(मंचाचा निर्णय: श्री. नरेश बनसोड - सदस्य यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 21/03/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत मंचात दि.17.02.2011 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 विरुध्द दाखल करुन मंचास मागणी केली आहे की, विरुध्द पक्षाचे सेवेत अनुचित पध्दतीचा अवलंब केल्याचे जाहीर करावे व लॉकर क्र.265 मधून रु.3,31,000/- रकमेचे सोन्याचे व चांदीचे गहाळ झालेल्या दागिण्यांचा मोबदला अदा करावा. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल रु.1,00,000/- व दि.26.10.2010 पासुन व्याजाची रक्कम रु.25,800/- नोटीस खर्च रु.3,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.20,000/- ची मागणी केलेली आहे.
प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. तक्रारकर्ते पति-पत्नीच्या नावाने विरुध्द पक्ष क्र.1 चे शाखेत दि.02.01.2009 रोजी आवश्यक रक्कम भरुन 265 क्रमांकाचे लॉकर विरुध्द पक्षाने दिले व तक्रारकर्त्यानी त्यामध्ये त्याच्या घरच्यांचे दागीणे ठेवले. तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे. तक्रारकर्ता सातत्याने ग्राहक असुन त्याने खालिल वर्णनांचे दागीणे उपरोक्त लॉकरमध्ये ठेवले होते...
1) गंगाबाई दादाराव रेवतकरः- (अ) 2 चपला कंठी (सोन्याची) प्रत्येकी 4 तोळे x 2 = 8 तोळे. (ब) 1 सोन्याची चैन (गोफ).
2) सौ. सुषमा रेवतकर (तक्रारकर्त्याची सून)ः- (अ) 2 सोन्याच्या बांगडया, (ब) 5 सोन्याची चैन (गोफ), (क) 1 सोन्याचा कडा, (ड) 4 सोन्याचे लॉकेट, (इ) 4 सोन्याचे टॉप्स.
3) सौ. स्नेहल रविंद्र रेवतकर (तक्रारकर्त्याची दूसरी सून)ः-
(अ) 8 सोन्याचे टॉप्स, (ब) 2 सोन्याच्या बांगडया, (क) 1 चपला कंठी, (ड) 1 सोन्याचा नेकलेस, (इ) 1 सोन्याचा नेकलेस, (ई) 1 सोन्याची नथ, (फ) 2 चांदीचे जोडवे व 1 आकडा, (ग) 2 चांदीच्या तोरडया आणि 1 चांदीचे निरांजनी.
4) सौ. विजया नारायण वैद्य (तक्रारकर्त्याच्या साळभावाची पत्नी)ः-
(अ) 2 पाटल्या (सोन्याच्या) 45.400 ग्रॅम, (ब) 1 सोन्याची चेन (गोफ) 20.03 ग्रॅम, (क) 1 सोन्याची चपला कंठी 30.340 ग्रॅम.
3. तक्रारकर्त्यानुसार लॉकरची एक किल्ली लॉकर धारकाकडे असते व दुसरी किल्ली विरुध्द पक्ष क्र.1 कडे असते. लॉकर उघडायचे असल्यास प्रथम बँकेची किल्ली लावावी लागते व त्यानंतर लॉकरधारकाच्या किल्लीने लॉकर उघडल्या जाते व बंद करतांना लॉकर धारकाच्या एकाच किल्लीने लॉकर बंद केल्या जाते.
4. तक्रारकर्त्यानुसार तक्रारकर्ता क्र.1 दि.26.07.2010 रोजी सकाळी 10.30 चे दरम्यान विरुध्द पक्ष क्र.1 चे शाखेत 1 चपलाकंठी जी विजया नारायण वैद्य यांचे मालकीची आहे ती काढण्याकरता गेली असता बँकेच्या नियमानुसार लॉकर रजिस्टरवर नोंदणी करुन उपरोक्त लॉकर उघडण्याकरीता लॉकर रुममध्ये गेला असता तक्रारकर्त्याचे निदर्शनांस आले की, सदर लॉकर सेलो टेपने तिन ठिकाणी बंद केले होते. त्याबाबत बँकेचे अधिकारी श्री. सुरेश लिखार यांचेकडे चौकशी केली असता श्री. सुरेश लिखार व चपराशी प्रदिप पुडके म्हणाले की, मागच्या तारखेपासुन बरोबर लॉकर लॉक न केल्यामुळे सदर लॉकरला सेलोटेपने सिल केलेले आहे. तक्रारकर्ता म्हणाला की, जे कार्य विरुध्द पक्ष क्र.1 चे अधिकारात नाही ते कार्य त्यांनी का केले, त्यावर तक्रारकर्ते म्हणाले की, तुम्ही पत्रव्यवहार वा नोटीस का पाठविला नाही, पंचनामा केला नाही व स्वतःच मनमानी पणे सेलोटेप लावून लॉकर सिल केले हे गैरकायदेशिर आहे. विरुध्द पक्ष क्र.1 चे अधिकारी म्हणाले की, दागीणे बरोबर आहेत किंवा नाहीत याची शहानिशा करुन घ्यावी व तक्रारकर्ता बँकेतून यादी आणण्याकरीता घरी गेला व उपरोक्त त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता बँकेत परत आला. पुन्हा लॉकर रजिस्टरमधे सही करुन उपरोक्त लॉकरला लागलेली सेलोटेप बँकेचे अधिकारी व चपराश्यासमोर उघडले असता काही खालिल दागीणे गहाळ/चोरी गेले असल्याचे निदर्शनास आले त्याचे विष्लेशन खालिल प्रमाणे....
अ.क्र. | लेपास/गहाळ/चारी गेलेले दागीने | मालकीचे | वजन | रक्कम |
1. | 1चपलाकंठी(सोन्याची) | सौ.गंगाबाई रेवतकर | 4 तोळे | 82,000/- |
2. 3. | 1 सोन्याची चैन/ गोफ 2 सोन्याचे लॉकेट (एकूण 8.050 + 2.500 = 10.550 ग्रॅम) | सौ. सुषमा रेवतकेर - ‘’ - | 8.050 ग्रॅ. | 22,500/- |
4. 5. | 8 सोन्याचे टॉप्स 1 सोन्याची नथ (एकूण 12 + 1.500 = 13.500 ग्रॅम) | सौ. स्नेहल रेवतकर - ‘’ - | 12.00 ग्रॅ. 1.50 ग्रॅ. | 27,500/- |
6. 7. | 2 चांदीच्या तोरडया 1 चांदीचा आकडा | सौ. स्नेहल रेवतकर - ‘’ - | | 2,500/- |
8. 9. 10. | 2 सोन्याच्या पाटल्या 1 सोन्याची चैन/ गोफ 1 सोन्याची चपला कंठी (एकूण 45.400 + 20.030 + 30.340 = 95.770 ग्रॅ.) | सौ. विजया वैद्य - ‘’ – - ‘’ - | 45.400 ग्रॅ. 20.030 ग्रॅ. 30.340 ग्रॅ. | 1,97,000/- |
| संपूर्ण एकूण रक्कम = | | | 3,31,000/- |
5. दागीणे गहाळ झाल्यामुळे तक्रारकर्त्याला धक्का बसला कारण वर नमुद केल्याप्रमाणे 6 सोन्याचे दागीणे, व इतर चांदीचे दागीणे एकूण किंमत रु.3,31,000/- चोरी गेल्याने त्यास बँकेचे अधिकारी जबाबदार आहेत. असे म्हटल्यावर विरुध्द पक्ष म्हणाले की, आपण जानेवारी-2010 ला आले होते त्या दिवशी उपरोक्त लॉकर उघडेच राहीले होते म्हणून विरुध्द पक्ष क्र.1 चे अधिका-यांनी वरील लॉकरला सेलोटेपने सिल केले आहे. तक्रारकर्ता म्हणाला की, त्याबाबत का कळविण्यांत आले नाही, जेव्हा की, तक्रारकर्त्याचा फोन नंबर व घरचा पत्ता विरुध्द पक्षाकडे आहे, तरी सुध्दा त्यांनी कळविले नाही. ही विरुध्द पक्ष क्र.1 च्या गैरशिस्तपणासोबतच ग्राहक सेवेतील त्रुटी असुन विरुध्द पक्ष क्र.1 चे सेवेत निष्काळजीपणा आहे. विरुध्द पक्ष क्र.1 ने सांगितले की, तुम्ही उद्या या उद्या चौकशी करुन म्हणून तक्रारकर्ता दि.27.07.2010 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 चे शाखेत सकाळी 10 वाजता गेला. तक्रारकर्त्यानुसार विरुध्द पक्ष क्र.1 ने त्यांनी योग्य सेवा व दक्षता घेण्याकरता खालिल गोष्टी करणे आवश्यक होते. परंतु ते न केल्यामुळे निव्वळ सेलोटेपने सिल केल्यामुळे विरुध्द पक्ष आपल्या खालिल जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही.
