निकाल
(घोषित दि. 04.02.2017 व्दारा श्री.सुहास एम.आळशी, सदस्य)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे.
तक्रारदार हा शकुंतला नगर, मंठा रोड, जालना येथील रहिवाशी आहे. तक्रारदार यांचा रेवगाव येथे गट क्रमांक 525 मध्ये शेतजमीन आहे. गैरअर्जदार यांनी विना परवाना विद्युत लाईनचे पोल तक्रारदाराच्या शेतामध्ये चारही बाजुला उभे करुन त्यावरुन विद्युत लाईन गेलेली आहे. गैरअर्जदार यांनी सदर विद्युत लाईन ओढताना तक्रारदाराच्या शेतातील लिंबाचे जूने झाड कोणतीही परवानगी न घेता तोडलेले आहे. दि.19.05.2015 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान सदर लाईनमध्ये शॉर्टसर्किट होऊन तक्रारदाराच्या घराजवळील शेतामध्ये आग लागली. त्या आगीमध्ये तक्रारदाराचे विहीरी जवळील 50 पी.व्ही.सी.पाईप तसेच मोटारचे कनेक्शन वायर, बेंड व पाईप आगीत जळून गेले. सदर घटनेची माहिती तक्रारदार यांनी फोनवरुन गैरअर्जदार यांना दिली. विद्युत कंपनीच्या अधिका-यांनी घटनेचा पंचनामा केला. गैरअर्जदार यांना वारंवार लेखी पत्र देऊन सुध्दा गैरअर्जदार यांनी आजपर्यंत कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही. म्हणून तक्रारदार यांनी सदरील तक्रार दाखल करुन एकूण रु.4,95,000/- नुकसान भरपाई मिळण्याची विनंती केली आहे.
गैरअर्जदार हे मंचासमोर हजर झाले. त्यांनी आपले लेखी निवेदन नि.6 अन्वये दाखल केले. लेखी निवेदनासोबत बाबासाहेब तोला जाधव, अधिक्षक अभियंता, यांचे शपथपत्र दाखल केले. गैरअर्जदार यांचे कथन की, तक्रारदार हा आमचा ग्राहक नाही, तक्रारदार ग्राहक या संज्ञेत बसत नाही. त्यामुळे तक्रारदारास सदरील तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण घडलेले नाही. सदर बाबींचा विचार करुन तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात यावी. तसेच तक्रारदाराने तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे गैरअर्जदार यांनी कोणतेही बेकायदेशीर पोल उभे केलेले नसून कोणतीही झाडे तोडलेली नाहीत. तसेच गैरअर्जदार यांच्या चुकीमुळे शॉर्टसर्किट होऊन तक्रारदार यांचे कोणतेही नुकसान झाले नाही. त्यामुळे तक्रारदारास नुकसान भरपाई देण्याचा अधिकार नाही. सदरील जबाबदारी ही गैरअर्जदाराची नाही. तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदाराने केली आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेले कागदपत्र, तक्रारदार यांचा आणि गैरअर्जदार यांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्यास
पात्र आहे काय? नाही.
2) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
मुद्दा क्र.ः- 1 तक्रारदार यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे रेवगाव येथे गट क्रमांक 525 मध्ये शेत आहे. सदरील शेतामधून गैरअर्जदार यांचा वीजप्रवाह वाहून नेणा-या तारा आहे.दि.19.05.2015 रोजी सदर तारामध्ये शॉर्टसर्किट होऊन तक्रारदाराच्या घराजवळील शेतामध्ये आग लागली. त्यामुळे तक्रारदार यांचे विहीरीजवळील पी.व्ही.सी.पाईप, मोटारचे कनेक्शन वायर, बेंड पाईप इत्यादी साहित्य जळून गेले. सदर घटनेची माहिती गैरअर्जदार यांना दिली, गैरअर्जदार यांच्या अधिका-यांनी घटनेचा पंचनामा केला. परांतू अद्याप पर्यंत गैरअर्जदार यांनी कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदार यांच्या वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार हा आमचा ग्राहक नाही. त्यामुळे तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. गैरअर्जदार यांच्या कृत्यामुळे तक्रारदार यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही व त्यास गैरअर्जदार जबाबदार नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
वर नमुद केलेला युक्तीवाद आम्ही लक्षात घेतला. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र याचे बारकाईन अवलोकन केले. तक्रारदार याने तक्रारीसोबत दाखल केलेली पावती व वीज देयक याचे अवलोकन केले असता सदर पावती व वीज देयकावर श्रीधर बाबुराव गोल्डे असे नाव असल्याचे निदर्शनास येते. तक्रारदार याने संपूर्ण तक्रारीत श्रीकिसन हाच श्रीधर आहे किंवा श्रीकिसन व श्रीधर हा एकच व्यक्ती आहे असे कोठेही नमुद केलेले नाही, किंवा त्या बाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केला नाही. यावरुन तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे किंवा नाही ही बाब संशयास्पद आहे. त्याबाबतचा स्पष्ट खुलासा तक्रारदार याने केला नाही. त्यामुळे तक्रारदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब सिध्द होत नाही.
तक्रारदार यांच्या कथननुसार त्याच्या शेतातून गैरअर्जदार यांचा वीजप्रवाह वाहून नेणा-या तारा आहेत. सदरील तारामध्ये शॉर्टसर्किट होऊन तक्रारदार यांच्या शेतातील पी.व्ही.सी.पाईप, मोटार कनेक्शन व इतर साहित्य जळाले असा मुददा उपस्थित केला. सदर वादग्रस्त मुद्याकरता तक्रारदार याने दाखल केलेले कागदपत्र याचे अवलोकन केले असता तक्रारदार हा शेतकरी आहे व त्याचे नावे रेवगाव येथे गट क्र.525 मध्ये शेतजमीन आहे व सदर शेतजमीनीमध्ये लिंबाचे झाड होते ही बाब सिध्द करण्याकरता तक्रारदार याने सदर जमिनीचा 7/12 उतारा व कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. यावरुन तक्रारदार हा शेतकरी आहे व त्याचे नावे शेतजमीन होती ही बाब सिध्द होत नाही. वीजप्रवाह वाहून नेणा-या तारामध्ये शॉर्टसर्किट होऊन तक्रारदार याचे शेतातील साहित्य जळाले ही बाब सिध्द करण्याकरता तक्रारदार याने जळालेले साहित्य विकत घेतल्याची पावती दाखल केली केली. तसेच कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारीतील मागणी पुराव्यानिशी सिध्द करण्याची जबाबदारी ही तक्रारदाराची आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदार याचे नुकसान झाले असा निष्कर्ष काढणे उचित होणार नाही. त्याकरता तक्रारदार हा सर्वस्वी जबाबदार आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार याने त्याचे नावे शेतजमीन आहे ही बाब सिध्द केली नाही. तसेच तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे ही बाब सुध्दा सिध्द करु शकला नाही. या कारणास्तव तक्रारदाराची तक्रार रदद होणेस पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुददा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजुर करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना