तक्रारदार : वकील श्री.विजय अग्रवाल यांचे मार्फत हजर. सामनेवाले : वकील श्री.प्रतापचंद्रा यांचे मार्फत हजर..
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाली ही विमा कंपनी आहे. तक्रारदारांकडे हलके चार चाकी वाहन चालविण्याचा परवाना क्र.LMV 14245 होता. तक्रारदारांनी फेब्रृवारी 2008 मध्ये टाटा इंडीका कार हे वाहन खरेदी केले. व ते व्यवसायाकामी तसेच टुरीस्ट टॅक्सी म्हणून वापरावयाचे ठरविले. तक्रारदारांनी हे वाहन नोंदविणेकामी परीवहन अधिकारी, ठाणे यांचेकडे नेले व परीवहन अधिकारी, ठाणे यांनी तक्रारदारांना त्या वाहनाकरीता शिकाऊ वाहन परवाना जारी केला. तक्रारदारांनी त्याच वाहनाकरीता सा.वाले यांचेकडून विमा पॉलीसी विकत घेतली होती.
2. तक्रारदारांचे तक्रारीतील कथनाप्रमाणे दिनांक 3.4.2008 रोजी तक्रारदार आपल्या टाटा इंडीका कार मधून बोरीवली ते अंधेरी पश्चिम दृतगती मार्गावरुन जात होते. त्या मार्गावर पुलाच्या दुरुस्तीचे काम चालु होते. व तिथे खड्डा खणलेला होता. परंतु त्या बद्दल कुठलीही सूचना फलक त्या बद्दल लावण्यात आलेला नव्हता. तक्रारदारांना त्या खंडयाची कल्पना नसल्याने तक्रारदारांचे वाहन त्या खंडयामध्ये पडले व उलटे झाले. तक्रारदारांनी आपले वाहन दुरुस्तीकामी टाटा मोटर यांचे दुरुस्ती सेवा केंद्र बोरीवली (पूर्व) यांचेकडे नेले. व दुरुस्ती नंतर दुरुस्ती सेवा केंद्राने तक्रारदारांकडून रु.52,847/- वसुल केले. त्यानंतर तक्रारदारांनी विमा करारा अंतर्गत सा.वाले यांचेकडे मागणीपत्र सादर केले. सा.वाले यांनी आपले पत्र दिनांक 9.6.2008 प्रमाणे तक्रारदारांची मागणी फेटाळली. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांना दिनांक 26.6.2009 रोजी रजिस्टर पोस्टाने नोटीस दिली. व खर्चाच्या प्रतिपुर्तीची मागणी केली. सा.वाले यांनी त्या नोटीसीला दाद न दिल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली. व सा.वाले यांचेकडून खर्चाच्या प्रतिपुर्तीची रक्कम रु.52,847/- त्यावर 18 टक्के व्याज अधिक नुकसान भरपाई रु.1 लाख वसुल होणेकामी दाद मागीतली.
3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व सा.वाले यांनी असे कथन केले की, दिनांक 9.6.2008 रोजी सा.वाले यांनी तक्रारदारांना पाठविलेले पत्र खुलासा मागविणारे होते व ते मागणी नाकारण्या बद्दलचे नव्हते. परंतु तक्रारदारांनी त्या बद्दल अधिकची माहिती अथवा खुलासा सादर केलेला नाही.
4. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये पुढे असे कथन केले की, तक्रारदार यांनी खरेदी केलेले वाहन टाटा इंडीका कार करीता तक्रारदारांना परीवहन अधिका-यांनी शिकाऊ परवाना दिलेला होता. व तक्रारदारांकडे त्या स्वरुपाचे वाहन चालविण्याचा कुठलाही कायमचा परवाना नव्हता. सा.वाले यांचे कथना प्रमाणे वाहन चालविण्याकरीता शिकाऊ परवाना असेल तर शिकविणारी व्यक्ती बाजूस असल्या शिवाय परवाना धारकाने वाहन चालवू नये असे मोटर कायद्याचे नियम 3 मध्ये तरतुद आहे. या तरतुदींचा भंग करुन तक्रारदारांनी टाटा इंडीका कार जे टॅक्सी म्हणून नोंदविण्यात आलेले होते ते स्वतः चालविले व अपघात झाला. या प्रकारे तक्रारदारांनी वाहन परवान्याचा भंग केलेला असल्याने तक्रारदार हे विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाई वसुल करण्यास पात्र नाहीत असे सा.वाले यांनी कथन केले.
5. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत शपथपत्र, व पुराव्याचे कागदपत्र हजर केले. सा.वाले यांनी देखील आपल्या कैफीयती सोबत कागदपत्रे हजर केली. दोन्ही बाजुंनी लेखी युक्तीवाद दाखल केला.
6. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना विमा कराराप्रमाणे नुकसान भरपार्इ अदा करण्यास नकार देवून सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाई वसुल करण्यास पात्र आहेत काय | नाही. |
3. | अंतीम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
7. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये तसेच लेखी युक्तीवादात ही बाब मान्य केली आहे की, त्यांनी फेब्रृवारी,2008 मध्ये खरेदी केलेले टाटा इंडीका वाहन हे टुरीस्ट टॅक्सी म्हणून नोंदविण्यात आलेले होते. व परीवहन अधिकारी, ठाणे यांनी तक्रारदारांना त्या वाहनाचे संदर्भात शिकाऊ परवाना जारी केला होता. त्या परवान्याची प्रत तक्रारदारांनी तक्रारी सोबत हजर केली आहे. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीतच कबुल केले आहे की, दिनांक 3.4.2008 रोजी तक्रारदार ते वाहन म्हणजे टाटा इंडीका कार एकटेच चालवित होते व रस्ता दुरुस्तीचे काम जिथे चालू होते तिथे खंडयामध्ये तक्रारदारांचे वाहन पडले व वाहनास अपघात झाला. या वरुन तक्रारदार तक्रारीमध्ये ही बाब मान्य करतात की, तक्रारदार हे एकटेच वाहन चालवित होते व सूचना देणारे कुणीही उपलब्ध नसताना तक्रारदारांचे वाहन रस्त्यामधील खंडयात पडले व तक्रारदारांचे वाहनास अपघात झाला.
8. सा.वाले यांनी आपल्या लेखी युक्तीवादामध्ये मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 3 उधृत केलेले आहे. व त्यामध्ये असे नमुद केलेले आहे की, कुठल्याही व्यक्तीने वैध वाहन परवाना असल्याशिवाय सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवू नये. सा.वाले यांनी आपल्या लेखी युक्तीवादामध्ये केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 चा नियम 3 उधृत केलेला आहे. त्यामध्ये वाहन चालविणारी व्यक्ती जर प्रशिक्षण घेत असेल तर त्यास वरील नियम लागू होत नाही. परंतु त्या व्यक्तीकडे शिकाऊ परवाना असणे आवश्यक आहे व वाहन शिकविणारी व्यक्ती त्या व्यक्तीचे शेजारी असणे आवश्यक आहे.
9. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये तक्रारदार चालवित असलेले वाहन टुरीस्ट टॅक्सी म्हणून नोंदविण्यात आलेले होते व त्याकामी तक्रारदारांकडे शिकाऊ वाहन वाहन चालकाचा परवाना होता. मोटर वाहन कायद्याचे वरील नमुद केलेल्या तरतुदीप्रमाणे तक्रारदारांना वाहन चालविण्यास शिकविणारी व्यक्ती शेजारी असल्या शिवाय ते वाहन चालविणे अपेक्षित नव्हते. परंतु तक्रारदारांनी स्वतःकडे केवळ शिकाऊ वाहन परवाना असतांना व वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणारी व्यक्ती सोबत नसतांना वाहन चालविले व रस्त्यावरील खंडयामध्ये वाहन पडले व वाहनास अपघात झाला. या प्रकारे तक्रारदारांनी मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 3 व मोटर वाहन नियम 1989 चा नियम 3 यांचा भंग केला आहे.
10. या संदर्भात सा.वाले यांचे वकीलांनी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या NEW INDIA ASSURANCE CO.LTD V/S PRABHU LAL I ( 2008) CPJ 1 (SC) निकाल दिनांक 30.11.2007 या न्याय निर्णयाचा आधार घेतला. त्या प्रकरणामध्ये मुळचे तक्रारदारांनी टाटा 709 हे माल वाहतुक करणारे वाहन खरेदी केले होते. व तक्रारदारांनी नेमलेले चालक हे ते वाहन चालवित असतांना मध्यप्रदेश परिवहन मंडळाचे बसने तक्रारदारांचे वाहनास धडक दिेली. व त्यामध्ये बसचे चालकाचे विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारदारांचे भाऊ श्री.रामनारायण हे त्याच वाहनाने प्रवास करीत होते व अपघातामध्ये श्री.रामनारायण यांना जबर इजा व दुखापती झाल्या. त्यानंतर तक्रारदारांनी विमा कंपनीकडे आपले मागणीपत्र सादर केले. परंतु विमा कंपनीने तक्रारदारांची मागणी नाकारली. त्यानंतर तक्रारदारांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. व त्यामध्ये जिल्हा ग्राहक मंचाने उपलब्ध पुराव्यावरुन असा निष्कर्ष नोंदविला की, तक्रारदारांचे बंधू रामनारायण हेच वाहन चालवित होते व अपघाताचे वेळेस श्री.रामनारायण यांचेकडे हलके वाहन चालविण्याचा (LMV ) परवाना होता. व श्री.रामनारायण हे माल वाहतुक करणारे वाहन (Transport Vehicle ) चालवू शकत नव्हते. या प्रकारे वाहन परवान्याचा भंग झाल्याने जिल्हा ग्राहक मंचाने त्या प्रकरणातील तक्रारदारांनी तक्रार रद्द केली.
11. तक्रारदारांनी त्या आदेशाचे विरुध्द केलेले अपील मध्य प्रदेश राज्य आयोग यांनी मंजूर केले. व मा.राष्ट्रीय आयोगाने राज्य आयोगाचा निकाल कायम केला व विमा कंपनीने तक्रारदारांना मागणी केलेली रक्कम व्याजासह अदा करावी असा आदेश दिला.
12. राष्ट्रीय आयोगाच्या त्या निकाला नंतर विमा कंपनीने मा.सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. व मा.सर्वोच्च न्यायालयाने मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 2 मधील वाहन चालविण्याचा परवाना, माल वाहतुक करणारे वाहन, हलके वाहन व सार्वजनिक वाहतुक करणारे व माल वाहतुक करणारे वाहन या सर्व वाहनाचे संदर्भात दिलेल्या व्याख्यांचा उहापोह केला. त्यानंतर मा.सर्वोच्च न्यायालयाने मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 3 मधील वाहन चालविण्याचे परवान्याच्या तरतुदींचा उहापोह केला. मा.सर्वोच्च न्यायालयाचे असा अभिप्राय नोंदविला की, प्रकरणातील वादग्रस्त वाहन हे माल वाहतूक म्हणून नोंदविले गेले होते तर श्री.रामनारायण यांचेकडे हलके वाहन चालविण्याचा परवाना होता व माल वाहतुक चालविण्याचा परवाना नव्हता. तरी देखी श्री.रामनारायण यांनी माल वाहतुक करणारे वाहन चालविल्याने मोटर वाहतुक कायद्याचे कलम 3 चा भंग केला व या प्रकारे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत. या प्रकारे विमा कंपनीचे अपील मंजूर करण्यात आले. वरील न्याय निर्णयातील मा.सर्वोच्च न्यायालयाचे अभिप्राय प्रस्तुत प्रकरणामध्ये देखील पुरेपुर लागू होतात. प्रस्तुत प्रकरणामध्ये देखील तक्रारदारांकडे ट्रान्सपोर्ट वाहनाचा शिकाऊ परवाना होता. व परवान्यातील अटी प्रमाणे तक्रारदार सार्वजनिक ठिकाणी केवळ शिकाऊ उमेदवार म्हणून वाहन चालवू शकत होते. परंतु त्यांचे सोबत प्रशिक्षण देणारी व्यक्ती असणे आवश्यक होते. त्याबाबीची पुर्तता येथे झालेली नसल्याने तक्रारदार सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत. कारण तक्रारदारांनी स्वतःच विमा करारातील शर्ती व अटींचा भंग केलेला आहे.
13. या उलट तक्रारदारांचे वकीलांनी आपले युक्तीवादाचे पृष्टयर्थ मा.सर्वोच्च न्यायालयाच्या JITENDRA KUMAR V/S ORIENTAL ISURANACE CO.LTD. AND ANOTHER 2003 ACJ 1441 निकाल दिनांक 17.7.2003 या निकालपत्राचा आधार घेतला. त्या निकालपत्रामध्ये वाहन चालकाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. तरी देखील मा.सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपनीस विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्याचा आदेश दिला. परंतु त्या प्रकरणामध्ये वाहनास वाहनातील तांत्रिक दोषामुळे आग लागली होती. व त्यामध्ये वाहनाचे नुकसान झालेले होते. प्रस्तुतचे प्रकरणामध्ये झालेला अपघात वाहनाचे तांत्रिक दोषामुळे झालेला नसून तक्रारदार वाहन चालवित असतांना झालेला आहे. सबब मा.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रस्तुतचे प्रकरणास लागू होणार नाही. त्यानंतर तक्रारदारांचे वकीलांनी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या MAHAMOODA AD OTHERS V/S UNITED INDIA INSURANCE CO.LTD. AND OTHERS 2006 ACJ 2825 निकाल दिनांक 20.9.2004 व मा. राजस्थान,जयपूर उच्च न्यायालयाच्या SHIVPAL SINGH V/S LAL CHAND AND OTHERS 2010 ACJ 1120निकाल दिनांक 18.2.2008 या न्याय निर्णयाचा आधार घेतला. परंतु त्या प्रकरणामध्ये तक्रारदारांनी म्हणजे त्रयस्त व्यक्तीची मागणी विमा कंपनीकडे नुकसान भरपाईकामी हेाती. प्रस्तुतचे प्रकरणामध्ये वाहनाचे मालक म्हणजे तक्रारदार हे स्वतः चे नुकसानीकामी नुकसान भरपाई ( Own Damages ) नुकसान भरपाई मागत आहेत. त्यानंतर तक्रारदारांचे वकीलांनी मा.हिमाचल प्रदेश,सिमला उच्च न्यायालयाच्या ORIENTAL INSURAACE CO.LTD V/S JAI DEVI AND OTHERS 2010 ACJ 1398 निकाल दिनांक 24.3.2009 चा आधार घेतला. त्या प्रकरणात देखील वाहनाचे मालका व्यतिरिक्त अन्य व्यक्ती म्हणजे त्रयस्त व्यक्ती (Third Party ) यांनी नुकसान भरपाई मागीतली आहे. त्यावरुन तो निकाल देखील प्रस्तुतचे प्रकरणास लागू होत नाही.
14. त्यानंतर तक्रारदारांचे वकीलांनी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या NATIONAL INSURANCE CO.LTD V/S ANNAPPA IRAPPA NESARIA AND OTHERS 2008 ACJ 721 निकाल दिनांक 22.1.2008 या निकाल पत्राचा संदर्भ दिला. त्यामध्ये वाहन चालकाकडे हलके चार चाकी वाहन चालविण्याचा (LMV) परवाना होता परंतु वाहन चालकाने माल वाहतुक करणारे वाहन चालविले होते. या संदर्भात विमा कंपनीचा आक्षेप फेटाळून मा.सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपनीस नुकसान भरपाई अदा करण्याचा आदेश दिला. त्या प्रकरणामध्ये वाहन चालकाकडे संबंधित वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना नव्हता तर हलके वाहन चालविण्याचा परवाना होता. परंतु वाहन चालकाने माल वाहतुक करणारे वाहन चालविले होते. या उलट प्रस्तुत प्रकरणामध्ये वाहन चालकाकडे टाटा इंडीका कारचे संदर्भात शिकाऊ वाहन परवाना होता व वाहन परवान्यातील अटींचा भंग करुन तक्रारदारांनी ते वाहन स्वतः चालविले. या प्रकारे मा.सर्वोच्च न्यायालयाचा वरील प्रकरणातील न्याय निर्णय प्रस्तुतचे प्रकरणास लागू होणार नाही.
15. वरील सर्व न्याय निर्णयाची चर्चा केल्यानंतर असे दिसून येते की, त्रयस्त व्यक्तीचे संबंधात (Third Party ) जर नुकसान भरपाईची मागणी केलेली असेल तर वाहन परवानातील शर्ती व अटींचा भंग झाला हा मुद्दा गौण ठरतो. परंतु प्रस्तुत प्रकरणामध्ये त्रयस्त व्यक्ती नुकसान भरपाईची मागणी करीत नसून वाहनाचे मालक स्वतः वाहनाचे झालेल्या नुकसानी बद्दल नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत. तक्रारदारांनी स्वतःच वाहन परवान्याचे संदर्भात शर्ती व अटींचा भंग केल्याने त्रयस्त व्यक्तीने केलेल्या नुकसान भरपाईचे मागणीचे संदर्भात लागू होणारे नियम व कर्तव्ये प्रस्तुत प्रकरणास लागू होणार नाही. त्यातही विमा कंपनीने दिनांक 9.6.2008 रोजी पाठविलेल्या पत्रामध्ये खुलासा मागीतला हेाता व मागणी स्पष्टपणे फेटाळली नव्हती. तथापी तक्रारदारांनी सा.वाले कंपनीने नुकसान भरपाईची मागणी फेटाळली आहे असा अर्थ काढून सा.वाले यांचे विरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
16. वरील परिस्थितीमध्ये व पुराव्याचा एकंदर विचार करता सा.वाले यांनी तक्रारदारांना विमा कराराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढणे शक्य नाही.
17. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 704/2009 रद्द करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्यपाठविण्यात
याव्यात.