(द्वारा मा.सदस्या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)
___________________________________________________________
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदाराने त्यांच्या बांधकामाच्या कामासाठी क्रेन दि.०९-०२-२०१७ रोजी रक्कम रूपये १२,९५०००/- ला खरेदी केली. सदरहु क्रेनचा सामनेवाले यांच्याकडे विमा उतरविला होता व आर.टी.ओ. यांच्याकडे सन २०१७ मध्ये नोंदणीकृत करण्यात आली. दिनांक ०८-०२-२०१७ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता माणीकदौंडी रोड तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर टेकडीवरून पडुन बरचसे नुकसान होऊन या अपघाताबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा क्र.०२/२०१७ अनव्ये गुन्हा नोंदविला आहे. सदरच्या अपघातानंतर त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला व तसा सर्व्हेअरचा अहवाल दाखल केला आहे. त्यानंतर तक्रारदाराने विमा दावा सामनेवालेकडे सादर केला. मात्र सामनेवाले यांनी तो विमा दावा जी पॉलिसी उतरविली आहे ती बांधकामाच्या स्थळी अपघात झाला असता ती नुकसान भरपाई देण्याबाबतची आहे. रस्त्यावर काही घटना घडल्यास त्याबाबत पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार नुकसान भरपाईची रक्कम देता येणार नाही, या कारणास्तव नाकारला आहे. सामनेवालेने दि.०३-०३-२०१७ व १०-०३-२०१७ रोजी तक्रारदाराचा दावा नाकारल्याचे पत्र दिले आहे. तक्रारदाराचे या अपघातामध्ये मशीनचे बरेच नुकसान झालेले आहे. अशाप्रकारे तक्रारदाराला ६,३८,८७४/- एवढा खर्च आला. तकारदाराने सदर मशीन खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले होते व त्याचे हप्ते भरता आले नाही. सदरच्या मशीनमध्ये नुकसान झाले व त्याच्या दुरूस्तीसाठी रूपये ६,५०,०००/- एवढा खर्च आला. अशाप्रकारे चुकीच्या कारणावरून सामनेवाले यांनी तक्रारदाराचा विमा दावा नकारून अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे व सेवेत त्रुटी दिली आहे. म्हणून सदरची तक्रार तक्रारदाराला दाखल करावी लागली. तक्रारदाराने ही तक्रार दाखल करून प्रार्थनेच्या परिच्छेदात नमुद केल्याप्रमाणे मंचाला मागणी केली आहे.
३. सामनेवाले यांनी त्यांची लेखी कैफीयीत नि.१२ प्रमाणे प्रकरणात दाखल केली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराने खरेदी केलेल्या मशीनचा विमा उतरविला होता ही बाब मान्य केली आहे व त्या मशीनचा अपघात हा दिनांक ०८-०२-२०१७ रोजी झाला, ही बाब मान्य केली आहे. पुढे सामनेवाले यांनी असे कथन केले की, सामनेवाले यांना अपघाताविषयी जेव्हा कळविण्यात आले तेव्हा त्यांनी ताबडतोब त्यांच्या सर्व्हेअरला तपासणी करण्यासाठी पाठविले. पॉलिसीचे कागदपत्र व सर्व्हेअरने दिलेला अहवाल यावरून अपघात हा माणिकदौंडी या गावामध्ये झालेला आहे. पाथर्डी रोडने जात असतांना ड्रायव्हर सदर मशीन फिरवून घेत असतांना समोरून येणा-या बसने क्रेनला धडक दिली व त्यामध्ये मशीनचे बरेचसे नुकसान झाले. पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार सामनेवाले यांनी विमा दावा नाकारला. त्यामधील अट क्र.एच मध्ये ‘ Loss or damage whilst in transit, from one location to another location. (Public Liability will not be payable while Contractors Plant & Machineries are on Public Roads).’ असे नमुद आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार विमा दावा देय नाही, या कारणावरून नाकारला आहे. पॉलिसीच्या अटीनुसार जे पार्ट खराब झाले असतील ते पॉलिसीच्या नियमाप्रमाणे दुरूस्त करून देता येतील. परंतु जी बाब पॉलिसीमध्ये बसत नाही त्याबाबतची नुकसान भरपाई सामनेवाले यांना देता येणार नाही. त्यामुळे तक्रारदाराचा विमा दावा योग्य कारणास्तव नाकाराला आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
४. तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र तसेच त्यांचे वकील श्री. मुनोत यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद तसेच सामनेवाले यांचे वकील श्री. मेहर यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्रारदार हे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? | नाही |
(३) | आदेश काय | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
५. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार यांनी त्यांच्या बांधकामाच्या व्यवसायासाठी क्रेन खरेदी केली होती. सदर क्रेनची रक्कम रूपये १२९५०००/- एवढी किंमत होती व ती मशीन तक्रारदाराने दि.०८-०२-२०१७ रोजी खरेदी केली. त्याबाबतचे बिल प्रकरणात दाखल आहे. तक्रारदाराने सामनेवाले विमा कंपनीकडे सदरहु मशीनची आर.टी.ओ. मध्ये नोंदणी झाल्यानंतर विमा उरविला होता, ही बाब सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी कैफीयतीमध्ये मान्य केली आहे व तक्रारदारानेसुध्दा सदरहु मशीनचा विमा उतरल्यिाची पॉलिसी प्रकरणात दाखल केली आहे. यावरून सदर मशिनचा विमा उतरविला होता, यावरून स्पष्ट होते की, तक्रारदाराने सामनेवाले यांच्याकडे विमा उतरविला. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहे, सबब मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
६. मुद्दा क्र. (२) : तक्रारदार यांनी त्यांच्या मशीनचा सामनेवाले यांच्याकडे विमा उतरविला होता ही मशीन खरेदी केल्यानंतर आर.टी.ओ.कडे त्याची नोंदणी केली होती. सामनेवाले यांनी विमा उतरविला होता व विम्याचा कालावधी मान्य केला आहे. तक्रारदाराने तक्रारीत पुढे कथन केले की, दिनांक ०८-०२-२०१७ रोजी ५.३० वाजता ती मशीन माणीकदौंडी तालुका पाथर्डी येथुन रोडने जात असतांना पडली व डॅमेज झाली. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदाराचा विमा दावा संपुर्ण कागदपत्रांसह सादर केल्यानंतर नाकारला व त्यासाठी असे कारण दिले की, तक्रारदाराने मशीनसाठी जी पॉलिसी उतरविली होती ती बांधकाम चालु असल्याठिकाणी अपघात झाला तर नुकसान भरपाईची रक्कम देता येवू शकत होती. परंतु रोडवर काही घटना घडली तर त्यासाठी जोखीम स्विकारता येणार नाही. त्यामुळे विमा दावा नाकारला. सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी कैफीयतीमध्ये तक्रारदाराची विमा पॉलिसी उतरविली होती ही बाब मान्य केली आहे. मशीनचा अपघात झाला ही बाब सामनेवालेला मान्य आहे. परंतु तो अपघात बांधकामाच्या ठिकाणी न होता माणीकदौंडी गावाकडून पाथर्डीकडे जात असणा-या रोडवर समोरुन येणा-या बसने धडक दिली व त्यामध्ये सदर मशीनचे नुकसान झाले. यासाठी सामनेवाले यांनी त्यांच्या पॉलिसीच्या अट क्र.एच.मध्ये ‘ Loss or damage whilst in transit, from one location to another location. (Public Liability will not be payable while Contractors Plant & Machineries are on Public Roads).’ असे नमूद केले असून या कारणास्तव विमा दावा नाकारला आहे, ही बाब स्पष्ट करण्यासाठी मंचाने तक्रारदाराने दाखल केलेल्या पॉललिसीचे अवलोकन केले तर सदरची पॉलिसी ही ‘ Contrractor Plant and Machinery Insurance ’ अशी पॉलिसी होती. त्यामुळे या पॉलिसीची अट क्रमांक ‘H’ ही योग्य आहे. कारण सदरची पॉलिसी ही रोड अपघाताची पॉलिसी नसुन बांधकाम चालु असेल त्या ठिकाणी अपघात घडला तर नुकसान भरपाई मिळु शकेल, या बाबतची पॉलिसी आहे. सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी कैफीयतीमध्ये पॉलिसीच्या अटी व शर्तीमधील अट ‘H’ नुसार विमा दावा देय नाही, ही बाब नमुद केली आहे. यासाठी मंचाने अट क्रमांक ‘H’ चे अवलोकन केले असता त्यामध्ये सदरची पॉलिसी ही ‘ Contrractor Plant and Machinery Insurance ’ असे स्पष्टपणे नमुद केले आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी घेतलेला बचाव हा ग्राह्य धरण्यात येतो. सदरची विम्याची नुकसान भरपाईची तक्रारदाराने सामनेवाले यांचकडे मागणी केली. परंतु सदर रोड अपघात हा पॉलिसीच्या अटी व शर्तीमध्ये बसत नाही, हे सामनेवाले यांनी दिलेले कारण संयुक्तीक आहे. यामुळे सामनेवाले यांनी सेवेत कोणती त्रुटी केली नाही, ही बाब स्पष्ट होते. सबब मुद्दा क्र.२ चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
७. मुद्दा क्र. (२) : मुद्दा क्र.१ चे विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
१. तक्रारकर्ताची तक्रार खारीज करण्यात येत आहे. २. उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा. ३. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्क देण्यात यावी. ४. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |