जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 553/2010. तक्रार दाखल दिनांक : 27/09/2010. तक्रार आदेश दिनांक :07/03/2011. श्री. राजकुमार दशरथ कांबळे, वय 42 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. कुरुल, ता. मोहोळ, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द प्रोप्रायटर/मॅनेजर, ओम साई ट्रॅक्टर्स, दुधपंढरीजवळ, सोलापूर-पुणे महामार्ग, केगांव, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : श्री. एम.एम. कुलकर्णी विरुध्द पक्ष गैरहजर/एकतर्फा आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांना शेतीव्यवसाय व उदरनिर्वाहाकरिता ट्रॅक्टर खरेदी करावयाचा असल्यामुळे विरुध्द पक्ष यांच्याशी संपर्क साधला असता दि.9/4/2009 रोजी न्यू हॉलंड टीटी 5500 - 55 एच.पी. ट्रॅक्टरचे रु.5,95,000/- चे कोटेशन नं.884 देण्यात आले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी बँक ऑफ इंडिया, शाखा कुरुल यांच्याकडे कर्ज प्रकरण केले आणि त्यांना रु.4,00,000/- कर्ज मंजूर झाले. दि.18/5/2009 रोजी त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे बँकेमार्फत रु.4,00,000/- व रु.1,95,000/- रोख जमा केले. ट्रॅक्टरचा पूर्ण मोबदला त्यांनी दिला आणि त्याप्रमाणे त्यांना विरुध्द पक्ष यांनी पावती क्र.516 व 478 दिली. त्यानंतर विरुध्द पक्ष यांनी ट्रॅक्टरची संपूर्ण कागदपत्रे तक्रारदार यांना दिलेली नाहीत आणि त्यामुळे ट्रॅक्टरचे आर.टी.ओ. पासिंग झाले नाही. त्याबाबत तक्रारदार व बँकेने विरुध्द पक्ष यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही दाखल घेण्यात आली नाही. ट्रॅक्टरचे पासिंग न झाल्यामुळे तो वापरात आणता आला नाही आणि त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर आठवडयानंतर चारही चाकांच्या टायरमध्ये दोष निर्माण झालेला आहे. तो दोष दूर करण्याऐवजी विरुध्द पक्ष यांनी त्यांना जादा रकमेची मागणी केली आहे. विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठविली असता त्याचे उत्तर दिले नाही. शेवटी तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे विरुध्द पक्ष यांना ट्रॅक्टरचे आर.टी.ओ. पासिंग व रजिस्ट्रेशन करुन कागदपत्रे देण्याचा आदेश करावा आणि नुकसान भरपाईपोटी रु.2,67,000/- व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी होऊनही ते मंचासमोर उपस्थित राहिले नाहीत आणि म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले. 3. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी ट्रॅक्टरचे रजिस्ट्रेशन न करुन देऊन व कागदपत्रे न देऊन सेवेमध्ये त्रुटी केली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी विरुध्द पक्ष यांच्याकडून घेतलेल्या कोटेशनप्रमाणे रक्कम रु.5,95,000/- बँक ऑफ इंडिया, शाखा कुरुल या बँकेमार्फत रु.4,00,000/- व रोख रु.1,95,000/- अदा केल्याच्या पावत्या रेकॉर्डवर दाखल आहेत. त्यानंतर तक्रारदार यांना ट्रॅक्टरचा ताबा देण्यात आल्याचे तक्रारदार यांना मान्य आहे. 5. प्रामुख्याने, ट्रॅक्टर खरेदीचा पूर्ण मोबदला दिल्यानंतर व ट्रॅक्टरचा ताबा मिळाल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी ट्रॅक्टरचे आर.टी.ओ. पासिंग व रजिस्ट्रेशन करुन दिलेले नाही आणि त्याची कागदपत्रे दिलेली नाहीत, अशी तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे. तक्रारदार यांनी ट्रॅक्टर खरेदीसाठी आवश्यक रक्कम विरुध्द पक्ष यांना अदा केल्याचे निदर्शनास येते. ट्रॅक्टरची किंमत मिळाल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी त्याचा ताबा तक्रारदार यांना दिलेला आहे. परंतु विरुध्द पक्ष यांनी त्या अनुषंगिक कोणतीही कागदपत्रे तक्रारदार यांना दिलेली नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांच्यासह बँक ऑफ इंडिया, शाखा करुल यांनीही विरुध्द पक्ष यांच्याशी संपर्क साधून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत उचित पाठपुरावा केल्याचे रेकॉर्डवरुन दिसून येते. 6. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नोंदणी झाल्याशिवाय वाहन रस्त्यावर चालविता येत नाही, अशी मोटार वाहन कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून नवीन ट्रॅक्टर खरेदी केलेली असल्यामुळे वाहनाचे रजिस्ट्रेशन / पासींग करुन न दिल्यामुळे व त्याची उचित कागदपत्रे न दिल्यामुळे तक्रारदार यांना ट्रॅक्टरचा वापर करता आलेला नाही, हे स्पष्ट होते. इतकेच नव्हेतर, विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या पाठविलेल्या नोटीसला उत्तर दिलेले नाही किंवा मंचासमोर म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे एका अर्थाने तक्रारदार यांची तक्रार त्यांना मान्य आहे, असे अनुमान निघते. तक्रारदार यांच्या ट्रॅक्टरचे आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन करण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष यांची असून त्यांनी ती पार न पाडल्यामुळे तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्यांनी त्रुटी निर्माण केलेली आहे, या मतास आम्ही आलो आहोत. अशा परिस्थितीत, तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांच्याकडून ट्रॅक्टरचे रजिस्ट्रेशन करुन मिळविण्यास पात्र ठरतात. तसेच योग्य वेळी आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन न करुन दिल्यामुळे व तक्रारदार यांनी कर्ज घेऊन वाहन खरेदी केलेले असल्यामुळे मानसिक त्रासापोटी व खर्चासह ट्रॅक्टर वापरात न आणता आल्यामुळे नुकसान भरपाई मिळविण्यास ते पात्र ठरतात. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत तक्रारदार यांच्या ट्रॅक्टरचे आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन / पासिंग करुन द्यावे. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना ट्रॅक्टर वापरात न आणता आल्यामुळे नुकसान भरपाई, मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी एकत्रितरित्या रु.20,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त रक्कम नमूद मुदतीच्या आत न दिल्यास तेथून पुढे सदर रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने द्यावी. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/8311)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |