नि का ल प त्र:- (व्दारा- मा. श्री. शरद डी. मडके, अध्यक्ष) (दि.21-12-2015)
1) वि. प. बँक यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने, तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986, कलम-12 अन्वये प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केली आहे.
2) तक्रारदार हे सेवानिवृत्त असून त्यांचे वि.प. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत सेव्हींग्ज अकौंट नं. 60026849979 आहे. तक्रारदार वि.प. बँकेत दि. 25-04-2009 रोजी खासबाग शाखा येथे खाते सुरु केले. तक्रारदारांनी वि.प. बँकेत खाते काढतांना रक्कम रु. 5,000/- भरले व गरजेनुसार देवघेवीचे व्यवहार करु लागले. तक्रारदार यांनी आजारपणामुळे सन 2012 ते 2013 मध्ये बँक व्यवहार केले नाहीत. सतत कार्यरत राहण्यासाठी प्रवर्ती रक्कम किमान रक्कम रु. 100/- शिल्लक ठेवणे जरुरीचे असल्याचे सांगितले होते व त्याप्रमाणे तक्रारदार यांनी दक्षता घेतली होती.
3) तक्रारदार यांच्या खात्यावर दि. 29-02-2012 अखेर रक्कम रु. 893/- शिल्लक होती. तक्रारदार यांनी दि. 21-01-2014 रोजी रक्कम रु. 10,500/- भरुन खातु-पुस्तिका अद्यावत केले असता, त्यांना असे दिसून आले की, बँकेने दि. 30-06-2012, 30-09-2012, 31-12-2012 व 31-03-2013 रोजी प्रत्येकी रक्कम रु. 225/- अनाधिकाराने व पुर्वकल्पना न देता खर्ची टाकून काढून घेतली. तक्रारदार यांचा पत्ता व मोबाईल नंबर बँकेमध्ये असताना न कळवता कपात केली.
4) तक्रारदारांनी संबंधीत शाखा व्यवस्थापक यांना विचारले असता, त्यांनी प्रवर्ती ठेव रक्कम रु. 1000/- नसेल तर खातेदारास प्रवर्ती ठेवीची भरपाई करेपर्यंत प्रत्येक तीन महिन्यास रु. 225/- दंडात्मक आकारणी करण्याचा अधिकार आहे असे सांगितले.
5) तक्रारदार यांना वि.प. बँकेस दि. 17-02-2014 रोजी नोटीस पाठवून सदर रक्कम परत द्यावी अशी मागणी केली. दि. 21-01-2014 रोजी बँकेने रु. 648/- कपात केली. नोटीसीला उत्तर दिले नाही. तक्रारदार यांनी माहितीच्या अधिकाराअन्वये मागितलेली माहिती दिली नाही. सदर रक्कम व दाव्याचा खर्च रु. 2000/- वि.प. नी द्यावी अशी मागणी केली.
6) वि.प. यांनी आपले म्हणणे दाखल करुन तक्रार चुकीची व खोटी असल्याचे कथन केले. बँकेने केलेली कपात नियमाप्रमाणे आहे. पत्र पाठवून वा एस.एम.एस. करुन नियमांची माहिती द्यावी अशी अपेक्षा करणे हास्यास्पद आहे. नियमाप्रमाणे बचत खातेमध्ये रक्कम रु. 1000/- शिल्लक असणे आवश्यक आहे. नियम दि. 1-09-2013 रोजी बदलला असून प्रतिमहिना रु. 70/- व सेवा शुल्क आकारता येते. तक्रारदार जेंव्हा चौकशीला आले तेंव्हा माहिती देऊन, सुचना फलकावर पाहणेची विनंती केली होती. किमान रक्कम शिल्लक न ठेवलेस रक्कम खर्ची पडणार याची कल्पना तक्रारदारास दिली होती. वि.प. बँकेने एकूण रक्कम रु. 1548/- चुकीच्या पध्दतीने घेतली नाही. तक्रारदार यांचा बँकेतून पैसे उकळण्याचा हेतू स्पष्ट आहे. खातेदारास नियम माहित नाही ही बँकेची चुक वा सेवेतील कमतरता नाही. तक्रारदार यांनी खोटी तक्रार केल्याबद्दल दंड व शासन व्हावे.
7) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार व वि.प. बँकेने आपले म्हणणे सिध्द करण्यासाठी पुराव्याचे प्रतिाज्ञपत्र दाखल केले व लेखी युक्तीवाद दाखल केले. तक्रारदार यांचे वि.प. बँकेत खाते आहे व वि.प. बँकेने एकूण रक्कम रु. 1548/- वजा केले या गोष्टी वादातीत आहेत. तक्रारदार यांनी सुरुवातीला सन 2009 मध्ये खाते सुरु केले व त्यावेळी खात्यावर कमीत-कमी रु. 100/- असणे आवश्यक होते असे तक्रारदार यांच्या तक्रारीत नमूद केले आहे. वि.प. यांनी ही बाब अमान्य केली नाही. प्रस्तुत तक्रारीमध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की, खात्यावर कमीत-कमी रक्कम रु. 100/- होती ती रक्कम ज्यावेळी रक्कम रु. 1000/- असणे बंधनकारक झाले या बदलाची नोटीस किंवा माहिती तक्रारदारांना देणे आवश्यक होते की नाही ? वि.प. यांनी आपले म्हणणे, प्रतिज्ञापत्र व लेखी युक्तीवादामध्ये म्हटले आहे की, दि. 1-09-2013 रोजीपासून नियमामध्ये बदल झाला आहे. मंचाचे मते बदलाची नोंद तक्रारदारास नोटीसीव्दारे किंवा अन्य माध्यमाव्दारे कळवणे योग्य होते. तक्रारदार यांनी खाते सन 2009 मध्ये केले व तेंव्हा फक्त रु.100/- कमीत कमी रक्कम असणे आवश्यक होते हे वि.प. यांनी नाकारले नाही. सबब, मंचाचे मते, कमीत कमी रक्कम रु. 100/- ऐवजी बदल होऊन रु. 1000/- झालेची माहिती वि.प. यांनी तक्रारदारांना कळविणे आवश्यक होते. वि.प. यांनी सेवा प्रभार पुस्तिका ( Schedule of service charges) दाखल केले आहे. वि.प. यांनी जी रक्कम नमूद केली हा विषय मंचाच्या कार्यक्षेत्राच्या अखत्यारीत येत नाही. मंचाचे मते, सदर नियम व बदलाची अगोदर माहिती खातेदारास देणे बँकेचे कर्तव्य होते. सदर नियमांची प्रत बँकेच्या कार्यालयात लावल्यासंबंधी कागदपत्रे वि.प. यांनी दाखल नाहीत. तक्रारदार यांनी स्पष्टपणे सांगितले की, या बदलाची त्यांना माहिती कळविली नाही.
8) वरील सर्व परिस्थितीचा व दाखल कागदपत्रांचा सुक्ष्मपणे विचार करता, मंचाचे मते वि.प. यांनी तक्रारदार यांना दिलेल्या सेवेमध्ये त्रुटी केली आहे. वि.प. बँकेने कपात केलेली रक्कम रु. 1548/-(रुपये एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस फक्त) तक्रारदार यांना तक्रार अर्ज दाखल केलेल्या दि. 5-08-2014 रोजीपासून द.सा.द.शे. 9 % व्याज दराने द्यावी व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु. 1000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) द्यावेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
9) न्यायाचे दृष्टीने मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. सबब, आदेश.
आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. बँक यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 1,548/- (रुपये एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस फक्त) तक्रार अर्ज दाखल केलेल्या दि. 5-08-2014 रोजीपासून द.सा.द.शे. 9 % व्याज दराने द्यावी.
3) वि.प. बँक यांनी तक्रारदार यांना तक्रारीचा खर्च रक्कम रु. 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
4) वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत आदेशाची पूर्तता करावी.
5) सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.