निकाल
(घोषित दि. 03.08.2016 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदाराच्या पतीचा मोटार अपघातात मृत्यू झाल्यानंतर विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम न्यायालयात जमा करुन न्यायालयाने मुले सज्ञान होईपर्यंत गैरअर्जदार बॅंकेत मुदत ठेवीच्या स्वरुपात रक्कम ठेवली. सदरील मुदत ठेवीच्या पावत्या अर्जदाराकडून गाहाळ झाल्यामुळे त्यांनी गैरअर्जदार बॅंकेस दुय्यम (डुप्लीकेट) पावत्यांची मागणी केली परंतू गैरअर्जदार बॅंकेने अद्याप पर्यंत दुय्यम पावत्या न दिल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार अर्जदाराच्या पतीचे मोटार अपघातात दि.21.10.2001 रोजी निधन झाले. मोटार अपघात प्राधिकरणाने नुकसान भरपाईचा दावा मंजूर केल्यानंतर विमा कंपनीने न्यायालयात रक्कम जमा केली. न्यायालयाने मुले सज्ञान होईपर्यंत प्रत्येकी 45,000/- रुपये, यानुसार बॅंकेत मुदत ठेवीच्या स्वरुपात रक्कम ठेवली. सदरील मुदत ठेवीच्या पावत्या अर्जदाराकडून गाहाळ झाल्या. त्यामुळे त्यांनी लेखी अर्जाद्वारे गैरअर्जदार बॅंकेस कळविले व दुय्यम (डुप्लीकेट) पावत्याची मागणी केली. गैरअर्जदार बॅंकेने त्यांना ओळखपत्र व बंधपत्राची मागणी केली. अर्जदार क्र.1 च्या म्हणण्यानुसार अर्जदार क्र.2 ते 5 हे लहान असल्यामुळे ही कारवाई तेथेच थांबली. त्यानंतर अर्जदाराने दि.06.11.2014 रोजी बॅंकेने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पुर्तता केली. त्यानंतर दि.10.09.2015 रोजी त्यांनी दुय्यम (डुप्लीकेट) पासबुक व ठेवीच्या पावत्यासाठी पुन्हा अर्ज करुन कागदपत्रे बॅंकेत जमा केले. पुन्हा त्यांना प्रत्येकांचे वेगळे बंधपत्र व वेगळे खाते उघडण्यास सांगण्यात आले, त्याचीही पुर्तता अर्जदाराकडून करण्यात आली. परंतू अद्याप पर्यंत गैरअर्जदार यांनी दुय्यम (डुप्लीकेट) पावत्या दिल्या नाहीत. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी गैरअर्जदार बॅंकेत अनेक वेळेस हेलपाटे घालूनही अद्याप पर्यंत त्यांना पावत्या मिळाल्या नाहीत. गैरअर्जदार यांची ही कृती सेवेतील त्रुटी असून त्यांनी शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची व दुय्यम (डुप्लीकेट) पावत्यांची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारीसोबत मुदत ठेवीच्या पावतीच्या प्रती, दुय्यम (डुप्लीकेट) पावतीसाठीचा अर्ज, बंधपत्र, दि.10.09.2015 रोजी बॅंकेला दिलेला अर्ज, अधिकार पत्र इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या लेखी जबाबानुसार अर्जदार क्र.2 ते 5 हे सज्ञान झालेले असल्यामुळे अर्जदार क्र.1 यांना तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. अर्जदार क्र.2 ते 5 यांच्या नावे त्यांच्याकडे 45000/- रुपयाच्या मुदतठेवी असल्याचे त्यांना मान्य आहे. अर्जदार क्र.1 यांनी मुदत ठेवीच्या पावत्या हरवल्याची तक्रार त्यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी नवीन मुदत ठेवीच्या पावत्या देण्यासाठी असलेल्या नियमांची माहिती दिली व त्याची पुर्तता करण्यास सांगितले. अर्जदाराने कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर त्या स्विकारण्यास अर्जदार आले नाहीत त्यामुळे त्या दुय्यम पावत्या आजही त्यांच्याकडे आहेत. अर्जदाराने दुय्यम पावत्यांची मागणी केल्यानंतर त्यांचे जूने रेकॉर्ड शोधण्यास तसेच नंतर बॅंकेच्या जागेचे स्थलांतर झाल्यामुळे अर्जदारास दुय्यम मुदतठेव पावती देण्यास उशीर झाला, परंतू त्यामुळे अर्जदाराचे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांना मान्य नाही. अर्जदाराच्या मुदत ठेवीच्या दुय्यम पावत्या तयार असल्याचे सांगून अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदार यांनी मंचामध्ये दुय्यम पावत्यांच्या प्रती दाखल केल्या आहेत.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की, अर्जदार क्र.1 यांच्या पतीच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांना मिळालेली नुकसान भरपाईची रक्कम मोटर अपघात न्यायाधिकरण यांच्या आदेशानुसार अर्जदार क्र.2 ते 5 यांच्या नावे प्रत्येकी 45000/- रुपये सज्ञान होईपर्यंत गैरअर्जदार यांच्या बॅंकेत मुदतठेव म्हणून दि.29.01.2002 रोजी ठेवण्यात आली गैरअर्जदार यांना देखील हे मान्य आहे.
सदरील मुदत ठेवीच्या पावत्या गहाळ झाल्यामुळे अर्जदार क्र.1 यांनी दि.23.03.2006 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे अर्ज करुन दुय्यम मुदत ठेवीच्या पावत्या देण्याची विनंती केली. गैरअर्जदार यांना अर्ज मिळाला असल्याची पोच पावती अर्जदाराने मंचात दाखल केली आहे. गैरअर्जदार यांनी बंधपत्र व ओळखपत्र इत्यादी कागदपत्रांची मागणी केली. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार अर्जदार क्र.2 ते 5 लहान असल्यामुळे त्यांनी दि.06.11.2014 रोजी स्टॅम्प पेपरवर बंधपत्र करुन दिले. अर्जदाराने सदरील कागदपत्रांच्या प्रती मंचात दाखल केल्या आहेत.
अर्जदारास त्यानंतर पुन्हा एकदा दुय्यम (डुप्लीकेट) पासबुक व ठेवीच्या पावत्यासाठी अर्ज देण्याची मागणी करण्यात आली. या सर्वाची पुर्तता करुनही अर्जदारास मंचात तक्रार दाखल करेपर्यंत दुय्यम (डुप्लीकेट) मुदत ठेवीच्या पावत्या देण्यात आल्या नाहीत. गैरअर्जदार यांनी मंचात तक्रार दाखल केल्यानंतर दि.05.04.2016 रोजी ते दुय्यम पावत्या अर्जदारास देण्यास तयार असल्याचे सांगितले.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या अतिरिक्त जबाबात ते जुन्या मुदत ठेवीच्या पावत्या न सापडल्यामुळे व नंतर बॅंकेची जागा बदलण्यात आल्यामुळे दुय्यम मुदत ठेवीच्या पावत्या देण्यास विलंब झाला असे म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दुय्यम (डुप्लीकेट) मुदत ठेवीच्या पावत्या देण्यास विलंब झाला हे स्वतःच मान्य केले आहे.
गैरअर्जदार यांची ही कृती सेवेतील त्रुटी मानण्यात येते. अर्जदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत.
मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार अंशतः मान्य करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास दुय्यम (डुप्लीकेट) मुदत ठेवीच्या पावत्या 7
दिवसात द्याव्यात.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास नुकसान भरपाई म्हणून रु.5000/- व
तक्रार खर्च रु.1500/- 30 दिवसात द्यावे.
श्री. सुहास एम.आळशी श्रीमती रेखा कापडिया श्री. के.एन.तुंगार
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना