निकालपत्र
(द्वारा- मा.अध्यक्षा - सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या घराच्या खिडक्यांच्या पडद्याची रक्कम सामनेवालेंकडून परत मिळण्याकरिता सदरचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केला आहे.
(२) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारदार यांनी दि.१४-११-२०११ रोजी सामनेवाले यांच्याकडून घराच्या खिडक्यांसाठीचे कापड, पाईप ब्रॅकेट्स व शिलाईसहीत रक्कम रु.१७०९५/- मात्र एवढया किमतीस बिल क्रमांक ५४०१ द्वारे विकत घेतले. परंतु सामनेवाले यांनी सदर पडदे खिडक्यांच्या मापाप्रमाणे शिवले नाहीत. सदरचे पडदे आखूड झाल्याचे लक्षात आल्याने पडदे परत नेले व त्यांना उसवून उंची वाढवून परत केले. परंतु सदर पडदे हे आखूड व वर खाली झाल्याने सामनेवाले हे परत घेऊन गेले. त्यानंतर तक्रारदाराने वेळोवेळी सामनेवालेंशी संपर्क साधला. परंतु सामनेवालेंनी तोंडी आश्वासन देऊन देखील नवीन पडदे दिले नाहीत. म्हणून तक्रारदार यांनी दि.२७-१२-२०११ रोजी सामनेवाले यांना पत्र पाठविले. त्याप्रमाणे सामनेवालेंनी पुर्तता केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांना शारीरिक, मानसिक त्रास व नुकसान सहन करावे लागले. त्याकामी सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रारदार यांची विनंती अशी आह की, सामनेवाले यांनी पडदयाचे कापड, पाईप, ब्रॅकेट, शिलाईची किंमत असे एकूण रु.१७,०९५/- १२ टक्के व्याजाने परत द्यावेत, मानसिक,शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रु.१५,०००/- आणि अर्जाचा खर्च द्यावा.
तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत शपथपत्र व दस्तऐवज यादी सोबत बिल, लेखी पत्र इ. कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत.
(३) सामनेवाले यांनी नि.नं.१२ वर खुलासा दाखल करुन सदर अर्ज नाकारला आहे. त्यात त्यांनी असे नमूद केले आहे की, तक्रारदार या सामनेवालेंच्या ग्राहक नाहीत. सदर पावतीवर तक्रारदाराचे ग्राहक म्हणून नांव नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या को-या पावतीचा गैरफायदा घेतलेला आहे. तक्रारदार या दि.०३-०६-२०११ रोजी पडदे विकत घेण्यास दुकानात आल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांनी विविध आकाराचे पडदे घेतले व त्यांच्या खिडक्यांचे माप देण्यात आले आहे. त्यानंतर तक्रारदार या सदरचे पडदे घेण्यास सामनेवाले यांच्याकडे आलेल्या नाहीत व त्यांनी पडद्यांची उर्वरीत रक्कम अदा केलेली नाही. तसेच तक्रारदार यांनी नवीन दुसरे पडदे घेतले असल्याने सदर पडदे घेण्यास नकार दिला आहे. सबब सामनेवाले यांनी ऑर्डर प्रमाणे व योग्य मापाचे पडदे तक्रारदारास शिवून दिलेले आहेत. त्यात कुठलीही कमतरता केलेली नाही. सबब सदरचा अर्ज खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
सामनेवाले यांनी खुलाशासोबत शपथपत्र व दस्तऐवज यादी सोबत पावती व पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे.
(४) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांचा तक्रार अर्ज, शपथपत्र व दाखल कागदपत्रे, सामनेवाले यांचा खुलासा व शपथपत्र तसेच तक्रारदार व सामनेवाले यांच्या विद्वान वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार या सामनेवाले यांच्या ग्राहक आहेत काय ? | : होय |
(ब)सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ? | : होय |
(क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(५) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी, सामनेवाले यांच्याकडून, घराच्या खिडक्यांसाठी कापड, पाईपब्रॅकेट्स हे शिलाईसह रक्कम रु.१७,०९५/- एवढया किमतीस बिल क्रमांक ५४०१ द्वारे विकत घेतले. त्याची पावती नि.नं.४ सोबत दाखल आहे. प्रकाश हॅण्डलूम हाऊस या नावाने सदर पावती असून त्यावर नं.५४०१ असा आहे व त्यावर रक्कम रु.१७,०९५/- अशी किंमत नमूद आहे. सदर पावती सामनेवाले यांनी नाकारली आहे व त्याबाबत त्यांनी दुसरी पावती नि.नं.१४ सोबत दाखल केलेली आहे. सदर पावती पाहता त्यावर तक्रारदाराचे नांव आहे मात्र बिल क्रमांक नमूद नाही. तसेच सामनेवाले यांनी त्यांच्या खुलाशामधील कलम १२ मध्ये असे नमूद केले आहे की, “ अर्जदार ही दि.०३-०६-२०११ रोजी पडदे विकत घेण्यासाठी जाबदेणार याच्या दुकानावर आली होती व त्याप्रमाणे अर्जदार हीने जाबदेणार याचे दुकानातुन विविध पडदे विकत घेतले व त्यावेळेस पडदयाचे मापेही जाबदेणार यास दिले व त्याच मापाच्या साईजच्या पडदयांची व त्यासाठी लागणा-या कापडाची व इतर साहित्याची एकूण किंमत रु.१४,८४०/- अशी झाली. त्यापोटी अर्जदार हिने २,०००/- जाबदेणार यास अॅडव्हान्स म्हणून दिले...” असे नमूद केले आहे. याचा विचार होता सामनेवाले यांनी तक्रारदार यांनी त्यांचे दुकानातून पडदे विकत घेतले हे मान्य केले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी दाखल केलेली पावती ग्राहय धरुन तक्रारदार या सामनेवालेंच्या “ग्राहक” असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(६) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी वरील खरेदीच्या पावतीप्रमाणे सामनेवाले यांच्याकडून पडदे खरेदी करुन, त्यांना आवश्यक असलेले खिडक्यांचे माप देवून पडदे शिवण्याकामी ऑर्डर दिलेली आहे. परंतु सामनेवाले यांनी सदर पडदे योग्य त्या मापात शिवलेले नाहीत. सदर पडदे सामनेवाले यांनी लावले असता त्याची उंची कमी असल्याने ते उसवून दुरुस्त करुन दिले. परंतु पुन्हा त्या पडद्यांची उंची कमीजास्त झाल्याचे सामनेवाले यांच्या लक्षात आले. त्यामुळे पुन्हा सामनेवाले यांनी सदर पडदे दुरुस्तीकामी नेलेले आहेत. याप्रमाणे सामनेवाले यांनी खिडक्यांच्या योग्य मापात पडदे शिवून दिलेले नाहीत असे दिसते. त्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या मागणी प्रमाणे पडदे न दिल्याने तक्रारदार यांनी दि.२७-१२-२०११ रोजी सामनेवाले यांना पत्र पाठविले आहे. सदर पत्र नि.नं.२ वर दाखल आहे. या पत्राप्रमाणे असे दिसते की, तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून ऑर्डर दिलेल्या पडदयांची दुरुस्ती करुन योग्य पडदे मिळण्याची किंवा संपूर्ण बिलाचे पैसे मिळण्याची मागणी केलेली आहे. परंतु या पत्रा प्रमाणे सामनेवाले यांनी पुर्तता केलेली नाही. तसेच पत्रास उत्तरही दिलेले नाही. यावरुन असे स्पष्ट होते की, सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या मागणीप्रमाणे पडदयांची पुर्तता करुन दिलेली नाही.
तक्रारदार यांनी समानेवाले यांच्याकडून रक्कम देऊन पडदे खरेदी केले आहेत व त्यामुळे त्यांना त्यांच्या मागणी प्रमाणे पडदे शिवून मिळणे आवश्यक आहे. परंतु सामनेवाले यांनी दोनवेळा सदर पडदे दुरुस्त करुनही ती दुरस्ती योग्य न झाल्याने व तक्रारदारांच्या मागणीप्रमाणे पडदे नसल्याने, तक्रारदार या सामनेवाले यांच्याकडून सदर नादुरुस्त पडदे घेण्यास तयार नाहीत असे दिसते. याकामी सामनेवाले यांनी असा बचाव घेतला आहे की, तक्रारदार यांनी नवीन पडदे खरेदी केल्याने त्या दुरुस्त केलेले पडदे घेण्यास आलेल्या नाहीत. परंतु सामनेवाले यांनी सदर पडदे तक्रारदाराच्या मागणीप्रमाणे दुरुस्त करुन दिलेले नाहीत. त्यामुळे सदर नादुरुस्त असलेले पडदे घेण्यास तक्रारदार तयार नाहीत. प्रत्येक घरामध्ये चांगले व आकर्षक पडदे असावेत अशी प्रत्येक स्त्रीची मनिषा असते.
केवळ आहे त्या परिस्थितीत तक्रारदार यांनी सदर पडदे परत घेऊन जावेत असा प्रयत्न सामनेवाले यांचा असल्याचे दिसत आहे. परंतु सदर बाब ही योग्य व रास्त नाही. सामनेवाले यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदार यांच्या मागणीप्रमाणे सामनेवाले यांनी खिडक्यांचे पडदे शिवून दिलेले नाहीत. त्यामुळे तक्रारदार या पडदे घेण्यास आलेल्या नाहीत, या सामनेवालेंच्या बचावत काही तथ्य आढळून येत नाही. निश्चितच सामनेवाले यांच्याकडून सदरचे नादुरुस्त पडदे योग्य त्या मापात दुरुस्त करुन देणे शक्य नाही, असे आमचे मत आहे. त्यामुळे सामनेवालेंच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘क’’ – उपरोक्त विवेचनाचा विचार करता, सदर नादुरुस्त असलेले पडदे तक्रारदारांच्या मागणीप्रमाणे पुन्हा योग्य त्या मापात शिवून देणे सामनेवालेस शक्य नसल्याचे दिसते. त्यामुळे सदर बिलाप्रमाणे दिलेले खिडक्यांच्या पडद्याचे कापड व पाईप ब्रॅकेट्स, सामनेवाले यांनी स्वत:कडे ठेवून घेऊन, त्यांची घेतलेली रक्कम तक्रारदारांना परत करणे योग्य व रास्त होईल असे आम्हाला वाटते. तक्रारदारांच्या मागणी प्रमाणे त्यांच्या घरास योग्य त्या मापात पडदे शिवून वेळेत न मिळाल्याने निश्चितच तक्रारदारांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व सदरचा अर्ज दाखल करावा लागला आहे. या नुकसानीस सामनेवाले जबाबदार आहेत. सबब न्यायाचे दृष्टीने खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले यांनी या आदेशाच्या दिनांकापासून पुढील ३० दिवसांचे आत.
(१) तक्रारदार यांना, घराच्या खिडक्यांसाठी कापड, पाईप ब्रॅकेट्स व शिलाई यासाठी बिल क्रमांक ५४०१ द्वारे तक्रारदारांनी दिलेली एकूण रक्कम १७,०९५/- (अक्षरी रक्कम रुपये सतरा हजार पंच्यान्नव मात्र ) परत द्यावेत.
(२) तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी एकूण रक्कम २,०००/- (अक्षरी रक्कम रुपये दोन हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम १,०००/- (अक्षरी रक्कम रुपये एक हजार मात्र) द्यावेत.
(क) उपरोक्त आदेश कलम (ब) (१) मध्ये नमूद केलेली रक्कम सामनेवाले क्र.१ यांनी तीस दिवसांचे मुदतीत न दिल्यास, संपूर्ण रक्कम देईपर्यंतचे पुढील कालावधीसाठी द.सा.द.शे. ६ टक्के व्याजासह रक्कम देण्यास सामनेवाले क्र.१ जबाबदार राहतील.
धुळे.
दिनांक : २४-०७-२०१४