जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 224/2008. प्रकरण दाखल तारीख - 20/06/2008 प्रकरण निकाल तारीख - 16/09/2008 समक्ष – मा.सतीश सामते - अध्यक्ष (प्र.) मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्य श्रीमती संध्याताई भ्र. मारोती नरवाडे वय 30 वर्षे धंदा, घरकाम, अर्जदार. रा. आनंद निवास, सहयाद्री नगर प्लॉट नंबर 63, तरोडा बू.ता.जि. नांदेड. विरुध्द. 1. व्यवस्थापक, पॅरामाऊंट हेल्थ सर्व्हीसेस प्रा.लि. शुक्रवार पेठ, टिळक रोड, पूणे 2. व्यवस्थापक, पॅरामाऊंट हेल्थ सर्व्हीसेस प्रा.लि. इलाईट अटो हाऊस, 54-ए, एम. वसंतजी रोड, गैरअर्जदार अंधेरी-कूर्ला रोड समोर, चकाला, अंधेरी (पूर्व) मुंबई -400 093 3. व्यवस्थापक, नॅशनल इश्योरन्स कंपनी लि. नगीना घाट रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एच.आर.जाधव गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकिल - अड.रियाजउल्लाखॉ. निकालपञ (द्वारा - मा.सतीश सामते, अध्यक्ष (प्र.)) गैरअर्जदार पॅरामाऊंट हेल्थ सर्व्हीसेस व नॅशनल इन्शूरन्स कंपनी यांच्या सेवेच्या ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे आपली तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांनी त्यांचे कूटूंबासाठी मेडीक्लेम पॉलिसी त्यांचे नांव हॉस्पीटेलायझेशन आणि डोमिसीलीअरी हॉस्पीटेलायझेशन बेनिफिट पॉलिसी असे आहे त्या पॉलिसीचा नंबर 27220000/48/05/8500000975 असा असून दि.22.8.2005 ते 21.8.2006 या कालावधीसाठी डॉ.मारोती नरवाडे यांचे नांवे घेतली. काही दिवसानंतर अर्जदाराचे पती डॉ.मारोती नरवाडे जे स्वतः डॉक्टर होते ते आजारी पडले. परंतु उपचार घेत असताना दूर्दैवाने दि.28.04.2006 रोजी त्यांचा मृत्यू झाला. पूढील सर्व विधी पार पडल्यानंतर अर्जदार यांनी मेडीक्लेम मिळण्यासाठी गैरअर्जदार यांना सूचना दिली व त्याप्रमाणे क्लेम फॉर्म, दि.1.6.2006 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे दिला व आजारपणात आलेला खर्च रु.91,416/- मागितला. अर्जदाराने क्लेम फॉर्म सोबत रुग्णालयाने पूरवलेले सर्व मूळे कागदपञ, मृत्यू प्रमाणपञ,एशीयन इन्स्टीटयूट ऑफ गॅस्ट्रोएन्ट्रॉलाजी हैद्राबाद यांनी दिलेला फॉर्म भरुन क्लेम फॉर्म सोबत सादर केला, वारसा प्रमाणपञ, वारसा ओळखपञ, हॉस्पीटलचे इनडोअर केसपेपर इत्यादी पेपर सादर केले. तरी त्यांनी क्लेम देण्यास टाळाटाळ केली. या कृत्यास कंटाळून गैरअर्जदार यांना दि.3.5.2008 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली व यांस पञ म्हणून त्यांने काही कागदपञाची मागणी केली. अर्जदार यांनी आवश्यक ती सर्व कागदपञे दिलेली आहेत. त्यामूळे गैरअर्जदार हे क्लेम देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अर्जदार यांची मागणी आहे की, रु.1,13,356/- मेडीक्लेम बाबत व त्यावर दि.01.06.2006 रोजी पासून व्याज मिळावे अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र. 3 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले म्हणणे दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार ही मूदतीत नाही. म्हणून ती फेटाळण्यात यावी असा आक्षेप घेतला आहे. मेडीक्लेमसाठी लागणारी सर्व कागदपञ बरोबर दाखल केलेली नाहीत, त्यांचे तक्रारीत ञूटी आहे. अर्जदाराचा मृत्यू कसा झाला यांचा तपशीलवार माहीती दिलेली नाही म्हणून दि.6.11.2006 रोजी पॅरामाऊंट हेल्थ सर्व्हीस यांनी अर्जदाराचा क्लेम नामंजूर केला तो योग्य आहे असे म्हटले आहे. त्यामूळे अर्जदार यांनी मेडीक्लेमची रक्कम रु.1,13,356/-देणे गैरअर्जदार क्र.3 यांना मान्य नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 3 शी थेट संपर्क साधलेला नाही. गैरअर्जदार क्र.3 जबाबादार नाही म्हणून तक्रार अर्ज खारीज करावा अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र. 3 यांनी पूरावा म्हणून त्यांचे शपथपञ दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार यांची तक्रार मूदतीत आहे काय होय. 2. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय होय. 3. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 व 2 ः- गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे गैरअर्जदार क्र. 3 याचे सर्व्हीसे एजंट आहेत व पूर्ण क्लेम वीषयीचे प्रपोजल ते हाताळतात व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे मार्फतच क्लेम प्रपोजल गैरअर्जदार क्र. 3 यांचेकडे पाठविले जातात. अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात दि.1.6.2006 रोजी मेडीक्लेम प्रपोजल आवश्यक त्या सर्व कागदपञासह दाखल केलेले आहे असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 3 यांनी आपल्या लेखी म्हणण्यात अर्जदाराचा क्लेम गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी दि.6.11.2006 रोजी नामंजूर केलेला आहे व तो योग्य आहे असे म्हटले आहे. क्लेम नामंजूर केल्याची दिनांक लक्षात घेतल्यास ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार अर्जदार यांनी आपली तक्रार क्लेम नाकारल्याच्या दिनांकापासून म्हणजे कॉज ऑफ अक्शन पासून दोन वर्षापर्यत यानुसार दि.6.11.2008 पर्यत अर्जदार ही आपली तक्रार दाखल करु शकतात. तक्रार ही दि.14.8.2008 रोजी दाखल केलेली आहे म्हणजे अजूनही तक्रार दाखल करण्यास दोन महिन्याचा अवधी आहे. त्याआधी तक्रार दाखल असल्याकारणाने ती मूदतीत आहे. म्हणून गैरअर्जदार यांचा आक्षेप फेटाळण्यात येतो. अर्जदार यांनी आपल्या मेडीक्लेम प्रपोजल गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्याकडे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी मेडीकार्ड मेंबर्स गाईड, प्रोव्हाईडेड लिस्ट, त्यांना पाठविली व अर्जदार यांना मिळाल्याची नोंद केली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 3 यांचे नांव असलेला मेडीक्लेम प्रपोजल फॉर्म जो की पूर्णतः भरला आहे. त्यासंबंधी अनाक्सर ए प्रमाणे, क्लेम पेपर्स, एशियन इन्स्टीटयूट हैद्राबाद यांचे डिसचार्ज बिल व झालेल्या हॉस्पीटलच्या खर्चाचे बिले, दाखल केलेली आहेत. नॅशनल इन्शूरन्स कंपनी लि. यांनी जारी केलेले आय कार्ड हे ही अर्जदाराने दाखल केलेले आहे. एशीयन इस्टीटयूट हैद्राबाद यांचे दि.15.4.2006 चा मृत्यू रिपोर्ट अर्जदाराने दाखल केलेला आहे. यावर CIRRHOSIS OF LIVER, RENAL INSUFFICIENT AND CARDIOPAFFLY ARREST. हे मूत्यूचे कारण दाखवलेले आहे. तो डेथ रिपोर्ट अर्जदाराने दाखल केलेला आहे. तसेच महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम 1976 नमूना नंबर 18 (नियम 9) प्रमाणे तसेच तरोडा ग्रामपंचायत यांनी जारी केलेला मृत्यू दाखला प्रमाणपञ हे ही दाखल केलेले आहे. हॉस्पीटलचा पूर्ण खर्चाचा तपशील रु.91,616/- चा दि.15.4.2006 ते दि.28.4.2006 पर्यतचा अर्जदाराने दाखल केलेला आहे. दि.4.10.2006 , दि.30.10.2006 गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेशी केलेला पञव्यवहार दाखल केलेला आहे. एवढे सर्व कागदपञ उपलब्ध असताना व मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट असताना गैरअर्जदार यांनी आणखी पूरेशी कागदपञ दयावे ही मागणी केली ती चूक आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी History of Investigation report अर्जदार यांनी मागितलेला आहे. जो की अनावश्यक आहे. अशा रोगासंबंधी प्रिव्हीयस हीस्टरी नसेल तर अर्जदार ती कोठून देणार व यात काही मयताने लपविले आहे असे वाटत नाही. किंवा तसा गैरअर्जदार यांचा आक्षेपही नाही. त्यामूळे सदरची मागणी ही चूक स्वरुपाची आहे. जेव्हा हॉस्पीटलचे कागदपञ उपलब्ध आहेत व मृत्यूचे कारण स्पष्ट आहे तेव्हा डॉक्टरच्या वेगळया पञाची आवश्यकता नाही, ही त्यांची मागणी देखील चूक आहे. गैरअर्जदार हे विनाकारण वेळ काढत आहेत असे दिसते. अर्जदार यांनी दि.3.5.2008 रोजी जी कायदेशीर नोटीस पाठविली त्यांस गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी दि.23.5.2008 ला उत्तर दिलेले आहे व जे कागदपञ दाखल केलेले आहेत त्यांच कागदपञाची परत मागणी केलेली आहे असे करणे क्लेम न देणे म्हणजे सेवेतील ञूटी आहे. अर्जदार यांनी जी रक्कम मागितली त्यांस गैरअर्जदार यांनी आक्षेप घेतलेला नाही. गैरअर्जदार क्र. 3 आपल्या लेखी म्हणण्यात गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी दि.6.11.2006 रोजी अर्जदाराच्या क्लेम नामंजूर केला व ते योग्य आहे असे म्हटले आहे. अर्जदाराचा मृत्यू कसा झाला यांची सविस्तर माहीती दिलेली नाही असा आक्षेप घेतला आहे. यांचा अर्थ गैरअर्जदार क्र.3 यांना या प्रपोजल वीषयी पूर्ण माहीती आहे व ते प्रपोजल त्यांच्याकडे आले होते. कारण याशिवाय ते असे म्हणून शकत नाहीत. गैरअर्जदार क्र. 3 हे जरी म्हणत असले की क्लेम प्रपोजल आम्हाला मिळाले नाही हे चूक आहे. कारण क्लेम फॉर्म हा त्यांच्या मार्फतच गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना पाठविला आहे. शिवाय क्लेम फॉर्म प्रपोजल वर गैरअर्जदार क्र. 3 यांचे नांव आहे म्हणून ते आपली जबाबदारी टाळू शकत नाहीत. शिवाय गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे त्यांचे सर्व्हीस एजंट आहेत म्हणून क्लेम फॉर्म हे गैरअर्जदार क्र. 3 यांना मिळाला आहे किंबहूना तो गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडून त्यांना प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र. 1, 2 व 3 यांनी एकञितरित्या व संयूक्तीकरित्या अर्जदार यांना मेडीक्लेमची रक्कम त्यांनी क्लेम फॉर्ममध्ये मागितल्याप्रमाणे रु.91,416/- व क्लेम नाकारल्याची दि.6.11.2006 पासून 9 टक्के व्याजाने दयावेत, असे न केल्यास दंडणीय व्याज म्हणून 12 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह अर्जदारास दयावेत. 3. अर्जदाराची मानसिक ञासापोटीची मागणी नसल्या कारणाने ती देण्यात येत नाही. 4. दावा खर्चाबददल रु.2,000/- देण्यात यावेत. 5. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते सदस्या अध्यक्ष (प्र.) जे. यु. पारवेकर लघूलेखक |