न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. श्रीम.अमृता नि.भोसले, सदस्या
1. तक्रारदारांनी प्रस्तुतचा अर्ज सामनेवाला यांनी दोषयुक्त टीव्ही तक्रारदारास देऊन सेवेत त्रुटी ठेवलेने दाखल केला आहे. तक्रारदाराच्या तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे-
तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.3 यांचे वेबसाईटवरुन सामनेवाला क्र.4 टीसीएल कंपनीचा एल.ई.डी स्मार्ट टीव्ही TCL 139.7 (55 inches) P2 L55P2US $K UHD LED Smart TV (Golden) व TCL 81.28 cm (32 inches) L32D2900 HD Ready LED TV असे दोन टी.व्ही. खरेदी केले. त्यावेळी विक्रेता म्हणून सामनेवाला क्र.1 यांचे नांव दाखविण्यात आले होते. सदर टी व्ही खरेदीची ऑर्डर दि.16/07/2018 रोजी देणेत आलेली होती. त्याचा ऑर्डर नंबर 404-2580644-333112 असा होता.
सामनेवाला क्र.1 यांचेकडून तक्रारदार यांना सामनेवाला क्र.3 यांचे वेबसाईटवरुन खरेदी केलेले दोन्ही टी व्ही तक्रारदार यांचे मुंबई येथील पत्त्यावर देणेत आले. सदर दोन्ही टी व्ही ची खरेदीची एकूण किंमत रक्कम रु.48,000/- सामनेवाला क्र.1 कंपनीला अदा केलेले आहेत. त्याचा इनव्हॉईस नंबर XWAA-3123 असा आहे. त्यातील खरेदी केलेल्या 55 इंचीच्या टी व्ही ची वॉरंटी 16/01/2020 अखेर होती. सदर दोन्ही टी व्ही पैकी TCL 139.7 (55 inches) P2 L55P2US $K UHD LED Smart TV (Golden) हा टी व्ही तक्रारदार त्यांचे खेड ता.खेड जि.रत्नागिरी येथील घरी वापरत आहेत. सदर घरामधील विजपुरवठा अत्यंत योग्य आहे व तक्रारदार यांचे घरातील टी व्ही चा वापर देखील योग्य होता. असे असताना दि.15 डिसेंबर,2019 रोजी तक्रारदार यांचे TCL 139.7 (55 inches) P2 L55P2US $K UHD LED Smart TV (Golden) या टी व्ही चा पॅनलला प्रॉब्लेम येऊ लागला. टी व्ही चालू असताना अचानक कलर बदलणे, चित्र अस्पष्ट दिसणे वगैरे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ लागले. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 टी.सी.एल. कंपनीच्या सर्व्हीस सेंटरला दि.27/12/2019 रोजी मोबाईलवरुन कळवून तक्रार नोंदविली त्याचा तक्रार नंबर IN01200055051 असा आहे. त्यानंतर सामनेवाला क्र.2 चे अय्याज बेग हे दि.30/12/2019 रोजी सदर टी व्ही च्या दुरुस्तीसाठी आले. त्यांनी टी व्ही पाहिला व तक्रारदाराचे वडीलांना "पॅनल प्रॉब्लेम आहे, बदलावा लागेल, त्याबाबत मी रिपोर्टींग कंपनीला देतो" असे सांगितले. परंतु तक्रारदाराचा सदोष टी व्ही दुरुस्तीबाबत सामनेवाला क्र.2 कडून कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. त्यानंतर तक्रारदाराने अनेकवेळा सामनेवाला क्र.2 यांना मोबाईल फोनवरुन तक्रारी केल्या परंतु सदर सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराचा टी व्ही चा असणारा दोष दुरुस्त करणेबाबत कोणतीही पूर्तता करणेत आलेली नाही. याउलट टी व्ही च्या वॉरंटची मुदत संपलेली आहे अशी उत्तरे देत आहेत. तक्रारदार यांनी पुन्हा दि.17/02/2020 रोजी टी सी एल कंपनीच्या कस्टमर केअर सर्व्हीस सेंटरच्या टोल फ्री क्र.18004190622 वर कॉल करुन तक्रार नोंदविली होती. तरीही सामनेवाला यांनी टीव्ही दुरुस्तीबाबत कोणतीही पूर्तता केलेली नाही. मूळातच सामनेवाला क्र.1 यांनी जाणुनबुजून तक्रारदार यांना दोषयुक्त, सुरुवातीपासून बिघाड असलेला टीव्ही खरेदी देऊन फसवणूक केलेली आहे. वॉरंटीचा कालावधीमध्ये टीव्हीमध्ये दोष निर्माण झालेला असताना तो दोष दुरुस्त करुन दुर करणे,पॅनेल बदलून देणे, प्रॉडक्ट बदलून देणे याबाबतची कोणतीही सेवा सामनेवाला यांनी दिली नाही. सामनेवाला क्र.3 ॲमेझॉन कंपनी ही पोर्टल कंपनी आहे. प्रत्यक्षात सदर व्यवहाराशी व देणेत येणारे सेवांबाबत सदर कंपनीचा प्रत्यक्ष संबंध येत नाही. परंतु तक्रारदाराने सामनेवाला क्र.3 च्या ॲमेझॉन कंपनीच्या वेबसाईटवरुन ऑर्डर दिलेली होती. कोणतीही तांत्रिक बाधा राहू नये म्हणून सामनेवाला क्र.3 यांना याकामी पक्षकार केलेले आहे.
तक्रारदार पुढे कथन करतात की, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना टी व्ही दुरुस्ती करुन मिळणेबाबत वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी तक्रारदाराचा टीव्ही दुरुस्त करुन दिला नाही त्यामुळे तक्रारदाराने दि.18/06/2020 रोजी सामनेवाला यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली. तसेच नि.12/07/2020 रोजी INGRAM (Integrated Grievance Redressal Mechanism) या संकेतस्थळावरदेखील तक्रार नं.2107711 दाखल करण्यात आलेली होती, परंतु सामनेवाला यांनी कोणतीही दखल घेतली नसलेने सदरची तक्रार दाखल करण्यात आली. सबब सामनेवाला क्र.1ते 4 यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तिकरित्या टीव्हीची किंमत रु.48,000/-(रक्कम रु.अठ्रठेचाळीस हजार फक्त) तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/- (रक्कम रु.एक लाख फक्त) तक्रारदार यांना देणेबाबत आदेश होणेबाबत विनंती केली आहे.
2. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत नि.6 कडे एकूण 5कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये नि.6/1 कडे टी व्ही खरेदी केलेबाबतचे बील/ टॅक्स इन्व्हॉईस, नि.6/2 कडे तक्रारदार व सामनेवाला क्र.2 चे अधिकारी यांचेदरम्यान झालेले संभाषणची सी डी, नि.6/3 कडे सामनेवाला क्र.1त 3 यांना पाठविलेली दि.18/06/2020 रोजीची नोटीस, नि.6/4 कडे INGRAM (Integrated Grievance Redressal Mechanism) या संकेतस्थळावर दाखल केलेली तक्रार क्र.2107711 इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच नि.29/1 कडे सामनेवाला क्र.1यांना नोटीस लागू झालेबाबतचा पोष्टाचा ट्रॅक रिपोर्ट दाखल केला आहे. नि.30 कडे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. नि.31 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.33कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. नि.35/1 कडे भारतीय पुरावा कायदा कलम 65ब प्रमाणे प्रमाणपत्र व नि.35/2 कडे टी सी एल प्रॉडक्टची ऑनलाईन वॉरंटी पॉलीसी दाखल केली आहे.
3. सामनेवाला क्र.1 ते 4 यांना या आयोगामार्फत नोटीस पाठविली असता सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांना नोटीस लागू होऊनही ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांचेविरुध्द दि.02/08/2022 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. सामनेवाला क्र.3 यांनी वकीलामार्फत हजर होऊन नि.14 कडे लेखी म्हणणे दाखल केले आहे.
