निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्री.विष्णु गायकवाड,सदस्य)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढील प्रमाणे, तक्रारदार श्रीकृष्ण शंकरराव बडे यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडून वर्ष 2007 मध्ये बजाज प्लॅटीना मोटार सायकल एकूण किंमत रु.39,160/- विकत घेतले. त्यासाठी डाऊन पेमेंट म्हणून तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे रु.13,200/- चा भरणा केला व उर्वरित रक्कमेसाठी सामनेवाले क्र.1 याचेकडून कर्ज घेतले. तक्रारदार व सामनेवाले यांचेतील कराराप्रमाणे सदर कर्ज रक्कम 18 समान मासिक हप्त्यामध्ये परतफेड करण्याचे ठरले होते. त्याकरिता तक्रारदार यांनी सामनेवाला यांना स्वतःच्या हिना शाहीन बँक बीड शाखेचे खाते क्र.2388 चे 18 कोरे धनादेश सामनेवाले क्र.2 मार्फत सामनेवाले क्र.1 यांचेकडे सूपूर्द केले. सदर धनादेश सामनेवाले यांनी दरमहा स्वतःचे बँक खात्यावर जमा करुन तक्रारदार यांचेकडून वाहनाच्या हप्त्याची रक्कम रु.1823/- वसूल करावी असे दोन्ही पक्षकारामध्ये ठरले होते. त्याप्रमाणे सामनेवाले यांनी सदर बँकेचे 10 धनादेश बँक खात्यावर जमा करुन कर्जाची रक्कम वसूल केली. परंतु उर्वरित आठ धनादेश बँकेस दिले नाहीत. सामनेवाले यांनी अर्जदार यांना दि.15.9.2011 रोजीच्या पूणे येथील तडजोड महामेळाव्यात उर्वरित थकीत रक्कम रु.21,862/- चा भरणा करुन त्यावरील दंड भरण्या संबंधीची व दंडावर भरघोस सुट देण्या बाबतची नोटीस पाठविली. सदर नोटीस मिळाल्यानंतर अर्जदार यांनी सामनेवाले यांचे पूणे येथील मुख्य कार्यालयात जाऊन नोटीशी बाबत विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन वाहन जप्त करण्याविषयी धमकावण्यात आले. अर्जदार यांनी थकीत रक्कम रोख भरणा करण्याची तयारी दाखवली असता सामनेवाले यांनी त्यांस सपशेल नकार दिला. वाहनाचे मुळ कागदपत्रे स्वतःकडे ठेऊन घेतली. अर्जदाराकडून दंडासहीत रककम रु.64,000/- भरा म्हणून बळजबरी करीत आहेत अन्यथा वाहन जप्त करण्याची धमकी देत आहेत. तसेच दि.19.9.2011 रोजी तक्रारदार हा सामनेवाला कडे आठ हप्त्याची धनादेश रक्कम घेऊन गेले होते. सामनेवाला यांनी ती रक्कम घेण्यास नकार दिला. उर्वरित रक्कम भरण्यास अर्जदार हे तयार आहेत असे वारंवार कळविले परंतु सामनेवाले यांनी त्या बाबत कोणतीही दखल घेतली नाही.
सामनेवाला क्र.1 हे हजर झाले व त्यांनी त्यांचा लेखी जवाब दि.05.06.2012 रोजी दाखल केला. तक्रारदार यांनी त्यांचेकडून तक्रारीत नमूद केल्या प्रमाणे वाहन घेतले व त्यासाठी कर्ज घेतले ही बाब मान्य केली आहे. तसेच सदरील कर्ज 18 मासिक हप्त्यामध्ये परतफेड करावयाचे ठरले होते ही बाबही मान्य केली आहे. सामनेवाला यांनी, तक्रारदार यांनी डाऊन पेमेंट म्हणून रु.13,200/- भरले होते हे अमान्य केले आहे. सामनेवाले क्र.1 यांनी पूढे आपले लेखी जवाबामध्ये असे म्हटले आहे की, तक्रारदार यांनी खरेदी केलेले वाहन नोंदणी करण्याची जबाबदारी त्यांचेवर नाही. सामनेवाले क्र.1 यांचेकडे गाडीचे कागदपत्र नाहीत असे म्हटले आहे. सामनेवाले क्र.1 यांचे कथनानुसार तक्रारदार यांचेकडे दि.10.02.2012 रोजी रक्कम रु.87,306/- येणे बाकी आहेत. सामनेवाले क्र.1 यांनी पूढे असे कथन केले आहे की, तक्रारदार यांचेकडून दि.10.02.2012 रोजी आठ धनादेश त्यांना प्राप्त झाले नाहीत. तक्रारदार यांनी हेतूपुरस्कर हप्ते भरले नाहीत. तसेच तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 यांचे कार्यालयात कधीही आलेले नाही अगर तडजोडी बाबत बोलणी झाले नाही. तक्रारदार यांनी खोटी तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी असे म्हटले आहे.
