ग्राहक तक्रार क्र. 159/2013
अर्ज दाखल तारीख : 11/11/2013
अर्ज निकाल तारीख: 16/07/2015
कालावधी: 01 वर्षे 08 महिने 06 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्री.साहेबराव दादाराव जाधव,
वय - 55 वर्षे, धंदा – पेन्शनर,
रा.जाधववाडी(चिखली) ता. हवेली, जि. पुणे,
ह.मु. अथर्व निवास, राम नगर, उस्मानाबाद,
ता.जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. व्यवस्थापक,
चव्हाण मोटर्स डिव्हीजन इं.प्रा.लि.,
150, अक्कलकोट रोड, एस.व्ही.सी.एस. हायस्कुल समोर,
सोलापूर.
2. व्यवस्थापक,
चव्हाण मोटर्स डिव्हीजन इं. प्रा. लि.,
तावडे कॉम्पलेक्स, भानुनगर, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.बी.एन.देशमूख.
विरुध्द पक्षकार क्र. 1 व 2 तर्फे विधिज्ञ : श्री. व्ही.डी.कुलकर्णी.
न्यायनिर्णय
मा.अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
अ) विरुध्द पक्षकार (विप) मारुती कारचे डिलर यांचेकडून मारुती स्विफ्ट गाडी विकत घेतल्यानंतर तिच्यामध्ये बिघाड झाल्यानंतर दुरुस्त करणेसाठी विप कडे दिली असताना विप ने कार दुरुस्ती करण्यामध्ये विलंब लावून सेवेत त्रुटी केली म्हणून भरपाई मिळणेसाठी तक्रारकर्ता (तक) यांनी ही तक्रार दिलेली आहे.
1) तक चे तक्रारी अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
2) तक ने आपले दैनंदिन गरजेकरता मारुती अल्ट्रो कार नं.एम.च.14 ए.के.- 5998 विप कडून खरेदी केली. विप क्र.1 हे अधिकृत विक्रेते असून विप क्र.2 विप क्र.1 ची उस्मानाबाद येथील शाखा आहे. दि.05.02.2012 रोजी तक चे जावई अॅड. बाजीराव देशमुख कळंब ते उस्मानाबाद येत होते. कळंब येथे कारच्या खाली मोठा दगड आल्याने गाडीला अपघात झाला. गाडीचे बोनेट – बोन रेडीएटर, कंडिशनर, फॅन, काच, दरवाजा, स्टेअरींग रॉड, इत्यादी पार्टचे नुकसान झाले. तक यांनी विप क्र.2 कडे गाडीचे दुरुस्तीसाठी संपर्क साधला. त्यांनी गाडी विप क्र.1 कडे सोलापूर येथे नेण्यास सांगितले. तक ने दि.09.02.2012 रोजी विप क्र.1 कडे गाडी दुरुस्तीसाठी नेली. विप क्र.1 चे कर्मचा-याने जॉब कार्ड तयार केले. वाहनाची दुरुस्ती अडीच महिन्यात करुन देण्याचे कबूल केले. दुरुस्तीचे बिल दुरुस्ती झाल्यानंतर द्यावयाचे होते.
3) मुदतीनंतर तक चे जावई अॅड. देशमुख यांनी विप क्र.1 शी संपर्क साधला आणखी 1 ते 2 महिने लागतील असे विप क्र.1 तर्फे सांगण्यात आले पुन्हा मुदतीनंतर संपर्क साधला असता आणखी दोन ते तीन महिने लागतील असे सांगण्यात आले. विप क्र.1 ने गाडीची दुरुस्ती करुन देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे तक ला खाजगी वाहन भाडयाने वापरावे लागले. शेवटी वाहनाची दुरुस्ती करुन तक चे ताब्यात दि.05.03.2013 रोजी देण्यात आले. विप क्र. 1 यांनी हेतुतः गाडीचे दुरुस्तीस एक वर्ष एक महिना एवढा विलंब लावला.