- गैरअर्जदार क्र.1 ने कमीत कमी फोन ने सुध्दा तक्रारकर्त्यास कळवायला पाहीजे होते ?
- गैरअर्जदार क्र.1 ने पत्राव्दारे किंवा नोटीसव्दारे कळवायला पाहीजे होते ?
- गैरअर्जदार क्र.1 ने या व्यतिरिक्त कमीत कमी दैनिक वर्तमान पत्राव्दारे सुचित करायला पाहीजे होते ?
- गैरअर्जदार क्र.1 ने पंचनामा करायला पाहीजे होता ?
- गैरअर्जदार क्र.1 ने चौकशी करुन अहवाल सादर करायला पाहीजे होता ?
- पोलिस रिपोर्ट सुध्दा द्यायला पाहीजे होती ?
6. तक्रारकर्त्याने दि.27.07.2010 रोजी हुडकेश्वर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली त्यामधे अपराध क्र.113/210 दाखल करण्यांत आला परंतु चौकशी होऊनसुध्दा विरुध्द पक्षांचे अधिका-यावर कारवाई करण्यांत आली नाही. तक्रारकर्त्याने त्याबाबत विरुध्द पक्षासोबत वेळोवेळी पत्र व्यवहार केला परंतु विरुध्द पक्षाने प्रत्येक वेळी आपली जबाबदारी नाकारण्याचा प्रयत्न केला आहे व दोषारोपण तक्रारकर्त्यावरच केले आहे. तक्रारकर्त्याने दि.01..12.2010 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठवुन नुकसान भरपाईची मागणी केली त्यामुळे वादाचे कारण सातत्याने सुरु आहे..
7. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत एकूण 25 दस्तावेज अनुक्रमे पृ.क्रृ 10 ते 45 वर दाखल केलेले आहेत..
विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 चे म्हणणे खालिल प्रमाणे..
8. तक्रारकर्ता विरुध्द पक्ष क्र.1 चा ग्राहक असल्याचे नाकारले, व हे सुध्दा नाकारले की तक्रारकर्त्याने सोन्या चांदीचे दागीणे ठेवण्याकरता दि.02.01.2009 रोजी उपरोक्त लॉकर उघडले. विरुध्द पक्ष म्हणाले की, बँक व अर्जदार यांचा संबंध फक्त मालक व किरायदार पर्यंतच मर्यादीत आहे व तक्रारकर्त्याने लॉकरमधे ठेवलेले दागीणे माहिती अभावी नाकारले. विरुध्द पक्षाने हे सुध्दा नाकारले की, तक्रारीत नोंदविल्याप्रमाणे दागीण्यांच्या यादी प्रमाणे दागीणे लॉकरमधे ठेवले होते याची माहिती बँकेकडे नाही. व लॉकर वापराबाबतची तक्रारकर्त्याने केलेली पध्दती विरुध्द पक्षाने मान्य केली, विरुध्द पक्षाने मान्य केले की, त्यांचे रेकॉर्डप्रमाणे तक्रारकर्ता दि.26.07.2010 रोजी लॉकर रजिस्टरमधे नोंदणी करुन लॉकर उघडण्याकरता आत गेला तेव्हा सदर लॉकर क्र.265 ला सेलोटेपने तिन ठिकाणी बंद केले होते, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षावर केलेले आरोप नाकारले. विरुध्द पक्षाने म्हटले की, तक्रारकर्ता जेव्हा मागच्या तारखेस लॉकर उघडण्याकरता आला होता त्यावेळेस त्याने निष्काळजीपणामुळे लॉकर उघडे ठेवले व जेव्हा लॉकर उघडे असल्याचे निदर्शनांस आले तेव्हा बँकेचे कर्मचारी श्री. आनंद बनसोड यास तक्रारकर्त्याचे पत्यावर माहिती देण्यास पाठविले असता तक्रारकर्ता सदर पत्त्यावर भेटला नाही व त्या पत्त्यावर दुसराच इसम राहत असल्याचे निष्पन्न झाले व आजूबाजूला विचारपूस केली असता. सदर नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी राहत नसल्याचे कळले. तसेच बँकेच्या रेकॉर्डप्रमाणे कोणतेही संपर्क क्रमांक दिले नसल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही व सदर लॉकरला सेलोटेपनी सिल करण्यांत आले, त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. विरुध्द पक्षाचे अधिकारी श्री. सुरेश लिखार यांनी लॉकर उघडून वस्तु बरोबर आहेत किंवा नाही हे तपासुन सांगण्यांस विनंती केली व ते नियमाप्रमाणे लॉकर रुममधूनबाहेर आले. 10-15 मिनीटांनी तक्रारकर्त्याने सांगितले की, संपूर्ण वस्तु बरोबर आहेत व दागीण्यांची यादी आणण्याबाबतचे केलेले विवरण खोटे आहे असे म्हटले. विरुध्द पक्षाने मान्य केले की तक्रारकर्ता त्याच दिवशी दुपारी 1.30 बँकेत येऊन लॉकर रजिस्टरवर सही करुन लॉकररुममधे गेला, विरुध्द पक्षाने नाकारले की, त्यावेळी लॉकर क्र.265 सेलोटेप काढून बँकेचे अधिकारी व कर्मचा-यासमक्ष उघडले असता काही दागीणे चोरीस गेल्याचे आढळले. विरुध्द पक्षाने म्हटले की, तक्रारकर्ता प्रथमतः’ आल्यानंतर लॉकर वापरुन लॉकर रुममधून निघुन गेला व दुपारी 1.30 वा. आला त्यामुळे तक्रारकर्त्याने केलेले आरोप विरुध्द पक्षाने नाकारले.
9. विरुध्द पक्षाने म्हटले की, लॉकरचा वापर केल्यानंतर जातेवेळी लॉकर योग्य प्रकारे लॉक करण्याची जबाबदारी ही तक्रारकर्त्याची असते, त्यामुळे लॉकर लॉक न करता जाणे हा तक्रारकर्त्याचा निष्काळजीपणा आहे कारण लॉकर हे तक्रारकर्त्याचे चाबीनेच शेवटी बंद होत असते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे इतर म्हणणे व मागणी नाकारली.