सामनेवाला क्र.3 यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. सामनेवाला क्र.3 ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म असून ती ॲमेझॅान शॉपींग या नावाने असून त्यावर Independent Third-Party Sellers त्यांची उत्पादित वस्तु विक्रीसाठी सदर प्लॅटफॉर्मवर लिस्ट करतात. सदरची लिस्ट पाहून कोणताही खरेदीदार त्यांना हवी असलेली वस्तुची निवड करुन खरेदी करु शकतात, सदर खरेदीदार हे विक्रेत्याला परस्पर वस्तुची किंमत अदा करतात व विक्रेता परस्पर खरेदीदाराला टॅक्स इन्व्हॉईस देतात. खरेदीदाराने खरेदी केलेल्या वस्तुची गुणवत्ता, सुरक्षीतता, किंमत, वस्तुचे वितरण, वॉरंटीच्या अटी शर्ती व वस्तुबाबतची सेवा देणे या सर्वांची जबाबदारी विक्रेते उत्पादित कंपनीची असते.
As per Section 79 of the IT Act, ASSPL/Answering Respondent –
79- Exemption from liability of intermediary in certain cases. (1) Notwithstanding anything contained in any law for the time being in force but subject to the provisions of sub-sections (2) and (3) an intermediary shall not be liable for any third party information, data or communication link made available or hosted by him.
तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.3 यांचे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन टीसीएल कंपनीचा एल.ई.डी स्मार्ट टीव्ही TCL 139.7 (55 inches) P2 L55P2US $K UHD LED Smart TV (Golden) व TCL 81.28 cm (32 inches) L32D2900 HD Ready LED TV सामनेवाला क्र.1 यांचेकडून खरेदी घेतला. सदर टीव्हीची किेंमत रक्कम रु.48,000/- तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना अदा केलेली असून सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास त्याबाबत टॅक्स इन्व्हॉईस दिली आहे.
सबब सामनेवाला क्र.3हे कोणतीही वस्तु उत्पादित करीत नाहीत, किंवा विक्री करत नाहीत, तसेच विक्री पश्चात सेवाही देत नाहीत. त्यामुळे सदर सामनेवाला क्र.3 यांचविरुध्दची सदरची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी विनंती सामनेवाला क्र.3 यांनी केली आहे.
4. सामनेवाला क्र.3 यांनी त्यांचे म्हणणेसोबत सामनेवाला क्र.3 यांचे संचालक मंडळाने संमत केलेल्या ठरावाची प्रत दाखल केली आहे. तसेच नि.36 कडे सामनेवाला क्र.3 यांनी नि.14 कडे दाखल केलेले म्हणणे व दाखल केलेली कागदपत्रे हाच लेखी युक्तीवाद समजावा अशी पुरसिस दाखल केली आहे.
5. वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत काय ? | होय. सामनेवाला 1, 2 व 4 |
2 | तक्रारदार व सामनेवाला क्र.3 हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत काय ? | नाही |
2 | सामनेवाला यांनी तक्रारदाराला उत्पादित दोष असलेला टीव्ही विक्री करुंन सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. सामनेवाला क्र.1, 2 व 4 |
3 | तक्रारदार हे सामनेवालाकडून टीव्ही ची दिलेली रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. अंशत: सामनेवाला क्र.1, 2 व 4 |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-वि वे च न –
6. मुद्रदा क्र.1:- तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.3 यांच्या वेबसाईटवरुन ऑनलाईन इंटरनेटव्दारे बुकींग करुन सामनेवाला क्र.4 कंपनीचा टीसीएल कंपनीचा एल.ई.डी स्मार्ट टीव्ही TCL 139.7 (55 inches) P2 L55P2US $K UHD LED Smart TV (Golden) व TCL 81.28 cm (32 inches) L32D2900 HD Ready LED TV असे दोन टी.व्ही. खरेदी केले. सदर दोन्ही टी व्ही ची खरेदीची एकूण किंमत रक्कम रु.48,000/- तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 कंपनीला अदा केलेली आहे. त्याचा इनव्हॉईस नंबर XWAA-3123 असा आहे. सामनेवाला क्र.1 ही वस्तुंच्या उत्पादनांची विक्री करणारी आहे. सामनेवाला क्र.1 व2 हे सामनेवाला क्र.4 कंपनीचे डिलर असून ते विक्री व विक्री पश्चात सेवा पुरवितात. त्याकारणाने ते ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत. यावरुन तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत हे निर्विवाद स्पष्ट होते. सबब तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक व सेवा पुरवठादार असे नाते निर्माण होत असलेने मुददा क्र.1 हे उत्तर हे आयोग होकाराथी्र देत आहे.
7. मुद्रदा क्र.2:- सामनेवाला क्र.3 ही कंपनी Intermediate (मध्यस्थी) म्हणून काम पाहते. ही कंपनी ग्राहकांसाठी विनामुल्य सेवा पुरवते. सामनेवाला क्र.3 यांनी स्वत:ची उत्पादित कोणतीही वस्तु तक्रारदारास दिलेली नाही. सामनेवाला क्र.3 हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. सामनेवाला क्र.3 यांनी ग्राहकाकडून कोणतेही मुल्य आकारलेले नाही. म्हणून सामनेवाला क्र.3 हे ग्राहक या कक्षेत येत नाहीत. त्यामुळे तक्रारदार व सामनेवाला क्र.3 यांचे नाते ग्राहक व सेवापुरवठादार असे होत नाही. सबब मुददा क.2 चे उत्तर हे आयोग नकारार्थी देत आहे.
8. मुद्दा क्र.3 :- तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.3 यांच्या वेबसाईटवरुन दोन टीव्ही खरेदी केल्या होत्या. त्यांनी दि.16/07/2018 रोजी टीव्ही खरेदी करणेची ऑर्डर दिली होती. त्यावेळी सामनेवाला क्र.1 हे विक्रेता म्हणून निर्देशित होते. तक्रारदाराने रक्कम रु.48,000/- खरेदीची किंमत सामनेवाला क्र.1 या कंपनीकडे जमा केली होती व त्याची वॉरंटी दि.16/01/2020 पर्यंत होती.. तक्रारदाराने सदर कामी नि.6/1 कडे टीव्ही खरेदी केलेबाबत व खरेदीची किंमत दिल्याचे बील दाखल केले आहे. दि.15 डिसेंबर,2019 रोजी तक्रारदाराचे TCL 139.7 (55 inches) P2 L55P2US $K UHD LED Smart TV (Golden) या मॉडेलच्या टीव्ही ला पॅनेलला प्रॉब्लेम येऊ लागल्याने तक्रारदाराने सामनेवाला क्र.4 कंपनीच्या सामनेवाला क्र.2 या सर्व्हीस सेंटरला फोन करुन कळविले व तक्रार केली. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीने सदर प्रॉब्लेम असलेल्या टीव्हीची पाहणी/तपासणी करुन टीव्हीच्या पॅनेल प्रॉब्लेम आहे, बदलावा लागेल मी कंपनीला रिपोर्टींग देतो असे सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी दि.16/01/2020, 31/1/2020, 06/02/2020 व 08/02/2020 रोजी सामनेवाला क्र.2 यांचे सर्व्हीस सेंटरला तक्रारी केलेचे दिसून येते. परंतु त्यांच्या तक्रारीचे निवारण न करता टीव्हीच्या वॉरंटीची मुदत संपलेचे कळविले आहे.
तक्रारदार यांनी सदर कामी नि.6/3 कडे दि.18/06/20 रोजी तक्रारदाराच्या वकीलांचे मार्फत नोटीस पाठविलेची स्थळप्रत दाखल केली आहे. सामनेवाला कंपनीने त्यास कोणतेही उत्तर पाठविले नाही. त्याकारणाने तक्रारदाराचे तक्रारीची दखल सामनेवालांनी घेतलेली नाही असे दिसून येत आहे. तक्रारदाराने नि.6/4 कडे INGRAM (Integrated Grievane Redressas Mechanism) या संकेतस्थळावर तक्रार क्र.2107711 ही सविस्तर नोंदविली आहे. सामनेवाला क्र.2 या कंपनीकडे तक्रारीचा तपशील दिलेले आहे. परंतु त्यांच्या तक्रारीचे निरसण केले नाही.
प्रस्तुत तक्रार अर्जाचे कामी सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांना आयोगामार्फत पाठविलेल्या नोटीसची बजावणी होऊन व संधी देऊनही ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्यांनी त्यांचे म्हणणेही दाखल केलेले नाही. सबब सामनेवाला क्र.1, 2 व 4 विरुध्द दि.02/08/2022 रोजी " एकतर्फा " आदेश पारीत झालेला आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांनी सदर कामी हजर होऊन तक्रारदाराची तक्रारीतील कथने नाकारलेली नसलेने सदर सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांना तक्रारीतील सर्व कथने मान्य आहेत असेच गृहीत धरावे लागेल.
सामनेवाला क्र.3 यांनी नि.14 कडे त्यांचे लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. सदर म्हणणेनुसार सामनेवाला क्र.3 हे स्वतंत्र थर्ड पार्टी विक्रेते आहेत. सामनेवाला क्र.3 हे कोणत्याही वस्तु उत्पादित करत नाहीत. एखादया वस्तुच्या उत्पादनाबाबत व वस्तुच्या विक्री पश्चात सेवेबाबतच्या समस्योचे निराकरण करणेची जबाबदारी त्यांची नाही. सदरची कंपनी ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे व त्यांचे वेबसाईटवरुन इतर कंपनींच्या उत्पादित वस्तुंची विक्री करत असते. वस्तुचे उत्पादन, गुणवत्ता, वॉरंटी किंवा कोणत्याही गोष्टीशी संबंध येत नाही. तक्रारदाराने त्यांचे तक्रारीमध्ये सामनेवाला क्र.3 कंपनी ही पोर्टल कंपनी आहे. प्रत्यक्ष सदर व्यवहाराशी व देण्यात येणारे सेवाबाबत सदर कंपनीचा प्रत्यक्ष संबंध येत नाही. त्यामुळे त्यांनी तक्रारदारास देण्यात येणा-या सेवेमध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही असे कथन केले आहे.
सदर कामी दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता मे. आयोगाचे निदर्शनास येते की, सामनेवाला कपंनीकडे तक्रारी करुनही त्यांनी तक्रारदाराला योग्य ती सेवा दिलेली नाही व त्यांचे तक्रारीचे निराकरण केले नाही. तक्रारदाराने नि.35/2 कडे टी सी एल प्रॉडक्ट ची ऑनलाईन वॉरंटीबाबत कागदपत्र दाखल केले आहेत. सदर वॉरंटी पत्राचे अवलोकनकरता त्यामध्ये तक्रारदाराने खरेदी केलेल्या टीव्हीचे वर्णन नमुद असून सदर टीव्ही ला दोन वर्षाची वॉरंटी असलेबाबत स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी टीव्ही नादुरुस्त झालेबाबतची सामनेवाला क्र.2 यांचेकडे केलेल्या तक्रारीचा दिनांक पाहता वॉरंटीच्या कालवधीतच तक्रारदाराच्या टीव्हीमध्ये दोष निर्माण झाला असलेचे या आयोगाचे मत आहे. सदरटीव्हीचा दोष हा वॉरंटी काळातील असलेने सदरचा दोष दुर करुन देणेची जबाबदारी सामनेवाला यांची आहे. परंतु सामनेवाला यांनी ती जबाबदारी पार पाडली नसलेचे दिसून येते.
तक्रारदाराने त्यांचे तक्रारीतील कथनांच्या शाबीतीकरिता नि.30 वर त्यांचे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांनी त्यांचे म्हणणे सादर न केल्याने तक्रारदारचे कथन निर्विवादपणे शाबीत झाले आहे.
वरील सर्व विवेचनांचा विचार करता सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांनी तक्रारदारास उत्पादित दोष असलेला टीव्ही विक्री करुंन व विक्री पश्चात सेवा न देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे. परंतु सामनेवाला क्र.3 यांनी स्वत:ची उत्पादित कोणतीही वस्तु तक्रारदारास दिलेली नाही. सामनेवाला क्र.3 ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. तक्रारदाराच्या टीव्ही खरेदीचा व्यवहार अथवा विक्री पश्चात सेवेबाबत सामनेवाला क्र.3 यांचा काहीही संबंध येत नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारास कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
त्यासाठी हे आयोग खालील वरिष्ठ न्यायालयाच्या न्यायनिवाडयाचा आधार घेत आहे.
In the matter of Madan Mohan Mandal V/s Manager, Lenovo, C.C. no.56 of 2018, the Hon’ ble District Consumer Disputes Redressal Forum, Kota, Rajsthan held that we are of the view of o.p. 3 is neither a necessary for a party as it has nothing to do with the quality of the product. It is only a shopping site & it is the manufacturer who is responsible for the product O. P. 3 in the matter was Amezon Seller Services Pvt. Ltd.,
Reliance is placed on the order of the Hon’ ble State Consumer Dispute Redressal Commission Raipur Chhattisgarh, in the matter of ASSPL V/s Mukesh Rajsahoo F. A, No.18/289 wherein the Hon’ ble Forum held that ASSPL cannot be held liable for the performance of the product.
