नि.19 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 174/2010 नोंदणी तारीख – 26/7/2010 निकाल तारीख – 15/12/2010 निकाल कालावधी – 139 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री प्रकाश विठ्ठलसा पवार रा.559, गुरुवार पेठ, सातारा ----- अर्जदार विरुध्द मॅनेजर, (सी.आर.एम.) भारतीय जीवन विमा निगम, विभागीय कार्यालय, सी.आर.एम.डिपार्टमेंट 513, गणपतदास देवी पेठ, सदर बझार, सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री एम.जी.कुलकर्णी) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांना जाबदार एल.आय.सी.जीवनप्रमुख या पॉलिसीविषयी अनेक फायदे सांगून सदरची पॉलिसी घेण्यास भाग पाडले. सदरची पॉलिसी गॅरेंटेड एडिशन 50/- रु. प्रत्येक हजारी, प्रत्येक वर्षाप्रमाणे 5 वर्षाचे कालावधीपर्यंत अर्जदारास त्याचा फायदा दिला जाईल व त्या पॉलिसीची मुदत मात्र 6 व्या वर्षात संपेल व त्यानंतर मात्र मुदत संपलेनंतर भरलेली सर्व रक्कम गॅरेंटेड एडिशन तसेच बोनस व फायनल एडीशनल बोनस यासह अर्जदारास दिली जाईल अशी खात्री दिली. अर्जदार यांना तोंडी माहिती देवून त्यांचेकडील ब-याचशा फॉर्मवर ते फॉर्म वाचून न देता ते सांगतील त्या ठिकाणी सहया करावयास लावले व विश्वासाने अर्जदारांनी त्यावर सहया केल्या आहेत. सदरचे पॉलिसीपोटी एकूण रु.14,67,060/- जाबदारकडे भरले. त्यानंतर पॉलिसीची मुदत संपलेनंतर जाबदारकडून अर्जदारना असे कळविण्यात आले की त्यांची पॉलिसी मॅच्युअर झाली असून त्यांना एकूण रक्कम रु.12,50,000/- देय आहे. अर्जदारांनी जाबदारकडे एकूण रक्कम रु.14,67,060/- भरलेली असताना प्रत्यक्षात भरलेली रक्कम रु.10 लाख दाखविली गेली आहे व त्यावर बोनस रु.2,50,000/- दाखविला आहे. म्हणून अर्जदार यांनी जाबदार यांचे तक्रार निवारण अधिकारी यांचेकडे तक्रार दिली. परंतु त्यांचेकडून समाधानकारकरित्या कळविले गेले नाही. अशा प्रकारे जाबदार यांनी अर्जदार यांचे रकमेचा अपहार करुन फसवणूक केली आहे. सबब जाबदारकडून रक्कम रु.4,67,060/- रक्कम व्याजासह मिळावी, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचा खर्च मिळावा यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि.11 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदार हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत त्यामुळे त्यांनी जाबदार यांनी सांगितल्याप्रमाणे सहया केल्या हे कथन खोटे आहे. सदरचे पॉलिसीचे प्रपोजल फॉर्मवर शेवटी प्रतिज्ञापत्र आहे. त्यामुळे आता अर्जदार यांना माहिती नाही असा बचाव घेता येणार नाही. अर्जदार यांनी विमा हप्त्यापोटी रु.12,21,010/- एवढीच रक्कम भरलेली आहे. परंतु अर्जदार यांनी रु.10 लाख या रकमेची विमा पॉलिसी घेतलेली होती. पॉलिसी घेताना अर्जदार यांचे वय 58 वर्षाचे होते. त्यामुळे पॉलिसीच्या अटीप्रमाणे विमा हप्ता जास्त बसतो. त्यामुळे जोखीम जास्त असल्यामुळे अर्जदार हे रु.10 लाख व सुनिश्चित लाभापोटी रु.2,50,000/- एवढीच रक्कम मिळणेस पात्र आहेत. जेवढी जोखीम स्वीकारलेली होती तेवढीच रक्कम व सुनिश्चित लाभ विमेदार मिळणेस पात्र असतो जाबदार यांनी फक्त 5 वेळाच अर्जदारकडून विमा हप्ता स्वीकारलेला आहे. अर्जदार यांनी रकमेच्या अपहाराचा आरोप केला आहे. सबब प्रस्तुतची तक्रार या मंचासमोर चालू शकत नाही. अर्जदारने सदरचे पॉलिसीपोटी स्वीकारलेली रक्कम ही कोणतेही हक्क अबाधित राखून स्वीकारलेली नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदार व जाबदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद अनुक्रमे नि. 15 व 17 ला पाहिला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 5. अर्जदार यांचे तक्रारअर्जात असे कथन केले आहे की त्यांनी जाबदार यांचेकडे एल.आय.सी.जीवनप्रमुख या पॉलिसीअंतर्गत एकूण सहा हप्ते भरले असून त्यांची एकूण रक्कम रु.14,67,060/- इतकी होते. परंतु जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये सदरची बाब नाकारली असून जाबदार यांचे कथनानुसार अर्जदार यांनी फक्त पाच हप्ते भरले असून त्याची रक्कम रु.12,21,010/- इतकी होते. अर्जदार यांनी विमा हप्ता भरल्याच्या पावत्या दाखल केल्या असून सदरच्या पावत्या या एकूण पाच असल्याचे दिसून येते. नि. 5/2 ला अर्जदार यांनी दाखल केलेली पावती ही प्रपोझल डिपॉझिट रिसीट आहे व विमा हप्त्याच्या इतर पावत्या या पाच आहेत. सदरची बाब विचारात घेता अर्जदार यांनी विमा पॉलिसीपोटी एकूण सहा हप्त्यांपोटी रक्कम रु.14,67,060/- भरली ही बाब शाबीत होत नाही. 6. अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात असे कथन केले आहे की, त्यांनी भरलेल्या जादा रु.4,67,060/- या रकमेचा जाबदार यांनी अपहार केला आहे व फसवणूक केली आहे. परंतु अपहार व फसवणूकीच्या तक्रारींचा निवाडा करण्याचे कार्यक्षेत्र या मे. मंचास नाही. जाबदार यांनी अपहार व फसवणूक केली असे अर्जदार यांचे कथन असेल तर त्यासाठी पावत्यांची पडताळणी, संबंधीतांचे जाब-जबाब इत्यादी बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. परंतु ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार सदरच्या बाबींचा समावेश या मे.मंचासाठी निश्चित केलेल्या कार्यकक्षेत होत नाही. सबब अर्जदार यांनी योग्य त्या न्यायालयात दाद मागावी असे या मंचाचे मत आहे. 7. वरील सर्व कारणांचा विचार करता अर्जदार हे त्यांची तक्रार शाबीत करु शकलेले नाहीत असे या मंचाचे मत आहे. सबब अर्जदारचा तक्रारअर्ज नामंजूर करण्यास पात्र आहे. 8. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 15/12/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |