(दिनांक 24.06.2011 द्वारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तिचे पती बाबु पटणे हे शेतकरी होते आणि त्यांचे दिनांक 31.08.2007 रोजी अपघाती निधन झाले. महाराष्ट्र शासनाने शेतक-यांचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे विमा उतरविलेला होता. सदर विमा पॉलीसी कालावधीमध्येच तिच्या पतीचे अपघाती निधन झाल्यामुळे तिने विमा पॉलीसी मधील तरतुदीनुसार नुकसान भरपाई मिळावी म्हणून तहसीलदार जालना यांच्या मार्फत गैरअर्जदारांकडे विमा दावा सादर केला होता. परंतू गैरअर्जदारांनी तिचा विमा दावा विनाकारण प्रलंबित ठेवला आणि त्रुटीची सेवा दिली. म्हणून तिने गैरअर्जदारांकडून विमा रक्कम मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रारदाराची तक्रार पाहता सदर तक्रार मुदतीत आहे काय ? असा मुद्दा आमच्या समोर उपस्थित झालेला आहे. तक्रारदाराच्या पतीचे निधन दिनांक 31.08.2007 रोजी झालेले आहे. मा.सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी कंदीमल्ला रघुवय्या & कंपनी विरुध्द नॅशनल इन्शुरन्स कंपनी व इतर (2009) 7 एस.सी.सी. 768 या प्रकरणातील निवाडयाद्वारे हे स्पष्ट केलेले आहे की, घटना ज्या दिवशी घडली त्याच दिवशी तक्रार दाखल करण्याचे कारण घडलेले असते. मा.सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या सदर तत्वाचा विचार केला तर तक्रारदारास ही तक्रार दाखल करण्याचे कारण दिनांक 31.08.2007 रोजी घडलेले आहे. म्हणून ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 24 (अ) नुसार ही तक्रार दोन वर्षाच्या आत म्हणजेच दिनांक 30.08.2009 पुर्वी दाखल करणे आवश्यक होते. परंतू ही तक्रार एक वर्ष आठ महिने पंचवीस दिवसाच्या विलंबाने दाखल केलेली असुन, तक्रारदाराने विलंब माफीचा अर्ज दिलेला आहे. विलंबाबाबत तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, ती गरीब स्त्री असुन, ती खेडयामध्ये राहते आणि तिला शासनाने शेतक-यांसाठी सुरु केलेल्या विमा पॉलीसी बद्दल माहिती नव्हती आणि तिच्याकडे वकीलांना देण्यासाठी पैसा नव्हता. त्यामुळे तिला तक्रार दाखल करण्यास विलंब झाला. तसेच तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, तिने दिनांक 20.09.2007 रोजी विमा दावा दाखल केला. त्यानंतर विमा कंपनीने तिच्या विमा दाव्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे तिला तक्रार दाखल करण्यासाठीचे कारण सतत घडत आहे व त्या दष्टीने तिला तक्रार दाखल करण्यास कोणताही विलंब झालेला नाही. तक्रारदाराने विलंबाबाबत दिलेले कारण संयुक्तीक नाही. विमा पॉलीसी बद्दल माहिती नसणे किंवा खेडयात राहत असल्यामुळे ती मुदतीत तक्रार दाखल करु शकली नाही. हे कारण विलंब माफीसाठी योग्य ठरत नाही. तक्रारदाराने दिनांक 20.09.2007 रोजी विमा दावा दाखल केलेला आहे. त्यावरुन तक्रारदाराला पॉलीसी बद्दलची माहिती दिनांक 20.09.2007 रोजीच होती. त्यामुळे पॉलीसी विषयीची माहिती नव्हती या तक्रारदाराच्या म्हणण्यात कोणताही अर्थ नाही. तक्रारदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केलेल्या विमा दाव्या बाबत विमा कंपनीने कोणताही निर्णय न घेता तिचा विमा दावा प्रलंबित ठेवला म्हणून तक्रारदाराला ही तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत आहे, हे तक्रारदाराचे म्हणणे योग्य नाही. तक्रारदाराची प्रस्तुत तक्रार मुदतबाह्य आहे. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार मुदतबाह्य असल्यामुळे सुनावणीसाठी दाखल करुन न घेता फेटाळण्यात येते.
- तक्रारदारास आदेश कळविण्यात यावा.
| HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |