ग्राहक तक्रार क्र. : 146/2014
दाखल तारीख : 11/07/2014
निकाल तारीख : 01/07/2015
कालावधी: 0 वर्षे 11 महिने 21 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. तबस्सूम नसीम अहेमद मोमीन,
वय- 37 वर्ष, धंदा – नौकरी,
रा.खाजा नगर, गल्ली क्र.26, उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. व्यवस्थापक,
चव्हाण मोटर्स डिव्हिजन इं.प्रा.लि.,
150, अक्कलकोट रोड, एस.व्ही. सी.एस.हायस्कुल समोर,
सोलापुर.
2. शाखा व्यवस्थापक,
चव्हाण मोटर्स डिव्हिजन इं.प्रा.लि.,
तावडे कॉम्पलेक्स, औरंगाबाद रोड, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.पी.साखरे.
विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 तर्फे विधिज्ञ : श्री.पी.एम.जोशी.
न्यायनिर्णय
मा. सदस्य मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा:
अ) 1. तक्रारदाराच्या तक्रारी अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
अर्जदार हे रा. खाजा नगर, ता.जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी असुन तक्रारदार गाडीची गरज असल्याने त्यांनी विप क्र. 2 यांचेकडून मारुती स्वीफ्ट व्ही.डी.आय. बी. एस. चार हे वाहन विप यांचे सुचनेनुसार रु.7,28,098/- चा भरणा करुन चेसीस क्र.MA3FHEB1S00352369 व इंजिन क्र.D13A331451 दि.18/01/2014 रोजी खरेदी केले व सदरहु वाहनाचा विमा कव्हरनोट काही दिवसात देणेत येईल असे तक्रारदार यांना सांगणेत आले. सदर वाहनावर पुर्वी पासून काळया रंगाचे बरीक ठिपके असल्याचे तसेच सदरील वाहनाचे सेंट्रल लॉक व्यवस्थित काम करत नसल्याचे व वाहनाचे बझरमध्ये दोष असल्याचे तक्रारदार यांचे निदर्शनास आले तसेच वाहनाचे उत्पादन वर्ष 2012 असे दर्शविणेत आले असल्याने तक्रारदार यांनी त्याबाबत विचारणा केली असता विप यांनी सदरहू बाब कबूल करुन तक्रारादार यांना सदरील वाहन बदलून देणेत येईल असे आश्वासन देऊन सदरहु वाहन विप क्र.1 यांचेकडे पाठविले व सदरहु वाहन बदलून न देता केवळ त्यातील सेन्ट्रल लॉक व बझारचा दोष दुरुस्त करुन वाहन बदलून देण्यास टाळाटाळ केली. म्हणून तक्रारदार यांनी दि.02/05/2014 रोजी अर्ज देऊन वाहन बदलून देणेबाबत अथवा तक्रारदार यांनी विप यांचेकडे भरणा केलेल्या रकमेची मागणी केली परंतू विप यांनी टाळाटाळ केली म्हणून दि.11/06/2014 रोजी नोटीस पाठवली असता त्यांस योग्य तो प्रतिसाद न दिल्याने विप यांनी सेवेत त्रुटी केली असून तक यांनी सदरची तक्रार दाखल करावी लागली. म्हणून विप यांनी वर नमूद वाहन बदलून द्यावे किंवा त्यापोटी भरणा केलेली रक्कम द.सा.द.शे.12 टक्के व्याज दराने परत करावे, तक्रारदार यांना झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रु.50,000/-, तक्रारीचे खर्चापोटी रु.10,000/- विप क्र. 1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या देणेचा हुकूम व्हावा अशी विनंती केली आहे.
ब) सदर प्रकरणात विप यांना नोटिस बजावली असता त्यांनी आपले म्हणणे अनेक संधी देऊनही हजर न केल्याने दि.21/10/2014 रोजी त्यांच्या विरुध्द नो से आदेश पारीत करण्यात आले नंतर दि.21/11/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केले त्यावर कॉस्ट आकारण्यात आली. विप यांनी आपले म्हणणे पुढीलप्रमाणे दिलेले आहे.
1. तक्रारदार यांची तक्रार मान्य नसून विप यांनी कोणत्याही प्रकारची त्रुटी केली नाही. वाहन खरेदी केल्याचे मान्य केले असून तक यांना सदरहू वाहनाचा ताबा देतेवेळीच पस्तुत विप यांनी तक्रारदार यांना सदरील वाहनाचे विमा कव्हरनोट दिलेल आहे. सदरहू वाहन सन 2012 मध्ये उत्पादीत केल्याबाबत तक्रारदार यांना कल्पना दिली होती परंतु तक्रारदार यांना सदरील वाहन पसंत पडल्याने व तक्रारदार यांनी सदरील वाहनाचे सर्व पार्ट व्यवस्थितरित्या काम करीत असल्याची खात्री करुन तसेच रंगाची पाहणी करुन वाहन खरेदी केलेले होते. तसेच तक्रारदार यांनी सदरील वाहनातील सेंट्रल लॉक व बझर व्यवस्थित काम करीत नसल्याची तक्रार केल्यानंतर लागलीच प्रस्तुत विप यांना दोष दुरुस्त करुन सदरील वाहनाचा ताबा कोणताही मोबदला न स्विकारता तक्रारदार यांना दिलेला आहे. विप यांनी दि.12/07/2014 रोजी विधिज्ञांमार्फत तक यांच्या नोटीसचे उत्तर दिले आहे. विप यांच्याकडून अवैधरित्या रक्कम हडप करुन विप यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारीचे योग्य मुल्यांकन केलेले नसून त्यांवर आवश्यक मुद्रांक शुल्क दिलेले नाही. म्हणून तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी तसेच नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.25,000/- देण्याचा हुकूम व्हावा असे नमूद केले आहे.
क) तक्रारदार यांची तक्रार व सोबत दाखल कागदपत्रे तसेच विप यांचे म्हणणे व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले. उभयतांचा लेखी युक्तिवाद वाचला तोंडी युक्तिवाद ऐकला असता सदर प्रकरणात आमच्या विचारार्थ खालीलप्रमाणे मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये निष्कर्ष
1) तक्रारदार विरुध्द पक्षकार यांचा ग्राहक होतो काय ? होय.
2) विरुध्द पक्षकाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
क) कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 ते 3 :
1. तक्रारदाराने घेतलेली मारुती स्वीफ्ट VDIBS IV चेसीस क्र.MA3FHEB1S00352369 व इंजिन क्र.D13A331451 ही खरेदी केली. सदरचे वाहन हे साल सन 2012 वर्षातील उत्पादित असून त्याला 2014 मध्ये विक्री करण्यात आले. तसेच त्यांना सदरचे वाहन दोषयुक्त पुरवण्यात आले तसेच वाहनाचा रंग हा गेलेला व खराब झालेला होता. त्यावर काळे रंगाचे बरेच ठिपके होते त्याच बरोबर सेंट्रल लॉक व्यवस्थित नव्हते व विम्याची कव्हर नोटही उशीरा देण्यात आली अशा स्वरुपाची तक्रार या न्याय मंचात दाखल झालेली आहे. त्या संदर्भात त्यांनी पुरावे म्हणुन पाठवीलेली नोटीस, गाडीचे काढलेले फोटो हे दाखल केलेले आहे. तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रार व विप यांचा जबाब पाहीला असता विप ने वाहनामध्ये काही दोष नाही. 2012 चे उत्पादित गाडी असल्याचे तक्रारदाराला कार खरेदी करता वेळी सांगण्यात आलेले होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारची सेवेतील त्रुटी नसून तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यात यावी असे म्हणणे दिले आहे. तक्रारदाराची मुख्य तक्रार विषेशता गाडी वरील डागासंदर्भात असून सदरचे डाग हे फोटोव्दारे या न्यायमंचास दाखविण्याचा प्रयत्न तक्रारदाराने केलेला आहे परंतू या पुराव्या संदर्भात विप ने लेखी युक्तिवादामध्ये अथवा सेमध्ये कसल्याही स्वरुपाचे स्पष्ट विरोधी प्रतिपादन केलेले नाही. फक्त तक्रारदाराने गाडी व्यवस्थित पाहून घेतली असे तक बद्दल मत व्यक्त केले आहे व अशा स्वरुपाचे डाग नसल्याबद्दल योग्य तो पुरावा या न्यामंचात दाखल केला नाही तसेच दाखल पुराव्यावर आक्षेपही घेतला नाही.
2. विप ने 2012 चे उत्पादित कार 2014 मध्ये प्रथम दर्शनी विक्री करणे या मंचास गैर वाटत नाही तथापि त्यामुळे विप चे पुर्नविक्रीसाठी कमी किंमत येण्याचा धोका निश्चित असू शकतो जर टैक्नॉलॉजी अपग्रेड झाली असेल तर त्याचा लाभ तक्रारदाराला मिळु शकत नाही तथापि तशीही तक्रारदाराची स्पष्ट तक्रार नाही. त्यामुळे तक्रारदाराची वाहनाच्या रंगासंबंधीच्या तक्रारीच्या अनुषंगाने फोटोची पाहणी केली असता या निष्कर्षास आम्ही आलो आहोत की रंग निश्चितपणे खराब झालेला आढळून येतो म्हणून विप यांनी सदरचा दोष दुरुस्त करुन द्यावा व जर हे विप यांना हे शक्य नसेल तर नुकसान भरपाई म्हणून रु.35,000/- तक यांना द्यावा.
आदेश
तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात येते.
1) विप क्र. 1 व 2 यांनी सदरचा दोष दुरुस्त करुन द्यावा व जर हे विप यांना हे शक्य नसेल तर नुकसान भरपाई म्हणून रु.35,000/- (रुपये पस्तीस हजार फक्त) तक यांना द्यावे.
2) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी व कागदपत्राच्या
खर्चापोटी रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावे.
3) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.