जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 144/2011 तक्रार दाखल तारीख –12/09/2011
कोदन पि.अजीतकुमार रहांगडाले
वय 35 वर्षे धंदा तात्पुरती नौकरी .तक्रारदार
रा.परळी (वै.) ता.परळी (वै) जि.बीड
विरुध्द
1. शाखा व्यवस्थापक
बँक ऑफ महाराष्ट्र
शाखा परळी (वै.) ता.परळी (वै.) जि.बीड सामनेवाला
2. मुख्य व्यवस्थापक,
बँक ऑफ महाराष्ट्र,
महाबँक भवन, मुंजेचौक, अभ्यंकर रोड,
सिताबर्डी नागपुर 12.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.रविंद्र धांडे
सामनेवाला क्र.1 व 2 तर्फे ः- कोणीही हजर नाही.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराचे डि.एड.चे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो नागपूर येथे अध्यापक विद्यालय येथे अंतरवासीतेच्या (इंटरनशिप) सहा महिन्याच्या कालावधी करिता प्रशिक्षण म्हणून कार्य करीत होता. तो कालावधी संपल्यानंतर तक्रारदारांना मानधनापोटी रु.9,000/- चेक नंबर 184218 द्वारे दिला.
तक्रारदारांनी सदरचा चेक सामनेवाला क्र.1 बँकेत स्वतःचे खाते नंबर 60044604415 व दि.2.6.2010 रोजी जमा केला. सदर चेकची रक्कम 10 ते 15 दिवसांत मिळून जाईन असे आश्वासन सामनेवाला क्र.1 यांनी दिले. 10 ते 15 दिवसांनी सामनेवाला क्र.1 बँकेत जाऊन तपास केला. अजून 4-5 दिवस वाट पहा रक्कम जमा होऊन जाईन असे तक्रारदारांनी जवळपास सामनेवालेकडे चकरा मारल्या. दि.21.08.2010, 28.10.2010 यानंतर 18.11.2010 व 09.02.2011 रोजी चेकची विचारणा करणे बाबत अर्ज दिला व नोटीस दिली. दि.19.03.2011 रोजी बॅकेने पत्राद्वारे तक्रारदारांना कळविले की, चेक सामनेवाला क्र.2 कडे दि.5.6.2010 रोजीला ओबीसी क्रमांक 1774853 द्वारे मधुर करिअर मार्फत कलेक्शनसाठी पाठविला होता. तो त्यांना पोहचल्याचे पावतीवरुन दिसून येते. सामनेवाला क्र.2 कडे वांरवार चौकशी व पत्रव्यवहार करुनही सामनेवाला क्र.2 कोणताही खुलासा करीत नाहीत व उत्तरही देत नाही, करिता आपण दुसरा चेक आणावा. दूस-या चेककरिता कॉलेजला तोंडी चौकशी केली असता त्यांनी तोंडी नकार दिला. त्यानंतर तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांना लेखी नोटीस दिली, परंतु अद्यापपर्यत कार्यवाही झाली नाही. रक्कम खाती जमा झालेली नाही.चेकची रक्कम न दिल्याने सामनेवाला क्र.1 व2 यांनी त्यांची जबाबदारी टाळली. दिलेल्या हमीप्रमाणे सेवेत कसूर केल्याप्रमाणे खालील प्रमाणे मागणी करीत आहे. चेक रक्कम रु.9,000/-, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- सामनेवालाकडून मिळावेत.
सामनेवाला क्र.1व 2 यांनी जिल्हा मंचाच्या नोटीसीमध्ये मिळाल्याचीबाब पाहणीचे अहवालावरुन स्पष्ट होते. सामनेवाला जिल्हा मंचात गैरहजर त्यांनी तक्रारदाराच्या तक्रारीस आव्हान दिले नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द दि.6.3.2012 रोजी एकतर्फा तक्रार चालविण्याचा निर्णय जिल्हा मंचाने घेतला.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.धांडे यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी त्यांचे सामनेवाला क्र.1 बँकेच्या शाखेत बचत खात्यात रक्कम रु.9,000/-चा चेक खात्यावर जमा होण्यासाठी भरला आहे. त्या बाबतची बॅंकेची पावती दाखल आहे. तसेच सदरचा धनादेश खात्यावर जमा न झाल्याने तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 कडे दि.21.8.2010, 28.06,2010, 18,11,2010, 09.02.2011 रोजी पत्रव्यवहार केलेला आहे. सामनेवाला क्र.1 यांनी दि.19.03.2011 रोजी सदरचा चेक हा सामनेवाला क्र.2 कडे क्लिअरिंगसाठी पाठविला असल्याचे कळविले. त्यांचेकडे पाठपुरावा करुन त्यांचेकडून कोणतेही उत्तर येत नसल्याबाबत कळविले आहे.
सामनेवाला क्र.2 हे हजर नाहीत व त्यांनी त्यांचा खुलासा ही केला नाही. सामनेवाला क्र.2 कडे सदरचा चेक क्लिअरिंग साठी गेला आहे व तो चेक त्यांचेकडून क्लिअरिंग होऊन आलेला नाही ही बाब स्पष्ट होते व तो चेक त्यांचे स्तरावरुन क्लिअंरिंग न झाल्यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते. सामनेवाला क्र.1 व 2 हे एकाच बँकेच्या दोन शाखा असल्याने सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना रक्कम रु.9,000/-देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सेवेत कसूरीची बाब स्पष्ट झाल्याने तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/- व खर्चाची रक्कम रु.2,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना
रक्कम रु.9,000/- (अक्षरी नऊ हजार फक्त) आदेश मिळाल्यापासून
एक महिन्याचे आंत अदा करावी.
2. सामनेवाला क्र. 2 यांना आदेश देण्यात येतो की,वरील रक्कम
मूदतीत न दिल्यास वरील रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज
तक्रार दाखल दि.12.08.2011 पासून देण्यास सामनेवाला क्र. 2
जबाबदार राहतील.
3. सामनेवाला क्र. 2 यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक
त्रासाची रक्कम रु.5000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या
खर्चाची रककम रु.2,000/-(अक्षरी रु.दोन हजार फक्त) आदेश
प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
4. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड