निकाल
(घोषित दि. 22.09.2016 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. तक्रारदार यांचा मोठा भाऊ हा वकील असून तो विविध ठिकाणी वकीली करतो. तो न्यायालयात जाण्याकरता नेहमी भाडयाने कार घेतो वरील कारणास्तव त्याने हयुंदाई कंपनीची कार विकत घेण्याचे ठरविले, परंतू तक्रारदार याच्या भावाच्या नावाने कर्ज मंजूर होत नव्हते म्हणून त्याने तक्रारदारास त्याचे नावाने कर्ज मिळविण्याबाबत विनंती केली, कर्ज मंजूर करणा-या बॅंकेने तक्रारदार याच्या नावे कर्ज मंजूर करणेकरीता तयार असल्याबाबत सांगितले. गैरअर्जदार यांनी तक्रारदार यास हयुंदाई कारचे कोटेशन दिले. दि.21.03.2015 रोजी सदर कार गैरअर्जदार यांचेकडून विकत घेतली त्यावेळी गैरअर्जदार यांना रु.1,00,000/- रोख देण्यात आले. उरलेली रक्कम व कोटेशनमध्ये समाविष्ट असलेली इतर रक्कम आय.सी.आय.सी.आय बॅंक यांनी गैरअर्जदार यांना दिली. सदर रक्कम कर्जाच्या स्वरुपात होती. त्यानंतर तक्रारदार यांना सदर कारचा ताबा दिला. त्यावेळी तक्रारदार यास सांगण्यात आले की, सदर कार 2015 साली बनविली आहे. आणि कारचा विमा देखील उतरविलेला आहे. त्यामुळे विम्याच्या रकमेपोटी गैरअर्जदार यांनी रु.20,238/- तक्रारदार यांचेकडून घेतले. गैरअर्जदार यांनी तक्रारदार यास आर.टी.ओ.कार्यालयातून आठ दिवसात कारची पासींग करुन देतो असे सांगितले व पासींग करीता रु.40,238/- तक्रारदार यांचेकडून घेतले. त्यानंतर तक्रारदार वारंवार गैरअर्जदार यांना भेटले व कारच्या विम्याचे कागदपत्र मागितले. तसेच आर.टी.ओ कार्यालयात जाऊन कारची पासींगकरुन द्या अशी विनंती केली परंतू गैरअर्जदार यांनी विविध कारणे सांगून कारची पासींग करुन देण्याचे टाळले. दि.06.05.2015 रोजी गैरअर्जदार यांनी कारची विमा पॉलीसी काढली हे दाखविण्याकरीता एक झेरॉक्स कागद तक्रारदार यास दिला. सदर झेरॉक्स कागदाचे अवलोकन केल्यावर तक्रारदारास निष्पन्न झाले की, गैरअर्जदार यांनी कारच्या विमा पॉलीसीकरता फक्त रु.17,674/- भरले आहेत. परंतू प्रत्यक्षात मात्र गैरअर्जदार यांनी तक्रारदाराकडून रु.20,238/- वसूल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदार यांचेकडून विमा पॉलीसीकरता वसूल केलेली अतिरिक्त रक्कम आजपर्यंत परत केलेली नाही. त्याचप्रमाणे कारचा विमा उशिराने घेतलेला आहे. अशाप्रकारे गैरअर्जदार यांनी सेवा देण्यात कसूर करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदाराच्या कारचा विमा न उतरविल्यामुळे तसेच कारचे आर.टी.ओ.कार्यालयातून पासींग करुन न दिल्यामुळे गैरअर्जदारास सदर कार न चालविता घरासमोर उभी करुन ठेवावी लागत आहे. तसेच स्वतःच्या कामाकरता भाडयाची कार वापरावी लागत आहे. भाडयाचे कार करिता तक्रारदार याचे भावास प्रत्येक महिन्यास रु.20,000/- ते 25,000/- खर्च करावे लागत आहेत. तक्रारदार याने आर.टी.ओ.ऑफीमध्ये सदर कारची का पासींग होत नाही याबाबत चौकशी केली असता त्यास कळाले की, पुर्वी ही कार गैरअर्जदार यांनी भरत नावाचे व्यक्तीच्या नावाने नोंदली होती. तक्रारदार यास सदर कार 2015 मध्ये उत्पादीत आहे असे खोटेच सांगितले. पण प्रत्यक्षात मात्र 2014 साली उत्पादीत झालेली कार दिलेली आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदार यास सेकंडहॅण्ड वापरलेली कार दिलेली आहे. अशा त-हेने गैरअर्जदार यांनी तक्रारदाराची फसवणूक केलेली आहे. त्यानंतर तक्रारदार याने गैरअर्जदार यांना नोटीस पाठविली अशारितीने गैरअर्जदार यांच्या सेवेत त्रुटी असून त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. म्हणून हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदार याने अशी विनंती केली आहे की, त्याचा तक्रार अर्ज त्याच्या मागणीप्रमाणे मंजूर करावा.
तक्रारदार याने तक्रार अर्जासोबत जोडलेल्या नि.4 च्या यादीप्रमाणे आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडलेल्या आहेत.
गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकीलामार्फत हजर झाले. त्यांचा जबाब नि.11 वर दाखल आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदार यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. तक्रारदाराचा भाऊ वकील आहे काय? तसेच तो कोठे वकीली करतो याबाबत त्यांना काहीही माहीत नाही. गैरअर्जदार यांनी तक्रारदार यास कधीही कोणतेही कागदपत्रे देण्याकरता टाळाटाळ केलेली नाही. त्याचप्रमाणे कोणतीही अतिरिक्त रक्कम तक्रारदार यांचेकडून उकळलेली नाही. तक्रारदाराने मुददाम आर.टी.ओ.कडून कारची पासींग करुन घेतलेली नाही. या मुद्यावर तक्रारदार याचीच चुक आहे. पोलीस कार्यवाही करतील या भीतीपोटी त्याने सदर कार घरामध्ये ठेवली आहे. गैरअर्जदार यांचेकडून सेवा देण्यात कसूर झालेली नाही. तक्रारदार हा कारची पासींग न करता कार वापरत असल्याबाबत संबंधित पोलीस व आर.टी.ओ.यांना गैरअर्जदार यांनी कळविले आहे. तक्रारदार याने प्रत्यक्षात दि.21.03.2015 रोजी हयुंदाई कार खरेदी केली होती. कार खरेदीच्यावेळी गैरअर्जदार यांनी तक्रारदार यास सदर कार 2014 साली उत्पादीत झाल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे कोटेशन ही देण्यात आले होते. सदर कोटेशन रु.5,09,398/- चे होते. त्या कोटेशनमध्ये इन्शुरन्स व आर.टी.ओ.खर्चाच्या बाबत उल्लेख होता. विमा रक्कम शोरुम मधील कारच्या किंमतीवर आधारीत होती त्यावेळी तक्रारदार यास कल्पना दिली होती की, 2014 चे मॉडेल घेतले तर त्याला रु.25,699/- चा डिस्काऊंट गाडीच्या शोरुम किंमतीवर देण्यात येईल. त्यानुसार डिस्काऊंटची रक्कम गृहीत धरुन गाडीची शोरुम किमत रु.4,13,637/- झाली. त्यावर आर.टी.ओ.चा चार्ज रु. 37,227/- (9 टक्के प्रमाणे) व प्रोसेसिंग फीस रु.2550/- आणि विमा रक्कम रु.17,674/- अशी एकंदर किंमत रु.4,89,088/- इतकी झाली. तक्रारदार याने दि.21.03.2015 रोजी रु.1,00,000/- जमा केले. तसेच दि.29.04.2015 रोजी कर्ज घेऊन रु.3,93,675/- इतकी रक्कम दिली. तक्रारदार याने दि.25.05.2015 रोजी रु.17,000/- चा चेक कंपनीच्या नावाने दिला. त्यामुळे कारची खरी किंमत काय आहे हे तक्रारदार यास चांगल्यारितीने माहीत होते. गैरअर्जदार यांनी हयुंदाई I 10 ग्रे कलरची कार भरत मुंडीया यांना विक्री केली होती. परंतू कंपनीच्या संबंधित क्लार्क कडून आर.टी.ओ.यांना माहिती देताना तक्रारदाराच्या कारचा चेसीस व इंजीन नंबर चुकीने लिहीण्यात आला, त्यानंतर सदर माहिती आर.टी.ओ.औरंगाबाद यांनी आर.टी.ओ.जालनाकडे पाठविली, ही बाब आर.टी.ओ.जालना यांनी गैरअर्जदार यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर लगेच गैरअर्जदार यांनी आर.टी.ओ.औरंगाबाद यांना आवश्यक ती दुरुस्ती करण्याबाबत दि.01.12.2015 रोजी पत्र दिले आणि इंजीन व चेसीस नंबरची आवश्यक ती दुरुस्ती करुन देण्यात आली. परंतू सदर दुरुस्तीची नोंद आर.टी.ओ.च्या औरंगाबाद येथील ऑफीसमध्ये न झाल्यामुळे व ती दुरुस्ती आर.टी.ओ.जालना यांच्याकडून पाठविण्यात आल्यामुळे चुकीची नोंद रेकॉर्डवर कायम राहिली. गाडीची रेकॉर्डमध्ये चुकीची दुरुस्ती करण्यास उशीर झाल्यामुळे तक्रारदाराचा गैरसमज झाला. आर.टी.ओ.जालना कडे चौकशी केल्यानंतर तक्रारदार यास समजून आले की, इंजीन व चेसीस नंबरची चुकी ही तांत्रीक मुद्यावर होती. त्या चुकीची दुरुस्ती झाल्यामुळे आता तक्रारदार यांनी गाडीची पासींग करुन घ्यावी. त्यानंतरही वेळोवेळी गैरअर्जदार यांनी तक्रारदार यास गाडीची पासींग करण्याबाबत कळविले परंतू तक्रारदार यांनी मुददाम गाडीची पासींग करुन घेतली नाही. तसेच गाडीचा आर.टी.ओ.टॅक्स सुध्दा कार्यालयात जमा केला नाही. गैरअर्जदार यांनी तक्रारदार गाडीची पासींग करुन घेत नाही म्हणून आर.टी.ओ. व पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलीसांनी गैरअर्जदार यांचे विरुध्द चंदनझीरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नं.139/2015 दाखल केला सदर प्रकरणात तक्रारदार यास जिल्हा व सत्र न्यायालय जालना यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. या सर्व गोष्टींचा राग मनात धरुन तक्रारदार याने गैरअर्जदाराचे विरुध्द खोटी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराचा भाऊ न्यायालयात मोटार सायकलवर येतो, त्याने कोणतेही भाडयाचे वाहन वापरलेले नाही. वरील कारणास्तव गैरअर्जदार यांनी तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करावा अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदार यांनी नि.18 या यादीसोबत काही महत्वाचे कागदपत्रांच्या नक्कला ग्राहक मंचाच्या अवलोकनार्थ दाखल केल्या आहेत.
आम्ही तक्रारदार व गैरअर्जदार यांच्या वकीलांचा सविस्तर युक्तीवाद ऐकला. त्यावरुन आमचे असे मत झाले आहे की, तक्रारदार याने त्याच्या भावाच्या उपयोगाकरीता आय.सी.आय.सी.आय.बॅंकेकडून कर्ज घेऊन नवी हयुंदाई कार विकत घेतली. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, त्याने 2015 साली उत्पादीत झालेली हंयुदाई कार विकत घेतली परंतू गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराची फसवणूक करुन त्याला 2014 साली उत्पादीत झालेली हयुंदाई कार विकली सदर कारचे आर.टी.ओ.रजिस्ट्रेशन आजपर्यंतही झालेले नाही, ही गोष्ट उभयपक्षी मान्य आहे. तक्रारदार याने असा आरोप केला आहे की, गैरअर्जदार यांनी हयुंदाई कार विक्रीच्यावेळी तक्रारदार यांचेकडून आर.टी.ओ.पासींग करीता रक्कम रु.40,238/- घेतलेली आहे. तक्रारदार याने तक्रार अर्जासोबत दि.23.03.2015 रोजी त्याला देण्यात आलेल्या कोटेशनची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे त्यावर सुध्दा रक्कम रु.40,238/- आर.टी.ओ.पासींग करीता तसेच कारच्या विम्याकरता रु.20,238/- आहेत असा उल्लेख आहे. गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी जबाबातही गाडीच्या रकमेवर 9 टक्के दराने आर.टी.ओ.चार्ज रु.37,227/- व पासींग फीस रु.2550/- असल्याचा व विम्याची रक्कम रु.17,674/- असल्याचा उल्लेख केला आहे. वरील सर्व रकमा एकत्र केल्यानंतर गाडीची एकूण किंमत रु.4,89,088/- होत असल्याचे नमुद आहे.
तक्रारदार याचा असा आरोप आहे की, सदर कारचा विमा उतरविण्याकरीता गैरअर्जदार यांनी पैसे घेतले परंतू विमा उतरविण्यास विलंब केला. या मुद्यावर तक्रारदार याने मॅगमा कंपनीच्या विम्याच्या कव्हर नोट कडे ग्राहक मंचाचे लक्ष वेधले. त्यावरुन असे दिसून येते की, सदर विमा दि.06.05.2015 रोजी उतरविलेला आहे व तो विमा अजय माणिकराव वाघ यांच्या नावे आहे. तक्रारदार याचे नावे गैरअर्जदार यांनी टॅक्स इनव्हाईस दिला, सदर टॅक्स इनव्हाईसची झेरॉक्स प्रत रेकॉर्डवर दाखल आहे. त्यावरुन असे दिसते की, सदर इनव्हाईस 21.03.2015 या तारखेचे आहे. तक्रारदार याने दाखल केलेल्या कोटेशनची तारीख पाहिली तर असे दिसते की, त्यावर 23.03.2015 ही तारीख आहे. याचाच अर्थ असा की, मार्च 2015 मध्ये तक्रारदार याने गैरअर्जदार यांचेकडून हयुंदाई कार विकत घेतली परंतू पैसे घेऊन ही त्यांनी त्याचा विमा मात्र दि.06.05.2015 रोजी उतरवून दिलेला आहे. याचाच अर्थ, कारचा विमा उतरविण्यास अंदाजे 46 दिवस उशीर झालेला आहे. त्यामुळे आम्हास असा संशय येतो की, गैरअर्जदार यांनी मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तक्रारदाराकडून वसूल केलेले कारचे विम्याचे पैसे इतर कामाकरता वापरले. वरील कारणास्तव गैरअर्जदार यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे गृहीत धरण्यास आम्हास कोणतीही अडचण वाटत नाही.
तक्रारदार याचा असा आरोप आहे की, त्याला 2015 साली उत्पादीत गाडी विकतो असे सांगून गैरअर्जदार यांनी 2014 साली उत्पादीत झालेली कार दिली. या मुद्यावर गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी जबाबात असे निवेदन केले आहे की, 2014 चे उत्पादीत कारला रु.25,699/- चा डिस्काऊंट उपलब्ध असल्यामुळे तक्रारदार याने स्वतःहून 2014 साली उत्पादीत झालेली गाडी घेतली. आमच्या मताने गैरअर्जदार यांच्या शब्दाशिवाय या गोष्टीवर विश्वास ठेवण्याकरता दुसरा कोणताही स्वतंत्र व ठोस पुरावा नाही. त्यामुळे आम्ही गैरअर्जदार यांच्या कथनावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. तक्रारदार यास कोटेशन व इनव्हाईस 2015 साली उत्पादीत झालेल्या गाडीचे देण्यात आले परंतू 2014 साली उत्पादीत झालेल्या गाडीची डिलेव्हरी त्याला देण्यात आली. हा प्रकार निःसंशय अनुचित व्यापारी प्रथेमध्ये मोडतो. या मुद्यावर गैरअर्जदार यांचा बचाव विश्वास ठेवण्यास अयोग्य आहे असे आमचे स्पष्ट मत आहे.
तक्रारदार याने असा आरोप केला आहे की, त्याच्या गाडीची पासींग करुन देण्याकरता गैरअर्जदाराने त्याचेकडून पैसे घेतले. परंतू वारंवार पाठपुरावा करुनही सदर गाडीची पासींग गैरअर्जदार यांनी करुन दिली नाही. त्यामुळे तक्रारदार याने आर.टी.ओ.ऑफीसमध्ये चौकशी केली तेव्हा सदर गाडी भरत मुंडीया या गृहस्थाच्या नावे नोंदली गेल्याचे दिसून आले. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी जबाबात सुध्दा भरत मुंडीया याच्या नावाने आर.टी.ओ.ऑफीसमध्ये नोंद असल्याचे अप्रत्यक्षपणे कबूल केले आहे, परंतू गैरअर्जदार असा खुलासा देतात की, कारकुनाच्या चुकीमुळे भरत मुंडीयाच्या गाडीचे डिटेल्स लिहीताना तक्रारदार याच्या गाडीचा चेसीस नंबर व इंजीन नंबर अनावधानाने लिहीण्यात आला. आमच्या मताने या मुद्यावर सुध्दा गैरअर्जदार यांनी ठोस पुरावा दिलेला नाही. आर.टी.ओ.ऑफीसमधील संबंधित कर्मचा-याचे किंवा भरत मुंडीयाचे शपथपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांचा या मुद्यावर वरील बचाव स्विकारण्यास योग्य नाही असे आमचे मत आहे.
तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रार अर्जात आरोप केला आहे की, त्यांचा भाऊ वकील असल्यामुळे त्यास वेगवेगळया कोर्टात जाण्याकरता वाहनाची आवश्यकता असते. म्हणून तक्रारदार याने गैरअर्जदार यांचेकडून या दाव्यात उल्लेख केलेली हयुंदाई कार विकत घेतली परंतू त्याचा विमा व आर.टी.ओ.पासींग न केल्यामुळे सदर गाडी तक्रारदार यास व त्याचे भावास वापरता आली नाही. परिणामी तक्रारदार याचे भावास कोर्ट कामास विविध ठिकाणी जाण्याकरता वेळोवेळी भाडयाने टॅक्सी घ्यावी लागली. आमच्या मताने तक्रारदार यांनी जास्त नुकसान भरपाई मिळावी म्हणून अतिशयोक्ती केलेली आहे. प्रत्यक्षात तक्रारदार याने कोणत्या दिवशी त्याचा भाऊ कोणत्या कोर्टात, कोणत्या नंबरच्या टॅक्सीने गेला होता, टॅक्सीचे काय भाडे होते व ते कोणाला दिले, याबाबत कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही. त्यामुळे तक्रारदार याचे भावास दाव्यातील गाडी न वापरता आल्यामुळे त्याला टॅक्सी करता भरमसाठ खर्च करावा लागला हया आरोपावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही.
तक्रारदार याने गाडीची पासींग केली नाही म्हणून गैरअर्जदार यांनी आर.टी.ओ. व संबंधित पोलीस यांचेकडे तक्रार केली असल्याचे सांगितले आहे. परंतू जर गाडीच्या पासींगकरीता गैरअर्जदार यांनी गाडी विक्रीच्यावेळेसच आवश्यक असलेली रक्कम तक्रारदार यांचेकडून घेतली असेल तर पुन्हा सदर गाडीच्या रजिस्ट्रेशन करता तक्रारदार यांना आर.टी.ओ.ऑफीमध्ये जाऊन खर्च करणे अपेक्षित नाही, ही जबाबदारी गैरअर्जदार यांचीच आहे. त्यामुळे तक्रारदार याने गाडीची पासींग न करता गाडी घरात ठेवली या आरोपावर आम्ही विश्वास देऊ इच्छित नाही.
गैरअर्जदार यांनी तक्रारदार यास गाडीची पासींग करुन घ्यावे असे पत्राद्वारे अथवा नोटीस देऊन कळविणे आवश्यक होते, परंतू तसे न करता गैरअर्जदार यांनी आर.टी.ओ.आणि संबंधित पोलीस स्टेशनकडे तक्रार दिली. आमच्या मताने या मुद्यावर गैरअर्जदार यांची सर्व वर्तणूक संशयास्पद आहे.
तक्रारदार यास 2015 सालची गाडी विकतो असे सांगून 2014 सालची गाडी देणे, तक्रारदार यांचेकडून गाडीचा विमा उतरविण्याकरीता व आर.टी.ओ.पासींगकरीता पैसे वसूल करुन त्या गोष्टी न करणे, विमा उतरविण्याकरीता अतिरिक्त रक्कम वसूल करुन कमी रकमेत उशिरा विमा उतरविल्यावर उरलेली रक्कम तक्रारदार यास परत न करणे, या सर्व गोष्टी सेवेतील त्रुटी दर्शवितात. त्याचप्रमाणे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब गैरअर्जदार यांनी केल्याचे दर्शवितात, त्यामुळे आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
- तक्रारदार याचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2) तक्रारदार याच्या टॅक्सी भाडयाच्या मागणीचा दावा नामंजूर करण्यात येतो.
3) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे अथवा संयुक्तपणे तक्रारदार यास
गाडीच्या विम्यापोटी भरलेली अतिरिक्त रक्कम या आदेशापासून 30
दिवसाचे आत राष्ट्रीयकृत बॅंकेच्या डिमांड ड्रॉफ्ट द्वारे परत करावी.
4) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे अथवा संयुक्तपणे तक्रारदार यांना
2015 साली उत्पादीत झालेली गाडी देण्याऐवजी दिशाभूल करुन 2014
साली उत्पादीत झालेली गाडी दिली त्यामुळे तक्रारदार यास जो मानसिक
त्रास झाला, त्याबददल नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.25,000/-
देण्यात यावी.
5) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे अथवा संयुक्तपणे तक्रारदार याच्या
गाडीचे आर.टी.ओ.पासींग या आदेशापासून 30 दिवसाचे आत करुन द्यावे.
त्या करिता त्यांनी तक्रारदाराकडून कोणतीही रक्कम मागू नये.
6) या तक्रार अर्जाच्या खर्चापोटी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे अथवा
संयुक्तपणे रक्कम रु.5,000/- द्यावेत.
7) या आदेशातील वर उल्लेख केलेल्या सर्व परिच्छेदामध्ये ज्या ज्या रकमा
गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यास विहीत मुदतीत देण्याकरता
आदेशीत केले आहे. त्या रकमा विहीत मुदतीत देण्यात आल्या नाही तर,
सदर रकमांवर या आदेशाच्या तारखेपासून सर्व रक्कम वसूल होईपर्यंत
11 टक्के व्याजाची आकारणी करण्यास तक्रारदाराला मुभा आहे.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना