निकालपत्र (दि.10.02.2015) द्वारा:- मा. सदस्य श्री दिनेश एस.गवळी
1 सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा पशु विमा दावा नाकारुन ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम-12 अन्वये सेवेत त्रुटी ठेवलेने तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2 प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाले विमा कंपनी वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. तक्रारदार तर्फे व सामनेवाले तर्फे वकिलांचा तोंडी अंतिम युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार गुणदोषावर निकाली काढणेत येते.
3 तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी :-
तक्रारदार हे शिरोळ येथील रहिवासी असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती असून त्याला पूरक व जोडधंदा म्हणून ते जनावरे पाळून दूधाचा व्यवसाय करतात. तक्रारदारांनी दूधाचे व्यवसायासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया लि.शाखा शिरोळ यांचेकडे कर्ज प्रकरण करुन त्यांचेमार्फत दि.07.11.2012 रोजी एच.एफ.कॉस या जातीची संकरीत गाय रक्कम रु.55,000/- इतके किंमतीस सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती सांगलीमार्फत श्री.प्रमोद बाबासो साळूखे यांचेकडून खरेदी केली होती. तक्रारदारांनी सामनेवाले यांचे प्रतिनिधीस बोलावून घेऊन सदर गायीचा विमा उतरविला. गायीच्या कानातील बिल्ल्याचा क्र.57933 असा आहे. तक्रारदारांची गाय दि.12.09.2013 रोजी अचानक मयत झाल्यामुळे तक्रारदारांनी मयत जनावराचा शासकीय वैदयकीय अधिकारी वर्ग-1 शिरोळ यांचेकडून रितसर पोस्टमार्टेम करुन विमा उतरविलेले गायीचे मरणोत्तर फोटो तिचे शरीरावरील खाणा-खुणासह सादर करुन बँकेकडे सदरचे कागदपत्र पुरवले व या पलीकडे जाऊन त्यांनी मयत गायीचा कान त्यावरील एअर टॅगसह सील करुन जाबदार कंपनीचे कार्यालयाकडे व्हेरीफिकेशन व स्क्रुटनीसाठी पाठवला होता. मयत गायीचे फोटो व आयडेंफिकेशनमध्ये कसलीही तफावत नसताना व वर दिले पोसीजरप्रमाणे कागदपत्र सामनेवाले यांचेकडे दाखल केला. परंतु तक्रारदारांचा न्याययोग्य क्लेम सामनेवाले यांनी दि.01.11.2013 रोजी नाकारला. तक्रारदारांनी सामनेवाले यांना दि.14.12.2013 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. तक्रारदार हे सामनेवाले कंपनीचे ग्राहक असून त्यांनी तक्रारदारांना विनाविलंब, सुलभ व तात्काळ सेवा देणेची कायदेशीर जबाबदारी कंपनीवर असतानासुध्दा तक्रारदारांचा क्लेम नाकारला असल्याने सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे. तक्रारदारांनी सदरहू अर्ज या मंचात दाखल करुन गायीचे विमा क्लेमची रक्कम रु.55,000/- तसेच सामनेवाले यांनी तक्रारदारांचा सदरचा क्लेम नाकारणेसाठी दिलेली बनावट कारणामुळे तक्रारदारांची बदनामीपोटी नुकसानभरपाईची रक्कम रु.1,00,000/- व मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी व तसेच कोर्टकामाचे खर्चापोटी रक्कम रु.45,000/- अशी एकंदरीत रक्कम रु.2,00,000/- सामनेवाले यांचेकडे वसुल होऊन मिळण्याची विनंती केली आहे.
4 तक्रारदारांनी तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारीसोबत एकूण 11 कागदपत्रे दाखल केली आहेत. ती अनुक्रमे पुढीलप्रमाणे, गाय खरेदी केलेबाबतची पावती, गायीचा विमा उतरविलेबाबतची पॉलीसी, दि.12.09.2013 रोजीचा पशुधन विकास अधिकारी नं.1 शिरोळ यांनी क्लेमसाठीचा तक्रारदारांचे पशुचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट, विमा प्रस्ताव नाकारले पत्र, सामनेवाले यांनी तक्रारदारांचा क्लेम नाकारलेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिरोळ यांचेकडे पाठविलेबाबतचे पत्र, तक्रारदारांनी वकीलामार्फत सामनेवाले यांना पाठविलेली नोटीसची प्रत व पोस्टाकडील पोहचपावत्यां, गायीचा जिवंतपणीचा फोटो, गाय मयत झालेनंतरचे फोटो, गायीचा पोस्टमार्टेमचा फोटो व गायीचे कानाचा सामनेवाले कंपनीचे एअरटॅगसहचा फोटो, इत्यादी कागदपत्रे तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.
5 सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या तक्रारीस लेखी म्हणणे दाखल केले असून त्यांनी तक्रारदारांची तक्रार परिशिष्टनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. त्यामुळे प्रसतुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदयाखाली चालणेस पात्र नाही. तक्रार कलम-1 मधील गायीचे विमा संदर्भात मजकूर मान्य आहे परंतु मयत गायीचे कानातील बिल्ल्यासंदर्भात मजकूर मान्य नाही. विमेधारक गाय दि.12.09.2013 रोजी मयत झाली हे मान्य नाही. मयत गायीचे फोटो व मयत गायीचे वर्णन मान्य नाही. मयत गायीचे फोटो व विमेधारक गाय यांचे वर्णनामध्ये फरक आहे. विमा कंपनीने चौकशीकरुन व वस्तुस्थिती विचारात घेऊन योग्य कारणाकरीता क्लेम नाकारला आहे. तक्रार अर्जाचे कलम-3 व 4 मधील मजकूर मान्य व कबूल नाही.
6 सामनेवाले त्यांचे म्हणणेमध्ये पुढे असे कथन करतात की, तक्रारदाराने क्लेम दाखल केलयानंतर कागदपत्रांची पडताळणी करताना असे दिसून आले की, तक्रारदाराने क्लेमचे आवश्यक कागदपत्रे दाखल केलेले नाहीत. तसेच फोटो व विमेधारक गाय यांचे वर्णनामध्ये फरक आहे. त्यामुळे क्लेम देय होत नाही. त्यामुळे सामनेवाले विमा कंपनीने योग्य कारणाकरीता क्लेम नाकारला आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासहीत नामंजूर करणेत यावी.
7 तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे व सामनेवाले यांची कैफियत/म्हणणे तसेच अनुषांगिक कागदपत्रे व उभय पक्षकारांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद याचा विचार होता, तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
2 | आदेश काय ? | अंतिम निर्णयाप्रमाणे |
कारणमिमांसाः-
मुद्दा क्र.1:- तक्रारदार हे शिरोळ, ता.शिरोळ येथील रहिवासी असून त्यांची सामनेवाले यांचेकडे विमा उतरविलेली गाय दि.12.09.2013 रोजी अचानक मयत झालेनंतर तिचे पोस्टमार्टेम करुन आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन सामनेवाले यांचेकडे विमा रक्कमेची मागणी केली असता, सामनेवाले विमा कंपनीने दि.01.11.2013 रोजी क्लेम दाखल करतेवेळचे फोटो व पोस्ट मार्टेम करतेवेळी गायीचे घेतलेले फोटो यामधील वर्णनामध्ये फरक असल्याने विमा नाकरला आहे. सबब, प्रस्तुत कामी गायीचे फोटोतील वर्णनामध्ये विसंगती आहे का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.
सदर मुद्दयांचे अनुषंगाने या मंचाने तक्रारदाराने अ.क्र.8 ते 10 कडे दाखल केलेल्या गायीचे फोटोचे बारकाईने अवलोकन केले असता, सदरची गायीचा रंग हा काळा पांढरा दिसुन येतो. त्याचप्रमाणे, विमा पॉलीसी पाहिली असता, त्यामध्ये Colour / Mark चे रकान्यामध्ये रंग White & Black असे नमूद केलेचे दिसून येते. त्याचप्रमाणे, फोटोमध्ये गायीचे कानात बिल्ला असून त्यांचा नंबर 57933 दिसतो. वरील सर्व बाबींवरुन तक्रारदारांचे विमाकृत गाय मयत झाली आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे सामनेवाले यांनी घेतलेला गायीचे फोटोतील वर्णनामध्ये/रंगामध्ये फरक आहे हा बचाव हे मंच या ठिकाणी विचारात घेत नाही. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदारांचा न्याययोग्य क्लेम नाकारुन सेवेत गंभीर त्रुटी ठेवली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2:- तक्रारदार पॉलीसीप्रमाणे विमा रक्कम रु.50,000/- व क्लेम दाखल दि.07.02.2014 पासून 9% प्रमाणे व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच सामनेवाले यांनी सेवेत ठेवलेल्या त्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु.2,000/- इतका मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2 सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली
रक्कम रु.50,000/- अदा करावी. सदर रक्कमेवर क्लेम दाखल दि.07.02.2014 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9% प्रमाणे व्याज अदा करावे.
3 तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रारीच्या
खर्चापोटी रक्कम रु.2,000/- अदा करावेत.
4 आदेशाच्या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.