(घोषित दि. 23.11.2012 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांची तक्रार अशी आहे की, तक्रारदारांचे पती श्री. गोविंदराव लक्ष्मणराव उफाड हे शासकीय कर्मचारी असून दिनांक 30.04.2011 रोजी झालेल्या मोटार सायकलच्या अपघातात गंभीर जखमी होवून मृत्यू पावले. अपघाता नंतर संबंधित पोलीस स्टेशनला माहीती मिळताच त्यांनी ए.डी.नंबर 20/2011 दाखल केली. घटनास्थळ पंचनामा, इनव्हेस्ट पंचनामा करुन साक्षीदारांचे जबाब घेतले.
तक्रारदारांचे पतीनी बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेकडून कर्जाऊ रक्कम घेतली होती. पतसंस्थेने खातेदारांकरीता जनता अपघात विमा पॉलीसी गैरअर्जदार विमा कंपनीकडून घेतल्याची माहीती तक्रारदारांना मिळाली. तक्रदारांच्या पतीच्या मृत्यूनंतर तक्रारदारांनी सदर पतसंस्थेची कर्जाची थकबाकी रक्कम पूर्णत: भरणा केली, त्याप्रमाणे पतसंस्थेने “Nil Certificate” दिले आहे.
तक्रारदारांनी बालाजी पतसंस्थे मार्फत गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा प्रस्ताव पाठवला असता गैरअर्जदार कंपनीने दिनांक 29.11.2011 रोजी तक्रारदारांनी सेटल केल्याचे कारणास्तव प्रस्ताव परत पाठवला अशी तक्रारदाराची तक्रार आहे.
गैरअर्जदार विमा कंपनीच्या म्हणण्यानूसार गैरअर्जदार कंपनीने तक्रारदारांच्या पतीच्या कर्जाऊ रकमेची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे तक्रारदारांचे पतीच्या निधनानंतर उर्वरीत थकबाकीची रक्कम पतसंस्थेकडे भरणा करण्याची गैरअर्जदार विमा कंपनीची जबाबदारी आहे. तक्रारदारांनी दिनांक 29.11.2011 रोजी थकबाकीची रक्कम भरणा केली आहे. त्यानंतर विमा प्रस्ताव गैरअर्जदार यांचेकडे पाठविण्यात आला. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांच्या प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही केली नाही. गैरअर्जदार नूकसान भरपाईची रक्कम देण्यास तयार आहे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.पी.एम.परिहार यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. गैरअर्जदार यांचे विद्वान वकील श्री.आर.यु.बनछोड यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला.
तक्रारदाराचे पती श्री.गोविंदराव लक्ष्मणराव उफाड यांचे दिनांक 03.05.2011 रोजी अपघाती निधन झाल्याचे तक्रारीत दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. तक्रारदारांचे पतीनी बालाजी पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाऊ रकमेची जनता अपघात विमा पॉलीसी गैरअर्जदार यांचेकडून घेतली होती. तक्रारदारांना सदर विमा पॉलीसी बाबत माहीती मिळाल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा प्रस्ताव दाखल केला.
गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यानूसार तक्रारदारांच्या पतीच्या निधनानंतर उर्वरीत थकबाकीची रक्कम पतसंस्थेकडे भरणा करण्याची जबाबदारी होती. तक्रारदारांनी दिनांक 29.11.2011 रोजी सदर रक्कम भरणा केल्यानंतर विमा प्रस्ताव गैरअर्जदार यांचेकडे पाठवला आहे. गैरअर्जदार नुकसान भरपाईची रक्कम देण्यास तयार आहेत. बालाजी पतसंस्थेच्या दिनांक 22.11.2011 रोजीच्या पत्रानूसार तक्रारदारांना गैरअर्जदार यांनी नूकसान भरपाईचा धनादेश देण्यास कोणतीही हरकत नसल्याचे नमूद केले आहे.
तक्रारीतील कागदपत्रानूसार तक्रारदार सदर योजने अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार विमा कंपनीने प्रस्ताव दाखल झाल्यानंतर कोणतीही कार्यवाही न करता प्रलंबित ठेवून त्रुटीची सेवा दिली आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदारांना जनता अपघात पॉलीसी अंतर्गत देय असलेली नूकसान भरपाईची रक्कम रुपये 1,00,000/- प्रस्ताव दाखल तारखे पासून 05/12/2011 द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दरासहीत देणे योग्य आहे. असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
- गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना जनता अपघात विमा पॉलीसी अंतर्गत देय असलेली नूकसान भरपाईची रक्कम रुपये 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त.) दिनांक 05.12.2011 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दरासहीत द्यावी.
- खर्चा बाबत आदेश नाही.