न्या य नि र्ण य : (व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा)
1) तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986, कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे
तक्रारदार हे गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथील कायमचे रहिवाशी आहेत. तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनीकडे अज्ञान मुलगा यश अरुण पिसे याचे नावे बजाज अलियांझ लाईफ इन्शुरन्स लि ची “चाईल्ड गेन पॉलीसी – 21 प्लस ” ही विमा पॉलिसी उतरविली होती. प्रस्तुत विमा पॉलिसीचा पॉलिसी नं. 33475313 असा असून पॉलिसीचा हप्ता प्रत्येक वर्षाच्या जुन व डिसेंबर असा सहामाई भरणेचा होता. तसेच पॉलिसी रक्कम रु. 1,00,000/- ( रुपये एक लाख मात्र ) अशी होती. प्रस्तुत विमा पॉलिसी दि. 16-12-2006 रोजी उतरविली होती. तर विमा पॉलिसी 2024 मध्ये मॅच्युअर होणार होती. प्रस्तुत विमा पॉलिसीचा सहामाही हप्ता रक्कम रु. 3,569/- असा आहे. तक्रारदाराने प्रस्तुत पॉलिसीचे ठरलेप्रमाणे सहामाही हप्ते वि.प. कंपनीकडे दि.16-12-2006 ते 16-12-2011 अखेर भरलेले आहेत. म्हणजेच तक्रारदाराने वि.प. कडे एकूण 11 हप्ते भरले आहेत. तक्रारदाराने दि. 16 जुन 2011 रोजी असणारा सहामाही हप्ता रक्कम रु. 3,569/- वि.प. कडे जमा केला आहे परंतु तांत्रिक अडचणीमुळे वि.प. ने प्रस्तुत हप्ता भरलेची पावती दिली नाही तसेच सदर दिवशी भरलेला हप्ता सिस्टीमध्ये दर्शवत नाही. तथापी, प्रस्तुत हप्ता भरलेचे आय.टी. सर्टीफिकेट तक्रारदार यांना मुरगुड येथील शाखेतुन दि. 22-07-2011 रोजी मिळाले आहे.
तक्रारदाराने जुन 2011 रोजीचा रक्कम रु. 3,569/- चा हप्ता बजाज अलीयांझ लाईफ इन्शुरन्स लि. च्या सिस्टीममध्ये न दर्शविलेने तक्रारदार यांची पॉलिसी क्र. 33475313 ही लॅप्स झालेचे कंपनीने दर्शविले आहे. तक्रारदाराने दि. 16-06-2011 रोजी विमा हप्ता भरलेला असताना तो कंपनीच्या सिस्टीमध्ये दर्शविलेला नाही. तथापि, सदर विमा हप्ता भरणेबाबत प्रिमीयम पेड सर्टीफिकेट तक्रारदार यांना दि. 22-07-2011 रोजी वि.प. यांचे मुरगुड शाखेकडून मिळालेले आह.
वि.प. चे निष्काळजी तसेच बेजबाबदार कामामुळे तक्रारदार यांची सदर विमा पॉलिसी ही लॅप्स झाली आहे असे वि.प. ने तक्रारदाराला कळविले आहे. वि.प. यांनी तक्रारदार यांचे वि.प. वर असले विश्वास गमावला असून वि.प. चे सदर कृतीमुळे तक्रारदाराला मानसिक व शारिरीक त्रास झाला आहे. सबब, तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज वि.प. यांचेकडून झाले चुकीमुळे झालेले नुकसान भरपाई मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.
2) तक्रारदाराने प्रस्तुत कामी वि.प. कंपनीकडून तक्रारदाराने वि.प. कंपनीकडे भरलेल्या विमा हप्त्यांची रक्कम रु. 39,259/- (रक्कम रुपये एकोचाळीस हजार दोनशे एकोणसाठ मात्र ) वसुल होऊन मिळावी, इतर खर्चासाठी वि.प. कडून रक्कम रु. 5,000/-, तक्रारीचा खर्च रक्कम रु. 10,000/-, मानसिक त्रास रु. 20,000/- व शारिरीक त्रास रु. 20,000/- अशी एकूण रक्कम रु. 94,259/- (रक्कम रुपये चौ-यानऊ हजार दोनशे एकोणसाठ मात्र ) वि.प. कडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती या कामी तक्रारदाराने केली आहे.
3) तक्रारदाराने प्रस्तुत कामी अॅफिडव्हेट, नि. 3 चे कागद यादीसोबत नि. 3/1 ते 3/6 कडे अनुक्रमे तक्रारदाराने जुन 2011 चा विमा हप्ता भरलेचे प्रिमियम पेड सर्टीफिकेट, डिसेंबर 2011 चा हप्ता भरलेची पोहोच पावती, पॉलिसी लॅप्स झालेबाबत वि.प.ने दिलेले पत्र/ इंटीमेशन लेटर वि.प. पॉलिसी, तक्रारदाराने मुरगुड शाखेकडे केलेला तक्रार अर्ज, तक्रारदाराने वि.प. ची मुख्य शाखा कोल्हापूर यांचेकडे केलेला तक्रार अर्ज, पुराव्याचे शपथपत्र, तक्रारदाराने वि.प. ला पाठविलेली नोटीस पुरावा संपलेची पुरसीस, लेखी युक्तीवाद वगैरेचे कागदपत्रे तक्रारदाराने या कामी दाखल केली आहेत.
4) वि.प. ने प्रस्तुत कामी म्हणणे, डेली कलेक्शन रजिस्टर दि. 16-06-2011 रोजीचे स्टेटमेंट, डी.सी.बी. रिपोर्ट, लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे वि.प. ने दाखल केली आहेत. वि.प. यांनी त्यांचे म्हणणे/कैफियतीमध्ये तक्रारदाराचे सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदविलेले आहेत.
(i) तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील कथने मान्य व कबूल नाहीत.
(ii) तक्रार अर्जास मुदतीची बाधा येते.
(iii) तक्रारदार व वि.प. यांचे दरम्यान ग्राहक व सेवा पुरवठादार असे संबंध आहेत हे मान्य व कबूल नाही.
(iv) तक्रारदार हे स्वत: डिफॉल्टर आहेत तसेच निष्काळजी आहेत त्यांनी हप्ता भरलेला नाही.
(v) प्रस्तुत तक्रार अर्ज या मे. मंचाचे स्थलसिमेत येत नाही.
(vi) तक्रारदाराने त्यांची कथने पुराव्यानिशी सिध्द केलेली नाहीत.
(vii) वि.प. यांची प्रस्तुत विमा पॉलिसी परत सुरु करुन देणेची इच्छा असतानाही तक्रारदाराने देय हप्त्याचा भरणा करुन पॉलिसी सुरु करुन घेतली नाही.
(viii) नोटीसीला उत्तर दिले नाही म्हणून वि.प. दोषी होत नाहीत.
(ix) तक्रारदाराने प्रस्तुत विमा पॉलिसी गुंतवणुकीसाठी उतरवली आहे.
(x) वि.प. ने कोणत्या सेवा त्रुटी दिल्या हे तक्रार अर्जात नमूद नाही व ते शाबीत केलेले नाही.
(xii) तक्रारदाराने स्वत: विमा पॉलिसीवरील अटी व शर्तीचा भंग केलेला आहे. सबब, सदरचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे वि.प. ने या कामी दिलेले आहे.
5) वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करता मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. यांचे दरम्यान ग्राहक व सेवा पुरवठादार असे नाते आहे काय ? | होय |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे |
वि वे च न -
मुद्दा क्र. 1 ते 3 :-
6) मुद्दा क्र. 1 ते 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहेात. कारण तक्रारदाराचे अ.पा.क. वडील यांनी त्यांचा मुलगा यश अरुण पिसे या अज्ञान मुलाच्या नावे “चाईल्ड गेन पॉलीसी – 21 प्लस ” ही विमा पॉलिसी, पॉलिसी क्र. 33475313 ही वि.प. कडे उतरविली होती. प्रस्तुत बाब वि.प. ने मान्य व कबूल केली आहे. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे सिध्द झाली आहे. तसेच पॉलिसीची प्रत या कामी तक्रारदाराने दाखल केली आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिलेले आहे.
तसेच प्रस्तुत विमा पॉलिसीचा प्रत्येक वर्षी जुन व डिसेंबर असा सहामाही हप्ता रक्कम रु. 3,569/- वि.प. कडे पॉलिसी उतरविलेपासून ते 2014 पर्यंत जमा करणेचे होते. तक्रारदाराने वि.प. विमा कंपनीकडे दि. 16-12-2006 ते दि. 16-12-2011 पर्यंत सर्व हप्ते जमा केलेले आहेत. त्याचप्रमाणे तक्रारदाराने वि.प. विमा कंपनीकडे दि. 16 जुन 2011 रोजी असणारा सहामाही विमा हप्ता रक्कम रु.3,569/- इतका भरलेला आहे. पण तांत्रिक अडचणीमुळे व सिस्टीममधील दोषामध्ये हप्ता भरलेची पावती वि.प. ने सदर दिवशी दिली नाही. परंतु वि.प. कंपनीचे मुरगुड शाखेने तक्रारदाराला दिले प्रिमियम पेड सर्टीफिकेटमध्ये (IT सर्टीफिकेट ) मध्ये दि. 16-06-2011 रोजीचा रक्कम रु. 3,569/- चा विमा हप्ता गरजेचे नमूद केलेले आहे. प्रस्तुत सर्टीफिकेट वि.प. ने दि. 22-07-2011 रोजी तक्रारदाराला दिले असून नि. 3 चे कागद यादीसोबत दाखल केलेले आहे. हे प्रमाणपत्र इन्कम टॅक्ससाठी कायदयानुसार ग्राहय धरले जाते अशी नोट असून प्रस्तुत प्रमाणपत्र इन्कम टॅक्ससाठी दाखलही केले आहे. तसेच तक्रारदाराने दि. 16-12-2011 रोजीचा विमा हप्ता सुध्दा वि.प. कडे जादा रक्कमेसहीत म्हणजेच रक्कम रु. 3,620/- भरलेला आहे. हप्ता भरणेची पोहोच पावती तक्रारदाराने दाखल केली आहे.
तक्रारदाराने डिसेंबर 2011 रोजीचा रक्कम रु. 3,569/- चा विमा हप्ता वि.प. कडे भरुनसुध्दा वि.प. ने निष्काळजीपणे व बेजबाबदारपणे सदर विमा हप्ता भरलेलाच नाही. त्यामुळे तक्रारदाराची विमा पॉलिसी लॅप्स झाली आहे म्हणजेच हप्ता भरुनसुध्दा त्याची नोंद केली नाही. सिस्टीममध्ये दोष असलेने सिस्टीममध्ये दाखवत नाही. परंतु वि.प. मार्फत प्रिमियम पेड सर्टीफिकेट मिळालेले आहे. सदर सर्टीफिकेट याकामी दाखल केले आहे त्यावरुन सदर विमा हप्ता भरलेचे स्पष्ट होत आहे. प्रस्तुत कामी तक्रारदाराने त्यांची कथने कागदोपत्री पुराव्यासह सिध्द केली आहेत मात्र वि.प. यांनी त्यांची कथने सिध्द करणेसाठी कोणताही पुरावा या कामी दाखल केलेला नाही. उलट तक्रारदाराने हप्ता भरुनसुध्दा तक्रारदाराची विमा पॉलिसी लॅप्स झाली असे वि.प. चे कथन हे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारे आहे. वि.प. ने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविलेली आहे हे स्पष्ट व सिध्द झालेले आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 1 व 2 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत.
वि.प. ने प्रस्तुत कामी त्यांची बचावात्मक कथने सिध्द करणेसाठी कोणताही लेखी व तोंडी पुरावा या कामी सादर केलेला नाही. सबब, प्रस्तुत कामी तक्रारदार हे वि.प. यांचेकडून नुकसान भरपाई व विमा हप्त्यांची भरलेली रक्कम रु. 39,259/- (रक्कम रुपये एकोणचाळीस हजार दोनशे एकोणसाठ मात्र) मिळणेस पात्र आहेत असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब, प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. सबब, आदेश.
- आ दे श -
1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. विमा कंपनीने तक्रारदाराला तक्रारदाराने विमा हप्त्यांची भरलेली एकूण रक्कम रु. 39,259/- (रक्कम रुपये एकोणचाळीस हजार दोनशे एकोणसाठ मात्र) तक्रारदाराला अदा करावी. प्रस्तुत रक्कमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 % प्रमाणे व्याजाची रक्कम वि.प. कंपनीने तक्रारदाराल अदा करावी.
3) वि.प. यांनी तक्रारदाराला शारिरीक त्रास, अर्जाचा खर्च व इतर खर्चापोटी वि.प. ने तक्रारदाराला रक्कम रु. 10,000/- (रक्कम रुपये दहा हजार मात्र ) अदा करावेत.
4) वर नमूद आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) वरील आदेशांची पूर्तता वि.प. यांनी विहीत मुदतीत न केलेस तक्रारदार यांना वि.प. यांचेविरुध्द ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.