ग्राहक तक्रार क्र. 104/2015
दाखल तारीख : 23/12/2015
निकाल तारीख : 21/10/2015
कालावधी: 0 वर्षे 10 महिने दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्रीराम आण्णा कालवडकर,
वय - 43 वर्ष, धंदा – नौकरी व शेती,
रा.दुधेडी, ता. भूम, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. मॅनेजर,
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ईटप ससयससव्यवस्थापक,
ता. भूम, जि. उसमानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.ए.ए.पाथरुडकर.
विरुध्द पक्षकारा विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
विरुध्द पक्षकार (विप) बँकेने पिक कर्जमंजूर केले परंतु वाटप न करुन सेवेत त्रुटी केली म्हणून पिक कर्ज वाटप करावे असा आदेश द्यावा तसेच मानसिक, आर्थिक, शारीरिक त्रासापोटी भरपाई द्यावी म्हणून तक्रारकर्ता (तक) यांने ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
1. तक हा ता.भुम चा शेतकरी आहे. त्याला जमीनी गट नंबर 333, गट नंबर 332, गट नंबर 545, व गट नंबर 548 अशा आहेत. तक चे विप कडे कर्ज खाते क्रमांक 60143021157 असे आहे. तक ने विप कडे पिक कर्जाची मागणी केली. त्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे दिली. विप यांनी तक ला पिक कर्ज रु.3,65,000/- मंजूर केले. सदर कर्जाचा बोजा तक च्या जमिनीवर चढवण्यासाठी तक ने पत्र दिले. त्याप्रमाणे फेरफार क्रमांक 545 दि.13.9. तक च्या जमिनीवर बोजा चढवण्यात आला. विप न तक ला रु.2,50,000/- देण्याचे ठरवले. कर्जाची रक्कम आज देतो उद्या देतो असे म्हणून विपने टाळाटाळ केली. विप तक ला जाणूनबूजून हेलपाटे घालण्यास भाग पाडत आहे. विप ने तक ला आर्थिक मानसिक शारीरिक त्रास दिलेला आहे.
2. शेवटी तक ने पिक कर्जाची रक्कम देण्यास नकार दिला. विप ने तक कडे को-या 100 च्या स्टॅप पेपरची मागणी केली व त्यावर मला पिक कर्ज नको असे लिहून देण्याची मागणी केली. विप ने तक कडून त्यांचे इच्छेविरुध्द बळजबरीने पिक कर्ज नको असे लिहून घेतले. विप ने तक ची फसवणूक केली आहे. तक ने दिलेली कागदपत्रे विप च्या कर्मचा-यांनी फाडून टाकली आहेत. विप च्या मॅनेजरची बदली झाल्यानंतर नवीन अधिकारी पिक कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ करीत आहेत. तक ने विप ला दि.6.1.15 रोजी नोटीस पाठविली व कर्ज रककमेची मागणी केली. मात्र विप ने कर्ज रक्कम दिली नाही अगर नोटीसचे उत्तर दिले नाही. म्हणून तक ने ही तक्रार दि.23.2.2015 रोजी दाखल केलेली आहे.
3. तक ने तक्रारीसोबत गट नंबर 333, गट नंबर 335, चे 7/12 उतारे दाखल केले आहेत. फेरफार नंबर 546 ने बँक ऑफ महाराष्ट्र चे कर्ज बोजाची नोंद केलेली दिसून येते, फेरफार नंबर 546 चा हजर केला आहे. दि.6.1.2015 रोजी दिलेले नोटीसीची प्रत हजर केली आहे.
4. विप यांना नोटीस बजावली. तथापि विप यांनी हजर राहून आपले म्हणणे दाखल केलेले नाही. तक्रार विप विरुध्द एकतर्फा चाललेली आहे.
5. तक ची तक्रार, त्यांने दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात आम्ही त्यांची उत्तरे त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणासाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
विप याने सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय.
तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 व 2
6. तक ने आपल्या तक्रारीच्या पृष्टयर्थ आपले शपथपत्र हजर केले नाही. फेरफार नंबर 546 चा उतारा असे दाखवितो की, दि.23.6.2013 रोजी मोहरी गांवच्या अनेक शेतक-यांना पिक कर्ज मंजूर झाले. कर्जाचा बोजा त्या त्या शेतक-यांच्या जमिनीवर टाकला आहे. तक चे चार जमिनीवर कर्ज रु.3,65,000/- चा बोजा चढवल्याचे नमूद आहे. तक च्या जमिनीच्या 7/12 उता-यावर त्या बोजाची नोंद करण्यात आलेली आहे. विप यांनी तक ला जुन 2013 चे सुमारास कर्ज मंजूर केलयाचे स्पष्ट होत आहे. ते कर्ज पिक कर्ज असल्याचे स्पष्टपणे नमूद नाही. तथापि ते पिक कर्ज असणे शक्य आहे. त्या कर्जावर विप यांना व्याज मिळण्याचा अधिकार आहे. त्यामुळे विप हे सेवा पुरवठादार होऊन तक हे त्यांचे ग्राहक होतात.
7. हे खरे आहे की, बँकेने एखादया व्यक्तीस कर्ज मंजूर करावे वा न करावे हा सर्वस्वी बँकेच्या मर्जीचा प्रश्न आहे. येथे असे दिसते की, विप बँकेने तक ला कर्ज मंजूर केले आहे. आता तक चे म्हणणे आहे की, कर्ज रक्कमेचे वाटप करण्यास विप टाळाटाळ करीत आहे. त्याबाबत विप कडे कोणतेही समर्थनीय कारण नाही. याउलट विप ने तक ला बळजबरीने पिक कर्ज नको असे लिहून देण्यास भाग पाडले आहे. तक ने असे प्रतिज्ञापत्र दिले असून विप ने हे कथन चुकीचे आहे असे म्हणणे सुध्दा दाखल केलेले नाही. तक तर्फे विप ला नोटीस बजावण्यात आली त्याचप्रमाणे या मंचातर्फे सुध्दा विप ला नोटीस बजावण्यात आली मात्र विप ने गैरहजर राहणे पंसत केले आहे.
8. तक चे कथन विप ने दबाव टाकून कर्ज नको असे त्यांचेकडून लिहून घेतले असे आहे. हे शाबीत करण्याची जबाबदारी तक वरच आहे. ते शाबीत करण्यासाठी तक ने आपले प्रतिज्ञापत्र दिले आहे. विप कडून असा दबाव टाकला गेला नाही व बळजबरीने तक कडून लिहून घेण्यात आलेले नाही असे म्हणणे दाखल करण्यात आलेले नाही. अगर कोणतेही प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेले नाही. त्यामुळे विप ने दबाव टाकला हे तक चे कथन मान्य करावे लागेल.
9. फेरफार नंबर 546 चे अवलोकन केले असता विप यांनी तलाठयाकडे पत्र देऊन बुधवणी गावातील ज्या शेतक-यांना कर्ज मंजूर केले त्यांचे जमिनीवर कर्जाचा बोजा नोंदवल्याचे कळवले त्याप्रमाणे बोजाची नेांद 7/12 उता-यावर झाली आहे.कर्जाची नोंद करण्यास विप ने उत्साह दाखविला मात्र आता तक ला कर्ज रक्क्म वाटप करण्यास विप टाळाटाळ करीत आहे. हे तक चे कथन विप ने नाकबूल केलेले नाही. याउलट तक वर दबाव टाकून कर्ज नको असे तक कडून विप ने लिहून घेतले असे दिसून येत आहे. त्यामुळे दुसरी कायदेशीर अडचण नसल्यास विप ने तक ला कर्ज वितरीत करणे जरुर वाटते. म्हणून आम्ही मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश करतो.
आदेश
तकची तक्रार खालील प्रमाणे मजूंर करण्यात येते.
विप यांनी तक ला दुसरी कायदेशीर अडचणी नसल्यास कर्ज रु.3,65,000/- (रुपये तीन लक्ष पासष्ट हजार फक्त) चे वितरण एक महिन्यात करावे.
विप यांनी तक ला या तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) द्यावेत.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत मंचात अर्ज द्यावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.