जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १६५/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २९/०९/२०१२
तक्रार निकाली दिनांक – १३/०८/२०१४
१. श्री.कृष्णराव शंकर कंवर
वय – ७९, वर्षे, धंदा – निवृत्ती
२. सौ. लिलाबाई कृष्णराव कंवर
वय – ६५ वर्षे, धंदा – घरकाम
राहणार – माधवपुरा, ता.जि. धुळे . तक्रारदार
विरुध्द
१. धुळे शहर किराणा व भुसार व्यापारी नागरी सहकारी
पतसंस्था मर्यादित, धुळे
मॅनेजर
धुळे शहर किराणा व भुसार व्यापारी नागरी सहकारी
पतसंस्था मर्यादित, धुळे
२. म.प्रशासक सो.
धुळे शहर किराणा व भुसार व्यापारी नागरी सहकारी
पतसंस्था मर्यादित, धुळे
ता.जि.धुळे ४२४ ००१. . सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
(मा.सदस्या – सौ.के.एस. जगपती)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.के.आर. लोहार)
(सामनेवाला तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.के.एस. जगपती)
१. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या पतसंस्थेत मुदत ठेवपावती व बचत खाते अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाला ‘धुळे शहर किराणा व भुसार व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे’ या पतसंस्थेत मुदत ठेवपावती व बचत खात्यात रक्कम गुंतविली होती. त्याचा तपशील खालील प्रमाणे.
क्र. रकमेचा तपशिल ठेव तारीख देय तारीख व्याजदर % ठेवरक्कम
1. मुदत ठेव पा.नं. 44215 11/7/07 11/10/07 10% 18,000/-
2. मुदत ठेव पा.नं. 37917 6/8/05 2/6/07 11% 16,000/-
3. मुदत ठेव पा.नं. 38443 27/5/05 27/10/06 11% 14,000/-
4. मुदत ठेव पा.नं. 39049 2/9/05 2/10/06 11% 15,000/-
5. मुदत ठेव पा.नं. 37311 1/7/05 31/5/07 11% 15,000/-
6. बचत खाते क्र.159 वरिल दि.26/07/10 पर्यंत अखेरची शिल्लक रक्कम रू. 2008/-
7. बचत खाते क्र.25/34 वरिल दि.26/07/10 पर्यंत अखेरची शिल्लक रक्कम रू.12,300/-
एकूण रक्कम रू.९२,३०८/- व त्यापुढील व्याज
३. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे वरील देय रक्कमेची वेळोवेळी मागणी केली असता सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून मुदत ठेवपावती व बचत खात्यामधील एकूण रक्कम रूपये ९२,३०८/- व त्यावर देय तारखेपर्यंत ठरलेल्या दराप्रमाणे व्याज आणि आर्थिेक, मानसिक, शारिरिक त्रासापोटी प्रत्येकी रक्कम रू.५,०००/-. तसेच वरील संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. १८% प्रमाणे व्याज सामनेवाला यांचेकडून मिळावे, याकामी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
४. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ मुदत ठेवपावतींच्या छायांकित प्रती नि.९ ते १२ आणि बचत खाते पासबुकची छायांकित प्रत नि.१३,१४ वर दाखल केलेल्या आहेत.
५. सामनेवाले मंचाची नोटीस मिळाल्यावर मुदतीत हजर झाले नाहीत व त्यांनी खुलासाही दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्याविरूध्द ‘एकतर्फा’ आदेश पारित करण्यात आला.
६. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे पाहता व विद्वान वकिलानी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कसूर केली आहे काय ? होय
- तक्रारदार हे सामनेवाले यांच्याकडून देय रक्कम
व्याजासह आणि मानसिक त्रास व तक्रार अर्जाच्या
खर्चापोटी भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
ड. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
७. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे मुदत ठेव पावती व बचत खात्यामध्ये मध्ये रक्कम गुंतविली होती. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी मुदत ठेवपावतींची छायांकित प्रत नि.९ ते १२ आणि बचत खाते पासबुकची छायांकित प्रत नि.१३,१४ वर दाखल केलेली आहे. त्यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. म्हणून मुददा ‘अ’ चे उत्तर आम्ही होय असे देत आहोत.
८. मुद्दा ‘ब’ - प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदतठेव पावती व बचत खाते अन्वये रक्कम गुंतविली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे गुंतवलेली रक्कम परत करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही सामनेवाला यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा ‘क’ - तक्रारदार यांनी दाखल केलेल्या मुदत ठेवपावती आणि बचत खात्यामधील व्याजासह होणारी रक्कम सामनेवाला ‘धुळे शहर किराणा व भुसार व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, धुळे’ व प्रशासक यांच्याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू प्रशासक हे शासकीय कर्मचारी असल्यामुळे त्यांना तक्रारदारांची रक्कम देण्यास जबाबदार धरता येणार नाही. या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले पतसंस्था धुळे शहर किराणा व भुसार व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, धुळे यांचेकडून मुदत ठेवपावतींमधील एकूण रक्कम रूपये ७८,०००/- व त्यावर देय तारखेपर्यंत ठरलेल्या व्याजदराप्रमाणे आणि देय तारखेपासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याज अधिक बचत खात्यामधील एकूण रक्कम रू.१४,३०८- व त्यावर दि.२७/०७/२०१० पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावतींमधील व बचत खात्यातील व्याजासह होणारी रक्कम सामनेवाला यांच्याकडुन परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना सामनेवाला धुळे शहर किराणा व भुसार व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, धुळे यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडून मानसिक त्रासापोटी रु.२०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.१०००/- भरपाई मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘क’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१०. मुद्दा ‘ड’ - वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाले धुळे शहर किराणा व भुसार व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, धुळे तक्रारदार यांना सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांच्या आत खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात.
- १) मुदत ठेवपावती क्र.४४२१५ मधील ठेव रक्कम रूपये १८,०००/- व त्यावर ठेव दि.११/०७/०७ पासून देय दि.११/१०/०७ पर्यंत १०% प्रमाणे व्याज आणि दि.१२/१०/०७ पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज द्यावे.
- २) मुदत ठेवपावती क्र.३७९१७ मधील ठेव रक्कम रूपये १६,०००/- व त्यावर ठेव दि.०६/०८/०५ पासून देय दि.०२/०६/०७ पर्यंत ११% प्रमाणे व्याज आणि दि.०३/०६/०७ पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज द्यावे.
- मुदत ठेवपावती क्र.३८४४३ मधील ठेव रक्कम रूपये १४,०००/- व त्यावर ठेव दि.२७/०७/०५ पासून देय दि.२७/१०/०६ पर्यंत ११% प्रमाणे व्याज आणि दि.२८/१०/०७ पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. ६ टक्के दराप्रमाणे व्याज द्यावे.
- मुदत ठेवपावती क्र.३९०४९ मधील ठेव रक्कम रूपये १५,०००/- व त्यावर ठेव दि.०२/०९/०५ पासून देय दि.०२/१०/०६ पर्यंत ११% प्रमाणे व्याज आणि दि.०३/१०/०७ पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज द्यावे.
(५) मुदत ठेवपावती क्र.३७३११ मधील ठेव रक्कम रूपये १५,०००/- व त्यावर ठेव दि.०१/०७/०५ पासून देय दि.३१/०५/०७ पर्यंत ११% प्रमाणे व्याज आणि दि.०१/०६/०७ पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज द्यावे.
(६) बचत खाते क्र१५९ मधील रक्कम रूपये २००८/- व त्यावर दि.२७/०७/१० पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज द्यावे.
(७) बचत खाते क्र.२५/३४ मधील रक्कम रूपये १२,३००/- व त्यावर दिनांक २७/०७/१० पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज द्यावे.
(८) मानसिक त्रासापोटी रक्कम रू.२,०००/- (अक्षरी रूपये दोन हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रू.१,०००/- (अक्षरी रूपये एक हजार मात्र) दयावेत.
३. वर नमुद आदेशाची अमंलबजावणी (अध्यक्ष/संचालक/व्यवस्थापक/अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्थेचा कारभार पाहात असतील त्यांनी करावी. तसेच क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास, त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
-
-
(सौ.के.एस. जगपती) (श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.