4) तक यांनी सदरची कार आपले जावई अॅड. देशमुख यांचे दैनंदिन वापराकरता दिली होती. तक चा मुलगा कळंब येथे राहतो तक चा पत्ता उस्मानाबाद असा दिला आहे तक ची शेती सारनीसांगवी ता.केज येथे आहे. अॅड.देशमुख यांना उस्मानाबाद येथून पूणे, लातूर, बिड, औरंगाबाद, मुंबई, वाशीम, भूम, परांडा, तुळजापूर, कळंब येथे जावे लागते. विप क्र.1 ने वाहन मुदतीत दुरुस्त न करुन दिल्यामुळे अॅड.देशमुख यांना वाहन भाडयाने घेऊन प्रवास करावा लागला त्यासाठी रु.1,40,000/- खर्च आला. तक यांना विप क्र.1 कडे सोलापूर येथे वेळोवेळी जावे लागले. त्यासाठी रु.30,000/- खर्च आला. विप यांनी वाहनाची दुरुस्ती योग्यरित्या केली नाही त्यामुळे पुन्हा दि.21.03.2013 रोजी वाहन विप क्र.1 कडे न्यावे लागले. अशा प्रकारे तक यांना खाजगी वाहनाने प्रवासाकरता रु.1,70,000/- खर्च आला. तक यांची समाजामध्ये नाचक्की झाली. दि.06.09.2013 रोजी तक ने विप क्र.1 यांना नुकसान भरपाई देणेबद्दल नोटीस पाठवली. त्यामुळे खाजगी वाहनाचे भाडे रु.1,70,000/- मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.1,00,000/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळावे म्हणून तक ने विप विरुध्द ही तक्रार दि.11.11.2013 रोजी दाखल केलेली आहे.
5) तक ने तक्रारीसोबत दि.09.02.2012 चे जॉबकार्डची प्रत हजर केली आहे. तसेच दि.21.03.2013 चे जॉबकार्डची प्रत हजर केली आहे. दि.06.09.2013 चे नोटीसीची प्रत हजर केली आहे. पोस्टाकडे पोहच पावती न मिळाल्याबद्दल दिलेल्या अर्जाची प्रत हजर केली आहे.
ब) विप यांनी दि.09.09.2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्याप्रमाणे तक हा विप चा ग्राहक नाही. अगर त्यांचेमध्ये ग्राहक वाद नाही. तक ने चव्हान मोटार्स प्रा.लि. या कंपनी विरुध्द दाद मागणे जरुर आहे. तक ने दि.05.03.2013 रोजी वाहनाचा ताबा स्वखुशीने घेतला. त्यामुळे तक्रारीस इस्टोपेड बाय कॉन्डक्टची हरकत आहे. तक ने दि.09.02.2012 रोजी वाहन दुरुस्तीस आणले हे खरे आहे. वाहन अडीच महिन्यात दुरुस्त करुन देण्याचे विप ने कबूल केले नव्हते. तक व त्यांचे जावई यांनी विप शी वारंवार संपर्क साधला हे अमान्य आहे. त्यांनी आपले वापरासाठी खाजगी वाहन भाडयाने घेतले हे खोटे आहे त्यासाठी रु.1,40,000/- खर्च आला हे खोटे आहे. वाहनामध्ये मोठया प्रमाणावर दुरुस्ती जरुरी होती. त्यासाठी बराच कालावधी लागेल याची जाणीव तक ला करुन देण्यात आली होती. तक ने वाहनाचा विमा युनायटेड इंडिया इन्शुरन्स यांचेकडून घेतला होता. त्यांचे सर्वेअरने वेळोवेळी समक्ष येऊन वाहनाची पाहणी केली. तक ने दि.11.08.2012 रोजी खर्चाचे रु.1,16,000/- जमा केले. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर रु.88,810/- देऊन वाहन घेऊन जाण्यास सांगितले. ही रक्कम तक ने दि.31.10.2012 रोजी जमा केली. मात्र तब्येत बरी नसल्यामुळे वाहन घेऊन जाण्यास नकार दिला. त्यापुढेही वेळोवेळी अडचणी सांगून तक ने वाहन घेऊन जाण्यास नकार दिला. जागेचे भाडे द्यावे लागेल अशी जाणीव करुन दिल्यावर दि.05.03.2013 रोजी वाहनाचा ताबा घेतला. वाहन सुस्थितीत होते विप ने दुरुस्तीस विलंब लावलेला नाही. गाडीचे मॉडेल 2008 चे होते. त्याचे भाग बाजारात उपलब्ध नसल्यामुळे दुरुस्तीस वेळ लागला. विप कडून पैसे उकळण्यासाठी तक ने ही तक्रार दिली ती रद्द होणेस पात्र आहे.
क) तक ची तक्रार त्यांनी दिलेली कागदपत्रे व विप यांचे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ, खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांचेसमोर खाली दिलेल्या कारणासाठी लिहली आहे.
मुद्दे उत्तर
1) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे.
ड) कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 व 2 ः-
1) गाडीला दि.05.02.2012 रोजी अपघात झाला याबद्दल वाद नाही. त्यावेळेस तक ची गाडी तक चे जावई अॅड. देशमुख नेत होते असे दिसते. गाडी ही दि.09.02.2012 रोजी विप क्र.1 कडे दुरुस्तीला नेण्यात आली. त्याबद्दल जॉबकार्ड तयार झाले त्याची प्रत हजर करण्यात आलेली आहे. गाडीमध्ये बरीच दुरुस्ती करणे जरुर होते असे दिसून येते. अंदाजे खर्चाची रक्कम नमूद करण्यात आली नाही. डिलेव्हरी डेट म्हणून अडीच महिने असे नमुद करण्यात आले आहे. विप ने म्हटले आहे की अडीच महिन्यात गाडी दुरुस्त करुन देण्याचे कोणतेही आश्वासन दिलेले नव्हते मात्र जॉबकार्डावर अशी मुदत लिहील्याचे दिसते. तो मजकूर विप तर्फे लिहीला गेलेला नाही असे शपथपत्र विप तर्फे दाखल करण्यात आलेले नाही. हा मजकूर जॉबकार्डात कसा आला या बद्दल विप ने काहीच म्हंणलेले नाही. गाडी दि.09.02.2012 रोजी दुरुस्तीस आणल्यामुळे अडीच महिन्याचा कालावधी एप्रिल 2012 अखेर संपला. त्यावेळेस गाडी दुरुस्त झालेली नव्हती याबद्दल वाद नाही.
2) विप चे म्हणणे आहे की, तक ने दि.11.08.2012 रोजी दुरुस्ती खर्चापोटी रु.1,16,661/- जमा केले. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर राहिलेली रक्कम रु.88,810/- भरण्याबद्दल विप ने तक ला सांगितले. तक ने ती रक्कम दि.31.10.2012 रोजी जमा केली. म्हणजे असे मानता येईल की दुरुस्ती ही दि.31.10.2012 पूर्वी पूर्ण झालेली होती. म्हणजेच एप्रिल 2012 नंतर सुमारे 6 महिने दुरुस्ती पूर्ण होण्यास लागले. विप चे पूढे म्हणणे आहे की, तक ने वारंवार अडचणी सांगून वाहन नेण्याचे नाकारले आहे. शेवटी दि.05.03.2013 रोजी तो वाहन घेऊन गेला. विप चा असा बचाव आहे की, मॉडेल 2008 चे असल्यामुळे त्याचे भाग बाजारात उपलब्ध होत नाही. हे लक्षात घेतले गेले पाहिजे की तेव्हा गाडी दि.09.02.2012 रोजी दुरुस्तीस आणली तेव्हा ही बाब विप च्या लक्षात आली असणार असे असताना जॉबकार्डावर डिलेव्हरीची तारीख अडीच महिने अशी लिहीली गेली.