तक्रार अर्ज व लेखी जबाबावरुन मंचाचे विचारार्थ खालील मुददे उपस्थित होतात व त्याचे समोरच त्याची उत्तरे दिलेली आहेत.
मुददे उत्तर
1) तक्रारदार हे सामनेवाला यांना वाहनाची संपूर्ण
रक्कम देण्यास तयार होते काय, सामनेवाला यांनी तो
घेण्यास नकार दिला काय ? होय.
2) तक्रारदार यांनी तक्रारीत केलेली मागणी मान्य करता
येईल काय ? होय
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः-
तक्रारदार यांनी दि.13.12.2011 रोजी स्वतःचे शपथपत्र दाखल केले आहे. त्यासोबत तडजोड महामेळावा पत्र, वाहनाचे आर.सी. बुक, हिना शाहीन को ऑप अर्बन बँक लि. बीड यांचे ताळेबंद, तक्रारदाराने मेलद्वारे बजाज अँटो फायनान्स यांना कळवल्याचे पत्र, धनादेश न वटल्याचे कागदपत्र इत्यादी झेरॉक्स कागदपत्र दाखल केली आहेत.
सामनेवाले क्र.2 हे हजर झाले, परंतु त्यांनी त्यांचा जवाब दाखल केला नाही, म्हणून त्यांचे विरुध्द नो से आदेश करण्यात आला.
तक्रारदार व सामनेवाले यांचा यूक्तीवाद व पुराव्याचे कागदपत्र तपासले असता, सामनेवाले यांनी उर्वरित आठ धनादेश ठरल्याप्रमाणे बँकेत भरुन रक्कम वसूल करणे अपेक्षीत होते. तसे त्यांनी केले नाही. तक्रारदार हा थकबाकीची रक्कम देण्यास तयार होता परंतु सामनेवाला यांनी त्यांस नकार देऊन अवाजवी रक्कमची मागणी केली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उर्वरित रक्कम दरमहा भरली नाही अगर चेक दिले नाही याबाबत कधीही कळविले नाही.सर्वसाधारणपणे अशी प्रथा आहे की, ज्यावेळेस कर्ज काढून वाहन खरेदी केले जाते त्यावेळी तक्रारदार यांनी सामनेवाला कडून दरमहा जे हप्ते दयायचे असतात त्यांचे संपूर्ण चेक अर्जदाराकडून घेतात व ते दरमहा बँकेत भरुन कर्जाची रक्कम वसूल करतात. सामनेवाला यांनी याबाबत कोणताही सबळ पुरावा दाखल केला नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्र यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार हा उर्वरित सर्व रक्कम भरण्यास तयार होता परंतु सामनेवाला क्र.1 यांनी ते घेण्यास नकार दिला व तक्रारदाराकडून अवाजवी रक्कम मिळावी या हेतूने रक्कम घेण्यास टाळाटाळ केली. तक्रारदार रक्कम भरण्यास तयार असूनही रक्कम न स्विकारुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी केली आहे. तसेच तक्रारदार यांना नोटीस देऊनही विनाकारण पुणे येथे येणेस भाग पाडले आहे. त्यामुळे तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रास झाला आहे. तक्रारदार हे मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- मिळण्यास पात्र आहेत तसेच दाव्याच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारा कडून आठ
हप्त्याची रक्कम रु.14,570/-(अक्षरी रु.चौदा हजार पाचशे सत्तर
फक्त) एक महिन्याचे आंत भरणा करुन घ्यावेत, रक्कम भरणा
केल्यानंतर सामनेवाला यांनी आठ दिवसांचे आंत वाहनाचे संपूर्ण
कागदपत्रे तक्रारदाराकडे सूपूर्द करावेत.
3. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना मानसिक व
शारीरिक त्रासापोटी रु.2,000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्त) व
दाव्याच्या खर्चापोटी रु.1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) एक
महिन्याचे आंत दयावेत.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विष्णु गायकवाड श्री.विनायक लोंढे
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
पारवेकर