी सेवेत कमतरता केलेली नाही. अर्ज रद्द करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे. पान क्र.12 ते पान क्र.18 लगतची पोलिसांचेकडील कागदपत्रे पहाता अर्जदार यांचे वाहनाची चोरी झालेली आहे हे स्पष्ट होत आहे. पान क्र.11 चे सामनेवाला यांचे दि.20/12/2009 रोजीचे पत्र पहाता अर्जदार यांनी चोरीची घटना पोलिस निरीक्षक छावणी पोलिस स्टेशन मालेगाव यांचेकडे लेखी अर्ज देवून दि.20/12/2009 रोजीच कळविलेली आहे असे स्पष्ट दिसून येत आहे. म्हणजेच अर्जदार यांनी चोरीची घटना घडल्यानंतर दुसरेच दिवशी पोलिसांचेकडे फिर्याद दिलेली आहे हे स्पष्ट होत आहे. परंतु अर्जदार यांचे वाहन चोरीला गेलेल्या घटनेबाबत योग्य तो तपास करुन अर्जदार यांना विमा पॉलिसी प्रमाणे योग्य ती सर्व रक्कम देण्याची जबाबदारी सामनेवाला यांचेवर होती व आहे. केवळ चोरीची घटना सामनेवाला यांना अर्जदार यांनी तात्काळ कळविली नाही. घटना कळविण्यास उशिर केलेला आहे या कारणावरुन सामनेवाला यांना अर्जदार यांचा विमा क्लेम नाकारता येत नाही. याचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. याबाबत मंचाचे वतीने पुढील प्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे. 2011 एन.सी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 860. न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी विरुध्द स्टर्डी पॉलिमर्स. अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून विमा क्लेमपोटी रक्कम रु.6,11,630/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे. पान क्र.9 व पान क्र.44 चे विमापॉलीसीनुसार अर्जदार यांनी चोरीला गेलेल्या वाहनाचा रक्कम रु.5,81,049/- चा विमा सामनेवाला यांचेकडून घेतलेला आहे हे स्पष्ट होत आहे. चोरीला गेलेल्या वाहनाची म्हणजे बलेरो एल एल एक्स या मॉडेलचे गाडीची बाजारभावाने किंमत व पान क्र.9 व पान क्र.44 ची विमापॉलिसीमधील विमीत रक्कम याचा विचार होता सामनेवाला यांनी योग्य तो घसारा वजा करुनच अर्जदार यांचे वाहनाची विमापॉलिसी दिलेली आहे असे दिसून येत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी रक्कम रु.5,81,049/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाले यांचेकडून अर्जदार यांना विमा क्लेमपोटी रक्कम रु.5,81,049/- इतकी मोठी रक्कम योग्य त्या वेळेत मिळालेली नाही. सामनेवाला यांनी वाहन खरेदीकरीता सुंदरम फायनान्स कं.लि.यांचेकडून कर्जाऊ रक्कम घेतलेली आहे ही बाब पान क्र.9 व पान क्र.44 चे विमापॉलिसीवरुन स्पष्ट होत आहे. यामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना कर्जाऊ रकमेचे हप्ते भरावे लागत असणार आहेत. वरील सर्व कारणांचा विचार होता निश्चितपणे अर्जदार यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. याचा विचार होता. अर्जदार हे मंजूर रक्कम रु.5,81,049/- या रकमेवर आर्थिक नुकसान भरपाईपोटी विमा क्लेम नाकारल्याचे पान क्र.27 चे पत्राची तारीख दि.15/10/2010 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 12% दराने व्याज मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. याबाबत मंचाचेवतीने पुढीलप्रमाणे वरिष्ठ कोर्टांचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहेः 1. 2 (2008) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग पान क्र.186. ओरीएंन्टल इन्शुरन्स कंपनी विरुध्द राजेंद्रप्रसाद बंन्सल. 2. 1 (2008) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग पान क्र.265. संजीवकुमार विरुध्द न्यु इंडिया इंन्शुरन्स कंपनी. सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमची रक्कम मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवालेविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे. सामनेवाले यांचे कृतीमुळे अर्जदार यांना निश्चितपणे मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद, वर उल्लेख केलेले व आधार घेतलेले वरिष्ठ कोर्टाचे निकालपत्र आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः आ दे श 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाले यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा दयाव्यातः 2.अ. विमाक्लेमपोटी रक्कम रु.5,81,049/- दयावेत व आर्थिक नुकसान भरपाई म्हणून या मंजूर रक्कम रुपये रु.5,81,049/- वर दि.15/10/2010 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 12% दराने व्याज दयावे. ब. मानसिक त्रासापोटी रु.15000/- दयावेत. क. अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- दयावेत. |