(आदेश पारीत व्दारा-श्री.महेश एन.ढाके - मा.सदस्य )
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये विरुध्दपक्ष यांनी द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्हणून नुकसान भरपाई मिळणेकामी दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणे खालील प्रमाणे ः-
तक्रारदार हे वरील ठिकाणचे कायमचे रहिवासी असुन पत्नी, मुलं यांच्या समवेत एकत्र कुटंबात राहतात व मातीकाम करतात. सामनेवाले यांचा जीवन, अपघात, वाहन व इतर विमा व्यवसाय असून संपुर्ण देशात तसेच अहमदनगर येथे सामनेवाले यांची शाखा आहे. तक्रारदार यांनी कामावर जाण्यासाठी स्वतःचे वापराकरीता बजाज अल्टो लि. कंपनीची मोटारसायकल नं.एमएच.16/बीआर-2806 ही मोटार सायकल खरेदी केली. सदरची मोटार सायकल खरेदी केल्यावर सामनेवाले यांनी तक्रारदारास सदर मोटार सायकलचा विमा सामनेवाले कंपनीकडे उतरविण्यास सामनेवाले यांनी आश्वासन दिले की, “ विमा कालावधीत सदरची मोटार सायकल चोरी गेल्यास अथवा सदर मोटार सायकलचा अपघात झाल्यास अपघातात जखमी अथवा मयत झालेल्या व्यक्तीची तसेच सदर गाडीचे झालेल्या नुकसानीसह संपुर्ण नुकसान भरपाई आम्ही देऊ ” त्यावेळी तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे शब्दावर विशवास ठेवून तक्रारदार यांनी सामनेवाले विमा कंपनीकडे सदर मोटार सायकलचा विमा उतरविला. त्याचा पॉलीसी नं.OG16999999000000003 असा असून सदर विम्याचा कालावधी दिनांक 10.06.2016 ते 09.06.2017 चे मध्यरात्री पर्यंत होता. दिनांक 04.12.2016 रोजी तक्रारदार हे अहमदनगर येथुन त्यांचे खाजगी कामासाठी बारामती ता.बारामती जि.पुणे येथे त्यांचे मालकीची मोटार सायकल नं.एम.16-बीआर.2806 हिचेवरुन चालले होते. त्यावेळी तक्रारदार हे त्यांचे ताब्यातील मोटार सायकल रस्त्याच्या डाव्यास बाजुने, सावकाश रहदारीच्या नियमांचे पालक करुन चालवित होते. दुपारी 4.00 वाजण्याच्या दरम्यान तक्रारदार हे बारामती एम.आय.डी.सी.जवळील रेल्वे उड्डान पुलाजवळून जात असताना समोरुन वळणावर टू व्हिलर मोपेड चालक एका गाडीला ओव्हरटेक करुन समोरुन जोरात येऊन तक्रारदाराचे गाडीवर धडकला त्यामुळे अपघात होऊन तक्रारदाराचे डोक्याचे डाव्या बाजुस तसेच तोंडाला जबर मार लागून तोंडाचे हाड फ्रॅक्चर झाले. तसेच इतर ठिकाणी गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या. त्यामुळे तक्रारदारास तातडीने उपचारासाठी गावडे हॉस्पिटल बारामती ता.बारामती जि.पुणे येथे दाखल करण्यात आले. सदर हॉस्पिटलमध्ये तक्रारदारावर ता.04.12.2016 ते 12.12.2016 पर्यंत उपचार करण्यात आले. सदर कालावधीत तक्रारदाराचे तोंडाचे ऑपरेशन करण्यात आले. तद्नंतर तक्रारदारास श्रीदीप हॉस्पिटल अहमदनगर येथे दिनांक 15.12.2016 ते 19.12.2016 पावेतो अॅडमिट केले होते. आजही तक्रारदार हा बाहयरुग्ण म्हणून उपचार घेत आहे. सदर अपघातामुळे तक्रारदारास कायमस्वरुपी अपंगत्व आलेले आहे. सदर अपघाताने तक्रारदाराचे डाव्या बाजुचा तोंडाचा जबडा तुटला त्यामुळे तक्रारदाराचे तीन दात पडले. तक्रारदारास ऑपरेशन करुन तीन कृत्रिम दात बसवले. सदर कालावधीत तक्रारदारास हॉस्पिटल व मेडीकलसाठी 2,50,000/- इतका खर्च आला. तक्रारदार यांचा अपघात झाल्यानंतर सदर अपघाताबाबत सामनेवाले विमा कंपनीस खबर दिली. त्यावेळी सामनेवाले यांनी सदर अपघात ठिकाणचा पंचनामा केला. तसेच तक्रारदाराचे जबाब घेतले व लवकरात लवकर तक्रारदारास नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. परंतु तदनंतर तक्रारदारासने सामनेवालेकडे वारंवार पाठ पुरावा करुनही सामनेवाले यांनी तक्रारदारास नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी दिनांक 06.02.2017 रोजी सामनेवाले यांना पत्र पाठवून नुकसान भरपाईच्या रकमेची मागणी केली. परंतु सामनेवाला यांनी आज पावेतो कोणतीही कारवाई केली नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे इन्शुरन्स पॉलिसी नुसार क्लेम मिळण्याकरीता प्रकरण दाखल केले. त्यावेळेस सामनेवाले यांच्या मागणीनुसार तक्रारदार यांनी सामनेवाले यांना सर्व मुळ कागदपत्रांची उदा.क्लेम फॉर्म, पोलीस पंचनामा, पॉलिसी डॉक्युमेटस, लायसन्स इत्यादी व इतर कागदपत्रांची पुर्तता केली. त्यानंतर सामनेवाले यांनी दिनांक 01.05.2017 रोजी तक्रारदार यांना पॉलिसीच्या शर्ती व अटीनुसार तक्रारदार यांचा क्लेम मंजुर होऊ शकत नाही असे कळविले. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम चुकीचे कारण देवुन नाकारलेला आहे. तक्रारदाराचा विश्वासघात करत आर्थिक फसवणुक केलेली आहे. तसेच विनाकारण आर्थिक नुकसानही केलेले आहे. सामनेवाले यांनी अव्यापारी चालिरितीचा अवलंब करत, योग्य सेवा न पुरवता निष्काळजीपणा करत चुकीचे कारण सांगत विमा रक्कम देण्यास नकार देत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे न वागत व विमा दावा देण्याची कायदेशीर व नैतिक जबाबदारी असूनही ती पार न पाडता तक्रारदार यांचा विश्वासघात करुन नुकसान केले आहे.
3. सामनेवाला यांच्या अनुचित व्यापारी प्रथेमुळे आणि तक्रारदार यांना पुरविलेल्या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांना मोठया प्रमाणावर आर्थिक, शारीरीक, मानसिक त्रासास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तक्रारदार यांना प्रस्तुत अर्ज सामनेवाले विरुध्द दाखल करणे भाग पडले आहे. सामनेवाले यांच्या या निष्काळजीपणा अव्यापारी चालिरीतीच्या वागणुकीमुळे व सेवा पुरविण्यात केलेला हलगर्जीपणा व दोषामुळे तक्रारादार यांना सामनेवाले यांच्याकडून विमा रक्कम रुपये 2,50,000/- मिळू शकलेली नाही. सदर रक्कम क्लेमसाठी प्रकरण दाखल केल्यापासून रक्कम मिळेपावेतो त्यावर द.सा.द.शे.या प्रमाणे व्यापारी चालिरिती प्रमाणे 12 टक्के व्याजासह मिळविण्याचा तक्रारदार यांचा हक्क व अधिकार आहे. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदाराचा केलेला आर्थिक ,मानसिक व शारीरीक छळापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 50,000/- अदा करण्यास पात्र ठरत असल्याने तक्रारदार यांनी प्रस्तुतची केस दाखल केली आहे.
4. तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारदार यांना सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमची संपुर्ण रक्कम रुपये 2,50,000/- क्लेम दाखल केल्याच्या तारखेपासून रक्कम मिळेपावेतो व्यापारी चालीरितीसह 12 टक्के व्याजासह अदा करण्याचा हुकूम व्हावा. तक्रारदार यांना शारीरीक, आर्थिक व मानसिक त्रासापेाटी रक्कम रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळणेचा आदेश व्हावा.
5. तक्रारदाराने तक्रारीचे पृष्ठयर्थ दस्तावेज यादी नि.6 प्रमाणे दाखल केलेले आहे. त्यामध्ये अनु.क्र.1 ते 36 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये तक्रारदाराने विविध हॉस्पिटमध्ये घेतलेली उपचाराबद्दलची मेडीकल बिले, हॉस्पिटलची रिसीप्ट, रक्तपेढीचे बिले जोडलेली आहेत. तसेच तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेली मागणी अर्जाचे झेरॉक्स प्रत, तक्रारदार यांचे वाहनाचे आर.सी.बुकची झेरॉक्स प्रत, इन्शुरन्स पॉलीसीची झेरॉक्स प्रत, गावडे हॉस्पिटल बारामती यांचेकडील डीसचार्जची मुळ प्रत, श्रीदीप हॉस्पिटल अहमदनगर येथील डीसचार्ज कार्डची मुळ प्रत, सामनेवाला यांचेकडून तक्रारदारास आलेल्या पत्राची मुळ प्रत, बी फॉर्म सर्टीफिकेटची मुळ प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
6. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीस काढण्याचा आदेश करण्यात आला. सामनेवाला यांना नोटीस प्राप्त होऊनही ते प्रकरणात हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांचे विरुध्द दिनांक 02.02.2018 रोजी निशाणी 1 वर एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला व प्रकरण एकतर्फा चालविण्यात आले.
7. तक्रारदार यांचे वकील श्री.रणसिंग यांचा युक्तीवाद ऐकला. त्यांनी निशाणी 11 ला लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, लेखी युक्तीवाद ऐकण्यात आला. व निष्कर्षासाठी खालील मुद्दे मंचासमोर उपस्थित होतात.
| मुद्दे | उत्तर |
-
| तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? | ... होय |
2. | सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात त्रुटी केली आहे काय.? | ...होय. |
3. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा
8. मुद्दा क्र.1 :– तक्रारदार व त्यांचे वकील श्री.रणसिंग यांनी त्यावर केलेला युक्तीवाद व लेखी युक्तीवाद याचा विचार करता सामनेवाला यांचेकडून तक्रारदार यांनी विमा पॉलीसी काढलेली आहे. त्यामुळे त्यांचेत व तक्रारदार यांचेमध्ये ग्राहक व सेवा देणार, विक्रेता असे नाते प्रस्तापित आहे. तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 2(1)(ड) नुसार सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर होकरार्थी नोंदविण्यात येते.
9. मुद्दा क्र. 2 :–तक्रारदार यांचे वकील श्री.रणसिंग यांचा युक्तीवाद ऐकला तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे मोटार सायकलचा विमा उतरविला होता. सदर विम्याचा कालावधी दिनांक 10.06.2016 ते 09.06.2017 चे मध्यरात्रीपर्यंत होता. तक्रारदार हे दिनांक 04.12.2016 रोजी अहमदनगर येथील त्यांचे खाजगी कामासाठी बारामती जि.पुणे येथे त्यांचे मालकीचे मोटार सायकलवरुन चालले होते. दुपारी 4.00 वाजण्याचे दरम्यात तक्रारदार यांचे वाहनास बारामती एम.आय.डी.सी. जवळील रेल्वे उड्डान पुलाजवळून जात असतांना समोरुन वळणावर टू व्हिलर मोपेड चालक एका गाडीला ओव्हरटेक करुन समोरुन जोरात येऊन तक्रारदाराचे गाडीवर धडकला. त्यामुळे अपघात होऊन तक्रारदाराचे डोक्यास डाव्या बाजुस तसेच तोंडाला जबर मार लागून तोंडाचे हाड फॅक्चर झाले. तसेच इतर ठिकाणी गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या. त्यामुळे तक्रारदारास तातडीने उपचारासाठी गावडे हॉस्पिटल बारामती ता.बारामती जि.पुणे येथे दाखल करण्यात आले. तेथून पुढे श्रीदीप हॉस्पिटल अहमदनगर येथे दिनांक 15.12.2016 ते 19.12.2016 पावेतो अॅडमिट केले होते. त्यासाठी तक्रारदारास हॉस्पिटल व मेडीकलसाठी रु.2,50,000/- रुपये खर्च आला. तक्रारदाराने सदर अपघाताबाबत सामनेवाला विमा कंपनीस खबर दिली. सामनेवाला यांनी अपघाताचे ठिकाणी येऊन पंचानामा केला. तक्रारदाराचा जबाब घेतला. व लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचे आशवासन दिले. परंतू त्यानंतर तक्रारदाराने सामनेवालाकडे वेळोवेळी नुकसान भरपाईबाबत पाठपुरावा करुनही सामनेवाला यांनी तक्रारदारास नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे दिनांक 06.12.2017 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाला यांना पत्र पाठवून नुकसान भरपाईचे रकमेची मागणी केली व त्या संदर्भात सर्व कागदपत्राची पुर्तता केली. परंतू सामनेवाला यांनी दिनांक 01.05.2017 रोजी तक्रारदार यांना पॉलीसीचे अटी व शर्तीनुसार तक्रारदाराचा क्लेम मंजुर होऊ शकत नाही असे कळविले. पत्रामध्ये कोणत्या अटी शर्ती नुसार क्लेम मंजूर होऊ शकत नाही हे कारण दिले नाही, म्हणून सदर बाबी या सेवेतील कमतरता व त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
10. मुद्दा क्र.3 ः- मुद्दा क्र.1 व 2 चे निष्कर्ष स्पष्ट करतात की, तक्रारदार व सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारुन सामनेवाला यांनी सेवेत कमतरता व त्रुटी तक्रारदारासप्रति दिलेली आहे. तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्राचे बारकाईने अवलोकन केले असता पॉलीसीचे शेडयुलमध्ये तक्रारदाराने रु.3,00,000/- रुपयाचा विमा विमा उतरविलेला दिसतो. त्याच प्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा दावा दिनांक 01.03.2017 रोजी नाकारला, सदर पत्राचे अवलोकन केले असता विमा पॉलीसी सोबत व विमा दावा नाकारण्याचे पत्रासोबत सामनेवाला कंपनीने नियम व अटी दाखल केले नाहीत. तसेच मंचाची नोटीस मिळूनही सामनेवाला हे हजर झालेले नाही. तक्रारदाराने निशाणी 6 सोबत जी मेडीकल बिले दाखल केलेली आहेत. त्यापैकी निशाणी 6/2, 6/5 ची संगणकीय बिले आहेत. तसेच निशाणी 6/6 , 6/7, 6/8 ची संगणकीय बिले आहेत. निशाणी 6/11 चे रु.653/- रुपयाचे बिल आहे. निशाणी 6/13 वरील 219/- रुपयाचे जे पेडींग बिल आहे. निशाणी 6/14 वरील बिल, 6/15, 6/19 वरील संगणकीय बिल यापैकी रु.566/- रुपयाचे जे बिल पेडींग दिसत आहे. त्यामुळे त्या बिलाची रक्कम तक्रारदाराने संबधीताकडे अदा केलेली नाही असा निष्कर्ष निघतो. त्यामुळे त्या पेडींग बिलांबाबत कुठलाही आदेश नाही. तक्रारदाराचे बिलाचे अवलोकन केले असता, रु.1,32,726/- हॉस्पिटल व मेडीकल बिलाचे खर्चापोटी मिळण्यास तक्रारदार हे पात्र आहेत. तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक, शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- तक्रारदार मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.3 उत्तरार्थ खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अं ति म आ दे श -
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना हॉस्पिटल व मेडीकलकरीता झालेला खर्च रु.1,32,726/- (रक्कम रुपये एक लाख बत्तीस हजर सातशे सव्वीस फक्त) तक्रार दाखल तारखेपासून द.सा.दशे. 9 टक्के दराने तक्रारदार यांना या आदेशाची प्रत मिळालेपासून 30 दिवसाचे आत द्यावी.
3. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारीरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (रक्कम रुपये दहा हजार फक्त) व या तक्रारीचा खर्च रु.3,000/- (रक्कम रुपये तीन हजार फक्त) या आदेशाची प्रत मिळालेपासून 30 दिवसाचे आत तक्रारदार यांना द्यावी.
4. या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी.
5. या प्रकरणाची “ब” व “क” फाईल तक्रारदार यांना परत द्यावी.