(आदेश पारीत व्दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी- मा.अध्यक्ष)
1. तक्रारकर्तांनी सदरील तक्रार मंचासमक्ष कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारकर्तांनी तक्रारीत असे कथन केलेले आहे की, स्व.रफिक इब्राहिम इनामदार यांचा दिनांक 11.09.2015 रोजी सोनगांव, लोणी रस्त्यावर लोणी शिवारामध्ये अपघात होऊन निधन झाले. तक्रारकर्ता नं.1 ह्या स्वर्गीय रफिक इनामदार यांच्या पत्नी असून तक्रारकर्ता नं.2 ते 5 हे त्यांचे कायदेशीर वारस आहेत. व ते तक्रारकर्ता नं.2 ते 5 ही त्यांची अपत्ये असल्याने सदर तक्रार तक्रारकर्ता नं.1 तर्फे दाखल केलेली आहे. तक्रारकर्ता नं.1 यांचे दिवंगत पती रफिक इब्राहिम इनामदार यांचा दिनांक 25.11.2014 ते 24.11.2017 या कालावधीकरीता सी.आय.एफ.सी.033 या प्लॅन खाली इन्शुरन्स पॉलीसी रु.1,650/- प्रिमीयमची रक्कम भरुन एकूण रु.3,00,000/- ची ग्रुप पर्सनल अॅक्सीडेन्ट मॅस्टर पॉलिसी सामनेवालाकडून उतरविली होती. तक्रारकर्ता नं.1 यांचे पतीचे निधन दिनांक 11.09.2015 रोजी अपघातामुळे झाले. तक्रारकर्तांने सामनेवालाकडे कायदेशीर दस्तावेज पुरवून विमा दावा सादर केला. सामनेवाला यांनी दिनांक 09.09.2016 रोजी पत्रा व्दारे तक्रारकर्तां नं.1 चे पती रफिक इब्राहिम इनामदार यांनी विष प्राशन करत आत्महत्या केली असल्याने पॉलीसीचे शर्त व अटी नुसार तक्रारकर्ता यांचा क्लेम मंजुर होऊ शकत नाही असे कळविले. सामनेवालाने चुकीचे कारण कळवून तक्रारकर्तांचा विमा दावा नामंजूर केला ही बाब सामनेवालाने तक्रारकर्तांसप्रति अनुचित व्यवहार प्रथेचा अवलंब केला, म्हणून सदरील तक्रार तक्रारकर्तांनी मंचासमक्ष दाखल केली आहे.
3. तक्रारकर्तांनी तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाला यांनी तक्रारकर्तांचे विमा दाव्याची रक्कम रुपये 3,00,000/- व्याजासह तक्रारकर्तांना देण्याचा आदेश व्हावा. तक्रारकर्तांना झालेल्या शारीरीक व मानसिक, आर्थिक त्रासापोटी खर्च व तक्रारीचा खर्च सामनेवालाकडून मिळण्याचा आदेश व्हावा.
4. तक्रारकर्तांची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्यात आली. सामनेवाला यांना नोटीस प्राप्त होऊनसुध्दा ते प्रकरणात हजर झाले नाही. म्हणून दिनांक 05.07.2018 रोजी सामनेवाला यांचे विरुध्द सदर तक्रार एकतर्फा चालविण्याचे आदेश निशाणी क्र.1 पारीत करण्यात आले.
5. तक्रारकर्तांनी दाखल तक्रार, दस्तावेज तसेच तोंडी युक्तीवादावरुन मंचासमक्ष खालील निष्कर्षावरुन अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
निष्कर्ष
6. तक्रारकर्ती नं.1 ही स्व.रफिक इब्राहिम इनामदार यांची पत्नी असून तसेच तक्रारकर्ता नं.2 ते 5 हे त्यांचे कायदेशीर अपत्य आहे. स्व.रफिक इब्राहिम इनामदार यांनी सामनेवालाकडून ग्रुप पर्सनल अॅक्सीडेन्ट मॅस्टर पॉलिसी घेतली होती व त्याचा कालावधी दिनांक 25.11.2014 ते 24.11.2017 पर्यंत होती ही बाब तक्रारकर्तांनी निशाणी 5 वर दाखल दस्त क्र.1 पॉलीसीचे प्रमाणपत्रावरुन सिध्द होते. म्हणून तक्रारकर्ते हे सामनेवालाचे ग्राहक आहे असे सिध्द होते. स्व.रफिक इब्राहिम इनामदार यांचे दिनांक 11.09.2015 रोजी झाले. स्व.रफिक इब्राहिम इनामदार यांचा मृत्यू लोणी बुद्रुक शिवारात पाण्याचे तळयात पडून झालेले आहे, ही बाब तक्रारकर्ताने निशाणी क्र.5 वर दाखल केलेले मरनोत्तर पंचनाम्यावरुन सिध्द होते. मयत स्व.रफिक इब्राहिम इनामदार यांचा पाण्यात तळयात बुडून मृत्यू झाले असे सिध्द होते. सामनेवाला नोटीस प्राप्त होऊनसुध्दा ते प्रकरणात हजर होऊन त्यांची बाजू मांडली नाही. त्यांना तक्रारकर्तांनी तक्रारीत सामनेवाला विरुध्द लावलेले आरोप सिध्द होत आहेत. तसेच सामनेवालाने प्रकरणात कोणताही पुरावा सादर केलेला नाही की, मयताची मृत्यू ही आत्महत्या चे आहे. म्हणून दिनांक 09.09.2016 रोजी तक्रारकर्तांचा विमा दावा चुकीचे कारणाने नाकारला आहे असे सिध्द होते. व सामनेवालाने तक्रारकर्तांचा विमा दावा नाकारुन तक्रारकर्तांना न्युनत्तम सेवा दिलेली आहे. तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे असे सिध्द होते. सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अं ति म आ दे श –
1. तक्रारकर्तांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांनी तक्रारकर्तांचा विमा दावा रक्कम रु.3,00,000/- (रक्कम रु.तीन लाख फक्त) दिनांक 09.09.2016 पासून द.सा.द.शे. 8 टक्के व्याजासह तक्रारकर्तां यांना द्यावेत.
3. सामनेवाला यांनी तक्रारकर्तां यांना झालेल्या शारीरीक व मानसिक, आर्थिक त्रासापोटी रु.10,000/- (रक्कम रु.दहा हजार फक्त) व तक्रारीचा खर्च 5,000/- (रक्कम रु.पाच हजार फक्त ) तक्रारकर्तांना द्यावे.
4. सामनेवाला यांनी वरील नमुद आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत मिळण्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
5. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी.
6. तक्रारकर्तां यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.