जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
मा.अध्यक्ष - श्री.डी.डी.मडके.
मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन.
--------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – १९९/२०१२
तक्रार दाखल दिनांक – ०२/११/२०१२ तक्रार निकाली दिनांक – ३१/०१/२०१३
अनिता नथ्थुसिंग रघुवंशी,
वय ४८ वर्षे, धंदा – घरकाम,
रा. २-ब, किरण हौसिंग सोसायटी, नकाणेरोड,
देवपुर, धुळे. .............. तक्रारदार
विरुध्द
१) एकलव्य गॅस एजन्सीज
चाळीसगावंरोड, ८० फुटरोड,
कोळवले गॅरेज जवळ, धुळे.
(सदर नोटीसीची बजावणी मॅनेजर सो.
एकलव्य गॅस एजन्सी यांचेवर बजवावी)
२) पुरवठा अधिकारी सो.
कलेक्टर ऑफिस, धुळे.
३) म. तहसीलदार सो.
धुळे तालुका धुळे.
४) हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरिशन
राहणारः मार्केटींग क्वॉर्टर ऑफीस
हिंदुस्थान भवन, सी सुरजीत वल्लभदास मार्ग
पोस्ट बॉक्स नं.१५५, मुंबई. ...........विरुध्द पक्ष
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड. एन.यु. लोखंडे)
(विरुध्दपक्ष तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
सौ.एस.एस.जैन, सदस्याः तक्रारदार यांनी विरूध्द पक्ष गॅस एजन्सीस यांची गॅस सिलेंडर रिफीलींगची सेवा सुरू करून मिळावी यासाठी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी वि.पक्ष एकलव्य गॅस एजन्सी यांचेकडुन १९९९ पासुन गॅस कनेक्शन घेतलेले आहे. त्याचा ग्राहक क्र.६०४९०२ असून रितसर गॅस कनेक्शन घेतल्याबाबत रजिस्ट्रेशन पावतीही दिलेली आहे तसेच विरूध्द पक्ष यांनी तक्रारदारला सन २००० पावेतो मागणीप्रमाणे गॅस सिलेंडरही दिलेले आहे.
३. त्यानंतर तक्रारदारने विरूध्द पक्ष नं.१ यांचेकडे गॅस सिलेंडर रिफील करणेसाठी स्वतः समक्ष तसेच फोनवर वेळोवेळी नंबर लावला परंतु विरूध्द पक्ष यांनी, तुमचा वेटिंगवर नंबर आहे, नंबर आल्यावर घरपोच गॅस सिलेंडर येईल, त्यास ८-१० दिवस लागतील अशाप्रकारे उडवाउडवीचे उत्तर तक्रारदार यांना दिले. शेवटी तक्रारदारला ३०५७ असा वेटिंग नंबर गॅस कार्डाचे मागे स्वतःचे हस्ताक्षरात लिहून दिल्यानंतर सुमारे १ वर्षानंतर गॅस सिलेंडर दिले. सदर गॅस सिलेंडर संपल्यानंतर नविन रिफील करणेसाठी नंबर लावला तेव्हाही विरूध्द पक्ष यांनी तक्रारदारास सांगितले की, ‘तुमचे गॅस कनेक्शन आमच्याकडे नाही, तुम्ही यापुढे आमच्याकडे नंबर लावायचा नाही, आम्ही तुम्हाला नविन भरलेले सिलेंडर देणार नाहीत’
४. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, त्यांनी गॅस सिलेंडर मिळणेसाठी विरूध्द पक्ष नं.२ पुरवठा अधिकारी सो. यांचे कडे अर्ज केला असता त्यांनी विरूध्द पक्ष नं. १ व ३ यांना दि.०२/१२/११ रोजी पत्र दिले आहे. विरूध्द पक्ष हे तक्रारदारला गॅस सिलेंडर देत नव्हते, तसेच नंबर लावून घेत नव्हते म्हणून तक्रारदारने दि.३०/०७/१२ रोजीची नोटीस विरूध्द पक्ष नं.१ व २ यांना दि.३१/०७/१२ रोजी रजिस्टर पोस्टाने पाठविली. सदर नोटीस विरूध्द पक्ष नं.१ यांना १६/०८/१२ व विरूध्द पक्ष नं.२ यांना दि.१४/०८/२०१२ रोजी मिळूनही त्यांनी काहीच तजविज केली नाही. तसेच नोटीसला उत्तरही दिले नाही व नविन भरलेले गॅस सिलेंडरही दिलेले नाही. रिफिल सिलेंडर भरून मिळत नसल्याने तक्रारदार वर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच तीला व तीच्या कुटुंबीयांना खूपच शारिरिक, मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
५. शेवटी तक्रारदार यांनी विरूध्द पक्ष नं.१ यांचेकडून आर्थिक नुकसानीचे रू.५,०००/- मानसिक त्रासापोटी रू.२०,०००/- व शारिरीक त्रासापोटी रू.१५,०००/- मिळावे. तसेच विरूध्द पक्ष नं.१ यांचेकडून मागणीप्रमाणे गॅस सिलेंडर रिफिल करून मिळावे. तक्रारदारची रिफीलींगची सेवा पुर्ववत सुरू करून मिळावी. तकारीचा खर्च रू.५,०००/- मिळावा अशी विनंती केली आहे.
६ तक्रारदार यांनी आपले म्हणण्याचे पृष्टयार्थ नि.७ चे यादी सोबत ८ कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात त्यांनी नि.७/१ ते ७/४ वर गॅस कार्डाची झेरॉक्स प्रत, नि.७/५ वर विरूध्द पक्ष १ यांनी दिलेल्या पत्राची झेरॉक्स प्रत, नि.७/६ वर विरूध्द पक्ष २ यांनी विरूध्द पक्ष ३ यांना दिलेल्या पत्राची झेरॉक्स प्रत नि.७/७ वर विरूध्द पक्ष १ व २ यांना पाठविलेल्या नोटीसीची स्थळप्रत, नि.७/८ वर विरूध्द पक्ष १ व २ यांना नोटीस मिळाल्याची पोच पावती. इ. कागदपत्रे दाखल केलेली आहे.
७. विरूध्द पक्ष १ ते ४ यांचे विरूध्द एकतर्फा आदेश करण्यात आलेला आहे.
८. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे पाहता आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्दे उत्तर
१. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना
दयावयाचा सेवत त्रृटी केली आहे का? होय.
२. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
३. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
९. मुद्दा क्रं.१- तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीत, त्यांनी १९९९ पासून विरूध्द पक्ष नं.१ यांचे गॅस कनेक्शन घेतलेले आहे. त्यांचा ग्राहक क्र.६०४९०२ असून गॅस कनेक्शन घेतल्याबाबत रजिस्ट्रेशन पावतीही विरूध्द पक्ष यांनी दिली आहे. तसेच तक्रारदारला सन २००० पावेतो गॅस सिलेंडर मागणीप्रमाणे मिळालेले आहे. परंतु त्यानंतर तक्रारदार ज्यावेळी गॅस सिलेंडर रिफील करणेसाठी विरूध्द पक्ष यांचेकडे स्वतः समक्ष तसेच फोनवर बोलले त्यावेळी विरूध्द पक्ष यांनी सुरूवातीस उडवाउडवीचे उत्तर दिले, त्यानंतर अर्जदाराला ३०५७ असा वेटिंग नंबर दिला व सुमारे वर्षानंतर गॅस सिलेंडर रिफील करून दिले.
१०. तक्रारदारने गॅस सिलेंडर संपल्यानंतर नविन रिफील करणेसाठी नंबर लावला त्यावेळी विरूध्द पक्ष नं.१ यांनी, तुमचे गॅस कनेक्शन आमच्याकडे नाही, तुम्ही यापुढे आमच्याकडे नंबर लावावयाचा नाही, आम्ही तुम्हाला नविन भरलेले सिलेंडर देणार नाहीत. असे सांगितले त्यानुसार तक्रारदारने विरूध्द पक्ष नं.२ पुरवठा अधिकारी सो. यांचेकडे अर्ज केला असता, त्यांनी दि.०२/१२/२०११ रोजी विरूध्द पक्ष यांना पत्र दिले. तरीही तक्रारदारला गॅस सिलेंडर न मिळाल्याने त्यांनी दि.३०/०४/१२ रोजी विरूध्द पक्ष नं.१ व २ यांना नोटीस पाठविली. सदर नोटीस त्यांना अनुक्रमे दि.१६/०८/२०१२ व दि.१४/०८/२०१२ रोजी मिळूनही विरूध्द पक्ष नं.१ यांनी काहीही तजवीत केली नाही. तसेच मागणीप्रमाणे नविन भरलेले गॅस सिलेंडरही दिलेले नाही. असे नमुद केलेले आहे.
११. विरूध्द पक्ष नं. २ ते ४ ह मंचाची नोटीस स्विकारूनही मे. मंचात हजर नाही तसेच विरूध्द पक्ष नं.१ यांनी नोटीस स्विकारली नाही. तक्रारदार हे विरूध्द पक्ष नं.१ यांचे ग्राहक आहेत. या नात्याने त्यांनी जी सेवा देणे अपेक्षीत होते ती विरूध्द पक्ष नं.१ यांना दिेलेली नाही. यावरून विरूध्द पक्ष नं.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१२. मुद्दा क्रं.२- तक्रारदार यांनी विरूध्द पक्ष नं.१ यांचे कडून मागणीप्रमाणे गॅस सिलेंडर रिफिल करून मिळावे व सेवा पुर्ववत करून मिळावी व आर्थिक नुकसानीचे रू.५,०००/- मानसिक त्रासापोटी रू.२०,०००/- व शारिरीक त्रासापोटी रू.१५,०००/- मिळावे तसेच तक्रारीचा खर्च रू.५,०००/- मिळावा अशी मागणी केली आहे.
१३. वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरून तक्रारदार हे गॅस रिफीलिंग ची सेवा मिळण्यास पात्र आहेत असे आम्हांस वाटते. विरूध्द पक्ष नं.१ यांनी तक्रारदार यांची गॅस रिफीलिंगची सेवा त्वरीत सुरू करून दयावी. तसेच तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रू.१०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.५००/- मिळण्यास पात्र आहेत असे आम्हांस वाटते.
१४. वरील विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. विरूध्द पक्ष नं.१ यांनी तक्रारदारास गॅस रिफीलिंग ची सेवा या आदेशाच्या प्राप्तीपासून १५ दिवसाच्या आत सुरू करून दयावी.
२. विरुध्द पक्ष नं.१ यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रू.१०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रू.५००/- या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाच्या आत दयावेत.
(सौ.एस.एस.जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.