3) जर तक ने दुरुस्ती खर्चापैकी रु1,16,661/- दि.11.08.2012 रोजी जमा केले असतील तर त्याचा अर्थ सहा महिन्याच्या कालावधीमध्ये विप ने ब-यापैकी दुरुस्ती केली असणार पूढे दीड महिन्याच्या कालावधीनंतर दि.31.10.2012 रोजी तक ने दुरुस्तीचा राहिलेला खर्च 88,810/- जमा केल्याचे विप चे म्हणणे आहे. त्यावेळेस दुरुस्ती पूर्ण झाली असणार त्यानंतर तक ने वाहन घेऊन जाण्यास विनाकारण टाळाटाळ करणे हे पटण्यासारखे नाही. त्यानंतर सुमारे चार महिन्याने तक ने वाहन नेले असे दिसते.
4) ऑगस्ट 2012 पर्यंत आलेल्या अडचणी दूर करुन गाडीची दुरुस्ती करणे जरुर होते मात्र तोपर्यंत गाडीची दुरुस्ती पूर्ण झाली नव्हती आणखी दोन महिन्याचा कालावधी गाडी दुरुस्तीस लागला व त्यानंतर विप ने दुरुस्तीचा राहिलेला खर्च तक कडून वसूल केला. याबद्दल तक आणि विप मध्ये मतभेद झाले असणार त्यामुळे गाडी नेण्यास तक ला विलंब झाला असणार. आता तक त्याबद्दल विप ला दोष देतात, तर विप त्याबद्दल तक ला दोष देतात. काहीही झाले तरी, विप कडून तक ला दुरुस्ती पूर्ण करुन गाडी देण्यास पाच ते सहा महिन्याचा विलंब झालेला आहे. तक चे म्हणणे आहे की, हया काळात त्याला तसेच त्याचे जावई अॅड.देशमुख यांना भाडोत्री वाहन वापरावे लागले. 13 महिने भाडोत्री वाहन वापरल्याचा खर्च तक ने रु.1,70,000/- सांगितला आहे म्हणजेच जवळ जवळ महिना रु.15,000/- खर्च केल्याचे तक चे म्हणणे आहे. मात्र हे दाखविण्यासाठी तकने कोणताही पुरावा दिलेला नाही. जर एवढया प्रमाणावर वाहन भाडयाने घेऊन खर्च केला असेल तर बँक स्टेटमेंट तसेच हिशोबाच्या वहया तक ने दाखल करणे जरुर होते. आपली गाडी आपले जावई अॅड. देशमुख यांचेच वापरासाठी घेतली असे तक चे म्हणणे आहे. मग गाडी अॅड. देशमुख किंवा आपली मुलगी यांचे नावावरच का घेतली नाही, याचा खुलासा केलेला नाही. तक ला आपला मुलगा याचेकडे पुण्याला जावे लागते असे त्याचे म्हणणे आहे. मात्र किती वेळा पुण्याला जावे लागते याबद्दल मौन बाळगले आहे. अशाप्रकारे तक याला जास्तीचा खर्च महिना सुमारे रु.4,000/- आला असेल असे म्हणता येईल. सहा महिन्याच्या कालावधीमध्ये हा खर्च रु 24,000/- आला असेल असे मानता येईल हा खर्च मिळणेस तक पात्र आहे. झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.3,000/- मिळणेस तक पात्र आहे. तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- मिळणेस तक पात्र आहे. म्हणून आम्ही मुद्दा नं.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक ची तक्रार खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
1) विप क्र. 1 व 2 यांनी तक ला सेवेत त्रुटी बद्दल रु.24,000 (रुपये चावीस हजार फक्त) व मानसिक त्रासाबद्दल रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) द्यावे. विप क्र.1 व 2 यांनी वरील रकमेवर तक यांना तक्रार दाखल तारखेपासून रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 दराने व्याज द्यावे.
2) विप यांनी तक याला तक्रारीचे खर्चापोटी रु.3,000/- द्यावे.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.