सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांचेसमोर.
दरखास्त क्रमांक - 27/2009
दाखल दिनांक – 07/08/2009
निकाल दिनांक 02/03/2013
श्री मंगेश राजाराम कोरगावकर
वय सु.60 वर्षे, धंदा- शेती,
रा.रवीकिरण, चाफेआळी,
कोलगाव, ता.सावंतवाडी,
जि.सिंधुदुर्ग. ... अर्जदार
विरुध्द
1) शाखा व्यवस्थापक,
बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी लि.
बांदा, शाखा- सावंतवाडी,
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
2) बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी लि.
बांदा, ता. सावंतवाडी तर्फे मुख्य प्रशासक,
श्री के.टी. गायकवाड, वय – सज्ञान,
धंदा- मुख्य प्रशासक
3) बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी लि.
बांदा, सदस्य, श्री एम.पी. पाटील
वय- सज्ञान, धंदा- प्रशासक मंडळ सदस्य,
4) बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी लि.
बांदा, सदस्य, के.एन. देसाई
वय- सज्ञान, धंदा- प्रशासक मंडळ सदस्य ... सामनेवाला.
गणपूर्तीः-
1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का अंकुश पावसकर(गावकर), सदस्या
तक्रारदारतर्फे वकील श्री सचिन सावंत
विरुध्द पक्ष 1 तर्फे वकील श्री आर.एस्. गव्हाणकर
विरुध्द पक्ष 2 ते 4 तर्फे वकील श्री ए.एस. गावडे
- निकालपत्र –
(दि.02/03/2013)
श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या:- सदरचे प्रकरण हे ग्राहक तक्रार क्रमांक 19/2009 मध्ये दि.27/04/2009 रोजी मंचाने पारीत केलेल्या निकालपत्रातील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्षाच्या बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लि.बांदा ने न केल्यामुळे तक्रारदाराला त्यांच्या ठेवींच्या रक्कमा व्याजासह व खर्चासह न मिळाल्याने ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 25 (3) अंतर्गत वसुलीचे प्रमाणपत्र मिळणेसाठी दाखल केले आहे.
2) दरम्यानचे कालावधीत सदर सोसायटीच्या संचालकांनी उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट पिटिशन दाखल केले होते त्यामुळे त्यात बराच कालावधी निघून गेला. तसेच सोसायटी अवसायानात निघाल्याने सोसायटीचा कार्यभार सांभाळण्यसासाठी शासनाकडून प्रशासकीय समितीची स्थापना करण्यात आली. अर्जदार यांनी सदर प्रकरणात प्रशासकीय समितीच्या सदस्यांना पक्षकार म्हणून दाखल केले आहे. सदर प्रकरणात विरुध्द पक्ष क्र.1 यांस नोटीस निघून त्यांनी हजर होऊन दि.03/06/2010 पर्यंत रक्कम रु.22,500/- (रुपये बावीस हजार पाचशे मात्र) तक्रारदार/अर्जदार यांस अदा केले आहेत. विरुध्द पक्ष क्र.2 ते 4 यांना नोटीस पाठविल्या असता, ते आपले वकील प्रतिनिधीमार्फत हजर होऊन त्यांनी अर्जातील मागणी फेटाळली असून मूळ प्रकरणामध्ये विरुध्द पक्ष क्र.2 ते 4 समाविष्ट नसल्यामुळे या प्रकरणातून आपली नावे वगळण्यात यावीत अशी विनंती केली आहे.
3) प्रस्तुत प्रकरणात अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले. अर्जदार व सामनेवाला यांचे वकील श्री मराठे यांचा युक्तिवाद ऐकला. सदरच्या अर्जाचे अवलोकन केले असता मूळ तक्रार अर्ज क्र.19/2009 मध्ये दि.27/04/2009 रोजी पारीत करुन तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन खालीलप्रमाणे आदेश पारीत केलेले आहेत.
- आदेश –
1) बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी लि.बांदा, शाखा- सावंतवाडी आणि वि.प. यांनी वैयक्तिक वा संयुक्तिकरित्या तक्रारदाराचे मुदत ठेव पावती क्र.701 दि.11/10/08 प्रमाणे मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु.50,630/- (रुपये पन्नास हजार सहाशे तीस मात्र) हे दि.22/10/2008 पासून सदर आदेशाची पुर्ण पूर्तता होईपर्यंत द.सा.द.शे.10% व्याजदराने देण्याचे आहेत.
2) ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केल्याबद्दल, तक्रारदार यांना झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल तसेच प्रकरण खर्चाबद्दल मिळून रु.3,000/- (रुपये तीन हजार मात्र) वि.प. तसेच बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी लि. बांदा शाखा सावंतवाडी यांनी तक्रारदारास दयावेत.
3) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसांच्या आत करणेत यावी.
वर नमूद आदेशाप्रमाणे सामनेवाला सोसायटीने तक्रारदाराची रक्कम अदा केली नव्हती. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा कलम 25(3) प्रमाणे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडे सदरचे प्रकरण पाठविणेत यावे, अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे. त्याकरिता तक्रारदाराने कागदाचे यादीलगत सामनेवाला संस्थेच्या असेसमेंट लिस्टचा उतारा नमूना नं.8 दाखल केला आहे. हे प्रकरण दाखल झाल्यानंतर सामनेवाला पतसंस्थेने रक्कमा अर्जदारास अदा केलेल्या आहेत.
तक्रारदारास अदा केलेल्या रक्कमांचे विवरण
दिनांक | रक्कम (रुपये) | दिनांक | रक्कम (रुपये) |
09/09/2009 | 1000/- | 14/01/2010 | 1500/- |
23/09/2009 | 1000/- | 28/01/2010 | 1500/- |
07/10/2009 | 1000/- | 17/02/2010 | 1000/- |
22/10/2009 | 1000/- | 22/03/2010 | 1500/- |
05/11/2009 | 1500/- | 07/04/2010 | 1500/- |
18/11/2009 | 1000/- | 22/04/2010 | 1500/- |
03/12/2009 | 1500/- | 03/05/2010 | 1500/- |
17/12/2009 | 1000/- | 17/05/2010 | 1000/- |
31/12/2009 | 1500/- | 03/06/2010 | 1000/- |
म्हणजेच सामनेवाला संस्थेने मंचाने पारीत केलेल्या आदेशापोटी रक्कम रु.22,500/- (रुपये बावीस हजार पाचशे मात्र) अर्जदार यांस अदा केलेले आहेत. मंचाचे आदेशाप्रमाणे सामनेवाला संस्थेने मुदत ठेवीचे मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु.50,630/- (रुपये पन्नास हजार सहाशे तीस मात्र) वर दि.22/10/2008 पासून पूर्ण पुर्तता होईपर्यंत द.सा.द.शे. 10% व्याज देण्याचे होते व त्रास व खर्चापोटी रु.3000/- अदा करणेचे होते. त्यामुळे संस्थेने अर्जदारास अदा केलेली रक्कम रु.22,500/- वजा करुन आदेशाप्रमाणे व्याजासहीत रक्कम सामनेवाला संस्थेने अर्जदारास देणे आवश्यक होते; परंतु अद्यापपर्यंत सामनेवाला संस्थेने ती रक्कम अर्जदास दिलेली नाही. सध्या सदर संस्थेचा कार्यभार प्रशासकीय समितीच्या ताब्यात असल्यामुळे म्हणजेच सामनेवाला क्र.2 ते 4 चे ताब्यात असल्याने बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप. सोसायटी बांदा करिता सामनेवाला क्र.2 ते 4 यांनी मंचाचे आदेशाचे पालन करणे आवश्यक होते; परंतु सामनेवाला क्र.2 ते 4 यांनी देखील अर्जदाराच्या रक्कमा आदेशाप्रमाणे अदा केलेल्या नाहीत. ही सर्व वस्तुस्थिती विचारात घेता तसेच अर्ज प्रकरणातील सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 25(3) अन्वये वसुली दाखला जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडे पाठविणेत यावा, या निष्कर्षापत हे मंच येत आहे. सबब पुढीलप्रमाणे आदेश पारीत करणेत येतात.
- आदेश –
1) अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
2) ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 25(3) अन्वये मूळ तक्रार क्र.19/2009 मधील दि.27/04/2009 चे निकालपत्रातील अंतिम आदेशातील रु.22,500/- वजा जाता उर्वरित रक्कम व्याजासहीत वसुल करणेसाठी मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडे वसुलीचा दाखला देण्यात येतो.
3) प्रबंधक, ग्राहक मंच, सिंधुदुर्ग यांनी वसुली दाखला जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडे पाठवावा.
ठिकाण- सिंधुदुर्गनगरी.
दिनांक - 02/03/2013
Sd/- sd/- sd/-
(वफा जमशीद खान) (डी. डी. मडके) (उल्का अंकुश पावसकर (गावकर)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सिंधुदुर्ग