निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
अर्जदार उत्तमराव पिता किशनराव राखोंडे यांनी टाटा कंपनीचे लोडींग वाहन सन 2006 मध्ये खरेदी केलेले होते. सदर वाहनाचा नोंदणी क्र. एम.एच. 22-एन-421 असा आहे. सदर वाहनाचे इंजिनमध्ये बिघाड झाल्याने अर्जदाराने सदर वाहनाचे इंजीन गैरअर्जदारास एक्सचेंजमध्ये देवून वरती रक्कम रु. 30,830/- देवून नवीन इंजीन खरेदी केले. अर्जदाराने अशाप्रकारे एकूण रक्कम रु. 61,500/- गैरअर्जदार यांना दिले. नवीन इंजिन खरेदी करतांना गैरअर्जदार यांनी नवीन इंजिनला नंबर दिला नाही. जुन्या इंजिनचा नंबर नवीन इंजिनला दिला जातो असे सांगितले. नियमाप्रमाणे वॉरंटी लागू राहील असे सांगन वॉरंटी कार्डपण दिले. सदर नवीन इंजिनची वॉरंटी ही 6 महिने किंवा 18,000 कि.मी. प्रवास अशी आहे परंतू 11000 कि.मी.प्रावास पूर्ण होण्याच्या अगोदरच 6 महिन्याच्या आधीच नवीन इंजिन बंद पडले. त्याच्या दुरुस्तीसाठी अर्जदाराने वाहन गैरअर्जदार यांच्याकडे नेले. त्याचा गेट पास नं. 7749 असा आहे. गैरअर्जदाराने इंजिन बंद पडल्याचा रिपोर्ट तयार केला व इंजिन स्वतःच्या खर्चाने दुरुस्ती करुन घ्यावे लागेल असे सांगितले व तसे पत्र दिनांक 22/04/2013 रोजी दिले. वॉरंटीच्या अटीप्रमाणे इंजिन दुरुस्ती करण्याची जबाबदारी गैरअर्जदारांची असतांना देखील गैरअर्जदाराने गाडी दुरुस्ती करुन दिलेली नाही. अर्जदाराने दिनांक 23/04/2013 रोजी अॅड. श्री रावनगावे यांच्यामार्फत नोटीस पाठवून देखील गैरअर्जदाराने त्याची दखल घेतलेली नाही म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केलेली आहे व मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज मंजूर करावा व गैरअर्जदाराने अर्जदारास इंजिनाची किंमत रु. 61,500/- उत्पन्नाच्या बुडवणूकीबद्दल रु.22,000/- व दावा खर्च रक्कम रु. 6,500/- देण्याबाबत गैरअर्जदार यांना आदेश करावा.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
अर्जदारास गैरअर्जदार यांच्याविरुध्द तक्रार करण्याचा कोणतेही कारण घडलेले नाही. सदर तक्रारीत उत्पादकास पार्टी केलेले नाही त्यामुळे सदर प्रकरण या मंचात चालू शकत नाही म्हणून प्रस्तुतची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. अर्जदाराने त्याचे वाहन क्र. एम.एच. 22-एन-421 गैरअर्जदार यांच्याकडे आणले तेव्हा वाहनामध्ये 1,71,085 कि.मी.ची नोंद होती त्यामुळे इंजिन बदलणे आवश्यक होते. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या संमतीने वाहनाच्या इंजिनबद्दल इंजिनची किंमत 26,640/- रुपये आकारण्यात आली. सदरचे इंजिन हे रिकॉन इंजिन होते. अर्जदाराचे म्हणणे की, त्यांच्याकडून 61,500/- रुपये स्विकारले हे म्हणणे चुकीचे आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराकडून इंजिनची किंमत रक्कम रु. 26,640/- व लेबर चार्जेस म्हणून रु.7,830/- स्विकारले. वाहनाचे इंजिन बदलल्यावर आर.सी. बुकमध्ये जो इंजिन नंबर असतो तोच इंजिन नंबर नवीन इंजिनला दयावा लागतो.
नवीन इंजिन सदर वाहनास 1,71,085 कि.मी.वर बदलण्यात आले. रिकॉन इंजिनची वॉरंटी 1800 कि.मी. किंवा 6 महिने अशी आहे. सदर वॉरंटी ही टाटा मोटर्सने ठरवलेल्या अटी व शर्तीप्रमाणे असते. वाहन मालकास रिकॉन इंजिनचे सर्व्हीस बुक देण्यात आले व इंजिनचे मेन्टनन्स कसे करावयाचे ई.च्या सुचना दिलेल्या आहेत. दिनांक 19/04/2013 रोजी जेव्हा वाहन गैरअर्जदार यांच्याकडे आणले त्यावेळी मिटर रिडींग 1,81,291 एवढे होते. जॉबकार्ड बनविण्यात आले व इंजिन तपासण्यात आले. गाडीचे इंजिन जाम झालेले होते. इंजिनच्या पिष्टनवर स्टॅम्पींग मार्क आले होते व सिलेन्डर बोअर हिटींगमुळे लाल झालेला होता. सिलेंडर हेड व वाटर जॉकेट रस्टी लाल झालेला होता. सदर इंजिन ओव्हर हिटींगमुळे जाम झालेले होते. गैरअर्जदाराने सदराची बाब इंजिन उत्पादक टाटा मोटर्स लि. यांच्या निदर्शनास आणून दिली असता उत्पादकाने दिनांक 24/4/2013 रोजी असे कळवले की, त्याबद्दल तपास करुन अर्जदाराचा क्लेम नामंजूर करावा. त्यानंतर तपास पूर्ण केला असता असे दिसून आले की, वाहनाचे इंजिन ओव्हर हिटींगमुळे जाम झाले. त्यामुळे अर्जदारास दिनांक 22/04/2013 रोजी कळवले की, इंजिनमध्ये उत्पादन दोष नव्हता. त्यामुळे ते वॉरंटीमध्ये बसत नाही. गैरअर्जदाराने सद्सद्विवेक बुध्दीने इंजिनची वॉरंटी नाकारलेली आहे. गैरअर्जदारास अर्जदारातर्फे कोणतीही नोटीस मिळालेली नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिलेली नाही. गैरअर्जदार हे अर्जदारास कोणतेही देणे लागत नाही. गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे गैरअर्जदार यांस मान्य आहे. गैरअर्जदार यांनी हेही मान्य केलेले आहे की, त्यांनी अर्जदारास टाटा मोटर्स लि. उत्पादित रेकॉन कंपनीचे इंजीन विकलेले आहे. सदर रेकॉन इंजीनची वॉरंटी उत्पादक यांनी दिलेली आहे. अर्जदाराने सदर इंजिनचा वापर केल्यानंतर ते वॉरंटी काळातच बिघडले. सदर इंजिनची तपासणी करण्यासाठी अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे नेले असता गैरअर्जदार यांनी त्याची तपासणी केलेली दिसते. गैरअर्जदार यांनी सदर इंजिनचे Failure Report बनवलेला आहे व सदर रिपोर्ट इंजिन उत्पादक म्हणजे टाटा मोटर्स लि. यांना दिनांक 20/04/2013 रोजी पाठवलेले दिसून येते. दिनांक 22/04/2013 रोजी टाटा मोटर्स लि. तर्फे गैरअर्जदारास “Pl. investigate into cause of failure and reject the case असा निरोप आला. सदर e.mail ची प्रत अर्जदाराने दाखल केलेली आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, गैरअर्जदार यांनी टाटा मोटर्सच्या सांगण्यावरुन सदर तक्रार रिजेक्ट केलेली आहे. सदर इंजिनचे उत्पादक हे टाटा मोटर्स लि. हे आहेत. त्यांनीच सदर इंजिनची वॉरंटी दिलेली असल्यामुळे गैरअर्जदारास अर्जदाराचे झालेले नुकसान भरपाई भरुन देण्याचा आदेश करणे मंचास योग्य वाटत नाही. अर्जदाराने उत्पादक कंपनीस पक्षकार केलेले नाही किंवा त्यांच्या विरुध्द कोणतीही दाद मागीतलेली नाही. तसेच इंजिनमध्ये असलेल्या उत्पादकीय दोषासाठी उत्पादकच जबाबदार आहेत.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराने उत्पादक कंपनीस पक्षकार न केल्याने अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.