जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 144/2012 तक्रार दाखल तारीख – 12/10/2012
निकाल तारीख - 23/03/2015
कालावधी - 02 वर्ष , 05 म. 11 दिवस.
श्रीमती प्रतिभा धनंजय राचमाळे,
वय – 42 वर्षे, धंदा-घरकाम,
रा. धामणगाव, ता. जळकोट,
जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) महाव्यवस्थापक,
दि. न्यु इंडिया अॅश्युरन्स कं.लि.,
विभागीय कार्यालय क्र. 153400
सावरकर भवन, शिवाजी नगर,
कॉंगेस हाऊस रोड, पुणे – 422 005.
2) व्यवस्थापक,
डेक्कन इन्शुरन्स अॅन्ड रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लिमिटेड,
एन स्क्वेअर, ऑफीस क्र. 13, तिसरा मजला,
संघवी नगर, परिहार चौकाजवळ, औंध, पुणे-422007.
3) व्यवस्थापक,
न्यु इंडिया इन्शुरन्स कं. लि.
चंद्रनगर, राजर्षी शाहु कॉलेज समोर,
लातुर.
4) तालुका कृषी अधिकारी,
कृषी कार्यालय, औसा, जि. लातुर.
5) जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी,
प्रशासकीय इमारत, लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. ए.एम.के.पटेल.
गैरअर्जदार क्र. 1 व 3 तर्फे :- अॅड.एस.जी.दिवाण.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार मौजे धामणगाव ता. जळकोट, जि. लातुर येथील रहिवाशी असून, मयत धनंजय सोपान राचमाळे यांची पत्नी असून कायदेशीर वारसदार आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 ही विमा कंपनी असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने अर्जदाराच्या पतीचा शेतकरी म्हणून क्र. 1 ते 3 कडे विमा पॉलीसी काढली आहे. त्याचा कालावधी दि. 15/08/2010 ते 14/08/2011 असा आहे. मयत धनंजय सोपान राचमाळे हे धामणगाव जि. जळकोट येथील रहिवाशी असून, गट क्र. 164 क्षेत्रफळ 1 हेक्टर 60 आर जमीन होती. ती वारसांच्या नावे लावली आहे. अर्जदाराचे पती दि. 25/07/2011 रोजी दुपारी 4 वाजता मुखेड ते उमरदरी रोडने पायी जात असताना मोटार सायकल क्र.एम.एच. 24/ एच-8422 चे चालक प्रकाश पिराजी निमलवाड यांनी त्यांचे ताब्यातील मोटारसायकल निष्काळजी व अतिवेगात चालवून मयत धनंजय राचमाळे यांना धडक दिली. त्यामुळे त्यांना डोक्यास गंभीर जखम झाली मोटार सायकल चालक धडक देवून पळून गेला. जमलेल्या लोकांनी मयतास उपचारासाठी शासकीय दवाखाना लातुर येथे दाखल केले असता ते दवाखान्यामध्ये मयत झाले. गांधी चौक पोलीस स्टेशन लातूर यांनी एडी.क्र. 0/11कलम 174 सी.आर.पी.सी प्रमाणे नोंद केली. सदरील गुन्हा हा मुखेड पोलीस स्टेशन जि. नांदेड अंतर्गत असल्याने मयताच्या नातेवाईकांनी मुखेड पोलीस स्टेशनमध्ये गेले असता, त्यांनी तक्रार घेतली नाही. म्हणून प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी मुखेड यांनी तक्रारदाराचा जबाब व म्हणणे लक्षात घेवून दि. 01/10/2011 रोजी पोलीस स्टेशन मुखेड यांना मयत धनंजय सोपान राचमाळे यांचे अपघाती मृत्यू बाबत प्रकाश पिराजी निमलवाड यांचे विरुध्द कलम 279, 304 (अ) भा.दं.वि प्रमाणे गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला. व पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. प्रकाश पिराजी निमलवाड मुखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. 167/11 नोंदविण्यात आला. तक्रारदाराने सर्व कागदपत्रे गोळा करुन मुदतीत गैरअर्जदार क्र. 1 ते 5 यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. परंतु गैरअर्जदार यांनी विमा प्रस्तावाचे काय झाले. याबाबत विचारणा केली असता विमा कंपनीने सदरचा प्रस्ताव इंटरनेटवर दि. 05/07/2012 रोजी No Intimation and late submission म्हणून तक्रारदाराचा विमा दावा नामंजुर केला आहे. अशी माहिती इंटरनेटवरुन तक्रारदारास उपलब्ध झाली. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी त्रुटी केली असल्यामुळे, गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांनी रु. 1,00,000/- अपघात तारखेपासुन 15 टक्के व्याजदराने दयावेत. मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु. 10,000/- व दाव्याचा खर्च रु. 7,000/- देण्यात यावा.
तक्रारदाराने तक्रारी सोबत क्लेम फॉर्म भाग-3, क्लेम फॉर्म भाग-1, क्लेम फॉर्म भाग – 1 चे सहपत्र, क्लेम फॉर्म भाग-2, तलाठयाचे प्रमाणपत्र, प्रस्ताव नामंजुर केल्याबाबत इंटरनेटवरील प्रत, 7/12 उतारा, 8/अ, 7/12 उतारा,8/अ खातेउतारा, फेरफार नक्कल, गाव नमुना 6 ‘क’, फेरफार नक्कल (वारसांचे नावे),तलाठी प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र(तक्रारदाराचे), मतदानाचे ओळखपत्र(मयताचे), मृत्यू प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र, प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा,शवविच्छेदन अहवाल, न्यायदंडाधिकारी श्रेणी-1 यांचे मुखेड पोलीस स्टेशन यांना आदेश, न्यायदंडाधिकारी यांचे आदेश, तक्रारदाराचे बचत खाते, तक्रारदाराचे मतदान ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांच्याकडुन अॅड. श्री. एस. जी. दिवाण हजर असून त्यांनी आपले म्हणणे दाखल केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 2 कडे आपला क्लेम पाठवला आहे. धनंजय राचमाळे याचा मृत्यू हा अपघाती नसुन तो मानसिक रोगाने मृत्यू पावलेला आहे. व त्यासाठी त्याला अपघाती मृत्यू दाखवण्यासाठी मोटार सायकल खोटया पध्दतीने अंतर्भुत करुन त्याचा मृत्यू रोड अपघातात झालेला दाखवलेला आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी त्यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदाराचा क्लेम हा गैरअर्जदार क्र. 3 कडे पाठवलेला नाही म्हणून अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा.
गैरअर्जदार क्र. 4 यांना नोटीस प्राप्त दि. 03/12/2012 रोजी झालेली आहे.
गैरअर्जदार क्र. 5 यांना नोटीस प्राप्त दि. 20/11/2012 रोजी झालेली आहे. दि. 20/11/2012 रोजी क्र. 1 व 3 यांना हमदस्त नोटीस प्राप्त झालेली आहे.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 1 चा ग्राहक असून, मौजे धामणगाव येथे गट क्र. 164 मध्ये 1 हेक्टर 60 आर एवढी जमीन आहे. व तो मृत्यू समयी शेतकरी होता याचा कागदोपत्री पुरावा न्यायमंचात दाखल केलेला आहे. मयताचे वय मृत्यू समयी 42 वर्ष होते. त्यामुळे त्याचे वय शेतकरी जनता अपघात विम्यास पुरक असे आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून, गैरअर्जदाराने दि. 05/07/2012 रोजी शेतकरी जनता अपघात विमा योजना कालावधी दि. 15/08/2010 ते 14/08/2011 इंटरनेटवरील विमा कंपनीच्या प्रस्तावाचे उत्तर अर्जदाराच्या बाबतीत No Intimation and late submission म्हणून तक्रारदाराचा विमा दावा नामंजुर केला आहे. ही गैरअर्जदाराने केलेली अर्जदाराच्या सेवेत त्रुटी आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी अर्जदारास Epilepsy असे त्यांच्या परिच्छेद क्र. 7(सी) 4 मध्ये लिहिलेले आहे. मृत्यू समयी अर्जदारास Epilepsy हा रोग होता व त्यास रोड अॅक्सीडेंट मध्ये अंतर्भुत करुन अर्जदाराने मयताचा मृत्यू हा अपघाती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून तो मानसिक रोगी असल्या कारणाने सदर मोबदला मिळण्यास पात्र नसल्यामुळे त्याचा प्रस्ताव नामंजुर करण्यात यावा असे लिहिलेले आहे. परंतु कोणताही कागदोपत्री पुरावा त्याच्या पुष्टयर्थ गैरअर्जदाराने दिलेला नाही. उलटपक्षी अर्जदाराने शवविच्छेदन अहवाल दाखल केलेला आहे. त्यात मृत्यूचे कारण Head Injury असे नमुद केलेले आहे. तशी कागदपत्रे कलम 279 ,304 (अ) भा.दं.वि प्रमाणे गुन्हा नोंद मुखेड पोलीस स्टेशन होवून गु.र.नं. 167/11 आहे. सदरचा गुन्हा नोंद करण्यासाठी अर्जदाराने किरकोळ अर्ज मुखेड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केल्यानंतर दि. 01/10/2011 रोजी तेथील न्यायालयाने गुन्हा नोंद करण्याचे पोलीस स्टेशन मुखेडला आदेश दिलेले आहेत. यावरुन असे स्पष्ट होते की, प्रकाश निमलवाड याने आपली मोटार सायकल क्र. एम.एच. 24/एच-8422 ही निष्काजीपणाने व हयगयीने चालवून पायी जाणा-या अर्जदारास जखमी केले आहे. म्हणून अर्जदाराने आपल्या पतीचा मृत्यू अपघाती स्वरुपाचा झाला. याबद्दलची सर्व कागदपत्रे या न्यायमंचात दाखल केली असल्यामुळे, व ती सिध्द होत असल्यामुळे हे न्यायमंच अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजुर करत आहोत. गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांनी अर्जदारास रु. 1,00,000/- दयावेत. मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु. 3,000/- व दाव्याचा खर्च रु. 3,000 देण्यात यावा.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु.
1,00,000/-(अक्षरी एक लाख रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या
आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन
मुदतीत न केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व
शारिरीक त्रासापोटी रु. 3,000/- (अक्षरी तीन हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या
खर्चापोटी रु. 3,000/- (अक्षरी तीन हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.