::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष
१. गैरअर्जदार यांनी, अर्जदारास ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार, कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसुर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. गैरअर्जदार हा स्वराज ट्रॅक्टरचा डिलर असुन अर्जदार यांची मौजा-शेबळ, ता. वरोरा, जि.चंद्रपूर येथे शेत जमीन आहे. अर्जदाराला शेतीच्या कामासाठी ट्रॅक्रटरची आवश्यकता असल्याने अर्जदाराने त्याच्याकडे असलेल्या सन २००६ मधे घेतलेल्या जुन्या स्वराज-७४४, ट्रॅक्टर गैरअर्जदाराकडे देऊन नवीन स्वराज –एपी ट्रॅक्टर एकुण किंमत रुपये ६,३०,०००/- मधे खरेदी केला. जुन्या ट्रॅक्टरची किंमत रुपये २,८०,०००/- वजा जाता उर्वरित रक्कम रोख स्वरुपात अर्जदाराने गैरअर्जदाराला दिली. दिनांक १७.१०.२०१४ रोजी ट्रॅक्टरचा क्र. एमएच ३४-एपी २०४२ पासिंग होऊन अर्जदारास मिळाला.
३. सदर ट्रॅक्टर मधे अलाईनमेंट बरोबर नसल्याने १०-१५ दिवसात टायर व टयुब खराब झाले. गैरअर्जदारांनी ट्रॅक््टरला जुने टायर टाकले होते. त्यामूळे अर्जदाराने तकार केल्यानंतर दिनांक ०४.०७.२०१५ रोजी गैरअर्जदाराने नवीन टायर टाकून दिले. परंतु काहीही फरक न पडल्यामूळे कंपनीच्या इंजिनिअरने दिनांक ०८.०७.२०१५ रोजी पाहणी करुन ट्रॅक्टर दुरुस्त करुन देण्याचे कबुल केले. परंतु कोणतीही दुरुस्ती न केल्याने ट्रक्टर ०८.०७.२०१५ पासून नादुरुस्त असल्याने अर्जदारास दररोजच्या नुकसान भरपाईपोटी दर दिवशी ३५००/- ३ टयुबचा कर्ज रुपये १६५०/- इतर खर्च रु.२०००/- तसेच ट्रॅक्टर बदलवून द्यावा किंवा १० दिवसाचे आत दुरुस्ती करुन द्यावी. अशा प्रकारचे सूचना पत्र दिनांक २४.०८.२०१५ रोजी गैरअर्जदाराला पाठविले. सदर सूचना पत्र् मिळाल्यानंतर दिनांक २६.०८.२०१५ रोजी गैरअर्जदाराचे इंजिनिअर यांनी दुरुस्तीचा प्रयत्न केला परंतु ट्रॅक्टर दुरुस्त न झाल्याने आजही तो नादुरुस्त आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास सदोष ट्रॅक्टरची विक्री केल्याने अर्जदारास आर्थिक् नुकसान सहन करावे लागले व मानसिक त्रास झाला. गैरअर्जदाराने सदोष ट्रॅक्टर बदलवून न दिल्याने झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. १,००,०००/- गैरअर्जदाराने अर्जदारास द्यावे तसेच ट्रॅकट्रर बदलवुन द्यावा किवा ट्रॅक्टरची किंमत परत करावी. तसेच दिनांक ०८.०७.२०१५ पासुन होणा-या नुकसानभरपाईची दर दिवस रुपये ३५००/- ,तीन टयुबचा खर्च रुपये १६५०/- गैरअर्जदाराने अर्जदारास द्यावे असे सुचना पत्र् दिनांक १६.१०.२०१५ रोजी पुन्हा गैरअर्जदाराला पाठवून देखिल गैरअर्जदाराने कोणतीही दखल न घेतल्याने सदर मागणी करिता अर्जदाराने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
४. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस पाठविली असता, गैरअर्जदार यांनी मंचासमक्ष हजर राहून तक्रारीतील मुद्द्यांचे खंडन करुन, सदर ट्रक्टर मध्ये कोणताही निर्मिती दोष नसून त्याबाबत पुरावा दाखल केला नाही. टायर व बटरी बाबतची तक्रार गैरअर्जदार यांच्याशी संबधीत नसून टायर व बटरीच्या कंपनीला गैरअर्जदार म्हणून समाविष्ट न केल्याने तक्रार अमान्य करण्यात यावी. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा ट्रक्टर वेळोवेळी दुरुस्त करून दिला असून त्याबाबतचे दस्तावेज अर्जदाराने दाखल केले आहेत. ट्रक्टरमधील निर्माणाधीन दोषाबद्दल अर्जदाराने तज्ञ अहवाल दाखल केला नसून मा. राष्ट्रीय आयोगाने सबिना सायकल इम्पोरीयल चेनाखाज वि. ताजेस रवी एम. आर. पंचवीला वेदार डाचकोन (१९९२)१ CPJ ९७ व क्लासिक ऑटोमोबाईल्स वि. लिलानंद मिश्रा I (२०१०) CPJ ३२५ NC यामधील न्यायतत्वानुसार अर्जदाराने तज्ञ अहवाल दाखल करणे आवश्यक आहे. सबब, सदर आक्षेपामुळे तक्रार अमान्य करणे न्याय्य व उचित आहे. अर्जदार यांनी कोणत्याही न्याय्य व उचीत कारणाशिवाय सदर तक्रार दाखल केली असल्याने व तक्रारदारास सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केला नसल्याने तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी, अशी विनंती गैरअर्जदार यांनी केली आहे.
५. अर्जदारांची तक्रार, कागदपत्रे, लेखी युक्तिवाद तसेच गैरअर्जदार यांची कागदपत्रे, लेखी म्हणणे, लेखी युक्तिवाद, तज्ञ अहवाल व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दे निष्कर्ष
- ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये अर्जदाराने
वाहनामध्ये निर्माणाधीन दोष असल्याबाबत तज्ञ
अहवाल दाखल केला आहे काय?नाही
२. आदेश ? तक्रार अमान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ :
६. अर्जदार व गैरअर्जदार यांच्या संमतीने वाहन तज्ञ यांनी केलेल्या वाहन तपासणी अहवालामध्ये उपरोक्त वाहनामध्ये दोष असल्याच्या निष्कर्षापर्यंत
न पोचल्याची बाब नमूद आहे. ट्रक्टरमधील निर्माणाधीन दोषाबद्दल अर्जदाराने स्पष्ट तज्ञ अहवाल दाखल केला नसून मा. राष्ट्रीय आयोगाने सबिना सायकल इम्पोरीयल चेनाखाज वि. ताजेस रवी एम. आर. पंचवीला वेदार डाचकोन (१९९२)१ CPJ ९७ व क्लासिक ऑटोमोबाईल्स वि. लिलानंद मिश्रा I (२०१०) CPJ ३२५ NC यामधील न्यायतत्वानुसार अर्जदाराने स्पष्ट तज्ञ अहवाल दाखल करणे आवश्यक आहे. परंतु तो दाखल केलेला नाही. अशा परिस्थितीत अर्जदाराने सदर वाहनामध्ये दोष आहे, हे सिद्ध करण्यासाठी उचित पावले उचलणे आवश्यक होते व सदर अहवाल संदिग्ध असल्याने सदर वाहनामध्ये निर्मिती दोष आहे, असे ग्राह्य धरणे न्यायोचित नाही. सबब, उपरोक्त न्यायनिर्णयातील तत्व सदर प्रकरणास लागू होत असल्याने, उपरोक्त निष्कर्षावरून, मुद्दा क्र. १ चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. २ :
७. मुद्दा क्र. १ व २ वरील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. २३६/२०१५ अमान्य करण्यात येते.
२. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
३. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
कल्पना जांगडे(कुटे) किर्ती वैद्य(गाडगीळ) उमेश वि. जावळीकर
सदस्या सदस्या अध्यक्ष