तक्रारदारातर्फे अॅड. कसबेकर हजर.
जाबदेणारांतर्फे अॅड. घोणे हजर
द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
** निकालपत्र **
(19/11/2013)
प्रस्तुतची तक्रार, तक्रारदारांनी जाबदेणार कंपनीविरुद्ध सेवेतील त्रुटीकरीता ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे. यातील कथने खालीलप्रमाणे आहेत.
1] तक्रारदार हे मयुर कॉलनी, कोथरुड येथील रहीवासी असून, त्यांनी जाबदेणार यांचेकडून दि. 08/03/2011 रोजी कॉम्प्युटरचे साहित्य विकत घेतले होते. त्यामध्ये सी.पी.यु., इन्टेल सी-2, डी 2.93, जी.एच. इन्टेल चिपसेट नोटरेबल खरेदी केले होते व त्याची किंमत रक्कम रु. 19,400/- होती. सदरचे उपकरण चालू केले असता तक्रारदार यांच्या असे लक्षात आले की, सदरचे उपकरण हे मागणी केल्याप्रमाणे नाही. बाजारातील त्याची किंमत रक्कम रु. 2,000/- असताना, जाबदेणार यांनी त्यांचेकडून रक्कम रु. 5,400/- घेतले, म्हणजे रक्कम रु. 3,400/- ज्यादा घेतले. जाबदेणार यांचेकडे सदरचे उपकरण दुरुस्तीसाठी दिले असता, त्यांनी ते दुरुस्त करुन दिले नाही. म्हणून तक्रारदार यांचे नुकसान झाले. त्यासाठी तक्रारदार यांनी रक्कम रु. 20,000/- ची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे, तक्रारदार यांनी त्यांना झालेला मानसिक त्रास, दु:ख व वेदनेपोटी रक्कम रु. 20,000/- आणि कोर्टाचा खर्च रक्कम रु. 15,000/- मागितलेला आहे.
2] जाबदेणार यांनी प्रस्तुत प्रकरणात उपस्थित होवून त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले. जाबदेणार यांच्या कथनानुसार, तक्रारदारांनी सदरचे उपकरण विकत घेतले होते, त्यावेळी सदर उपकरण तपासून, त्याचा दर्जा तपासून घेतला होता. तक्रारदार यांनी त्यांच्याकडे अटी व शर्तींप्रमाणे ताबडतोब कोणतीही तक्रार केली नाही, त्यामुळे तक्रारदार यांची मागणी चुकीची आहे. तक्रारदार यांनी नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 20,000/- ची मागणी केलेली आहे, ही बाब चुकीची आहे. तक्रारदार यांची तक्रार फेटाळण्यात यावी, अशी मागणी जाबदेणार यांनी केलेली आहे.
3] दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदोपत्री पुरावे आणि लेखी कथने विचारात घेता खालील मुद्दे निश्चित करण्यात येत आहेत. सदरचे मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र. | मुद्ये | निष्कर्ष |
1. | जाबदेणार यांनी तक्रारदार यांना कमी प्रतीचे उपकरण विकून दुषित सेवा दिली आहे का ? | होय |
2 . | अंतिम आदेश काय ? | तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते |
कारणे
4] तक्रारदार यांनी आपल्या कथनाच्या पुष्ठ्यर्थ संबंधीत उपकरण विकत घेतल्याची पावती, नोटीशीची स्थळप्रत व शपथपत्र दाखल केले आहे. जाबदेणार यांनी आपल्या लेखी म्हणण्यामध्ये, तक्रारदार यांनी सदरचे उपकरण त्यांच्याकडून खरेदी केल्याचे कबुल केलेले आहे. परंतु, जाबदेणार यांच्या कथनानुसार, तक्रारदार यांनी संबंधीत उपकरणाबाबत ताबडतोब तक्रार करणे आवश्यक होते. तक्रारदार यांनी सदरच्या उपकरणाबाबत ताबडतोब तक्रार न केल्यामुळे आता त्यांना तक्रार करता येणार नाही. जाबदेणार यांच्या कथनानुसार, तक्रारदार यांनी मागितलेली नुकसान भरपाई ही अवास्तव आहे आणि तक्रारदार यांनी, त्यांना व्यवसायामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई मागितलेली आहे व व्यावसायिक नुकसान भरपाईची तक्रार ग्राहक मंचामध्ये चालणार नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पावतीच्या मागे काही अटी व शर्ती लिहिलेल्या आहेत. परंतु त्यावर जाबदेणार यांची सही नाही. जाबदेणार यांनी सदरच्या अटी व शर्तींमध्ये असा उल्लेख केला आहे की, माल खरेदी केल्यापासून एक आठवड्याच्या आंत संबंधीत मालाविषयी तक्रार करणे आवश्यक आहे. पावतीवरील काही अटी व शर्तींखाली जर एखाद्या व्यक्तीची सही नसेल तर, त्या अटी व शर्ती त्या व्यक्तीस मान्य आहेत, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. तक्रारदार यांच्या कथनानुसार, त्यांनी दि. 8/3/2011 रोजी सदरचे उपकरण खरेदी केले होते व
ताबडतोब तक्रार केलेली होती. दि. 20/4/2011 रोजी तक्रारदार यांनी यासंबंधी जाबदेणार यांना वकीलामार्फत नोटीस पाठविलेली होती. या पुराव्यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी सदरची तक्रार ही मुदतीत दाखल करुन दाद मागितलेली आहे. म्हणून तक्रारदार हे जाबदेणार यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरतात.
5] तक्रारदार यांनी, त्यांना व्यवसायामध्ये झालेल्या नुकसानापोटी रक्कम रु. 20,000/- आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 20,000/- मागितलेले आहेत. तक्रारदार यांच्या या मागण्या अवास्तव असल्यामुळे मान्य करता येणार नाहीत. त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये झालेले नुकसान ग्राहक मंचामध्ये मागता येत नाही. तथापी, तक्रारदार हे, त्यांना आलेला खर्च व योग्य तो मोबदला मिळण्यास पात्र ठरतात. वर उल्लेख केलेले कथनांचा विचार करता, खालील आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना कमी प्रतीचे
उपकरण विकून दुषित सेवा दिली आहे, असे
जाहीर करण्यात येते.
3. तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेकडे सदरचे उपकरण
3. परत करावे व जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम
रु. 19,400/- (रु. एकोणीस हजार चारशे फक्त),
मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाईपोटी
रक्कम रु.3,000/-(रु. तीन हजार फक्त) व तक्रारीच्या
खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- (रु. दोन हजार फक्त)
या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या
आंत द्यावी.
4. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
5. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की
त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक
महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे
संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट
करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 19/नोव्हे./2013