Reliance also placed upon the decision passed by the District Forum at South Goa, in Shoail Shaikh V/s Cloudtail & others (c.c.No.71/19 decided on Jan, 27, 2020) wherein the Hon’ ble Forum has exonerated ASSPL form all liabilities and held the manufacturer and the independent Third party seller lilable for the manufacturing defects the Hon’ ble Forum has specifically relied on the terms of “ Conditions of Use” while arriaving at a conclusion in favour of ASSPL
वरील मा. वरिष्ठ न्यायालयाचे निर्णयाचे अवलोकन केले असता सामनेवाला क्र.3 यांना सदोष सेवा दिली असे म्हणता येत नाही.
प्रस्तुत कामी तक्रारदाराने दाखल केलेली कागदपत्रे व तक्रारीतील कथने यांचे अवलोकन करता सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांनी तक्रारदाराला उत्पादित दोष असलेला टीव्ही विक्री करुन व सदर विक्रीपश्चात टीव्ही दुरुस्तीबाबत तक्रारदाराने तक्रार नोंदवूनही त्याबाबत कोणतीही दखल न घेतल्याने तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेचे स्पष्टपणे दिसून येत आहे. वॉरंटी काळात टीव्ही दुरुस्त करुन देणे ही सामनेवाला यांची जबाबदारी होती. सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांनी तक्रारदारास सदोष सेवा दिलेचे तक्रारदाराने शाबीत केले आहे असे या आयोगाचे मत आहे. सबब मुद्रदा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
9. मुददा क्र4 :-तक्रारदार यांना सदोष टीव्हीची विक्री करुन व विक्री पश्चात टीव्हीमध्ये झालेला उत्पादित दोष दुरुस्त न करुन देऊन सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांनी सदोष सेवा दिलेली आहे. त्यामुळे तक्रारदार हे त्यांना झालेली नुकसान भरपाई सामनेवाला क्र.1, 2 व 4 कडून मिळणेस अंशत: पात्र आहेत. तक्रारदारांनी टीव्हीची किंमत रक्कम रु.48,000/- व मानसिक त्रसापोटी रक्कम रु.1,00,000/- ची मागणी केलेली आहे. तक्रारदाराने मानसिक त्रासापोटी मागणी केलेली रककम ही अवास्तव व अवाजवी आहे असे या आयोगाचे मत आहे. तसेच तक्रारदाराने दोन टीव्हीसाठी एकूण रक्कम रु.48,000/- सामनेवालास अदा केलेले आहेत. परंतु तक्रारदार हे TCL 139.7 (55 inches) P2 L55P2US $K UHD LED Smart TV (Golden) हा एक टीव्ही सदोष असलेचे कथन केले आहे. परंतु तक्रारदाराचा दुसरा TCL 81.28 cm (32 inches) L32D2900 HD Ready LED TV या मॉडेलचा टीव्ही व्यवस्थित आहे. त्यामुळे तक्रारदार हे एका टीव्हीची किंमत परत मिळणेस पात्र आहेत. तसेच तक्रारदारास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- सामनेवाला क्र.1, 2 व 4 कडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
10. मुददा क्र.5 :- सबब हे आयोग खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तकारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येतो.
- सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारास TCL 139.7 (55 inches) P2 L55P2US $K UHD LED Smart TV (Golden) या एका टी व्ही ची किंमत रु.24,000/- (रक्कम रुपये चोवीस हजार फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर सदर आदेशापासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 % दराने व्याज अदा करावे. सदर रक्कम मिळालेनंतर तक्रारदार यांनी सदरचा सदोष टीव्ही कंपनीस परत दयावा.
- सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (रक्कम रु. पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्क्म रु.2,000/- (रक्कम रुपये दोन हजार फक्त) अदा करावेत.
- सामनेवाला क्र.3 यांचेविरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
- वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
-
- विहीत मुदतीत सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांनी आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
-
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.