10. मंचाने दि.29.12.2011 रोजी तक्रारकर्त्याचा युक्तिवाद ऐकला, विरुध्द पक्षास अंतिम संधी देऊनही ते गैरहजर, त्यांचे वकीलांने सदर प्रकरण बोर्डवर घेण्याकरीता व युक्तिवादाकरीता परवानगी मिळण्याचा अर्ज सादर केला. सदर अर्ज मंचाने दि.23.01.2012 रोजी रु.1,000/- चे कॉस्टसह मंजूर करण्यांत आला. विरुध्द पक्षाचे वकीलाने दि.23.02.2012 रोजी लेखी युक्तिवाद दाखल केला. मंचाने तक्रारीसोबत असलेल्या सर्व कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
11. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 1 चे शाखेत आवश्यक रक्कम भरुन लॉकर क्र.265 उघडले याबाबत दोन्ही पक्षात वाद नाही. तक्रारकर्त्याने म्हटले की तो विरुध्द पक्षांचा ग्राहक आहे, हे विरुध्द पक्षाने नाकारले व म्हटले की, लॉकर संबंधी त्यांचा संबंध मालक व किरायदार इतकाच आहे त्यामुळे तो ग्राहक नाही. हे विरुध्द पक्षांचे म्हणणे मंचास संयुक्तिक वाटत नाही कारण तक्रारकर्त्यास प्रथम बँकेत बचत खाते उघडावे लागते व त्यानंतरच खाते धारकाचे मागणीनुसार व आवश्यक रक्कम भरल्यानंतर उपलब्ध लॉकरमधून खातेधारकाचे मागणी नुसार वेगवेगळया आकाराचे लॉकर्स विरुध्द पक्ष क्र.1 पुरवित असतात, त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्द पक्षांचा ग्राहक ठरतो.
12. विरुध्द पक्षानुसार दि.26.07.2010 चे आधी तक्रारकर्त्याने लॉकरचा उपयोग केल्यानंतर ते बंद करते वेळी निष्काळजीपणामुळे लॉकर योग्य प्रकारे बंद न करता ते उघडेच राहील्याचे विरुध्द पक्षांचे निदर्शनास आल्यानंतर त्यांचे अधिकारी श्री. सुरेश लिखार यांनी बँकेचे कर्मचारी श्री. आनंद बनसोड यांना बँकेत उपलब्ध असलेल्या तक्रारकर्त्याचे पत्त्यावर माहिती देण्यास पाठविले परंतु तक्रारकर्त्याची भेट झाली नाही व तक्रारकर्ता त्या पत्त्यावर राहत असल्याचे निष्पन्न झाले नाही. तसेच तक्रारकर्त्याचे अर्जावर संपर्क क्रमांक नसल्याने त्याचेशी संपर्क होऊ शकला नाही म्हणून विरुध्द पक्ष क्र.1 ने लॉकर टेपने पक्के बंद करुन सिल करुन ठेवले होते. विरुध्द पक्षाने त्यांचे उत्तरात तक्रारकर्त्याचे अर्जाचा उल्लेख केलेला आहे, परंतु तक्रारकर्त्याने लॉकर मिळवीण्याकरता विरुध्द पक्ष क्र.1 कडे केलेला अर्ज मंचासमोर दाखल केलेला नाही त्यामुळे त्याबाबतचे विरुध्द पक्षाचे कथन पूर्णतः तथ्यहीन ठरते, जेव्हा की, सदर दस्तावेज मंचासमोर दाखल करुन सत्य परिस्थीती मांडण्याची जबाबदारी ही विरुध्द पक्षाची होती. त्यामुळे हे स्पष्ट होते की, विरुध्द पक्ष सदर बाब हेतूपुरस्सर मंचापासुन दडवुन ठेवली असल्यामुळे मंचा विरुध्द पक्ष क्र.1 विरुध्द Adverse Inference काढीत आहे.
13. विरुध्द पक्षाने त्यांचे म्हणण्याचे पृष्ठयर्थ श्री. प्रदीप महादेव पुडके व आनंद सानबाजी बनसोड यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले. श्री. आनंद बनसोड यांचे प्रतिज्ञापत्र पृ. क्र.73 वर आहे. त्याचे सुक्ष्म अवलोकन केले असता त्यामधे लॉकर उघडे असल्याबाबतच्या घटनेची तारीख, वेळ तसेच शाखेचे अधिकारी श्री. देवस्थळे यांनी तक्रारकर्त्यास बोलावुन आणण्यास सांगितल्याबाबतची वेळ त्यांचे प्रतिज्ञापत्रात नमुद नाही. प्रतिज्ञापत्रात तक्रारकर्त्याचा पत्ता हा प्लॉट क्र.82 महात्मा गांधीनगर असे नमुद आहे व तोच पत्ता तक्रारकर्त्याच्या तक्रारीवर नमुद आहे, त्यामुळे तक्रारकर्ता त्या पत्त्यावर सापडला नाही किंवा तेथे राहात नाही किंवा आजुबाजूला विचारपूस केल्यानंतर पत्ता सापडला नाही हे प्रतिज्ञापत्रातील कथनय पूर्णतः अविश्वसनीय स्वरुपाचे असुन मंचाने तथ्यहीन असल्यामुळे नाकारले. प्रतिज्ञापत्रकर्ता श्री. आनंद बनसोड, हा विरुध्द पक्ष क्र.1 चा कर्मचारी असल्यामुळे त्याने बँकेच्या म्हणण्याशी सहमती दर्शविलेली आहे, असे दिसते.
14. तक्रारकर्त्याने तक्रारीत म्हटले की, जर उपरोक्त लॉकर हे दि.26.07.2010 चे आधीचे तारखेला पूर्णपणे लॉक न होता उघडे राहीले तर विरुध्द पक्षाने तक्रारीच्या पृष्ठ क्र.5 परिच्छेद क्र.8 मधे नमुद केलेल्या बाबी कार्यवाही संदर्भात आवश्यक असल्याचे नमुद केले. त्याबाबत विरुध्द पक्षाने ती कार्यपध्दती अवलंबीने आवश्यक होते, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सदर्रहू घटना घडल्यानंतर विरुध्द पक्षाने वरील प्रमाणे एकही कृति केलेली नाही, जेव्हा की तक्रारकर्त्यास नोंदणीकृत डाकेव्दारे कळवीणे व पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करुन त्यांचे मार्फत त्याबाबत लॉकरचा पंचनामा करुन घेणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे विरुध्द पक्षाचे ग्राहक सेवेत व त्यांचे स्वतःचे कार्यपध्दतीत गंभीर स्वरुपाचा निष्काळजीपणा आहे तसेच त्यांचे ग्राहक सेवेत गंभीर स्वरुपाची त्रुटी आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
15. तक्रारकर्त्याच्या स्पष्ट आरोपानंतर सुध्दा विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास रजिस्टर्ड पोष्टाव्दारे नोटीस का पाठविली नाही, तसेच पोलिस स्टेशनला एफ. आय. आर. का दाखल केली नाही याबाबत कुठलेही स्पष्टीकरण विरुध्द पक्षाने केले नाही. उलट श्री.आनंद बनसोड यांना तक्रारकर्त्याचे घरी पाठविण्यांत आले होते हे वरील परिच्छेदात विवेचन केल्याप्रमाणे विरुध्द पक्षास मदतगार ठरत नाही. विरुध्द पक्षाने त्यांचे उत्तरात हे सुध्दा नमुद केले नाही की, दि.26.07.2010 च्या आधी कोणत्या तारखेस तक्रारकर्त्याने लॉकर उघडले व बंद केले होते. तसेच त्यावेळी त्यांचे लॉकर बाबत कोण जबाबदार अधिकारी होते हे सुध्दा नमुद केले नाही. एका ग्राहकाचे रु.3,31,000/- चे दागीणे गहाळ झाल्यानंतर सुध्दा विरुध्द पक्षाने त्याबाबत चौकशी केल्याचा कुठलाही वस्तुनिष्ठ अहवाल किंवा त्या अधिका-या विरुध्द काय कारवाई केली या बाबत कुठलाही दस्त मंचासमोर नसल्यामुळे विरुध्द पक्षाने त्यांच्या कर्मचा-यांची पाठराखन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे सुध्दा विरुध्द पक्षाच्या कार्यपध्दतीत गंभीर स्वरुपाचा निष्काळजीपणा व ग्राहक सेवेतील त्रुटी आहे असा मंचाचे स्पष्ट मत आहे.
16. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत तक्रारीच्या परिच्छेद क्र.2 मधे 26.07.2010 चे आधी कोणा-कोणाची कोणते दागीणे लॉकरमधे ठेवले होते त्याचे विवरण, खरेदीची बिले इत्यादी दिलेली आहेत. तसेच तक्रारीच्या परिच्छेद क्र.6 मधे दि.26.0.7.2010 रोजी लॉकर उघडल्यानंतर कुठले दागीणे गहाळ झाले त्याचे वजन, किंमत इत्यादींचे विवरण व दस्तावेज दाखल केलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचे तक्रारीत व गहाळ झालेल्या वस्तुंबाबत केलेले कथन मंचास विश्वसनीय वाटते. वरील परिच्छेदात केलेल्या विवेचनानुसार विरुध्द पक्ष क्र.1 व त्यांचे अधिका-यांचा निष्काळजीपणा सिध्द झालेला आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याच्या गहाळ झालेल्या वस्तुस ते सुध्दा जबाबदार आहेत व जरी तक्रारकर्त्याच्या हाताने लॉकर योग्य प्रकारे बंद झाले नसले तरी संपूर्ण घटनाक्रम हा विरुध्द पक्ष क्र.1 च्या परिसरात घडल्यामुळे व लॉकर रुमच्या परिसरात लॉकर धारक व त्यांच्या जबाबदार कर्मचा-याशिवाय दुस-या कोणालाही शिरकाव नसतो. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 यांनी घटना घडल्यानंतर आवश्यक दक्षता न घेतल्यामुळे ते सर्वस्वी या घटनाक्रमास जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे. बँका लॉकरची सेवा पुरविते वेळी त्याच्या सुरक्षेची व त्यांच्या कर्मचा-यांच्या विश्वसनीयतेची ग्राहकांना शास्वती देते, परंतु सदर तक्रारीत त्यांच्या कर्मचा-यांचे विश्वसनीयतेस तडा गेलेला आहे, असे मंचाचे मत आहे.
17. मंचाने राष्ट्रीय आयोगाचे, “Mahendrasingh Siwach –v/s- Punjab & Sindh Bank”, 2006 Vol-IV, CPJ -231, या निकालपत्रातील वस्तुस्थिती व सदर तक्रारीतील वस्तुस्थितीत साम्य दिसत असल्यामुळे सदर निकालपत्र या तक्रारीस लागू होते. म्हणून तक्रारकर्त्याच्या गहाळ झालेल्या दागीण्यांची किंमत रु.3,31,000/- देणे तसेच सदर घटनेमुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासासाठी रु.25,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- देणे संयुक्तिक होईल असे मंचाचे मत आहे. विरुध्द पक्ष क्र.1 बँकेचे ब्रिदवाक्य आहे की, ‘बँक ऑफ महाराष्ट्र, आपली बँक जिव्हाळाची बँक’ असे असतांना त्या जिव्हाळास सुध्दा त्यांचे अधिका-यांच्या निष्काळजीपणा जबाबदार असल्यामुळे मंचाने आदेशीत रक्कम ही विरुध्द पक्षाने त्यांचे जबाबदार अधिका-यांकडून वसुल करणे संयुक्तिक होईल असे मंचाचे मत आहे व त्यास मंचाने, ‘लखनौ डेव्हलपमेंट ऍथोरीटी –विरुध्द- एम.के. गुप्ता’, या सर्वोच्च न्यायालयाच्या 1993 CCJ-1100 (CS) निकालपत्राच्या परिच्छेद क्र.12 स आधारभूत मानले आहे.
करीता खालिल प्रमाणे आदेश पारित करण्यांत येतो.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्षास आदेश देण्यांत येतो की, तक्रारकर्त्याच्या गहाळ झालेल्या दागीण्यांची किंमत रु.3,31,000/- अदा करावी. तसेच सदर रक्कम विरुध्द पक्षाने त्यांचे जबाबदार अधिका-यांकडून वसुल करावी.
3. विरुध्द पक्षास आदेश देण्यांत येतो की, सदर घटनेमुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- द्यावे.
4. वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्षाने 30 दिवसांचे आंत करावी अन्यथा आदेश क्र.2 मधील रकमेवर द.सा.द.शे.9% प्रमाणे व्याज देय राहील.