जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ११३/२०११
तक्रार दाखल दिनांक – ०९/०६/२०११
तक्रार निकाली दिनांक – १३/०६/२०१३
जय संतोषीमाता ब्रिक्स वर्क्स, दिघावे
प्रो.श्री. राजेंद्र पंडीतराव ठाकरे
उ.व ४८, धंदा – व्यवसाय
रा.प्रतापपूर, ता.साक्री. जि.धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
१. व्यवस्थापक
चोलामंडलम एम.एस. जनरल
इंन्शरन्स, कंपनी लि.
दारे हाऊस, दुसरा मजला, एन.एस.सी.
बोस रोड चेन्नई, ६०० ००१ (भारत)
२. व्यवस्थापक
चोलामंडलम एम.एस. जनरल
इंन्शुरन्स, कंपनी लि. शाखा – नाशिक
३. व्यवस्थापक सो.
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया
शाखा – कासारे ............... सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.एम.बी. साळुंखे)
(सामनेवाला तर्फे – अॅड. डी.एन. पिंगळे)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ. एस.एस. जैन)
सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा विमा दावा मंजूर न केल्याने तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडुन दि.०४/०९/२०१० रोजी सर्व प्रकारच्या मालाचा व नुकसानी बाबत विमा काढला होता. सदर पॉलिसीची मुदत दि.२८/०८/२०१० ते २७/०८/२०११ अशी होती. दि.१५/११/२०१० रोजी बेमोसमी पावसामुळे विट कारखान्याचे व कच्चया मालाचे एकंदरीत रककम रू.१५,००,,०००/- चे नुकसान झालेले आहे. सदर घटनेबाबत तक्रारदारने सामनेवाला यांना दि.१६/११/२०१० रोजी पत्रादवारे व फॅक्सदवारे घटनेबाबत व नुकसान भरपाई मिळणेबाबत कळविले. सदर घटनेचा पंचनामा दि.१६/११/१० रोजी तलाठी सो. दिघावे यांनी केलेला आहे. मा. तलाठी यांनी अहवालानुसार दि.२५/११/२०१० रोजी नुकसानीबाबत मा. तहसिलदार यांना दाखला दिलेला आहे. सामनेवाला यांना कळवूनही प्रतिसाद न दिल्याने तक्रारदारने पुन्हा दि.१८/१०/२०१० रोजी फॅक्स दवारे सामनेवाला यांना नुकसानी बाबत कळविले. त्यानंतरही वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर कंपनीचे सर्वेअर सचिन अजमेरा यांनी दि.२७/११/२०१० रोजी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून रक्कम रू.१२,५३,०००/- चे नुकसानी बाबतचा अहवाल दिलेला आहे.
२. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांनी नुकसान भरपाईची रककम मिळणेबाबत सामनेवाला यांना दि.२७/१२/२०१० व दि.१५/०१/२०११ रोजी पत्रादवारे मागणी केली असता सामनेवाला यांनी तक्रारदारास रू.८,००,०००/- मंजूर केल्याचे कळविले व त्याबाबत व्हाऊचर पाठविले. सदर रक्कम घेण्यास तक्रारदारने नकार दिल्याने ३ महिन्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदारास रू.९,८५,८८०/- चे नुकसान भरपाई देण्याचे कळविले व रू.१०,००,०००/- चे वरील रक्कम मिळण्यास मुख्य कार्यालयाकडे अर्ज करून उर्वरित रक्कम देवू असे आश्वासन दिल्याने तक्रारदारने सदरची रककम नाईलाजास्तव स्विकारली. त्यानंतर अर्वरित रक्कम रू.२,६६,८००/- ची वेळोवेळी सामनेवाला यांचेकडे मागणी करूनही आजपावेतो रककम अदा केलेली नाही.
३. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून सर्वेअरच्या अहवालानुसार उर्वरित रक्कम रू.२,६६,८००/- तोच शारिरिक व मानसिक त्रासापोटी रककम रू.५,००,०००/- व आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रू.३,००,०००/-. तसेच संपूर्ण रकमेवर द.द.शे. १८% दराने व्याज मिळावे अशी विनंती केली आहे.
४. तक्रारदार यांनी आपले म्हणण्याचे पृष्टयार्थ नि.६ सोबत पॉलीसी प्रत, घटनेबाबत वृत्तपत्राची झेरॉक्स प्रत, मा. तलाठी यांचे पत्र, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना पाठविलेल्या पत्राची प्रत व फॅक्सचा रिर्पोट, मा. तहसिलदार यांचा नुकसानी बाबतचा दाखला, सर्वे रिपोर्ट, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना पाठविलेले पत्र, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
५. सामनेवाला नं.१ व २ यांनी आपला लेखी खुलासा नि.८ वर दाखल केला आहे. त्यांत त्यांनी असे म्हटले आहे की, तक्रारदार यांचा अर्ज व त्यातील म्हणणे नाकारले आहे. त्यांनी सेवा देण्यामध्ये कुठेही कमतरता केलेली नाही. त्यामुळे तक्रारद रदद करण्यात यावी.
६. विमा कंपीनीने पुढे असे म्हटले आहे की, तक्रारदारला सर्वेअरचा रिपोर्ट आल्यानंतर कंपनीच्या पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे रू.९,८५,८८०/- अदा केली आहे. सदर प्रकरणांत तक्रारदाराकडून कमतरता आहे. त्यामुळे सामनेवाला यांचेविरूध्द तक्रार दाखल करण्याचा तक्रारदारास हक्क नाही. म्हणून तक्रारदारची तक्रार बरखास्त करून सामनेवाला यांना खर्चापोटी रू.१०,०००/- देण्याचा हुकुम व्हावा.
७. सामनेवाला यांनी आपले म्हणण्याचे पृष्टयार्थ रिव्हाईज सर्वे अहवाल, प्रतिज्ञापत्र, इ. कागदपत्रे दाखल केलली आहेत.
८. सामनेवाला नं.३ यांना नोटीस बजावणी होवूनही ते मे. मंचात हजर न झालेने त्यांचेविरूध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आला आहे.
९. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचा खुलासा व युक्तिवाद ऐकल्यानंतर व दाखल कागदपत्रे पाहता आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
१. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना
दयावयाच्या सेवेत त्रृटी केली आहे काय ? होय
२. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास
पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे
३. अंतिम आदेश ? खालीलप्रमाणे
विवेचन
१०. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांचा विट तयार करण्याचा कारखाना आहे. सदर कारखान्याचे दि.१५/११/२०१० रोजी वादळीवारा व बेमोसमी पावसामुळे विट कारखान्याचे व कच्च्या मालाचे अतोनात नुकसान झाले. सदर कारखान्याचा विमा सामनेवाला कंपनीने काढलेला असल्याने विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवला असता विमा कंपनीने सदर नुकसानभरपाई देण्याचे नाकारले आहे व सेवेत त्रृटी केली आहे.
११. या संदर्भात विमा कंपनीने आपल्या खुलाश्यामध्ये सर्वेअरचा रिपोर्ट आल्यानंतर कंपनीच्या पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदारास रू.९,८५,८८०/- इतकी रककम अदा केली आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई विमा कंपनी तक्रारदारास देवू शकत नाही.
१२. आम्ही तक्रारदारने तक्रारी सोबत नि.६ लगत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. त्यांत नि.६/७ वर दि.२७/११/१० रोजीचा श्री.सचिन अजमेरा यांचा आर्थिक नुकसानी बाबतचा सर्वे अहवाल दाखल आहे. सदर अहवालात ‘Loss amount adjusted Rs.12,53,000/-` असे नमुद आहे. म्हणजे सदर अहवाल घटना घडलयानंतर लगेचच १२ दिवसात देण्यात आलेला आहे.
१३. तसेच आम्ही सामनेवाला विमा कंपनीने दि.०३/०८/१२ रोजी दाखल केलेल्या रिव्हाईज सर्वे अहवालाचेही बारकाईने अवलोकन केले आहे. त्यात त्यांनी प्रथम अहवाल नुकसानभरपाईची रककम रू.१२,५३,०००/- चा दिल्याचे नमुद केलेले आहे. परंतु सदर रिव्हाईज अहवालात त्यांनी रिव्हाईज अॅसेसमेंट दि.०९/०५/११ रोजी केल्याचे व त्यानुसार नुकसान भरपाईची रककम रू.९,८६,७००/- होत असल्याचे नमुद केलेले आहे. सदर रिव्हाईज अहवालावर दि.०९/०५/११ तारीख नमुद आहे. म्हणजेच सदर अहवाल घटना घडल्यानंतर सुमारे ६ महिन्यांनी देण्यात आलेला आहे.
१४. तक्रारदार यांचे तक्रारीत नमुद व त्यांचे वकील अॅड. साळुंखे यांनी आपले युक्तीवादात म्हटले नुसार श्री. सचिन अजमेरा यांनी दि.२७/११/१० रोजी घटनेच्या ठिकाणी प्रत्यक्षात येवून पाहणी करून सर्वे अहवाल दिलेला असतांना ५ महिन्यानंतर दुसरा रिव्हाइज सर्वे अहवाल केवळ तक्रारदारला त्रास देण्याच्या हेतूने दिलेला आहे. वास्तविक विमा कंपनीने दाखल केलेला रिव्हाईज अहवाल हा ५ महिन्यानंतरच्या अॅसेसमेंटच्या आधारावर तयार केलेला आहे. सदरच्या ५ महिन्यात कच्चा माल व इतर मालात पावसाळी वातावरणामुळे बराच फरक पडला असणार आहे. त्यामुळे नंतर काढलेली रू.६,८६,७००/- ही नुकसानभरपाईची रककम या कामी प्रमाण मानता येणार नाही. त्यामुळे घटना घडल्यानंतर लगेचच दि.२७/११/२०१० रोजीच्या श्री. अजमेरा यांच्या सर्वेक्षण अहवालात नमूद नुकसान भरपाईची रककम रू.१२,५३,५००/- या कामी विचारात घेणे योग्य होईल असे आम्हांस वाटते.
१५. वरील परिस्थिती पाहता विमा कंपनीने सर्वेअरच्या अहवालात तक्रारदारचे नुकसान झालेचे नमुद असुनही तक्रारदारास नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम न देवून सेवेत त्रृटी केली आहे. या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुददा क्रं.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१६. मुद्दा क्र.२- तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून नुकसान भरपाईची उर्वरित असलेली रककम रू.२,६६,८००/- शारिरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रू.५,००,०००/- तसेच आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रू.३,००,०००/- व वरील संपूर्ण रकमेवर द.द.शे. १८% दरा प्रमाणे व्याज मिळावे अशी मागणी केली आहे. आमच्या मते तक्रारदार हे श्री. अजमेरा यांच्या प्रथम अहवालानुसार नुकसानभरपाईची उर्वरित रककम रू.२,६६,८००/- मिळण्यास पात्र आहेत.. तक्रारदार यांना सदर तक्रार दाखल करण्यासाठी मानसिक त्रास व खर्च झालेला आहे हे नाकारता येणार नाही. त्यामुळे तक्रारदार मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रू.५,०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रू.१०००/- मिळण्यास पात्र आहेत.
१७. मुद्दा क्र.३- वरील विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. (अ) सामनेवाला नं.१ व २ चोलामंडलम एम.एस. जनरल इंन्शरन्स, कंपनी लि. यांनी तक्रारदारास रक्कम रू.२,६६,८००/- या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसांच्या आत दयावेत.
(ब) सदर रक्कम मुदतीत न दिल्यास, संपूर्ण रक्कम देईपावेतो द.सा.द.शे. ९% दराने व्याजासहीत रक्कम दयावी.
३. सामनेवाला नं.१ व २ चोलामंडलम एम.एस. जनरल इंन्शरन्स, कंपनी लि. यांनी मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रू.५०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रू.१०००/- या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाच्या आत दयावेत.
(सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.