(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार, मा. सदस्या)
(पारीत दिनांक – 13 डिसेंबर, 2019)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्षां विरुध्द दोषपूर्ण बियाण्यांमुळे झालेल्या नुकसान भरपाई संबधात ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारी नुसार, तक्रारकर्ता श्री केशव(बाबु) परसराम मेहर, यांची संयुक्त कुटूंबाचे मालकीची मौजा वडेगाव, तहसिल मोहाडी, जिल्हा भंडारा येथे गट क्रं 83-1 तलाठी साझा क्रं-14 या वर्णनाची शेती असून तिचे एकूण क्षेत्रफळ-9.21 हेक्टर आर असे आहे. तक्रारकर्ता हा आपल्या शेतात धानाचे उत्पादन घेत असून त्यावर त्याचे कुटूंबियांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे तसेच बरेच पशुधन असल्याने शेणखताचा वापर करतात. विरुध्दपक्ष क्रं 1 मे.दप्तरी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड, सेलू, जिल्हा वर्धा हे विविध लागवडयोग्य बियाण्यांची निर्मिती करीत असून संपूर्ण भारतात ते बियाण्यांची विक्री करतात. तर विरुध्दपक्ष क्रं 2 मोहाडी अॅग्रो एजन्सी, मोहाडी हे बियाण्याची विक्री करतात. विरुध्दपक्ष क्रं 3 ते 6 हे महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाचे अधिकारी असून शेतक-यांना पिक वाढी संबधी वेळोवेळी मार्गदर्शन करतात.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 दप्तरी अॅग्रो बायोटेक लिमिटेड, सेलू, जिल्हा वर्धा या कंपनीव्दारे निर्मित दप्तरी श्री.1008 लेवल नं.डीडी-14-7269 या लॉट क्रमांकाचे धानाचे बियाणे प्रतीकिलो वजन-10 किलोग्रॅम प्रमाणे एकूण 32 पिशव्या प्रतीपिशवी किम्मत रुपये-525/- प्रमाणे एकूण रुपये-20,320/- मध्ये विरुध्दपक्ष क्रं 2 स्थानिक विक्रेत्याकडून दिनांक-16.06.2015 रोजी खरेदी केले. विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता यांचे जाहिराती नुसार उत्पादन कालावधी हा 145 दिवसांचा होता तसेच सदर बियाणे शुध्द व प्रमाणित आणि भेसळमुक्त असल्याची विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता यांनी जाहिरात केली होती. सदर लॉटचे बियाण्याची तपासणी दिनांक-05.06.2015 अशी नमुद होती आणि ते दिनांक-10.08.2015 पर्यंत वापरावयाचे होते. तक्रारकर्त्याने शेतात धानाचे परे टाकले व खरेदी केलेल्या एकूण 32 धानाच्या पिशवीतील बियाण्यांची रोवणी आपले शेतात दिनांक-19.07.2015 रोजी केली. विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीने जाहिराती मध्ये हेक्टरी 55 ते 65 क्विंटल उत्पादनाची हमी दिली होती तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेत्याने सुध्दा हमी दिली होती. तक्रारकर्त्याने बियाण्यांची रोवणी केल्या नंतर सर्वप्रकारे काळजी घेतली होती तसेच निंदण सुध्दा केले होते.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-19.07.2015 रोजी धान बियाण्याची रोवणी केल्या नंतर जवळपास कमी कालावधीचा 85 दिवसाचा भेसळ व खबरा धान मोठया प्रमाणात शेतात विसवा झाल्याचे निर्दशनास आले, परिणामी त्याचे आर्थिक नुकसान झाले व फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तक्रारकर्त्याने दिनांक-30.09.2015 रोजी मा.जिल्हाधिकारी भंडारा यांचे कडे सदर भेसळयुक्त धानाचे बियाण्यां बाबत लेखी तक्रार केली व सदर अर्जाची प्रत विरुध्दपक्ष क्रं 4 व 5 यांचेकडे सादर केली परंतु विरुध्दपक्ष क्रं 3 ते 6 महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागातील अधिकारी लेखी तक्रार सादर केल्या नंतर त्वरीत मोका पाहणीसाठी आले नाहीत तर लेखी तक्रार केल्या नंतर एक महिन्याने उशिराने पाहणीसाठी आलेत परंतु तो पर्यंत भेसळ व खबरायुक्त वानाचे निसवा झालेल्या धानाच्या लोंब्या मोठया प्रमाणात गळून पडल्या होत्या, कृषी विभागा तर्फे उशिराने पाहणी केल्यामुळे कमी नुकसान दर्शविणारा अहवाल तयार केल्या गेला. वस्तुतः तक्रारकर्त्याचे धान पिकाचे एकंदरीत 40 ते 45 टक्के आर्थिक नुकसान झाले असताना विरुध्दपक्षांनी संगनमत करुन केवळ 10.42 टक्के नुकसान झाल्याचा बनावटी व खोटा अहवाल दिला. भेसळयुक्त बियाण्यांमुळे धनाचे पिक परिपक्व होऊ शकले नाही.
तक्रारकर्त्याच्या मता नुसार त्याला प्रतीएकरी 21 क्विंटल प्रमाणे एकूण 22.5 एकर शेती मध्ये 462.50 क्विंटल एवढे अपेक्षीत उत्पादन येणे आवश्यक होते. कृषी उत्पन बाजार समितीचे दरा नुसार धानास प्रतीक्विंटल रुपये-2000/- असा दर असल्याने त्यास एकूण अपेक्षीत उत्पन्न रुपये-9,25,000/- मिळावयास हवे होते. तक्रारकर्त्याचे 40 टक्के अपेक्षीत उत्पादनाचे नुकसान झालेले असल्याने त्याचे अंदाजे रुपये-3,98,000/- एवढया उत्पन्नाचे नुकसान झाले आणि त्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 ते 6 जबाबदार आहेत. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 अनुक्रमे बियाणे निर्माता कंपनी व बियाणे विक्रेता यांनी भेसळयुक्त बियाण्याची विक्री केल्यामुळे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याने तक्रारकर्त्याला शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला म्हणून त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 ते 6 यांना वकील श्री बी.बी.सेलूकर यांचे मार्फतीने नुकसान भरपाईसाठी रजिस्टर पोस्टाने कायदेशीर नोटीस पाठविली परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 ते 6 यांनी नोटीसला उत्तर दिले नाही वा कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणून शेवटी त्याने प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 ते 6 यांचे विरुध्द ग्राहक मंचात दाखल करुन विरुध्दपक्षां विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
(01) विरुध्दपक्ष क्रं 1 ते 6 यांनी दोषपूर्ण धानाचे बियाण्याचे नुकसान भरपाईपोटी रुपये-3,98,000/- एवढी रक्कम वार्षिक-18 टक्के दराने व्याजासह तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
(02) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-1,00,000/-, तसेच तक्रार खर्च म्हणून रुपये-20,000/- अशा रकमा विरुध्दपक्ष क्रं 1 ते 6 यांनी तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
(03) या शिवाय योग्य ती दाद तक्रारकर्त्याचे वतीने देण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1) व्यवस्थापक मे.दप्तरी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड, सेलू, जिल्हा वर्धा या धान बियाणे निर्माता कंपनीला ग्राहक मंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली असता त्यांचे तर्फे श्री जे.एच.कोठारी अधिवक्ता यांनी वकीलपत्र दाखल करुन लेखी उत्तरासाठी मुदत मिळण्याबाबत लेखी अर्ज दिनांक-12.04.2017 रोजी ग्राहक मंचा समक्ष दाखल केला, सदरचा अर्ज मंजूर करण्यात आला. परंतु त्यानंतर बरीच संधी देऊनही विरुध्दपक्ष क्रं 1 धान बियाणे निर्माता कंपनीने लेखी उत्तर ग्राहक मंचा समोर दाखल न केल्याने त्यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार त्यांचे लेखी जबाबाशिवाय पुढे चालविण्याचा आदेश ग्राहक मंचाव्दारे प्रकरणात दिनांक-03.06.2017 रोजी पारीत करण्यात आला.
