निकालपत्र :- (दि.21.12.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.3 यांनी म्हणणे दाखल केलेली नाही. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला क्र.1 व 2 हे वित्तीय संस्था आहे. सामनेवाला क्र.3 यांचेमार्फत तक्रारदारांनी वाहन खरेदी करणेकरिता सामनेवाला वित्तीय कंपनीकडून कर्ज घेतले व त्याआधारे बजाज प्लॅटिना नं.एम्.एच्.09 ए डब्ल्यु 8866 हे दुचाकी वाहन खरेदी केले आहे. सदर कर्जातील असलेल्या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाला वित्तीय कंपनीच्या कर्जाची संपूर्ण फेड केली आहे व त्याची माहिती सामनेवाला यांना आहे व त्यांनी तक्रारदारांना सर्टिफिकेट ऑफ सॅटिस्फॅक्शनचा दाखला दिलेला आहे. सदर वाहनाची संपूर्ण कर्जफेड करुनही सदर वाहनावरती नोंदविलेला बोजा कमी करणेकरिता ना हरकत दाखला देणेविषयी विनंती केली असता सामनेवाला वित्तीय कंपनीने टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदारांनी दि.25.01.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली. परंतु, त्यास उत्तर दिलेले नाही. सामनेवाला यांच्या सदरच्या कृत्यामुळे तक्रारदाराना आर्थिक व मानसिक त्रास झालेला आहे. सबब, सामनेवाला यांनी तक्रारदारांना कर्जफेडीबाबत ना हरकत दाखला देणेबाबतचा आदेश व्हावा. वाहनाचे शासकिय कागदोपत्री नोंदविलेला बोजा कमी करणेबाबतचा आदेश व्हावा. तसेच, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रुपये 25,000/- व खर्चापोटी रुपये 1,500/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत शिवम बँकचे पासबुक, सामनेवाला यांनी दिलेले सर्टिफिकेट ऑफ सॅटिस्फॅक्शन, सामनेवाला क्र.2 यांनी हायर पर्चेस अॅग्रीमेंट संपुष्टात आलेबाबत दिलेले पत्र, आर.सी.बुक, सामनेवाला क्र.1 यांना पाठविलेली नोटीस, पॉलीसी सर्टिफिकेट इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवला क्र.1 व 2 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सदर सामनेवाला वित्तीय कंपनीने तक्रारदारांना एन्.ओ.सी. दिलेली आहे. लेटर ऑफ सॅटिक्फॅक्शन आणि एन्.ओ.सी. हे एकच डॉक्युमेंट असतात, त्याच्यामध्ये फरक करता येत नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ एन्.ओ.सी.सर्टिफिकेट दाखल केले आहे. (6) प्रस्तुत प्रकरणी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद तसेच उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे; तक्रारदारांनी वाहन खरेदी करणेकरिता सामनेवला वित्तीय कंपनीकडून कर्ज घेवून तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे दुचाकी वाहन खरेदी केले आहे. तसेच, सदर कर्जाची पूर्ण परतफेड झालेली आहे. ही वस्तुस्थिती सामनेवाला वित्तीय कंपनीने मान्य केली आहे; तक्रारदारांची तक्रार ही सामनेवाला वित्तीय कंपनीने संपूर्ण कर्जफेड होवूनसुध्दा वाहनावरील बोजा कमी करणेकरिता ना हरकत दाखला मागणी करुनही दिलेला नाही याबाबत दाखल केलेली आहे. प्रस्तुत तक्रार दाखल झालेनंतर व सामनेवाला यांनी म्हणणे प्रस्तुत प्रकरणी दाखल झालेनंतर सामनेवाला वित्तीय कंपनीने ना हरकत दाखल्यासंबंधीचे कागदपत्र दाखल केलेले आहे. परंतु, वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे ना हरकत दाखल्याची मागणी केली आहे. तसेच, त्या अनुषंगाने अड.एस्.बी.सावेकर यांच्यामार्फत दि.25.01.2010 रोजीची नोटीसही पाठविलेली व त्याची पोच प्रस्तुत कामी दाखल आहे. याचा विचार करता सामनेवाला म्हणतात त्याप्रमाणे सामनेवाला वित्तीय कंपनीने तक्रारदारांना त्यांनी मागणी करुनही वाहनावरील बोजा कमी करणेकरिता ना हरकत दाखला दिलेचे दिसून येत नाही. सदर वस्तुस्थितीचा विचार करता सामनेवाला वित्तीय कंपनीने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला वित्तीय कंपनीने तक्रारदारांना तक्रारीत उल्लेख केलेल्या वाहनाबाबत संपूर्ण कर्ज परतफेड झालेसंबंधीचा ना हरकत दाखला तक्रारदारांना द्यावा. 3. सामनेवाला वित्तीय कंपनीने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- द्यावेत. 4. सामनेवाला वित्तीय कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/- द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |