जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 184/2015.
तक्रार दाखल दिनांक : 27/04/2015.
तक्रार आदेश दिनांक : 16/05/2016. निकाल कालावधी: 01 वर्षे 00 महिने 19 दिवस
काकासाहेब गोपीनाथ माने, वय 35 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. येवती, ता.जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
मॅनेजर, बजाज अॅटो फायनान्स लि.,
आकुर्डी, पुणे – 411 035. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ : जी.डी. देशमुख
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारकर्ता (संक्षिप्त रुपामध्ये ‘त.क.’) यांचे वादकथन थोडक्यात असे आहे की, त्यांनी दि.22/2/2007 रोजी विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये ‘वि.प.’) यांच्याकडून वित्तसहाय्य घेऊन व डाऊन पेमेंट रु.9,250/- भरणा करुन बजाज सी.टी.100 हे दुचाकी वाहन खरेदी केलेले आहे. त.क. यांनी वि.प. यांच्याकडे हप्ते भरणा करण्यासाठी तेरणा नागरी सहकारी बँक लि., उस्मानाबाद यांचे रु.1,310/- रकमेचे 30 धनादेश दिलेले होते. तसेच वाहनाचा विमा भरण्यासाठी त्यांनी वसंतदादा सहकारी बँक लि. यांचे दोन धनादेश वि.प. यांना दिलेले होते. त्यानंतर वि.प. यांनी धनादेश वटवून हप्ते स्वीकारण्यास सुरुवात केलेली होती. परंतु त.क. यांच्या खात्यावर पुरेशी रक्कम शिल्लक असतानाही वि.प. यांनी जाणीवपूर्वक व हेतु:पुरस्सर धनादेश क्र.9512 व 9513 वटवण्याकरिता सादर केले नाहीत. तसेच वसंतदादा नागरी सहकारी बँक, उस्मानाबाद यांचा दुसरा धनादेश त.क. यांना परत केलेला नाही. त.क. यांचे पुढे असे वादकथन आहे की, वि.प. यांनी तडजोड महामेळाव्याद्वारे त.क. यांच्या थकीत हप्त्यांची रक्कम व दंड अशी रु.18,330/- रक्कम दि.20/10/2011 रोजीच्या आत भरणा केल्यास दंड रकमेमध्ये सवलत देऊन सर्व कागदपत्रांसह वाहन त.क. यांचे नांवे करुन देण्यात येईल, असे कळवले. त.क. यांनी त्यांच्याकडे दोन हप्त्यांशिवाय कोणतेही हप्ते शिल्ल्क नसल्यामुळे दंड आकारणीचा प्रश्न निर्माण होत नाही, असे कळवले असता त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच त.क. यांनी नोटीस पाठवून धनादेश क्र.9512 व 9513 करिता रु.2,620/- रक्कम स्वीकारुन वाहनाची कागदपत्रे परत करण्याबाबत कळवले असता दखल घेण्यात आलेली नाही. उपरोक्त वादविषयाचे अनुषंगाने त.क. यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन वि.प. यांच्याकडून वादविषयक वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, नाहरकत प्रमाणपत्र, वाहनाची दुसरी किल्ली, वसंतदादा नागरी सहकारी बँक लि., उस्मानाबाद यांचा धनादेश इ. मिळण्यासह रु.51,000/- नुकसान भरपाई देण्याचा वि.प. यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केलेली तक्रार दि.27/4/2015 रोजी दाखल केलेली आहे.
2. वि.प. यांनी दि.21/8/2015 रोजी अभिलेखावर लेखी उत्तर सादर केलेले असून तक्रारीतील विधाने व मजकूर अमान्य केला आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे त.क. यांनी विनंती केल्याप्रमाणे बजाज सी.टी.100 डीएलएक्स दुचाकी वाहन खरेदी करण्यासाठी लोन अॅग्रीमेंट नं. 530036956 अन्वये रु.39,300/- वित्तसहाय्य दिले. ज्यामध्ये रु.8,300/- वित्तीय शुल्क अंतर्भूत आहेत. कर्जाचा कालावधी 30 महिने (दि.10/4/2007 ते 10/9/2009) होता आणि प्रतिमहा रु.1,310/- प्रमाणे कर्ज परतफेड करण्याची होती. त्याकरिता त.क. यांनी पूर्वदिनांकीत धनादेश विकल्प स्वीकारलेला होता. वि.प. यांचा असा प्रतिवाद आहे की, त.क. यांनी सुरुवातीस कधीही रु.9,250/- रक्कम भरणा केलेली नाही. पूर्वदिनांकीत धनादेशाद्वारे कर्ज परतफेड करणे ही केवळ सुविधा असून ज्यामुळे कोणत्याही कारणास्तव त.क. यांना धनाकर्ष किंवा रोख रक्कम भरण्यास मनाई होत नाही. त.क. यांनी थकीत हप्ते भरण्यासाठी कोणतेही पावले उचललेली नाहीत किंवा धनादेश वटल्याबाबत बँकेचा खातेउतारा दाखल केला नाही. लोन अॅग्रीमेंटमधील कलम क्र.17 (बी) चा संदर्भ वि.प. यांनी लेखी उत्तरामध्ये नमूद केला आहे. त्यांचे पुढे असे कथन आहे की, वाहनाच्या सन 2007-2008 करिता विमा उतरवण्यासाठी एक धनादेश वटवण्यात आला आणि सन 2008 मध्ये धनादेशाद्वारे विमा पॉलिसी उतरवण्याची सुविधा बंद केल्यामुळे दुसरा धनादेश त.क. यांना परत केला. त.क. यांच्याकडून 21 ते 23 क्रमांकाच्या हप्त्यांची रक्कम रु.3,930/- प्राप्त झालेली नाही आणि अनेकवेळा विनंत्या व स्मरण करुनही थकीत रक्कम भरण्यासाठी त.क. यांनी स्वारस्य दर्शवले नाही. तसेच त.क. यांच्याकडे रु.3,930/- थकीत हप्त्यांसह इतर रु.25,992/- येणे आहेत. वि.प. यांनी कराराचे कलम 11 (ए) प्रमाणे अनुपालन केलेले आहे. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही किंवा तक्रारीस कारण निर्माण झालेले नाही. उलटपक्षी त.क. यांनी कराराप्रमाणे कर्ज परतफेड करण्यामध्ये कुचराई केलेली आहे. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केलेली आहे.
3. त.क. यांची तक्रार, वि.प. यांचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीतील नमूद वादाचे निवारणार्थ मंचापुढे खालीलप्रमाणे प्राथमिक मुद्दे उपस्थित होतात आणि त्याचे उत्तर आम्ही त्यांचेसमोर खाली दिलेल्या कारणमीमांसेअन्वये देत आहोत.
मुद्दे उत्तरे
1. त.क. हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? होय.
2. प्रस्तुत तक्रार निर्णयीत करण्याचे या जिल्हा मंचास प्रादेशिक
अधिकारक्षेत्र प्राप्त होते काय ? नाही.
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
4. मुद्दा क्र. 1 :- त.क. यांनी वि.प. यांच्याकडून कर्जविषयक करारपत्राद्वारे बजाज सी.टी.100 डीएलएक्स दुचाकी वाहन खरेदी करण्यासाठी वित्तसहाय्य घेतल्याबाबत उभय पक्षांमध्ये विवाद नाही. वि.प. यांनी त.क. यांना रु.8,300/- वित्तीय शुल्क आकारणी केल्याचे वि.प. यांनी मान्य केले आहे आणि निर्विवादपणे त.क. हे वि.प. यांच्याकडून वित्तीय सेवा घेत असल्यामुळे ते ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2 (1) (डी) अन्वये ‘ग्राहक’ संज्ञेत येतात आणि आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
5. मुद्दा क्र. 2 :- वि.प. यांनी लेखी उत्तराद्वारे ते गैरबँकींग वित्तीय संस्था असून त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पुणे येथे असल्याचे नमूद केलेले आहे. त.क. यांचे वादकथन पाहता त्यांचे दुचाकी वाहन त्यांनी कोणाकडून व कोठून खरेदी केले याबद्दल कोणतेही स्पष्ट कथन केलेले नाही. ब-याचवेळा ज्या ठिकाणी एखादा ग्राहक वाहन खरेदी करतो, त्या ठिकाणी वित्तीय संस्थेचे प्रतिनिधी कार्यरत असू शकतात. परंतु त.क. यांचे त्याप्रमाणेही वादकथन नाही. वादविषयक वाहन खरेदीचे ठिकाण, वाहनाचे विक्रेते किंवा त्यांना दुचाकीकरिता खरेदी करण्यासाठी कर्ज देणा-या वि.प. यांचे वास्तव्य इ. बाबी उस्मानाबाद जिल्हा ग्राहक मंचाच्या अधिकारकक्षेत आहेत, असा स्पष्ट उल्लेख किंवा ऊहापोह त.क. यांनी केलेला नाही.
6. त.क. यांचे वादकथनाप्रमाणे कर्ज परतफेडीकरिता त्यांनी तेरणा सहकारी बँक लि., उस्मानाबाद यांचे प्रत्येकी रु.1,310/- रकमेचे 30 धनादेश व वाहनाचा विमा उतरवण्यासाठी वसंतदादा नागरी सहकारी बँक लि., उस्मानाबाद यांचे 2 धनादेश वि.प. यांना दिलेले होते. तसेच त्यांच्या वादकथनाप्रमाणे वि.प. यांनी तेरणा सहकारी बँक लि., उस्मानाबाद यांचे धनादेश क्र.9512 व 9513 जाणीवपूर्वक वटवण्याकरिता बँकेत भरले नाहीत आणि वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा धनादेश क्र.39246 त्यांना डाकेद्वारे परत पाठवला. त.क. यांनी उस्मानाबाद येथील तेरणा व वसंतदादा बँकेचे धनादेश कर्ज परतफेड व विमा हप्ता भरण्याकरिता दिलेले असले तरी त्या बँका प्रस्तुत तक्रारीमध्ये पक्षकार नाहीत किंवा वादविषयामध्ये त्यांची भुमिका महत्वपूर्ण ठरत नाही. त.क. यांचे वादकथनाप्रमाणे वि.प. यांच्या प्रतिनिधी सुनिता शिंदे यांचेशी तडजोडीबाबत बोलणी झालेली होती. त्यादृष्टीने अभिलेखावर दाखल असलेल्या तडजोड महामेळाव्याच्या पत्रामध्ये सुनिता शिंदे यांच्या संपर्काचे ठिकाण पुणे येथे नमूद केलेले आहे.
7. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11 असे स्पष्ट करते की,
कलम 11 (2) ज्याच्या अधिकारतेच्या स्थानिक सिमेत :-
(अ) वि.प. किंवा ते एकापेक्षा अधिक असल्यास विरुध्द पक्षांपैकी प्रत्येक व्यक्ती फिर्याद दाखल करण्याच्या वेळी प्रत्यक्षपणे आणि स्वेच्छेने राहत असेल (किंवा व्यवसाय करीत असेल किंवा तिचे शाखा कार्यालय असेल) किंवा लाभासाठी व्यक्तिश: काम करीत असेल, किंवा
(ब) वि.प. एकापेक्षा अधिक असल्यास त्यापैकी कोणीही, फिर्याद दाखल करण्याच्यावेळी प्रत्यक्षपणे आणि स्वेच्छेने राहत असेल (किंवा व्यवसाय करीत असेल किंवा शाखा कार्यालय असेल) किंवा लाभासाठी व्यक्तिश: काम करीत असेल, परंतु अशा प्रकरणी जिल्हा मंचाने परवानगी दिली असेल किंवा ज्या राहत नसतील (किंवा व्यवसाय करीत नसतील किंवा शाखा कार्यालय नसेल) किंवा व्यवसाय करीत नसतील किंवा प्रकरणपरत्वे लाभासाठी व्यक्तिश: काम करीत नसतील अशा विरुध्द पक्षांनी फिर्याद दाखल करण्यास मुक संमती दिली असेल; किंवा
(क) वादाचे कारण पूर्णपणे किंवा भागश: घडले असेल;
अशा जिल्हा मंचाकडे फिर्याद दाखल करण्यात येईल.
8. उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद व दाखल कागदपत्रे, तसेच कलम 11 (2) चे अवलोकन केले असता त.क. यांनी वि.प. यांच्या उस्मानाबाद येथील कार्यालयाकडून कर्ज घेतल्याचे सिध्द होत नाही. तसेच त.क. यांनी कोणत्याही उचित व ठोस कागदोपत्री पुराव्याद्वारे उस्मानाबाद जिल्हा मंचाचे कार्यक्षेत्रामध्ये वि.प. हे कार्यरत असल्याचे सिध्द केलेले नाही. अभिलेखावर दाखल कागदपत्रांवरुन वि.प. हे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये व्यवसायासाठी कार्यरत असल्याचे व त्यांचे शाखा कार्यालय असल्याचे सिध्द होत नाही. आमच्या मते केवळ त.क. हे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वास्तव्यास असल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा मंचास तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र प्राप्त होत नाही. उपरोक्त विवेचनावरुन त.क. यांची तक्रार निर्णयीत करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा मंचाला प्रादेशिक अधिकारक्षेत्र प्राप्त होत नाही, या अनुमानास आम्ही आलो असल्यामुळे तक्रारीमध्ये उदभवलेल्या इतर प्रश्नांना स्पर्श न करता त.क. यांनी योग्य मंचापुढे तक्रार दाखल करणे उचित होईल आणि त्याप्रमाणे त.क. यांना तक्रार दाखल करण्यास त्यांना स्वातंत्र्य आहे, या निर्णयाप्रत येत आहोत. वरील विवेचनावरुन आम्ही मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी दिलेले असून शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. त.क. यांची तक्रार निर्णयीत करण्याकरिता प्रादेशिक अधिकारक्षेत्र नसल्यामुळे तक्रार रद्द करण्यात येते.
2. उभय पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
3. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क देण्यात यावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (सौ. व्ही.जे. दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-
(संविक/स्व/16516)