(मंचाचे निर्णयान्वये, श्री सादीक मो. झवेरी, सदस्य)
(पारीत दिनांक : 23 फेब्रुवारी 2016)
अर्जदार यांनी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदाराची मौजा शिवणी बुज येथे 1 हेक्टर शेती आहे, त्या शेतीमध्ये श्रीराम धानाचे वाण सन 2014-15 या वर्षामध्ये लावणी केलेली होती. गैरअर्जदार क्र.1 कडून दिनांक 3.4.2014 ला श्रीराम वाणाची महाबीज यांच्याकडून 5 बॅग प्रतीनग रुपये 500/- याप्रमाणे रुपये 2500/- देवून खरेदी केले होते. दिनांक 9.6.2014 ला प-याची पेरणी केल्यानंतर दिनांक 7.7.2014 ला रोवणी केली. अर्जदाराने याकरीता डी.ए.पी.खताचा वापर केलेला होता. काही दिवसानंतर धाणामध्ये भेसळ धान निसवतांना दिसले, त्यामुळे अर्जदाराने तालुका कृषि अधिकारी व पंचायत समिती कृषि अधिकारी यांना धान भेसळ असल्याबाबत दि.10.10.2014 ला तक्रार अर्ज केला, त्यानुसार दिनांक 31.10.2014 ला शेतीला प्रत्यक्ष भेट देवून त्यांनी चौकशी केली. समितीने पाहणी केलेल्या शेतात श्रीराम भात वाणात 25 टक्के इतर भात वाणाची भेसळ आढळून आल्याचे समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. यामुळे अर्जदारास मानसिक शारीरिक ञास झालेला आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचेकडून नुकसान भरपाई रक्कम रुपये 25,000/- मिळावी, तसेच गैरअर्जदार यांच्या विलंबनामुळे झालेल्या मानसिक, शारिरीक ञासापोटी रुपये 15,000/- व तक्रार दाखल करण्याचा खर्च रुपये 5000/- मिळावा अशी मागणी केली आहे.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 6 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 हजर होऊन नि.क्र.8 नुसार लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी नि.क्र.9 नुसार लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने नि.क्र.10 नुसार 10 नुसार 5 दस्ताऐवज दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.8 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात तक्रार खोटी असल्याने नाकबूल केली आहे. गैरअर्जदार क्र.1 ने पुढे लेखीउत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, तांञीक अधिका-यामार्फत शेताची तपासणी करुन तथा तपासणी मानकामध्ये पास झालेल्या शेतातीलच उत्पादीत झालेले कच्चे बियाणे, त्यांच्या परवानगीनेच बिज प्रक्रिया केंद्रावर पुढे प्रक्रियेकरीता स्विकारण्यात येते त्यानंतर त्यांच्या देखरेखीखाली कच्च्या मालाची प्रक्रिया झाल्यानंतर प्रक्रिया झालेल्या बियाणातून महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य बिय प्रमाणिकरण यंञणेचा अधिकारी यांचेव्दारा सदर बियाणाचे नमूना काढून महाराष्ट्र शासनाच्या बियाणे चाचणी प्रयोगशाळेत पाठविला जातो, त्या बियाणाची चाचणी घेवून बियाणे सर्व मानकामध्ये पास झाल्यानंतरच व महाराष्ट्र राज्य बिज प्रमाणिकरण यंञणेव्दारा बियाणे विक्रीकरीता मुक्त केल्यानंतरच असे बियाणे शेतक-यांना माफक दरात विक्रेत्या मार्फत शेतक-यांना पुरवठा करण्यात येतो. या गैरअर्जदाराने महाबीज यांचेकडून लाट नं.Nov-13 MSSC-559-543 चे 35 क्विंटल बियाणे विक्रीसाठी घेतलेले होते. बियाणे भेसळ होण्याची अनेक कारणे आहेत. प्रत्यक्षात चौकशी कमेटीने दिलेला अहवाल हा वस्तुसापेक्ष नाही कारण अहवालात कुठेही बियाणामुळे भेसळ झाली असे नमूद नाही. अर्जदाराने केवळ पैसे उकळण्यासाठी गैरअर्जदाराविरुध्द खोटी तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
4. गैरअर्जदार क्र.2 व 3 ने नि.क्र.9 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात तक्रार खोटी असल्याने नाकबूल केली आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 ने पुढे लेखीउत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, तांञीक अधिका-यामार्फत शेताची तपासणी करुन तथा तपासणी मानकामध्ये पास झालेल्या शेतातीलच उत्पादीत झालेले कच्चे बियाणे, त्यांच्या परवानगीनेच बिज प्रक्रिया केंद्रावर पुढे प्रक्रियेकरीता स्विकारण्यात येते त्यानंतर त्यांच्या देखरेखीखाली कच्च्या मालाची प्रक्रिया झाल्यानंतर प्रक्रिया झालेल्या बियाणातून महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य बिय प्रमाणिकरण यंञणेचा अधिकारी यांचेव्दारा सदर बियाणाचे नमूना काढून महाराष्ट्र शासनाच्या बियाणे चाचणी प्रयोगशाळेत पाठविला जातो, त्या बियाणाची चाचणी घेवून बियाणे सर्व मानकामध्ये पास झाल्यानंतरच व महाराष्ट्र राज्य बिज प्रमाणिकरण यंञणेव्दारा बियाणे विक्रीकरीता मुक्त केल्यानंतरच असे बियाणे शेतक-यांना माफक दरात विक्रेत्या मार्फत शेतक-यांना पुरवठा करण्यात येतो. लाट नं.Nov-13 MSSC-559-543 चे पैकी 35 क्विंटल बियाणे आरमोरी सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती आरमोरी व 32.50 क्विंटल बियाणे वनमाली कृषि केंद्र आरमोरी यांचेकडे विक्रीस पाठविले होते. गैरअर्जदाराने एकूण सदर लॉटच्या 675 बॅगा खरीप हंगाम 2014 मध्ये विक्री केलेल्या असून 4-5 बॅग प्रति शेतकरी धरल्यास 150 शेतक-यांनी बियाणे खरेदी केले परंतु, त्यांनी कोणतीही तक्रार बियाणाबाबत केलेली नाही. याउलट, बियाणाची शुध्दता 100 टक्के असल्याचे प्रमाणपञ/अहवाल सीड टेस्टींग ऑफीसर यांनी दिलेला आहे, यावरुन चौकशी समितीने दिलेला रिपोर्ट हा महाबीज श्रीराम धान बियाणे पेरलेल्या शेताचा नसून दुस-या शेताचा आहे व म्हणून तो चुकीचा असून वस्तुसापेक्ष नाही. अर्जदाराने केवळ पैसे उकळण्यासाठी गैरअर्जदाराविरुध्द खोटी तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, पुरावा शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 चा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराप्रती अनुचित व्यापार पध्दतीची : होय.
अवलंबना केली आहे काय ?
3) अर्जदाराचा तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
6. अर्जदाराची मौजा शिवणी बुज येथे 1 हेक्टर शेती आहे, त्या शेतीमध्ये श्रीराम धानाचे वाण सन 2014-15 या वर्षामध्ये लावणी केलेली होती. गैरअर्जदार क्र.1 कडून दिनांक 3.4.2014 ला श्रीराम वाणाची महाबीज यांच्याकडून 5 बॅग प्रतीनग रुपये 500/- याप्रमाणे रुपये 2500/- देवून खरेदी केले होते, ही बाब अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ला मान्य असून अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 चा ग्राहक आहे असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
7. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून घेतलेले बियाणे लावल्यानंतर व खताचा वापर करुन सुध्दा अर्जदारास हवी तसे पिक उत्पन्न दिसून न आल्यामुळे व त्याबाबत सरकारी यंञणास तक्रार करुन पिकाची चौकशी पाहणी करण्यासाठी अर्ज केल्यानंतर सरकारी यंञणेव्दारे चौकशी व प्रत्यक्ष पाहणी करुन सादर केलेले अहवालावरुन असे दिसून येते की, सदर बियाणांमध्ये 25 टक्के इतर भात वाणाची भेसळ आहे. या सर्व सरकारी यंञणेचे अहवालावरुन असे सिध्द होते की, अर्जदाराप्रती अनुचित व्यापार पध्दतीची अवलंबना केली आहे. तसेच गैरअर्जदारांनी आपल्या लेखीउत्तरात व युक्तीवादात असे म्हटले आहे की, सरकारी बिज गुणन केंद्रात तपासणी करुन अहवाल घेतले असल्यास त्याची शुध्दता 100 टक्के उगवण शक्ती 84 टक्के असल्याचे रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. तसेच त्यांचे हे म्हणणे बियाणांमध्ये काही भेसळ असल्यास त्वरीत बघताबरोबर दिसून येते व त्याबाबत अर्जदाराने कुठलिही तक्रार केली नाही. तसेच गैरअर्जदारांव्दारे इतर दिलेले इतर कारण गृहीत धरण्यासारखे नाही. कारण, भेसळ बियाणे हातात घेतल्या बरोबर दिसून येते हे कास्तकारांना समजलेच पाहिजे किंवा समजते हे मान्य करता येत नाही तसेच शुध्दता व उगवण शक्तीबाबत कुठलेही प्रमाणपञ बिज विकतांना शेतक-याला दिलेले आहे किंवा त्याबाबत त्यांना समजविण्यात आलेले आहे किंवा तशी शेतक-यांसाठी कार्यशाळा घेवून समजविण्याची पध्दत आहे याबाबत कोणताही पुरावे व खुलासा केलेला नाही. यावरुन गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराप्रती अनुचित व्यापार पध्दतीची अवलंबना केली आहे हे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
8. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेकडून अर्जदाराने सदर बियाणे खरेदी केले नसल्यामुळे व गैरअर्जदार क्र.2 व 3 यांच्या खरेदी विक्रीचा कोणतेही व्यवहार अर्जदारासोबत झालेला नसल्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार क्र.2 व 3 चे ग्राहक नाही असे सिध्द होते. सबब, गैरअर्जदार क्र.2 व 3 चे विरुध्द तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. अर्जदाराचे धानाचे नुकसान झाले ही बाब अर्जदाराने दाखल नि.क्र.2 नुसार दाखल दस्ताऐवजावरुन व चौकशी अहवालावरुन सिध्द झाले आहे. सदर बाब आणि मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास धान पिकाचे नुकसानी बद्दल खरेदी केलेल्या बियाणे देयकाची रक्कम रुपये 2500/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास झालेल्या शारिरीक, मानसिक ञासापोटी व तक्रारीचा खर्च रुपये रुपये 5000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.
(4) गैरअर्जदार क्र.2 व 3 विरुध्द कोणतेही आदेश नाही.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 23/2/2016