निकालपत्र
(द्वारा- मा.अध्यक्षा - सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदार यांनी त्यांच्या मयत पतीच्या विमा पॉलिसीची रक्कम मिळण्याकामी सामनेवाले यांच्याविरुध्द सदरचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केला आहे.
(२) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारादार या जुने भामपुर ता.शिरपुर.जि.धुळे येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. शिरपुर विधानसभा मतदारसंघातील रसिकलाल फौंडेशनचे माध्यमातून संपूर्ण मतदारांचा विमा सामनेवाले विमा कंपनीकडून काढण्यात आला आहे. त्यास पॉलिसी क्रमांक ४५१७०१/४७/०८/६१/००००००७३ असा देण्यात आला आहे. सदर पॉलिसीतील अटी-शर्ती प्रमाणे जर कोणत्याही मतदाराचे निधन झाले तर, रु.२५,०००/- देण्याचे अभिवचन सामनेवाले विमा कंपनीने दिलेले आहे. तक्रारदार यांच्या पतीचा दि.१२-०९-२००९ रोजी अपघातात मृत्यु झालेला आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी रसिकलाल पटेल फौंडेशन व आमदार कार्यालयाशी संपर्क साधला व विमा कंपनीला आवश्यक असणा-या सर्व कागदपत्रांची पुर्तता केली. तसेच नुकसान भरपाई मिळासाठी सामनेवाले विमा कंपनीकडे अर्ज केला. त्याप्रमाणे सामनेवाले क्र.१ यांनी नुकसान भरपार्इची रक्कम दिली नाही व त्याबाबत उत्तर दिले नाही. म्हणून दि.२९-११-२०१० रोजी सामनेवाले क्र.१ यांना पत्र पाठविले. परंतु त्याप्रमाणे सामनेवाले यांनी नुकसान भरपाई दिलेली नाही. म्हणून सदरचा अर्ज या मंचात दाखल करावा लागला आहे.
तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांच्याकडून नुकसान भरपाई रक्कम रु.२५,०००/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.२५,०००/- व अर्जाचा खर्च रु.५,०००/- व्याजासह मिळावेत.
तक्रारदार यांनी सदर अर्जासोबत नि.नं. ३ वर शपथपत्र, नि.नं.१० वरील दस्तऐवज यादी सोबत फिर्याद, पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, मतदार यादी व पत्र असे एकूण सात कागदपत्र छायांकीत स्वरुपात दाखल केले आहेत.
(३) सामनेवाले क्र.१ यांनी नि.नं. २४ वर खुलासा दाखल केला आहे. त्यात त्यांनी सदरचा अर्ज नाकारला असून असे नमूद केले आहे की, तक्रारदार यांनी त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर विमा क्लेम हा संबंधीत शाखेत सादर केलेला नाही व आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता केलेली नाही. सदर प्रकरण सामनेवाले यांच्याकडे कधीही सादर न झाल्याने त्याबाबत कुठलाही निर्णय घेण्याचा प्रश्न उदभवलेला नाही. तक्रारदार यांनी क्लेम सादर न केल्याने तो सामनेवाले यांनी नाकारलेला नाही. त्यामुळे सदर तक्रार ही प्रि-मॅच्युअर असून सदर तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. सबब सदर तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केलेली आहे.
सामनेवाले यांनी त्यांच्या खुलाशासोबत प्रतिज्ञापत्र आणि दस्तऐवज यादीसोबत अटी-शर्ती व पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
(४) सामनेवाले क्र.२ हे वकीलामार्फत प्रकरणात हजर आहेत. तथापि त्यांनी मुदतीत त्यांचा खुलासा दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द नि.नं.१ वर “म्हणणे दाखल नाही” असा आदेश करण्यात आला आहे.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार या सामनेवाले यांच्या ग्राहक आहेत काय ? | : होय |
(ब)सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ? | : नाही |
(क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
| |
विवेचन
(५) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार या जुने भामपुर ता.शिरपुर.जि.धुळे येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. शिरपुर विधानसभा मतदार संघातील रसिकलाल फौंडेशनचे माध्यमातून संपूर्ण मतदारांचा विमा सामनेवाले विमा कंपनीकडून काढण्यात आला आहे. त्याचा पॉलिसी क्रमांक ४५१७०१/४७/०८/६१/००००००७३ असा आहे. सदर बाब सामनेवाले यांनी नाकारलेली नाही. याचा विचार होता तक्रारदार या मयताच्या कायदेशीर वारसदार पत्नी म्हणून सामनेवालेंच्या “ग्राहक” असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(६) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांच्या पतीचे दि.१२-०९-२००९ रोजी नगर मनमाड रोडवर रस्ता अपघातात निधन झाले आहे. त्याबाबत संबंधीत पोलीस स्टेशनला नोंद केलेली आहे. त्याची फिर्याद, घटनास्थळाचा पंचनामा, पि.एम.रिपोर्ट प्रकरणात दाखल आहे. सदर मयताची शिरपुर मतदार संघातून आमदार विमा पॉलिसी उतरविण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे नुकसान भरपाई मिळण्याकामी रसिकलाल पटेल फौंडेशन, आमदार कार्यालय यांच्याकडे सर्व कागदपत्रे दाखल केली आहेत. परंतु सामनेवाले क्र.१ विमा कंपनीने नुकसान भरपाईची पुर्तता केलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांना दि.२९-११-२०१० रोजी लेखी पत्र पाठविले आहे. सदरचे पत्र नि.नं.६/६ वर दाखल केलेले आहे. सदर पत्र पाहता असे दिसते की, तक्रारदार यांनी विमा क्लेमसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आमदार कार्यालयात सादर केलेली आहेत. परंतु तक्रारदारांनी विमा क्लेम मिळण्याकामी विमा कंपनीकडे विमा क्लेम फॉर्म सादर केलेला नाही हे स्पष्ट होत आहे.
या बाबत सामनेवाले क्र.१ यांनी पोष्टाद्वारे मंचात दि.०१-०३-२०११ रोजीचे पत्र पाठविले आहे. सदर पत्र हे सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांना पाठविलेले असून यामध्ये तक्रारदार यांनी विमा क्लेम मिळण्याकामी आवश्यक असलेली कागदपत्रे त्यांना पाठविलेली नाहीत, तसेच जर पाठविलेली असल्यास त्याची छायांकीत प्रत व कोणत्या दावा क्रमांकासोबत पाठविले आहे याचा संदर्भ मागितलेला आहे, असा आशय पत्रात नमूद केलेला आहे. या पत्राप्रमाणे असे दिसते की, सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदाराकडे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची मागणी केलेली आहे. तक्रारदार यांनी आवश्यक असलेला विमा क्लेम सामनेवालेंकडे केलेला नसून त्याकामी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची मागणी केली आहे. परंतु या पत्राप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. १ यांना कोणतेही लेखी उत्तर दिलेले नाही. तसेच त्या पत्राप्रमाणे कोणतीही कागदपत्रांची पुर्तता केलेली दिसत नाही व तशी पुर्तता न करता तक्रारदार यांनी सदर मंचामध्ये सामनेवालें विरुध्द तक्रार दाखल केल्याचे दिसत आहे.
तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, दि.२९-११-२०१० चे पत्राप्रमाणे सामनेवाले यांनी विमा क्लेम मंजूर करुन नुकसान भरपाई द्यावी. परंतु सामनेवाले यांनी असा बचाव घेतला आहे की, त्यांच्याकडे तक्रारदारांनी विमा क्लेम दाखल केलेला नाही. याबाबत आमचे असे मत आहे की, तक्रारदार यांनी त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाल्यानंतर विमा पॉलिसीच्या अटी-शर्ती प्रमाणे सामनेवाले विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळणेकामी आवश्यक त्या कागदपत्रांसह विमा कालावधीत विमा क्लेम सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर सामनेवाले विमा कंपनीने सदर क्लेमची छाणणी करुन, क्लेमबाबत पुढील कारवाई करणे आवश्यक आहे. याप्रमाणे सदर विमा क्लेम मंजूर अथवा नामंजूर करण्याची प्रक्रिया करावयाची असते. परंतु तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे क्लेम सादर केला नसल्यामुळे, सामनेवाले यांच्याकडून सदर पक्रिया झालेली नाही. त्यामुळे सामनेवालेंकडे विमा क्लेम सादर न केल्याने सामनेवाले यांनी संबंधित दावा मंजूर किंवा नामंजूर करण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असे स्पष्ट होते. सदर क्लेम सामनेवालेंकडे सादर न केल्याने सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता असण्याचा प्रश्न उदभवत नाही. त्यामुळे सामनेवालेंच्या सेवेत त्रुटी आढळून येत नाही.
ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे, जर सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता असेल तर ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्याचा हक्क तक्रारदारांना प्राप्त होतो. याचा विचार होता सामनेवाले यांच्या सेवत कमतरता नसल्याने, तक्रारदारांना त्यांचे विरुध्द तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण घडलेले नाही असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘क’’ – उपरोक्त सर्व विवेचनाचा विचार होता न्यायाचे दृष्टीने खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांक : २४-०७-२०१४