निकालपत्र
--------------------------------------------------------------------
(1) मा.अध्यक्ष,श्री.डी.डी.मडके – विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना योग्य व तत्पर सेवा देण्यात कसुर केली म्हणून, तक्रारदार यांनी नुकसान भरपाई मिळण्याकरिता प्रस्तुत तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे
(2) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, ते गणपुर,ता.चोपडा.जि.जळगांव येथील रहिवाशी असून तेथे त्यांची गट नं.15 क्षेत्रफळ 1 हेक्टर 42 आर ची शेती आहे. तक्रारदारास त्यांच्या शेतात बोअर करावयाचे होते. त्यासाठी विरुध्दपक्ष यांचेकडे चौकशी करुन बोअर करण्याचे ठरले. बोअर करण्यासाठी दि.12-04-2010 रोजी रक्कम रु.10,000/- विरुध्दपक्षास अॅडव्हान्स म्हणून दिले व पावती घेतली. तक्रारदाराकडे बोअर करण्यासाठी दि.25-04-2010 पावेतो येण्याचे विरुध्दपक्षाने सांगितले.
(3) परंतु अॅडव्हान्स रक्कम देऊन पंधरा ते वीस दिवस झाल्यावरही विरुध्दपक्ष हे तक्रारदाराचे शेतावर बोअर करण्यासाठी आले नाहीत. त्यासाठी विरुध्दपक्ष यांचेशी तक्रारदाराने संपर्क केला असता विरुध्दपक्षाने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि बोअर करुन देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर तक्रारदाराने बोअरसाठी दिलेल्या अॅडव्हान्स रकमेची मागणी केली. तसेच फसवणूक झाल्यामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा शिरपूर यांच्यामार्फत न्याय मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु विरुध्दपक्ष यांनी अॅडव्हान्स घेतलेली रक्कम परत दिली नाही व बोअरही करुन दिलेला नाही.
(4) तक्रारदारास त्याच्या शेतात कापूस पिकाची पेरणी करावयाची होती. परंतु विरुध्दपक्षाने बोअर करुन न दिल्यामुळे पुरेशा पाण्या अभावी तक्रारदाराच्या पिकाच्या उत्पन्नात घट झाली. पाण्यामुळे एकरी 10 क्विंटल इतके उत्पन्न येणार होते ते पाण्याअभावी एकरी 6 क्विंटल इतके उत्पन्न आले. संपुर्ण क्षेत्रात 12 क्विंटल इतक्या कापूस पिकाची घट होऊन नुकसान झाले.
(5) त्यामुळे विरुध्दपक्ष यांचेकडून बोअर करण्यासाठी अॅडव्हान्स म्हणून दिलेली रक्कम रु.10,000/-,बोअर अभावी शेतातील उत्पन्नात झालेले नुकसान रु.54,000/- आणि विरुध्दपक्षाच्या कृत्यामुळे झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून रु.26,000/- असे एकूण रु.90,000/- मिळावेत आणि नुकसान भरपाई रकमेवर 18 टक्के प्रमाणे व्याज मिळावे अशी तक्रारदाराने शेवटी विनंती केली आहे.
(6) सदर तक्रार अर्जाचे कामी विरुध्दपक्ष यांना रजिष्टर्ड पोष्टाद्वारे नोटिस काढण्यात आली. परंतु सदर नोटिस विरुध्दपक्ष यांनी स्वीकारली नसल्यामुळे ती “ मुदतीत सोडवायला आले नाहीत. सबब परत. ” अशा पोष्टाच्या शे-यासह या न्यायमंचात परत आली आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष यांना सदर नोटिसीचे ज्ञान झाले आहे असे समजण्यात येत आहे.
(7) विरुध्दपक्ष हे या न्यायमंचाच्या नोटिसीचे ज्ञान होऊनही, सदर प्रकरणी नेमलेल्या सर्व तारखांना गैरहजर आहेत. तसेच त्यांनी स्वतः अथवा प्रतिनिधी मार्फत स्वतःच्या बचावार्थ काहीही म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश करण्यात आला आहे.
(8) तक्रारदार यांनी नि.नं.2 वरील त्यांच्या तक्रारीच्या समर्थनार्थ नि.नं.3 वर शपथपत्र, नि.नं.5 प्रमाणे पुराव्याची कागदपत्रे दाखल केली आहेत.
(9) तक्रारदारांची तक्रार व दाखल कागदपत्रांवरुन आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक आहेत काय ? | ःहोय. |
(ब)तक्रारदार विरुध्दपक्ष यांचेकडून, दिलेली अॅडव्हान्स रक्कम, शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानीचा खर्च मिळण्यास पात्र आहे काय ? | ःहोय. |
(क)आदेश काय ? | ःअंतिम आदेशानुसार |
विवेचन
(10) मुद्दा क्र. ‘‘अ’’ - तक्रारदारांनी त्यांचे शेतात बोअरवेल करुन घेण्यासाठी ठरलेल्या रकमेपैकी अॅडव्हान्स म्हणून रु.10,000/- विरुध्दपक्ष यांना दिल्याचे नि.नं.5/1 वरुन स्पष्ट होते. त्यानुसार तक्रारदार हे विरुध्दपक्षाचे ग्राहक आहेत असे या न्यायमंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(11) मुद्दा क्र. ‘‘ब’’ - दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदारांनी त्यांचे शेतात विरुध्दपक्ष यांचेकडून बोअरवेल करुन घेण्यासाठी बोलणी केली व ठरलेल्या किमतीपैकी रु.10,000/- अॅडव्हान्स म्हणून दिले आणि दि.25-04-2010 पावेतो बोअरवेल करुन देण्याचे विरुध्दपक्षाने मान्य केले होते. परंतु मुदतीत बोअर न केल्यामुळे वारंवार पाठपुरावा करुन व शेवटी नाईलाजाने बोअर करणार नसाल तर अॅडव्हान्स केतेलेली रक्कम रु.10,000/- परत द्या अशी मागणी करुनही विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारास काहीही प्रतिसाद न दिल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदाराचे रु.10,000/- विरुध्दपक्षाकडे अडकून पडले आहेत. त्यामुळे विरुध्दपक्षाने पुर्तता न केल्यामुळे तक्रारदास या न्यायमंचात तक्रार दाखल करावी लागली आहे हे तक्रार अर्ज व शपथपत्रावरुन शाबीत होते.
(12) तक्रारदारांनी विरुध्दपक्ष यांचेकडून बोअर करण्यासाठी अॅडव्हान्स म्हणून दिलेली रक्कम रु.10,000/-, बोअर अभावी शेतातील उत्पन्नात झालेले नुकसान रु.54,000/- आणि विरुध्दपक्षाच्या कृत्यामुळे झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून रु.26,000/- असे एकूण रु.90,000/- मिळावेत आणि नुकसान भरपाई रकमेवर 18 टक्के प्रमाणे व्याज मिळावे अशी तक्रारदाराने शेवटी विनंती केली आहे.
(13) विरुध्दपक्षाने मंचाची नोटिस स्वीकारलेली नाही, नोटिसीचे ज्ञान होऊनही मंचात हजर नाही, कोणताही खुलासा दाखल केलेला नाही, तक्रारदारांच्या तक्रारीस व कथनास आव्हान दिलेले नाही. कथन नाकारलेले नाही.
(14) या उलट तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले आहे. तसेच त्यांच्या कथनाच्या पुष्टार्थ नि.नं.5 वर महत्वाचा पुरावा म्हणून दस्तावेज व पत्रव्यवहार दाखल केला आहे. या सर्व दस्तऐवजाचे अवलोकन करता तक्रारदारांच्या तक्रारीतील कथन हे योग्य व खरे आहे. विरुध्दपक्षाने तक्रारदाराकडून बोअरवेल करण्यासाठी ठरलेल्या रकमेपैकी अॅडव्हान्स म्हणून रु.10,000/- घेऊनही बोअरवेल करुन दिलेला नाही व अॅडव्हान्स रक्कमही परत दिलेली नाही. विरुध्दपक्षाच्या या कृतीमुळे तक्रारदाराचे निश्चितच आर्थिक नुकसान झाले आहे व त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे ही बाबही स्पष्ट झालेली आहे. तसेच तक्रारदारांना यासाठी तक्रार दाखल करावी लागली आहे. या सर्व बाबी पाहता तक्रारदार हे विरुध्दपक्षाकडून अॅडव्हान्स रक्कम रु.10,000/- व त्यावर द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज मिळण्यास पात्र आहेत असे आम्हास वाटते. तसेच विरुध्दपक्षाच्या अशा कृतीमुळे तक्रारदार निश्चितच शारीरिक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत असे आम्हास वाटते. परंतु पिकाच्या झालेल्या नुकसानीबाबत तक्रारदाराने कोणताही सबळ पुरावा दाखल केला नसल्याने त्याबाबत कोणताही आदेश करणे योग्य होणार नाही असेही आम्हास वाटते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(15) मुद्दा क्र. ‘‘क’’ – वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सदर निकाल प्राप्त झाल्यापासून पूढील तीस दिवसांचे आत, विरुध्दपक्ष यांनी.
(1) तक्रारदारास बोअरवेलच्या अॅडव्हान्सपोटी घेतलेली रक्कम 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) दि.12-04-2010 पासून, रक्कम देईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह परत द्यावी.
(2)तक्रारदारास मानसिक, शारीरिक त्रासापोटी रक्कम 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
(3)उपरोक्त आदेश कलम 2 मध्ये नमूद केलेली रक्कम मुदतीत न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखे पासून ते संपूर्ण रक्कम देईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज तक्रारदारास द्यावे.
धुळे
दिनांक – 28-03-2012.