निकाल
(घोषित दि. 03.03.2017 व्दारा श्री.सुहास एम.आळशी, सदस्य)
तक्रारदार मौजे अंबड ता. अंबड जि. जालना येथील रहिवासी आहे. शेतीवरच त्याचा उदरनिर्वाह चालतो. कस्बे अंबड ता. अंबड जि. जालना येथील सर्व्हे नं. 152 म्हणजेच 152/2 नामे तळ च्या क्षेत्रफळापैकी 4 एकर 19 गुंठे जमीन 30 ते 40 वर्षापासुन तक्रारदाराच्या ताब्यात व वहितीत आहे. उपरोक्त क्षेत्रापैकी 4 एकर शेतजमीनीवर तक्रारदाराने धनगांव जातीच्या तुरीची लागवड केली होती. तुरीला भरपुर फुले (पापडया) व शेंगा आल्यावर त्यावर रोग व आळया पडू नये याकरीता त्याने गैरअर्जदार नं. 1 राठी अॅग्रो इनपुटस यांचेकडुन दि. 13/11/2015 रोजी मोनोसील या किटकनाशक औषधाची मागणी केली. तेव्हा गैरअर्जदार नं. 1 यांनी अर्जदाराला मोनोसिल हे औषध चांगले नसल्याचे सांगून शिवालीक अॅग्रो केमिकल एच.ओ.कंपनीचे अल्फाबेन किटकनाशक औषधाची 1 लिटरची बाटली किंमत रु. 320 ला दिली. तक्रारदाराला गैरअर्जदार नं. 1 यांनी साईनाथ अॅग्रो व्हेट इंडस्ट्रिज प्रा.लि. कंपनीचे साविल ट्रेडमार्क असणारे अॅग्रोफर्ट किटकनाशक पावडरचे दोन पुडे (ज्याची प्रत्येकी किमत रु. 130/- प्रमाणे) एकुण 260/- रुपयांना दिले. वरील दोन्ही औषधाची एकुण 580/- रुपयांची पावती प्रकरणात दाखल आहे.
तक्रारदाराने दि. 13/11/2015 रोजी सदर औषधीची तुरीच्या पिकावर फवारणी केली. औषध कमी पडल्याने त्याने पुन्हा वरील प्रमाणे 580/- रुपयांची औषधी गैरअर्जदार नं. 1 यांच्याकडुन खरेदी केली, मात्र त्याच्या पावत्या हरविल्याने त्या पावत्या प्रकरणात दाखल केल्या नाहीत. दि. 13/11/2015 रोजी तुरी पिकावर वरील औषधाची फवारणी केल्यानंतर दोनच दिवसांनी तुरीच्या झाडांची फुले व शेंगा गळुन गेली व तुरीचे पिक वाळुन गेले. त्यामुळे तक्रारदाराचे उत्पन्न बुडाले.
दि. 16/11/2015 रोजी तक्रारदार गैरअर्जदार नं. 1 कडे गेला व त्याला तुरीचे पिक वाळल्याबाबत सांगितले. गैरअर्जदार नं. 1 याने पुर्वीचे औषध हानीकारक निघाले असेल त्यामुळे पुन्हा तुर हिरवीगार होण्यासाठी दुस-या कंपनीचे 4 पुडे दिले. सदर औषधाची फवारणी गैरअर्जदार नं. 1 याने केली परंतु तुर पिकावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तक्रारदाराचे शेतातील पिक वाळल्यानंतर त्याने त्याबाबतची तक्रार तालुका कृषी अधिकारी अंबड, कृषी अधिकारी पंचायत समिती अंबड, यांना दिली. त्यानुसार त्यांनी दि. 18/2/2016 रोजी जायमोक्यावर जावून पंचनामा केला.
तक्रारदाराला तुरीचे उत्पन्नापोटी एकरी 5 क्विंटल प्रमाणे 4 एकरामध्ये 20 क्विंटल उत्पन्न झाले असते व त्याची किंमत प्रती क्विंटल 10,000/- रु. या बाजारभावाप्रमाणे 2,00,000/- रु. मिळाले असते. तक्रारदाराने गैरअर्जदार नं. 1 यास नुकसान भरपाईची मागणी केली असता ती देण्यात गैरअर्जदार नं. 1 याने नकार दिला. त्यामुळे तक्रारदाराला वि.मंचात तक्रार दाखल करावी लागली. तक्रारदाराने सदोष किटकनाशक औषधे व पावडरचे पुडे अर्जदारास विक्री करुन तुर पिकाचे नुकसान केल्याबाबत 2,00,000/- रु.ची मागणी केली असुन नुकसान भरपाईपोटी रु. 50,000/- ची मागणी केली आहे. तक्रारदाराने या प्रकरणात शपथपत्र, 7/12 चा उतारा, किटकनाशक खरेदीची पावती, गै.अ.नं. 1 ला पाठविलेली नोटीसची प्रत, तालुका तक्रार निवारण समितीचा अहवाल, पंचनामा व इतर दस्तऐवज दाखल केले आहेत.
गैरअर्जदारांना नोटीसेस काढण्यात आल्या त्यानुसार गैरअर्जदार नं. 1 व 3 यांनी प्रकरणात जबाब दाखल केला. गैरअर्जदार नं. 2 यांनी या प्रकरणात लेखी जबाब न दिल्याने त्यांचे विरुध्द नो से चा आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार नं. 1 यांनी नि. क्र. 9 वर जबाब दाखल केला त्यांचे जबाबात त्यांनी तक्रारदाराचे जमीनीचे सर्व्हे क्रमांकाबाबत हरकत घेवुन 152 म्हणजे 152/2 कसे होते असे म्हटले आहे. 7/12 च्या उता-यावर तक्रारदाराचे गट नं. 152 ही सरकारी मालकीची जमीन असा उल्लेख आहे, तक्रारदाराने त्याचे जमीनीच्या चतुसिमा दिलेल्या नाहीत, सदर जमीन शासनाने पाझर तलावाकरीता संपादित केलेली आहे, तक्रारदाराला सदर शेती वहितीचा अधिकार नाही, तो हया शेतजमीनीचा मालक नाही, अशी हरकत नोंदविली आहे. दि. 13/11/2015 रोजी तक्रारदार गैरअर्जदार नं. 1 याचे दुकानात आल्यावर त्याला शिवालीक अॅग्रो केमिकल एच.ओ.कंपनीचे अल्फाबेन किटकनाशक औषधाची व साईनाथ अॅग्रो व्हेट इंडस्ट्रिज प्रा.लि. कंपनीचे साविल ट्रेडमार्क असणारे अॅग्रोफर्ट किटकनाशक पावडरचे दोन पुडे यांची शिफारस केली नसल्याचे नमुद केले असुन सदर किटकनाशकांकरीता कोणतेही गॅरंटी अथवा वॉरंटी कार्ड नसल्याचे म्हटले आहे. तक्रारदाराने पुन्हा फवारणीसाठी तीच औषधी नेली व पावती व पुडे गहाळ झाल्याबाबत खोटे विधान केले आहे. तक्रारदाराने औषध फवारणी करताना कोणत्याही तांत्रिक बाबींचा अवलंब केला नाही,सदर तुर पिक गाळाच्या जमीनीमध्ये येत नसते, त्यामुळे तक्रारदाराच्या तुर पिकावर मर या रोगाचा प्रार्दुभाव झाला होता, असे म्हटले असुन तक्रारदाराची तक्रार नामंजुर करण्यात यावी असे म्हटले आहे.
गैरअर्जदार नं. 3 यांनी नि. क्र. 11 वर त्यांचा लेखी जबाब व नि.क्र.17 वर त्यांचा लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. त्याचे युक्तीवादात त्यांनी नमुद केले की, तक्रारदाराने तक्रार अर्जात नमुद केलेले अॅग्रोफर्ट हे कीटकनाशक नसुन सुक्ष्मअन्नद्रव्ययुक्त पोषक आहे,त्यामुळे तुरीचे पिकाचे नुकसान होत नाही. तक्रारदाराने औषधाची फवारणीचे प्रमाण दिलेले नाही, कोणत्या पंपाने फवारणी केली ते नमुद नाही कारण फवारणी कोणत्या पंपाने करणार यावर औषधाचे प्रमाण ठरते. तक्रारदाराचे तुर पिकावर मर या रोगाची लागवण झाली. पिकाची पाने व फुले गळुन पडणे ही मर या रोगाचीच लक्षणे आहेत. कीटकनाशकाची तपासणी कोणत्याही सरकारी यंत्रणेकडे झालेली नाही, निघालेल्या तुर पिकात दोष असल्याबाबत कोणतीही तपासणी झालेली नाही, फुले व फळे वाळुन जाणे हे निसर्गाचे बदलावर अवकाळी तसेच अवकाळी पाऊस, बुरशीजन्य रोग फुलो-याच्या काळात येणारे रोग, अपुर्ण अर्धवट शेती तंत्रज्ञान यावर अवलंबुन असल्याचे म्हटले असुन तक्रारदाराची विनंती फेटाळण्या यावी अशी मागणी केली आहे. सोबत अॅग्रोफर्ट व बोरोमिन या औषधाचे माहितीपुस्तक जोडले आहे.
तक्रारदाराची तक्रार दाखल दस्तऐवज व गैरअर्जदार नं. 1 व 3 यांनी दाखल केलेला जबाब व युक्तीवाद याचा विचार केला असता न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) तक्रारदार त्याची तक्रार सिध्द करु
शकला काय? नाही.
2) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
मुद्दा क्र.ः- 1 तक्रारदार हा मौजे अंबड ता. अंबड जि. जालना येथील रहिवासी आहे. शेतीवरच त्याचा उदरनिर्वाह चालतो. कस्बे अंबड ता. अंबड जि. जालना येथील सर्व्हे नं. 152 म्हणजेच 152/2 नामे तळ च्या क्षेत्रफळापैकी 4 एकर 19 गुंठे जमीन 30 ते 40 वर्षापासुन तक्रारदाराच्या ताब्यात व वहितीत आहे असे नमुद आहे. परंतु 7/12 मध्ये सरकारी मालकी दर्शविली आहे. तक्रारदाराने त्याचे तक्रार अर्जामध्ये त्याचे जमीनीचा जो सर्व्हे /गट नंबर लिहिला आहे तो नेमका कोणता आहे याचा बोध होत नाही. तक्रारदाराने उपविभागीय अधिकारी यांना सदर जमीन त्याच्या नावावर करणेबाबत दि. 10/2/2014 रोजी अर्ज लिहिला आहे त्यामध्ये या जमीनीचा उल्लेख सर्व्हे नं. 152/2 असा आहे. तहसिलदार अंबड यांनी मंडळ अधिकारी अंबड यांना दि. 9/8/2012 रोजी स्थळ पाहणीबाबत पत्र दिले त्यामध्ये जमीनीचा सर्व्हे नं. 152/2 असा उल्लेख आहे. या व्यतिरिक्त इतरही जे सरकारी पत्र व्यवहार आहे तो सर्व्हे नं.152/2 या जमीनीचा आहे. त्यामुळे तक्रारदाराने तुर पिकाची लागवड नेमकी कोणत्या जमीनीवर केली आहे याचा बोध होत नाही. तक्रारदाराने प्रकरणात दि. 21/11/2015 व 13/6/2016 चा गट नं. 152 चा 7/12 जोडला आहे. सदर 7/12 मध्ये जमीनीची मालकी सरकारी दर्शविली असुन सन 2014-15 व 2015-16 मध्ये गट नं. 152 हा पडीत दाखविलेला आहे. इतर अधिकारामध्ये तक्रारदाराचे नाव नाही. तक्रारदाराने सदर जमीन तहसिलदार अंबड यांचेकडुन भाडेपट्टयाने अथवा कायदेशीररीत्या वहितीकरीता घेतल्याबाबत प्रमाणपत्र प्रकरणात जोडलेले नाही.
तक्रारदाराने गट नं. 152 मधील 4 एकर शेतजमीनीवर धनगांव जातीच्या तुरीची लागवड केली होती. तुरीला भरपुर फुले (पापडया) व शेंगा आल्यावर त्यावर रोग व आळया पडू नये याकरीता त्याने गैरअर्जदार नं. 1 राठी अॅग्रो इनपुटस यांचेकडुन दि. 13/11/2015 रोजी मोनोसील या किटकनाशक औषधाची मागणी केली. तेव्हा गैरअर्जदार नं. 1 यांनी अर्जदाराला मोनोसिल हे औषध चांगले नसल्याचे सांगून शिवालीक अॅग्रो केमिकल एच.ओ.कंपनीचे अल्फाबेन किटकनाशक औषधाची 1 लिटरची बाटली किंमत रु. 320 दिली. तक्रारदाराला गैरअर्जदार नं. 1 यांनी साईनाथ अॅग्रो व्हेट इंडस्ट्रिज प्रा.लि. कंपनीचे साविल ट्रेडमार्क असणारे अॅग्रोफर्ट किटकनाशक पावडरचे दोन पुडे (ज्याची प्रत्येकी किमत रु. 130/- आहे) 260/- रुपयांना दिले, हे पावतीवरुन दिसुन येते, मात्र गैरअर्जदार नं. 1 यानेच त्याला हे औषध चांगले असल्याचे अश्वासन दिले याबाबत कोणताही लेखी व तोंडी पुरावा दाखल नाही.
तक्रारदाराचे शेतातील पिक वाळल्यानंतर त्याने त्याबाबतची तक्रार तालुका कृषी अधिकारी अंबड, कृषी अधिकारी पंचायत समिती अंबड, यांना दिली. त्यानुसार कृषी अधिकारी यांनी दि. 18/2/2016 रोजी जायमोक्यावर जावून पंचनामा केला. सदर अहवालामध्ये तक्रारदाराचे तुर पिकावर मर या रोगाची लागण झाली, असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. साविल ट्रेडमार्क असणारी अॅग्रोफर्ट किटकनाशक पावडर ही किटकनाशक नाही तर सुक्ष्मअन्नद्रव्ययुक्त पोषक आहे, असे गैरअर्जदार नं. 3 यांनी दाखल केलेल्या माहिती पत्रावरुन समजते. शिवालीक अॅग्रो केमिकल एच.ओ.कंपनीचे अल्फाबेन किटकनाशक औषधाची फवारणी तक्रारदाराने केली. ती कोणत्या प्रमाणात व किती केली व तक्रारदाराचे तुरीचे पिक त्यामुळेच वाळले, याबाबत कोणताही प्रयोगशाळेचा अहवाल प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेला नाही. तालुका स्तरीय समितीने जो अहवालामध्ये जो निष्कर्ष दिला त्यामध्ये तुर पिक वाळण्याचे कारण गैरअर्जदार नं. 1 यांनी दिलेले अल्फाबेन व अॅग्रोफर्ट हेच असल्याचे स्पष्टपणे नमुद केलेले नाही, त्यामुळे सदर अहवाल स्वयंस्पष्ट नाही.
वरील विवेचनावरुन असे दिसुन येते की, तक्रारदार त्याची तक्रार गैरअर्जदार यांचे विरुध्द सिध्द करु शकला नाही, त्यामुळे त्याने तक्रार अर्जात नमुद केलेली मागणी मंजुर करता येणार नाही. मुद्दा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी देऊन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजुर करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना