निकालपत्र (पारित दिनांक 27 आक्टोंबर, 2010) व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा. तक्रारकर्ता श्री. प्रेमशंकर उपेन्द्रप्रसाद मिश्रा यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा थोडक्यात आशय असा की, ..2.. ..2.. 1. तक्रारकर्ता हे मिर्ल्टी कॅम्प, देवलाली येथे लान्स नायक या पदावर कार्यरत होते. त्यांची लडाख येथे बदली झाल्यामुळे त्यांनी दिनांक 08/06/2010 रोजी त्यांचे संपूर्ण घरगृहस्थीचे सामान एकूण वजन 5 क्विंटल 90 किलो, किराया रुपये 2296/- देवून देवलाली येथून गोंदिया येथे पाठविण्यासाठी बुक केले. 2. सामान प्राप्त न झाल्यामुळे तक्रारकर्ता यांनी दिनांक 02/07/2010 रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गोंदिया येथे विरुध्दपक्ष यांचे विरोधात तक्रार केली. त्यानंतर त्यांना क्षतीग्रस्त स्वरुपात सामान प्राप्त झाल्यामुळे तक्रारकर्ता यांनी ती तक्रार मागे घेवून सदर तक्रार दाखल केली आहे व मागणी केली आहे की, त्यांना विरुध्दपक्ष यांचेकडून रुपये 1,73,726/- ही रक्कम 15% व्याजासह मिळावी. 3. विरुध्दपक्ष क्रमांक 2 त्यांच्या लेखी जबाबात म्हणतात की, विद्यमान मंचास सदर ग्राहक तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. तक्रारकर्ता यांनी त्यांच्याकडे वस्तू या क्षतीग्रस्त स्वरुपात मिळाल्याबद्दल कोणतीही तक्रार दिलेली नाही त्यामुळे तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात यावी. 4. विरुध्दपक्ष क्रमांक 1,4 व 5 यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी दिलेला लेखी जबाब निशानी क्रमांक 11 हा स्विकारलेला आहे तसेच विरुध्दपक्ष क्रमांक 3 हे विद्यमान मंचाचा नोटीस प्राप्त होवून सुध्दा मंचात हजर झालेले नाही व त्यांनी लेखी जबाब ही दिलेला नाही. कारणे व निष्कर्ष 5. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताऐवज, इतर पुरावा व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांचे कडे दिनांक 08/06/2010 रोजी सामान गोंदिया येथे पाठविण्यासाठी बुक केले होते परंतू ते एक महिण्यानंतर तक्रारकर्ता यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल केल्यानंतरच मिळाले. 6. विरुध्दपक्ष क्रमांक 1,2,4 व 5 यांनी त्यांचा लेखी जबाब निशानी क्रमांक 11 मध्ये म्हटले आहे की, विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांच्या कर्मचा-यांनी चुकीचे सिल लावल्यामुळे सामान गोंदियाला न उतरविता ते कलकत्ता येथे पोहचले. मुंबई हावडा मेल ही गोंदिया येथे कमी वेळ थांबते. गोंदिया येथे सामान उतरविण्यासाठी विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांनी वरीष्ठ अधिका-यांची परवानगी मागणे आवश्यक होते तसेच त्यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 1,2,4 व 5 यांना सामान गोंदिया येथे उतरविण्याबाबत कळविले नाही. 7. तक्रारकर्ता यांनी त्यांच्या ग्राहक तक्रारीत शपथेवर असे सांगितले आहे की, सामानाचे एक बंडल दिनांक 10/07/2010 रोजी विरुध्दपक्ष यांचेकडून त्यांना गोंदिया रेल्वे स्टेशनवर ..3.. ..3.. देण्यात आले. ज्यात 3 रजाई, 2 गादी, 2 कम्बंल, 4 चादर व 2 उशी होत्या ते पूर्णपणे पाण्याने भिजले होते व त्यातून र्दुगंधी येत होती व त्यामुळे ते सामान त्यांनी रेल्वे स्टेशनवरच सोडून दिले. तसेच एक सामानाचे बंडल विरुध्दपक्ष यांचेकडून दिनांक 14/07/2010 ला मिळाले. ज्यात काच व फायबरचे किमती सामान व सेना कडून तक्रारकर्ता यांना प्राप्त झालेले सील व मेडल होते ते पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांचे रजिस्टरमध्ये ‘’वन पॅक ब्रोकन’’ असे लिहून ते सामान घेतले. 8. तक्रारकर्ता यांनी दिनांक 10/07/2010 व दिनांक 14/07/2010 रोजी क्षतीग्रस्त स्वरुपात सामान प्राप्त झाल्याबद्दल लेखी अर्ज विरुध्दपक्ष यांना दिला नसला तरी दिनांक 11/08/2010 रोजी विदयमान मंचात तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्ता यांचे सामान गोंदिया येथे न उतरविण्यात आल्यामुळे ते कलकत्याला गेले व 1 महिण्यानंतर तक्रारकर्ता यांना प्राप्त झाले त्यामुळे सामान क्षतीग्रस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच तक्रारकर्ता यांनी त्यांच्या ग्राहक तक्रारीत लिहिले आहे की, त्यांनी सामान घेतेवेळी विरुध्दपक्ष यांच्या रजिस्टरमध्ये ‘’ वन पॅक ब्रोकन ’’ असे नमूद केले ही बाब विरुध्दपक्ष यांनी त्यांच्या लेखी जबाबात स्पष्टपणे नाकारलेली नाही. 9. विरुध्दपक्ष यांनी रेल्वे क्लेम्स ट्रिब्यूनल एक्ट 1987 च्या कलम 13 प्रमाणे विद्यमान ग्राहक मंचास सदर ग्राहक तक्रार चालविण्याचा अधिकार नाही असे म्हटले आहे. तथापी परमेश्वरीबाई बजाज व इतर विरुध्द जी.एम. नॉर्दन रेल्वे, न्यु दिल्ली व इतर या II( 2010)CPJ 604 मध्ये प्रकाशीत झालेल्या न्यायनिवाडयामध्ये आदरणीय उत्तर प्रदेश ग्राहक वाद निवारण आयोग यांनी असे प्रतिपादन केले आहे की, ग्राहक संरक्षण कायदा-1986 च्या कलम 3 नुसार ग्राहक संरक्षण कायदा हा अतिरीक्त उपाय असल्यामुळे रेल्वे क्लेम्स ट्रिब्युनल एक्टचे कलम 13 व 15 मुळे ग्राहक मंचात तक्रार चालविण्यास बाधा निर्माण होत नाही. 10. विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांच्या चुकीमुळे तक्रारकर्ता यांना त्यांचे गृहपयोगी सामान व मुलांचे सर्टीफिकेट एक महिना प्राप्त न झाल्यामुळे त्यांना शारीरिक व मानसिक त्रास झाला व मुलांचे शिक्षण प्रभावीत झाले याबाबत शंका नाही. शिवाय सामान हे 1 महिण्यानंतर क्षतीग्रस्त स्वरुपात मिळाले आहे. असे तथ्य व परिस्थिती असतांना खालील आदेश पारित करण्यात येत आहे. आदेश 1. विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांनी तक्रारकर्ता यांना नुकसानभरपाई म्हणून रुपये 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) दयावेत. ..4.. ..4.. 2. विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांनी तक्रारकर्ता यांना सामान उशिरा मिळाल्यामुळे शारीरिक व मानसिक त्रासासाठी रुपये 5,000/- दयावेत तसेच ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1,000/- दयावेत. 3. आदेशाचे पालन विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांनी आदेशाच्या तारखेपासून 30 दिवसांचे आत करावे. (श्रीमती अलका उ. पटेल) (श्री अजितकुमार जैन) (श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे) सदस्या, सदस्य, अध्यक्षा, जिल्हा ग्राहक मंच,गोंदिया जिल्हा ग्राहक मंच, गोंदिया जिल्हा ग्राहक मंच, गोंदिया.
| [HONORABLE Smt. Patel] Member[HONORABLE Smt. Potdukhe] PRESIDENT[HONORABLE Shri. Ajitkumar Jain] Member | |