ग्राहक तक्रार क्र. 28/2012
अर्ज दाखल तारीख : 01/02/2012
अर्ज निकाल तारीख: 05/12/2014
कालावधी: 02 वर्षे 10 महिने 05 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. रेखा बालाजी दंडगुले,
वय-22 वर्षे, धंदा – घरकाम,
रा.एकूरगा, ता. उमरगा, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखा व्यवस्थापक,
भारती एएक्सए जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
101 अॅन्ड 1116, पहिला मजला, पोलिज सेक्टर-17,
वर्धमान मार्केटच्या विरुध्द दिशेला, वाशी, नवी मुंबई- 4000703.
2. शाखा व्यवस्थापक,
इंडिया इनफो लाईन, मार्केटिंग सर्व्हीसेस लि.
मार्केट यार्ड, कव्हा रोड,
नावंदर ऑर्केड पहिला मजला. लातूर. ....विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2)मा.श्रीमती विदयुलता जे. दलभंजन सदस्य.
3) मा.श्री.एम.बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.जी.के.गायकवाड,
विरुध्द पक्षकारा क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.पी.एम.जोशी.
विरुध्द पक्षकारा क्र.2 तर्फे विधीज्ञ : एकतर्फा.
निकालपत्र
मा. सदस्य श्री. मुंकुद बी.सस्ते, यांचे व्दारा :
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारदाराने दि.01/02/2012 रोजी न्यायमंचात तक्रार दाखल केली. त्यानंतर दि.14/06/2012 रोजी तक्रारकर्त्याचे वकील हजर राहीले. दि.12/07/2012 रोजी विप तर्फे अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर दि.04/09/2013 रोजी तक्रारदाराने नवीन दुरुस्ती दावा दाखल केला तो संक्षीप्त स्वरुपात खालीलप्रमाणे.
तक्रारदार ही मयत बालाजी दंडगूले याची पत्नी असून त्याने विप कडून जनता अपघात विमा घेतला असून सदर पॉलीसीचा क्र.10191286 असा असून त्याचे प्रमाणपत्र क्र.एस.137609322 आहे. सदर पॉलीसचा कालावधी दि.02/05/10 ते 01/05/2011 असा असून नॉमिनी म्हणून तक्रारदाराचे नाव आहे. अर्जदारा चा पती रीक्षा क्र.एमएच 25 डी 9935 मध्ये प्रवास करीत असतांना बालाजी दंडगुले सदरचे वाहन चालवित असतांना दि.15/05/2010 रोजी टिप्पर क्र.एम.ए.25 बी.9357 या वाहनाने रिक्षास पाठीमागून धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. यानंतर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन प्रस्ताव पाठविला असता दि.23/05/2011 रोजी विमा प्रमाणपत्र मिळवून न आल्यामुळे अर्जदाराचा दावा नामंजूर करण्यात आला. त्यानंतर दि.06/09/2011 रोजी तक्रारदाराने नोटीस देवून पॉलीसीची रक्कम देण्याविषयी विनंती केली असता विपने ती स्वीकारुन आदयाप पर्यंत त्याचे उत्तर दिलेले नाही.
अर्जदाराच्या पतीने लातुर येथील शाखेतून पॉलीसी काढली होती व त्याची रक्कम लातूर येथे जमा केल्यानंतर लातूर येथील विपने त्याची शाखा बंद केलेली आहे म्हणून अर्जदाराने त्याचा क्लेम फॉर्म विप क्र.1 यांच्याकडे पाठवून दिला होता. विपने सदर पॉलसीच्या संदर्भात इन्हीगेटर नेमून चौकशी न करता अर्जदाराच्या पतीने काढलेली पॉलीसी मिळवून येत नाही म्हणून तक्रारदाराचा अर्ज नामंजूर केलेला आहे तो चूकीचा आहे कारण अर्जदाराने पाठविलेल्या फॉर्मसोबत मुळ प्रमाणपत्राची प्रमाणीत प्रत पाठविली होती. त्याची चौकशी न करता विपने विमा पॉलिसीची रक्कम देण्यास नकार दिला म्हणून ही तक्रार दाखल करणे तक्रारदारास भाग पडले. त्यासाठी मानसिक व शारीरिक त्रासासाठी रु.25,000/- देण्यास विप जबाबदार आहे तसेच अपघात हा उमरगा येथे झालेला असल्याने तो या कोर्टाच्या कार्यक्षेत्रात घडलेला आहे म्हणून सदरचे प्रकरण चालविण्याचा या कोर्टास अधिकार आहे. नॉमिनी म्हणून तक्रारदाराचे नाव असल्याने तक्रारदार बेनीफीशीअर असून तक्रारदाराची तक्रार ही न्यायीक दृष्टीने योग्य आहे व त्याला पॉलीसीचे रु.1,00,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- देण्याविषयी विनंती केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत FIR, स्थळ पंचनामा, इंन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मार्टम रिपोर्ट, विपस पाठविलेली नोटीस, मृत्यू प्रमाणपत्र, विपचे पत्र, इन्शूरन्स लेटर, विमा प्रमाणपत्र इ. च्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
विप क्र.1 यांना नोटीस काढलया असता त्यांनी आपले म्हणणे दि.22/06/2012 रोजी दाखल केले. त्यानुसार तक्रारदाराने जनता अपघात विमा पॉलीसी घेतली हे अमान्य करण्यात आले असून तक्रारदाराच्या पतीने कथीत विमा पॉलीसी घेण्यासाठी विपकडे विमा प्रिमियम जमा केला याबाबत कोणताही पुरावा नाही. याच सोबत दि.23/05/2011 रोजी विपने पॉलिसी संदर्भात मुळ विमा पॉलसी सादर करण्यासाठी नागनाथ दंडगुळे यांना दि.14/01/2011 पुन्हा दि.18/02/2011 रोजी व वेळोवेळी कळवूनही पुर्तता केली गेली नाही. तसेच मयत बालाजी शंकर दंडगुले यांना कथीत विमा सरंक्षण दि.01/07/2010 ते 30/06/2011 रोजी पर्यंत असल्याने सदर विमादावा नाकारणे विपस भाग पडले. त्यामुळे या कालावधीनंतर आलेल्या नोटीसीस विपने उत्तर दिले आहे. तक्रारदाराने या व्यतिरीक्त सर्व तक्रारदाराच्या तक्रारीतील मजकूर नाकारलेला असून निवेदन केले आहे की संबंधीत विमा पॅालीसीचे प्रपोजल व त्या अंतर्गत विमेदार इंडिया इन्फोलाईन मार्केर्टीग सर्व्हीसेस लि. हे होते. संबंधीत विमा पॉलीसीबाबत एन्डॉर्समेंट क्र.5 अन्वये विप विमा कंपनी व सदर इंडिया इन्फोलाईन मार्केटींग सर्व्हीसेस लि. यांच्यामध्ये झाली त्यानुसार संबंधीत विमा पॉलीसींचा कार्यकाळ दि.15/02/2010 ते 14/02/2012 रोजी असे हे उभयपक्षी घोषीत व मान्य करण्यात आलेले आहे. तक्रारदाराने इंडिया इन्फोलाईन मार्केटींग सर्व्हीसेस लि. यांना या प्रकरणी आवश्यक पक्षकार असतांनाही गैरअर्जदार पक्षकार केलेले नाही. म्हणून ही तक्रार कायदयाने अयोग्य असून सदर विमा दावा योग्य कारणास्तव व बरोबररीत्या नामंजूर केला आहे. विपने सेवेत कोणतीही त्रूटी केलेली नाही. म्हणून तक्रारदाराकडून विपस रु.10,000/- नुकसान भरपाई देववावी असे नमूद केले आहे.
3) विप क्र.2 ला नोटीस मिळून देखील गैरहजर राहील्यामुळे त्याच्या विरोधात अंतिमत: दि.03/11/2014 रोजी सदरचे प्रकरण एकतर्फा करण्यात आले.
4) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुदये उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) सदरची तक्रार या न्यायीक क्षेत्रात येते काय ? नाही.
2) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्षाचे विवेचन
5) मुददा क्र.1 चे उत्तर:
तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीचे सुक्ष्म अवलोकन केले असता तक्रारदाराने दि.01/02/2012 रोजी न्यायमंचात तक्रार दाखल केली. त्यानंतर दि.14/06/2012 रोजी तक्रारकर्त्याचे वकील हजर राहीले. दि.12/07/2012 रोजी विप तर्फे अर्ज दाखल करण्यात आला. दावा दुरुस्त करण्याचे आदेश 01/01/2013 रोजी झालेले होते व दि.04/09/2013 रोजी दुरुस्ती दावा दाखल करण्यात आलेला आहे. सदरबाबत तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीचे स्वरुप पाहता. तक्रारदाराच्या तक्रारीत पॉलीसी विप क्र.1 वा 2 पैकी कोणाकडून घेतली हे कोठेच नमूद नाही. प्रस्ताव केव्हा व कोणी पाठविला हेही कूठेच नमूद नाही. विपकडे प्रिमीयम भरला तो नेमका कोणाकडे हेही नमूद नाही. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने विपकडून सदर विमा दावा घेतला असून त्याची पुर्तता विपने न केल्याने तक्रार दाखल केली असून सदर विप क्र.1 यांचा पत्ता वाशी, नवी मुंबई असा असून विप क्र.2 हे लातूर येथील आहे. विप क्र.1 व 2 हे दोघेही या मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीत असे कोठेही म्हंटलेले नाही की सदरची पॉलीसी ही विप क्र.1 वा 2 च्या प्रतिनीधीमार्फत उस्मानाबाद येथे घेतली आहे. म्हणजेच सदर पॉलीसी स्वीकारणे वा नाकारणे या दोन्ही गोष्टींपैकी कोणतीही गोष्ट या मंचाच्या कार्यक्षेत्रात झालेली नसून तक्रारदाराने केवळ सदरच्या अपघाताची घटना उमरगा जि.उस्मानाबाद येथे घडल्याने सदरची तक्रार या मंचात दाखल केली आहे असे दिसते. मात्र ते ग्रा. सं. कायदयानूसार दाव्यास कारण (कॉझ ऑफ अॅक्शन) म्हणून धरता येत नाही तर सेवा देण्याची वा त्रुटी करण्याची कृती सदर मंचाच्या कार्यक्षेत्रात केली असल्यास सदरची तक्रार त्या कार्यक्षेत्रातील मंचात ग्रा.सं.का. कलम 11 च्या अ,ब,क, या मधील तरतूदीच्या अधीन राहून दाखल करता येते तशी सदर तक्रारीतील कोणतीही गोष्ट या मंचाच्या कर्यक्षेत्राच्या कक्षेत न घडल्यामुळे सदर तक्रारीच्या गुणत्तेबाबत काहीही मत प्रदर्शन नकरता सदरची तक्रार योग्य त्या न्यायीक क्षेत्राकरीता फेटाळण्यात येते.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार योग्य त्या न्यायीक क्षेत्राकरीता फेटाळण्यात येते.
2) सदरची तक्रार इतर मंचात दाखल करतांना या तक्रारीची बाधा येणार नाही.
3) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद