जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 345/2016.
तक्रार दाखल दिनांक : 06/12/2016.
तक्रार आदेश दिनांक : 05/06/2017. निकाल कालावधी: 00 वर्षे 06 महिने 00 दिवस
देविदास महादेव जाधव, वय 55 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. मेडसिंगा, ता.जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र,
आनंद नगर शाखा, उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.ए. धावणे
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : के.डी. लाखे
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, त्यांचे व त्यांच्या पत्नी दैवशिला यांचे विरुध्द पक्ष बँकेमध्ये बचत खाते असल्यामुळे ते विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत. तक्रारकर्ता व त्यांच्या पत्नी दैवशिला हयात असताना प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेंतर्गत विरुध्द पक्ष यांच्याकडे अर्ज भरुन दिला होता आणि त्याच्या पोहोच तक्रारकर्ता यांना दिल्या आहेत. त्यांच्या खात्यातून रु.12/- परस्पर कपात करुन योजनेंतर्गत मयताचे वारसांना रु.2,00,000/- दिले जातात, अशी माहिती त्यांना देण्यात आली. दि.15/1/2016 रोजी तक्रारकर्ता यांच्या पत्नी मृत्यू पावल्या. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी योजनेनुसार रकमेची मागणी केली असता रक्कम खात्यावर जमा होईल, असे मौखिकरित्या सांगण्यात आले. परंतु रक्कम जमा न झाल्यामुळे दि.3/3/2016 रोजी चौकशी केली असता विरुध्द पक्ष यांनी मयताचे आधार कार्ड, वारस प्रमाणपत्र व मृत्यू प्रमाणपत्राची मागणी केली आणि त्याप्रमाणे तक्रारकर्ता यांनी पूर्तता केली आहे. तक्रारकर्ता यांचे पुढे असे कथन आहे की, दि.7/5/2016 रोजी तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्या खात्यातून रु.12/- नियमाप्रमाणे कपात करुन घेतले नसल्यामुळे लाभ देण्याबाबत अस्पष्टता व्यक्त केली. त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेंतर्गत तक्रारकर्ता यांच्याकडून दुसरा अर्ज भरुन घेतला आणि त्याची पोहोच दिली. दि.2/11/2016 रोजी चौकशी केली असता रक्कम मिळणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. उपरोक्त वादविषयाचे अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेंतर्गत देय लाभ व्याजासह देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रार खोटी व काल्पनिक असल्यामुळे अमान्य केली आहे. तक्रारकर्ता व त्यांच्या पत्नी दैवशिला हयात असताना प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेंतर्गत विरुध्द पक्ष यांच्याकडे अर्ज भरुन दिला आणि त्याच्या पोहोच तक्रारकर्ता यांना दिल्याचे विरुध्द पक्ष यांनी मान्य केले आहे. त्यांचा असा प्रतिवाद आहे की, दि.28/4/2015 चे परिपत्रक क्र. AXI/ABC/Govt. Scheme/Cir.No.5/2015-16 नुसार प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ अपघाताने मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या व्यक्तींना देय आहे. तक्रारकर्ता यांचे पत्नीचा मृत्यू अपघाताने झाल्याचे नमूद केलेले नाही किंवा तसा उल्लेख नाही. त्यामुळे विमा रक्कम देण्याचा प्रश्न उदभवत नाही. शेवटी तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलीर आहे.
3. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या वादमुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये
त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
2. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
5. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारकर्ता व त्यांच्या पत्नी दैवशिला हयात असताना प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेंतर्गत विरुध्द पक्ष यांच्याकडे अर्ज भरुन दिला आणि त्याच्या पोहोच तक्रारकर्ता यांना दिल्याचे विरुध्द पक्ष यांनी मान्य केले आहे. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर दि.28/4/2015 चे परिपत्रक क्र. AX1/ABC/Govt. Scheme/Cir.No.5/2015-16 दाखल केले आहे. असे दिसते की, त्यांच्या बँकेकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना व अटल पेन्शन योजना राबवण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेनुसार जीवन विमा संरक्षण व प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना नुसार अपघाती मृत्यूचे विमा संरक्षण दिले आहे.
6. विरुध्द पक्ष यांच्या प्रतिवादाप्रमाणे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ अपघाताने मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या व्यक्तींना देय आहे आणि तक्रारकर्ता यांचे पत्नीचा मृत्यू अपघाताने झाल्याचे नमूद केलेले नाही किंवा तसा उल्लेख नाही. परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना दिलेल्या पावती (अनुज्ञेय) आणि विमा संरक्षणाच्या दाखल्यामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेंर्गत बचत खात्यातून परस्पर रक्कम वळती करण्यासाठी संमती व अधिकार देणारा फॉर्म मिळाल्याचे नमूद आहे. त्यामुळे तक्रारकर्ता व त्यांच्या पत्नी दैवशिला यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेंर्गत बचत खात्यातून परस्पर रक्कम कपात करुन घेण्यासाठी अर्ज दिलेला होता, हे ग्राह्य धरावे लागते.
7. तक्रारकर्त्याने मयत दैवशिला हिच्या बँक पासबुकाची प्रत हजर केली आहे. दैवशिला हिच्या खात्यामधून प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेंतर्गत हप्त्याची रक्कम परस्पर वळती करण्यासाठी फॉर्म भरुन मिळाल्याबद्दल विरुध्द पक्षाची पावती पण हजर करण्यात आलेली आहे. सदर पावतीवर तारीख दिसून येत नाही. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे दैवशिला हिने विरुध्द पक्षाकडे संबंधीत अर्ज भरुन दिला होता व खात्यातून रु.12/- विमा हप्ता परस्पर भरण्यास सहमती दिली होती. खाते उता-याप्रमाणे दैवशिला हिच्या खात्यामध्ये 2012 सालापासून दि.9/2/2016 पर्यंत रु.12/- पेक्षा जास्तच शिल्लक रक्कम होती. रु.500/- पेक्षा सुध्दा रु.12/- पेक्षा जास्त रक्कम खात्यात शिललक होती. मृत्यू प्रमाणपत्राप्रमाणे हिचा मृत्यू दि.15/1/2016 रोजी झाला.
8. यावरुन हे स्पष्ट होते की, दैवशिला हिने दि.15/1/2016 पूर्वी विरुध्द पक्षाकडे विमा योजनेंतर्गत हप्ता परस्पर खात्यातून वळते करण्याबद्दल विरुध्द पक्षला अधिकारपत्र दिलेले होते. खाते उता-याप्रमाणे विरुध्द पक्षाने असा हप्ता कापून घेऊन विमा योजतनेमध्ये वर्ग केल्याचे दिसून येत नाही. वरील सर्व बाबी तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे असल्या तरीही एक गोष्ट स्पष्ट आहे की, दैवशिला हिने प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेसाठी आपल्या खात्यातून हप्ता भरण्याचे ठरवले होते व तो त.क. च्या म्हणण्याप्रमाणे हप्ता वार्षिक रु.12/- होता. विरुध्द पक्षाने विमा योजनेबद्दलचे माहितीपत्रक हजर केलेले आहे. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजतनेंतर्गत एक वर्षाचा हप्ता रु.330/- दिसून येतो. मात्र प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा हप्ता एक वर्षाचा रु.12/- दिसून येतो. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत अपघाताने मृत्यू झाल्यास रु.2,00,000/- चे विमाछत्र मिळते. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेंतर्गत कोणत्याही प्रकारे मृत्यू झाला तर रु.2,00,000/- चे विमाछत्र मिळते.
9. तक्रारकर्ता याने तक्रारीमध्ये दैवशिला हिने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज केल्याचे म्हटलेले आहे. विरुध्द पक्षाच्या पोहोच पावतीप्रमाणे प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेसाठी दैवशिलाचा अर्ज आलेला होता. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेसाठी वार्षिक हप्ता रु.330/- दिसून येतो. मात्र तक्रारकर्त्याच्या म्हणणे आहे की, रु.12/- चा हप्ता कापण्यासाठी दैवशिलाने अधिकृत केलेले होते. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेंतर्गत कशाही प्रकारे मृत्यू आल्यास रु.2,00,000/- चे विमाछत्र आहे. माणूस हा मर्त्य असल्यामुळे केव्हानाकेव्हा मरतोच. ही गोष्ट लक्षात घेऊन या विमा योजनेंतर्गत हप्ता रु.330/- ठेवलेला आहे. या उलट एकूण मरणा-या माणसापैकी अपघाताने मरणा-यांचे प्रमाण खुपच कमी असते. त्यामुळे अपघाती मृत्यूसाठी द्याव्या लागणा-या रकमा खुपच की असतात. म्हणून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेखाली हप्ता फक्त रु.12/- ठेवलेला आहे. जर तक्रारकर्त्याच्या पत्नीने रु.12/- चा हप्ता भरण्याचे ठरवले असेल तर फक्त अपघाती मृत्यूचे विमाछत्र मिळाले असते. मात्र तक्रारकर्त्याचे असे म्हणणे नाही की, त्याच्या पत्नीचा अपघाती मृत्यू झालेला आहे. असा कोणताही पुरावा हजर केलेला नाही. उलट तक्रारकर्ता हा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा रकमेची मागणी करतो. त्याचप्रमाणे दैवशिला हिच्या खात्याचे निरीक्षण केले असता किमान रु.500/- जमा ठेवण्याची अट असल्यास रु.330/- चा हप्ता विमा योजनेंतर्गत देणे विरुध्द पक्षाला शक्य दिसत नाही. म्हणून तक्रारकर्ता रु.12/- चा हप्ता कापण्यासाठी विरुध्द पक्षाला अधिकृत केल्याचे म्हणत आहे.
10. दैवशिला हिचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत अर्ज होता व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेंतर्गत अर्ज नव्हता, हे स्पष्ट झालेले आहे. मात्र तक्रारकर्ता प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा फायदा मागत असून हप्ता मात्र प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा देण्याबद्दल विरुध्द पक्षाला प्राधिकृत केल्याचे म्हणत आहे. दैवशिला हिचा अपघाती मृत्यू झालेला नसल्यामुळे तक्रारकर्ता हा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा रक्कम मिळण्यास पात्र नाही. दैवशिला हिने प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेंतर्गत विमाछत्राची मागणी केलेली नव्हती व ते तिला शक्य नव्हते, असे दिसते. त्यामुळे विरुध्द पक्षाकडून सेवेत कोणतीही त्रुटी झाल्याचे दिसून येत नाही. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
ग्राहक तक्रार क्र.345/2016.
आदेश
(1) तक्रारकर्त्यांची तक्रार रद्द करण्यात येते.
(2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-