::: आ दे श :::
( पारित दिनांक : 29/06/2015 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश खालीलप्रमाणे -
तक्रारकर्त्याचे वडील नामे रामचंद्र सुर्याजी महाले हे असून त्यांनी विदर्भ बँक, पार्डी टकमोर, ता. जि. वाशिम यांचे मार्फत विरुध्द पक्ष यांचेकडून सर्व्हे शक्ती सुरक्षा पॉलिसी अंतर्गत दिनांक 12/02/2011 रोजी 5,000/- रुपये वार्षीक हप्ता देऊन विमा काढला असून तक्रारकर्ता त्यांचा नॉमिनी आहे. तक्रारकर्त्याच्या वडिलांनी पुर्ण पॉलिसीच्या शर्ती व अटी पुर्ण केल्यानंतरच विरुध्द पक्षाने विमा पॉलिसी क्र. 0205364746 दिली आहे. त्यानंतर दुसरा हप्ता भरण्यापूर्वीच तक्रारकर्ते यांचे वडील दिनांक 05/02/2012 रोजी चालता बोलता अचानकपणे मरण पावले. पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारकर्त्यास वडिलांचे मृत्यूनंतर विरुध्द पक्षाकडून इंन्शुर्ड रक्कम 1,25,000/- व अकाउंट रक्कम 5,160/- घेणे होते. त्याकरिता बँकेमार्फत तक्रारकर्त्याने डेथ क्लेम केला. परंतु विमाधारकास दिनांक 6 एप्रिल 2007 पासुन 4 मे 2007 पर्यंत इजकेमिक हार्ट डिसीज आणि डायबेटीस मेलीटसचा आजार असून मयताने त्याचा पॉलिसी अर्ज( दिनांक 31 मार्च 2011) भरतांना जाणीव असुन, अर्जामध्ये नमुद केले नाही, असे खोटे व चुकीचे कारण दाखवून विरुध्द पक्षाने डेथ क्लेम नामंजूर केला व मयताची अकाउंट रक्कम रुपये 5,160/- धनादेशाव्दारे तक्रारकर्त्यास अदा करण्याचा प्रयत्न केला. परंतु विमा रक्कम न दिल्याने तक्रारकर्त्याने अकाउंट रक्कम विरुध्द पक्षास परत केली. विरुध्द पक्षाने गैरकायदेशिररित्या क्लेम नाकारला आहे. त्यामुळे विरुध्द पक्षाकडून विम्याची रक्कम रुपये 1,25,000/- तसेच अकाउंट रक्कम 5,160/- व त्यावरील आजपर्यंतचे व्याज, तसेच वकील फी, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 69,840/- असे एकूण रुपये 2,00,000/- इतकी रक्कम व त्यावर 18 % वार्षीक व्याजदाराने विरुध्द पक्षाकडून वसुल करुन दयावी, हया प्रार्थनेसह ही तक्रार दाखल केली. सदर तक्रार शपथेवर दाखल असुन, त्यासोबत एकंदर 4 दस्त पुरावा म्हणून सादर केले आहेत.
2) विरुध्द पक्ष क्र. 1 यांचा लेखी जबाब -
ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर मंचाने विरुध्द पक्ष क्र. 1 ला नोटीस काढली असता, त्यांनी निशाणी-13 प्रमाणे इंग्रजी भाषेत व निशाणी-20 प्रमाणे मराठी भाषेत लेखी जबाब मंचासमोर दाखल केला. त्यानुसार तक्रारकर्त्याचे बहुतांश कथन फेटाळत, अधिकच्या कथनामध्ये नमुद केले ते थोडक्यात येणेप्रमाणे, मृतकाचा डेथ क्लेम आल्यानंतर विरुध्द पक्षाने त्याबाबत त्यांच्या अधिकृत अधिका-याव्दारे चौकशी केली, त्या चौकशीमध्ये असे लक्षात आले की, मृतकाला हृदयरोग होता व त्यासाठी त्याने दिनांक 06/04/2007 व 02/05/2007 ते 04/05/2007 पर्यंत कोरोनरी आर्टेरी डिसीज व सिंगल वेसल डिसीज डायबेटीज मेलीलुटीस चा उपचार घेतला होता. हया महत्वाच्या बाबीचा खुलासा मृतकाने पॉलीसी घेता वेळेस विमा कंपनीला जाणुनबजून, हेतुपूरस्सर दिला नाही. या कारणास्तव, विमा कंपनीने विम्याची रक्कम देण्यास नकार दिला आहे. जिवन विमा कराराच्या तरतुदीचे पालन विमाधारक मयत रामचंद्र सुर्याजी महाले यांनी केलेले नाही. विमाधारकाने दिनांक 31/03/2011 रोजी जिवन विमा पॉलिसी काढण्याकरिता अर्ज ( प्रप्रोजल ) भरुन विरुध्द पक्ष क्र. 1 ला दिला, त्या अर्जामधील डिक्लरेशन ऑफ गुड हेल्थ या मधील प्रश्न क्र.1 ते 5 मध्ये पॉलिसी धारकास यापुर्वी कोणता आजार झाला आहे का या विचारलेल्या माहितीचे ऊत्तर नकारार्थी दिलेले आहे. चौकशीमध्ये असे सुध्दा लक्षात आले की, मृतक हा अपोलो हॉस्पीटल, हैद्राबाद येथे 02/05/2007 रोजी उपचारासाठी गेला होता तसेच तो वर नमुद केलेल्या आजाराचा उपचार घेत होता. तसे तक्रारकर्ते यांनी दि. 18/04/2012 रोजी विरुध्द पक्षास दिलेल्या पत्रामध्ये कबूल केले आहे की, माहे एप्रील – मे 2007 मध्ये मृतक वर नमुद केलेल्या आजारासाठी उपचार घेत होता. विरुध्द पक्षाने मृतकाचा डेथ क्लेम खारिज करतांना, पूर्ण कायद्याचे पालन केले आहे. विरुध्द पक्षाने कोणताही अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केला नाही तसेच सेवा देण्यास त्रुटी केली नाही. विरुध्द पक्ष कंपनी ही मा. सर्वोच्च न्यायालय यांनी सतवंतकौर संधू – विरुध्द – न्यू इंडीया इंशोरंस कंपनी ( IV (2009) CPJ 8 (SC) व युनायटेड इंडीया इंशोरंस कंपनी – विरुध्द – एम.के.जे कार्पोरेशन ( III (1996) CPJ 8 (SC) या न्याय निर्णयावर भिस्त ठेवत आहे. सबब तक्रारकर्ता हा कोणत्याही मागणी केलेल्या विनंतीला पात्र नाही. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी दाखल केलेली तक्रार खर्चासह खारिज करण्यांत यावी.
3) विरुध्द पक्ष क्र. 2 यांचा लेखी जबाब - विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी निशाणी-14 प्रमाणे लेखी जबाब मंचासमोर दाखल केला. त्यानुसार तक्रारकर्त्याचे बहुतांश कथन फेटाळत, अधिकच्या कथनामध्ये नमुद केले ते थोडक्यात येणेप्रमाणे . . . . .
तक्रारकर्ता याने विरुध्द पक्ष क्र. 2 यांना मयत रामचंद्र सुर्याजी महाल्ले यांच्या मृत्यूची सुचना दिली व विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी ही सुचना विरुध्द पक्ष क्र. 1 यांना कळविली. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 1 च्या प्रतिनिधीला डेथ क्लेम रक्कमेची मागणी केली. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी दिनांक 09/05/2012 च्या पत्रानुसार तक्रारकर्त्याचा क्लेम नाकारला व रुपये 5,160/- चा धनादेश दिला, तसेच त्या पत्राची व धनादेशाची नक्कल विरुध्द पक्ष क्र. 2 यांना पाठविली. विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी सदरहू दिनांक 09/05/2012 चे पत्र व सोबत आलेल्या धनादेशाची प्रत तक्रारकर्त्यास दिली. तक्रारकर्त्याने सदरहू धनादेश घेण्यास नकार दिला व विरुध्द पक्ष क्र. 1 च्या प्रतिनिधीला परत केला. प्रस्तुत प्रकरणामध्ये विरुध्द पक्ष क्र. 2 यांचा पॉलिसीची रक्कम देण्यामध्ये किंवा रोकण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही व त्यांच्यामुळे कोणत्याही प्रकारचा विलंब नाही. विमा काढून देणे हा विरुध्द पक्ष क्र. 2 बॅंकेचा व्यवसाय नाही. अशा परीस्थितीमध्ये विरुध्द पक्ष क्र. 2 ची सेवेमधे कोणतीही त्रुटी नाही. विरुध्द पक्ष क्र. 2 बँकेला हेतुपुरस्सर, जाणुनबुजून या प्रकरणामध्ये कोणतेही कारण नसतांना पक्ष केले आहे व विरुध्द पक्ष क्र. 2 विरुध्द खोटी तक्रार दाखल केली आहे. तरी सदरहू तक्रार अर्ज हा विरुध्द पक्ष क्र. 2 विरुध्द खर्चासह खारिज करण्यांत यावा. नियमाप्रमाणे विरुध्द पक्ष क्र. 2 कोणतीही रक्कम देणे लागत नाही. सबब तक्रार दंड लावुन खारीज करावी.
सदर लेखी जबाबासोबत विरुध्द पक्ष यांनी एकंदर 3 दस्तऐवज पुरावे म्हणून सादर केले आहेत.
4) कारणे व निष्कर्ष ::
या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 चा स्वतंत्र लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्त्याचे प्रतिउत्तर व दाखल केलेले प्रतिज्ञालेख, तसेच तक्रारकर्त्याचा लेखी युक्तिवाद व विरुध्द पक्षाचा तोंडी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देऊन नमूद केला तो येणेप्रमाणे.
या प्रकरणात उभय पक्षाला मान्य असलेल्या बाबी अशा आहेत की, तक्रारकर्त्याचे मयत वडील नामे रामचंद्र सुर्याजी महाले यांनी त्यांचे जीवनावर विरुध्द पक्ष क्र.2 / विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक पारडी टकमोर ता. जि. वाशिम यांचेमार्फत विरुध्द पक्ष क्र. 1 यांचे कडून सर्वेशक्ती सुरक्षा जीवन पॉलिसी अंतर्गत दिनांक 12/02/2011 रोजी रुपये 5,000/- वार्षीक हप्ता भरुन जीवन विमा काढला होता, व तक्रारकर्ता हा सदरहू पॉलिसी मध्ये नॉमिनी आहे. उभय पक्षामध्ये या बाबीमध्ये देखील वाद नाही की, विमाधारक रामचंद्र सुर्याजी महाले हे दिनांक 05/02/2012 रोजी हृदयविकारामुळे मृत्यू पावले होते व याची सुचना तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 2 यांना दिली होती.
विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी ही बाब विरुध्द पक्ष क्र. 1 यांना कळविली व विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी त्यांचे दिनांक 09/05/2012 च्या पत्रानुसार मयताचा सदरहू विमा दावा असे कारण देवून नाकारला की, Consultation / Treatment for ischemic heart disease and diabetes mellitus since 6th April 2007 and 2nd May 2007 to 4th May 2007 for coronary artery disease single vessel disease and diabetes mellitus, this facts known to deceased life assured were not disclosed in enrolment form dated 31st March 2011. उभय पक्षामध्ये ही बाब देखील वादातीत नाही की, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारला व रुपये 5,160/- मृतकाची अकाऊंट रक्कम तक्रारकर्त्याला परत देऊ केली होती. परंतु तक्रारकर्त्याने ही रक्कम घेण्याचे नाकारले होते.
विरुध्द पक्ष क्र. 1 यांचा असा युक्तिवाद आहे की, जेंव्हा त्यांनी तक्रारकर्त्याच्या मृत्यू दाव्याबाबत त्यांच्या अधिकृत अधिका-यामार्फत चौकशी केली तेंव्हा या चौकशीत त्यांना असे लक्षात आले की, मृतकाला हृदयरोग होता व त्यासाठी त्याने दिनांक 06/04/2007 व 02/05/2007 ते 04/05/2007 पर्यंत कोरोनरी आर्टरी डिसीज व सिंगल वेसल डिसीज, डायबेटीज मेलीलुटीस चा उपचार घेतला होता. परंतु या बाबतचा खुलासा मृतकाने पॉलीसी घेते वेळेस केला नाही. तसेच प्रपोजल फॉर्म डिक्लरेशन ऑफ गुड हेल्थ या मधील प्रश्न क्र.1 ते 5 मध्ये विचारलेल्या माहितीचे ऊत्तर नकारार्थी देऊन महत्वाच्या घटना या विरुध्द पक्षापासून लपविलेल्या आहेत. त्यामुळे विरुध्द पक्षाच्या पॉलिसी मधील अटी व शर्तीचा भंग झालेला आहे. यावर तक्रारकर्त्याने याबद्दलचा असा युक्तिवाद केला की, विरुध्द पक्षाच्या चौकशी अधिका-याने मृतकाच्या आजाराबद्दल कोणतीही चौकशी केली नाही. उलट पॉलिसीचे पैसे काढून देतो असे म्हणून को-या कागदावर सह्या घेतल्या होत्या.
अशा प्रकारचा युक्तिवाद एैकून मंचाचे असे मत आहे की, विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी रेकॉर्डवर मयत विमाधारकाकडून सदरहू पॉलिसी मधील कोणत्या अटी व शर्तीचा भंग झाला आहे, ही बाब, पॉलिसी प्रत दाखल करुन विषद केलेले नाही. उलट सदरहू पॉलिसी घेतेवेळेस मयताचे वय हे जवळपास 60 च्या वर होते. त्यामुळे अशा परीस्थितीत पॉलिसी काढतांनाच विरुध्द पक्ष क्र. 1 ने त्यांची वैद्यकीय तपासणी करुन आता जशी चौकशी केली तशीच चौकशी विमा काढतेवेळी करावयास पाहिजे होती. त्यामुळे या चूकीचा फायदा आता विरुध्द पक्ष क्र. 1 घेवू शकत नाही. शिवाय विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी जी मृतकाच्या आरोग्याविषयी माहिती गोळा केली ती सन 2007 मधील आहे व विमाधारकाचा मृत्यू हा दिनांक 05/02/2012 रोजी झालेला आहे. अशा परीस्थितीत विरुध्द पक्षाने नमूद केलेले न्याय निवाडे या प्रकरणात तंतोतंत लागू पडत नाहीत. म्हणून तक्रारकर्ता / नॉमिनी हे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 कडून सम इंन्शुअर्ड रक्कम रुपये 1,25,000/- व अकाऊंट रक्कम रुपये 5,160/- ही सव्याज इतर नुकसान भरपाईसह प्रकरण खर्चासहीत मिळण्यास पात्र आहे. हया निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
सबब, खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यांत येतो.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ता यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यांत येते.
- विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी संयुक्तपणे किंवा वेगवेगळे तक्रारकर्त्यास त्याच्या मयत वडिलांच्या पॉलिसीची रक्कम रुपये 1,25,000/- ( रुपये एक लाख पंचवीस हजार फक्त ) व अकाऊंट रक्कम रुपये 5,160/- ( रुपये पाच हजार एकशे साठ फक्त ) दरसाल, दरशेकडा 6 % व्याजदराने दिनांक 26/09/2013 ( प्रकरण दाखल तारीख ) पासून व्याजासह दयावी. तसेच तक्रारकर्त्यास शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 5,000/- ( रुपये पाच हजार फक्त ) व प्रकरण खर्च रुपये 2,000/- ( रुपये दोन हजार फक्त ) दयावा.
- विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी, या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यानंतर 45 दिवसाचे आत करावे.
- उभय पक्षास आदेशाची प्रत निशु:ल्क द्यावी.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
svg जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.