04. विरुध्दपक्ष क्रं 3 ते 5 यांना रजिस्टर पोस्टाने ग्राहक मंचाव्दारे नोटीस पाठविली असता ते ग्राहक मंचा समक्ष हजर न झाल्यामुळे त्यांचे विरुध्द प्रकरणात एकतर्फी आदेश ग्राहक मंचाव्दारे दिनांक-03.06.2017 रोजी पारीत करण्यात आला.
05. विरुध्दपक्ष क्रं 6 तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती मोहाडी, जिल्हा भंडारा यांनी लेखी निवेदन ग्राहक मंचा समोर लेखी निवेदन दिनांक-17.01.2017 रोजी पान क्रं -42 ते पान क्रं- 45 प्रमाणे अभिलेखावर दाखल केले. त्यांनी लेखी निवेदनात असे नमुद केले की, महाराष्ट्र शासन कृषी व पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास यांचे दिनांक-17 ऑक्टोंबर, 2013 रोजीचे शासन निर्णयाप्रमाणे तक्रार प्राप्त होताच त्याची नोंद तात्काळ नोंदवहीत करुन सदर तक्रार अध्यक्ष, तालुका स्तरीय निवारण समिती तथा उपविभागीय कृषी अधिकारी यांना कळवावे आणि त्यानंतर 07 दिवसांचे आत अध्यक्ष, तालुकास्तरीय निवारण समितीने मोका पाहणी करावी असे नमुद आहे. तक्रारकर्त्याने पंचायत समिती मोहाडी यांचे मार्फतीने दिनांक-29.09.2015 रोजी केलेली तक्रार गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांचे मार्फतीने त्यांना (कृषी अधिकारी) दिनांक-03.10.2015 रोजी प्राप्त झाली असता त्यांनी त्याच दिवशी सदर तक्रार अध्यक्ष, तालुकास्तरीय निवारण समितीकडे सादर केली, या बाबत ते सदर पत्रावरील पोच पुराव्या दाखल सादर करीत आहेत. त्यानंतर तालुकास्तरीय निवारण समितीने प्रत्यक्ष मोकापाहणी करण्या बाबत दिनांक-28.10.2015 रोजी पत्र देऊन दिनांक-29.10.2015 रोजी तक्रारकर्त्याचे शेताची मोक्का पाहणी केली व पंचनामा तयार केला. पंचनाम्याचे वेळी समिती सदस्य व्यतिरिक्त कंपनी प्रतिनिधी, विक्रेता व तक्रारकर्ता इत्यादी हजर होते, त्यांचे समोर पाहणी करुन पंचनामा तयार करण्यात आला व उपस्थितांच्या स्वाक्ष-या घेण्यात आल्यात. शेत पाहणीचे वेळी भात पिकात भेसळ (खबरा) हे 115 ते 120 दिवसाचे ठेंगणे, परिपक्व स्थितीत आढळले तसेच मुख्य वाणापेक्षा भेसळ हे हलक्या वाणाचे असल्याचे समितीचे निदर्शनास आले. जमीनीवर भेसळ गळून झडून पडल्याचे समितीला दिसून आले नाही त्यामुळे एक महिन्यानी भेट दिल्यामुळे आधीच भेसळ गळून पडला हे तक्रारकर्त्याचे म्हणणे संयुक्तिक नाही. समितीचे प्रत्यक्ष मोका पाहणी मध्ये 10.42 टक्के भेसळ असल्याचे निदर्शनास आले. सदर धानाच्या उत्पादना बाबत त्यांनी वि.प.क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीशी कोणतीही चर्चा केलेली नाही वा तक्रारकर्त्याला कोणतेही आश्वासन दिलेले नाही त्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रारीतून केलेले सर्व आरोप निराधार आहेत. त्यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांचेशी कोणतेही संगनमत केलेले नसून तक्रार प्राप्त होताच त्वरीत कार्यवाही केली असल्याचे नमुद केले, ते पुराव्या दाखल तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचा क्षेत्रीय भेटीचा अहवाल व पंचनामा दाखल करीत आहेत.
06. विरुध्दपक्ष क्रं 2 मोहाडी अॅग्रो एजन्सी तर्फे प्रोप्रायटर हसन अहमद अब्दुल रहमान या बियाणे विक्रेत्याने लेखी निवेदन अभिलेखावर पान क्रं- 37 ते 38 दाखल केले. विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेत्याने त्याचे कडून तक्रारकर्ता श्री केशवबाबु परसराम मेहर याने बिल क्रं 5703 अन्वये दप्तरी 1008 लॉट क्रं-डीडी-14-7269 एकूण 32 पॅकेट खरेदी केल्याची बाब मान्य केली. त्यांनी सदरचे वाण चौधरी ब्रदर्स, नागपूर डिस्ट्रीब्युटर यांचे कडून खरेदी केले होते. अनेक ग्राहकांनी सदरचे बियाणे विकत घेतले परंतु त्यांची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही परंतु तक्रारकर्ता यांनी तक्रार केल्या नंतर त्यांनी वि.प.क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीला भेसळी बाबत वारंवार कळविले परंतु प्रतिसाद मिळाला नाही. तो किरकोळ विक्रेता असून बियाणे भेसळी संबधात त्याचा कोणताही दोष नसल्याने त्याचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली. त्याने चौधरी ब्रदर्स, नागपूर यांचे कडून बियाणे विकत घेतल्याबाबत ईनव्हाईसची प्रत दाखल केली.
07. तक्रारकर्त्याने पान क्रं 09 वरील दस्तऐवज यादी नुसार शेतीचे सातबारा उतारा प्रत, बियाणे खरेदीचे बिल, ट्रुथफुल लेबल, तक्रारकर्त्याने बियाणे भेसळी संबधात मा.जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी यांचेकडे केलेला अर्ज, तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचा अहवाल व पंचनामा, तक्रारकर्त्याचे वकीलांनी विरुध्दपक्ष क्रं 1 ते 6 यांना रजिस्टर पोस्टाने पाठविलेल्या कायदेशीर नोटीसची प्रत, रजिस्टर पोस्टाच्या पावत्या, रजि. पोच अशा दस्तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने स्वतः पुराव्याचे शपथपत्र ग्राहक मंचा समोर पान क्रं- 74 ते पान क्रं- 80 वर दाखल केले तसेच पान क्रं- 82 ते पान क्रं- 87 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. त्याच बरोबर मा.वरिष्ठ न्यायालयाच्या निवाडयांच्या प्रती दाखल केल्यात आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर यांनी दिलेला धानाचा बाजारभाव प्रत दाखल केली.
08. प्रस्तुत तक्रारी मध्ये तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री सेलूकर यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. मौखीक युक्तीवादाचे वेळी विरुध्दपक्षा तर्फे कोणीही उपस्थित नव्हते.
09. तक्रारकर्त्याची तक्रार, त्याने दाखल केलेले दस्तऐवज, पुराव्याचे शपथपत्र आणि लेखी व मौखीक युक्तीवाद तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेता आणि विरुध्दपक्ष क्रं-6 तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती मोहाडी यांचे लेखी निवेदन इत्यादीचे ग्राहक मंचाव्दारे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन ग्राहक मंचा समोर न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | त.क. हा वि.प.क्रं 1 व 2 अनुक्रमे बियाणे निर्माता व विक्रेता यांचा ग्राहक होतो काय? | -होय- |
02 | वि.प.क्रं 1 बियाणे निर्माता यांचे निर्मित धानाचे बियाणे दोषपूर्ण असल्याने त.क.ला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -होय- |
03 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: कारणे व मिमांसा ::
मुद्दा क्रं 1 ते 3 बाबत-
10. तक्रारकर्त्याने पान क्रं 12 वर दाखल केलेल्या 7/12 उता-या वरुन तक्रारकर्ता आणि त्याचे कुटूंबाचे संयुक्त नावाने मौजा वडेगाव, तलाठी साझा क्रं.14, तालुका मोहाडी येथे भूमापन क्रं-83/1, एकूण क्षेत्रफळ-9 हेक्टर 21 आर एवढी शेतजमीन असल्याची बाब सिध्द होते.
11. तक्रारकर्ता श्री केशवबाबु परसराम मेहर याने विरुध्दपक्ष क्रं 2 मोहाडी अॅग्रो एजन्सीज मोहाडी या स्थानिक विक्रेत्याकडून बिल क्रं 5703 अन्वये विरुध्दपक्ष क्रं-1) दप्तरी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड, सेलू, जिल्हा वर्धा यांचे निर्मित दप्तरी 1008 लॉट क्रं-डीडी-14-7269 एकूण 32 पॅकेट, प्रत्येक पॅकेट वजन 10 किलोग्रॅम व प्रतीपॅकेट दर रुपये-635/- या प्रमाणे एकूण रुपये-20,320/- एवढया किमतीत खरेदी केल्याची बाब पान क्रं- 13 वर दाखल बिलाचे प्रतीवरुन दिसून येते व ही बाब विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 अनुक्रमे धान बियाणे निर्माता कंपनी आणि बियाणे विक्रेता यांना सुध्दा मान्य आहे.
12. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीने जाहिराती मध्ये हेक्टरी 55 ते 65 क्विंटल उत्पादनाची हमी दिली होती. त्याने शेतात धानाचे परे टाकले व खरेदी केलेल्या एकूण 32 धानाच्या पिशवीतील बियाण्यांची रोवणी आपले शेतात दिनांक-19.07.2015 रोजी केली.धान बियाण्याची रोवणी केल्या नंतर जवळपास कमी कालावधीचा 85 दिवसाचा भेसळ व खबरा धान मोठया प्रमाणात शेतात विसवा झाल्याचे त्याचे निर्दशनास आल्याने त्याने दिनांक-30.09.2015 रोजी मा.जिल्हाधिकारी भंडारा आणि कृषी विभागातील अधिकारी यांचे कडे सदर भेसळयुक्त धानाचे बियाण्यां बाबत लेखी तक्रार केली परंतु विरुध्दपक्ष क्रं 3 ते 6 महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागातील अधिकारी हे त्वरीत मोका पाहणीसाठी आले नाहीत तर तक्रार केल्या नंतर एक महिन्याने उशिराने पाहणीसाठी आलेत परंतु तो पर्यंत भेसळ व खबरायुक्त वानाचे निसवा झालेल्या धानाच्या लोंब्या मोठया प्रमाणात गळून पडल्या होत्या, कृषी विभागा तर्फे उशिराने पाहणी केल्यामुळे कमी नुकसान दर्शविणारा अहवाल तयार केल्या गेला. वस्तुतः त्याचे धान पिकाचे एकंदरीत 40 ते 45 टक्के आर्थिक नुकसान झाले असताना विरुध्दपक्षांनी संगनमत करुन केवळ 10.42 टक्के नुकसान झाल्याचा बनावटी व खोटा अहवाल दिला. त्याला प्रतीएकरी 21 क्विंटल प्रमाणे एकूण 22.5 एकर शेती मध्ये 462.50 क्विंटल एवढे अपेक्षीत उत्पादन येणे आवश्यक होते. कृषी उत्पन बाजार समितीचे दरा नुसार धानास प्रतीक्विंटल रुपये-2000/- असा दर आहे त्यामुळे त्याला एकूण अपेक्षीत उत्पन्न रुपये-9,25,000/- मिळावयास हवे होते. त्याचे 40 टक्के अपेक्षीत उत्पादनाचे नुकसान झालेले असल्याने अंदाजे रुपये-3,98,000/- एवढया उत्पन्नाचे नुकसान झाल्याचे म्हणणे आहे.
13. तक्रारकर्त्याने त्याचे तक्रारीमध्ये जरी विरुध्दपक्ष क्रं 1 ते 6 विरुध्द संगनमताने पिक पाहणी करुन खोटा क्षेत्रीय भेटीचा अहवाल व पंचनामा तयार केला असा जो आरोप केलेला आहे तो ग्राहक मंचाव्दारे मान्य करता येत नाही याचे कारण असे आहे की, तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचा क्षेत्रीय भेटीचा अहवाल जो पान क्रं 16 ते पान क्रं- 20 वर दाखल आहे, त्याचे अवलोकन ग्राहक मंचाव्दारे करण्यात आले, सदर अहवालावर महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विद्दापिठाचे शास्त्रज्ञ, महाबीज अकोला यांचे प्रतिनिधी, बियाणे निर्माता कंपनीचे प्रतिनिधी, विक्रेता तसेच तक्रारकर्ता श्री केशव परसराम मेहर यांच्या सहया केलेल्या आहेत. तक्रारकर्त्याला जर तालुका स्तरीय समितीने दिलेल्या अहवालावर जर आक्षेप होता तर त्याने पाहणीचे वेळीच असा आक्षेप नोंदावयास हवा होता परंतु त्याने तसे केलेले नाही. तसेच सदर समितीमध्ये शासनाचे तज्ञ अधिकारी, शास्त्रज्ञ यांचा समावेश असून त्यांनी तयार केलेल्या अहवालावर ग्राहक मंचाला अविश्वास ठेवण्याचे कोणतेही प्रयोजन वाटत नाही म्हणून ग्राहक मंचाव्दारे तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचा अहवाल तक्रार निकाली काढण्यासाठी विचारात घेण्यात येत आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याचे सदरचे आक्षेपा मध्ये ग्राहक मंचाला कोणतेही तथ्य दिसून येत नाही.
14. तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीचे अहवाला नुसार तक्रारकर्त्याचे शेताची दिनांक-29.10.2015 रोजी पाहणी करण्यात आली. सादर अहवालामध्ये तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 निर्माता कंपनीचे धानाचे बियाणे शेतात प्रतीबॅग 10 किलोग्रॅम प्रमाणे एकूण 32 बॅग एकूण 9 हेकटर 21 आर क्षेत्रात वापरल्याचे सुध्दा नमुद आहे. पेरणीची तारीख 25.05.2015, पुर्नलागवडीची तारीख 19.07.2015 नमुद आहे. तसेच खताची फवारणी केल्याचे नमुद आहे. तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या अहवालात पुढे असे नमुद केलेले आहे की, भेसळीचे प्रमाण 10.42 टक्के आहे व त्याचे कारण सदोष बियाणे असल्याचे नमुद आहे. तक्रारकर्त्याने साक्षीमध्ये शेतात विरुध्दपक्ष क्रं 1 निर्मित एकूण 320 किलोग्रॅम बियाणे पेरल्याचे व किटकनाशकाचा वापर केल्याचे नमुद केलेले आहे.
15. तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीच्या अहवाला प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीव्दारे निर्मित सदोष बियाणे असल्याची बाब सिध्द झाल्यामुळे तक्रारकर्त्याचे अपेक्षीत उत्पन्नाचे आर्थिक नुकसान झाले व त्यामुळे त्याला निश्चीतच शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे कंपनी निर्मित धानाचे सदोष बियाणे तक्रारकर्त्याला विकून दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते.
16. तक्रारकर्त्याची पारंपारीक शेती पध्दती आणि जलसिंचन तसेच मशागत, रासायनिक औषधी व किटकनाशकाचा केलेला वापर पाहता ग्राहक मंचा तर्फे धानाचे प्रति एकर सरासरी 20 क्विंटल एवढे अपेक्षीत उत्पादन हिशोबात धरण्यात येते, त्यानुसार तक्रारकर्त्याचे एकूण 9 हेक्टर 21 आर क्षेत्रा (22 एकर) करीता अपेक्षीत धान उत्पादन 440 क्विंटल हिशोबात धरण्यात येते. तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीच्या अहवाला प्रमाणे अपेक्षीत उत्पादनाच्या 10.42 टक्के घट (पूर्णांकात 10.50 टक्के घट) आल्याची बाब लक्षात घेता तक्रारकतर्याचे अपेक्षीत उत्पादनापोटी 48.40 एवढया क्विंटल धानाचे उत्पादनाची घट झालेली आहे.
17. तक्रारकर्त्याने माहे डिसेंबर-2015 ते एप्रिल 2016 चे हंगामात धान 1008 चे कृषी उत्पन बाजार समिती तुमसर यांनी दिलेल्या दरपत्रकाची प्रत पान क्रं.102 वर अभिलेखावर दाखल केलेली आहे, त्यानुसार एप्रिल-2016 मध्ये किमान दर रुपये 1871/- आणि कमाल दर रुपये-2490/- एवढा दिलेला आहे, त्यामुळे ग्राहक मंचाव्दारे प्रती क्विंटल 2000/- एवढा दर विचारात घेण्यात येतो. या हिशोबा नुसार तक्रारकर्त्याला अपेक्षीत उत्पन्नाचे नुकसानी मध्ये आलेली घट 48.40 क्विंटल किलोग्रॅमसाठी साठी रुपये-96,800/- एवढी नुकसान भरपाई विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीकडून मंजूर करणे योग्य व न्यायोचित आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 निर्माता कंपनी व विरुदपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेता यांनी दिलेल्या दोषपूर्ण बियाण्यामुळे तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-5000/- एकूण रुपये-15,000/- वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 3 ते 6 संबधित कृषी अधिकारी यांनी तक्रारकर्त्याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिल्याचा कोणताही पुरावा ग्राहक मंचा समोर आलेला नसल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
18. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
:: आदेश ::
- तक्रारदारांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 दप्तरी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड, या धान बियाणे निर्माता कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं-2 मोहाडी अॅग्रो एजन्सी तर्फे प्रोप्रायटर हसन अहमद अब्दुल रहमान यांचे विरुध्द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं (1) दप्तरी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड, या धान निर्माता कंपनीने धानाचे अपेक्षीत उत्पन्नाचे नुकसानीपोटी तक्रारदार यांना रुपये- 96,800/- (अक्षरी श्याण्णऊ हजार आठशे फक्त) एवढी नुकसान भरपाईपोटीची रक्कम प्रस्तुत तक्रार दाखल दिनांक-24.11.2016 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-12 टक्के व्याज दरासह अदा करावी.
- विरुध्दपक्ष क्रं-(1) व (2) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) द्यावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी उपरोक्त नमुद केल्या नुसार प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
- सदर अंतिम आदेशातील मुद्या क्र. 2 मधील धानाचे अपेक्षीत उत्पन्नापोटी नुकसान भरपाईची रक्कम विरुध्द पक्ष क्रं. 1 बियाणे निर्माता कंपनीने तक्रारदाराला विहीत मुदतीत न दिल्यास, विरुध्दपक्ष क्रं. 1 निर्माता कंपनी ही नमुद नुकसान भरपाईची रक्कम मुदतीनंतर पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15% दराने दंडनीय व्याजासह येणारी रक्कम तक्रारदाराला अदा करण्यास जबाबदार राहिल.
- विरुध्दपक्ष क्रं-3) ते 6) यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- तक्रारदाराला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.