जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक :135/2012
तक्रार दाखल दिनांक:21/06/2012
तक्रार आदेश दिनांक :05/07/2013
निकाल कालावधी:01वर्ष0महिना14दिवस
श्री.प्रकाश हरीबा काळे
वय 60 वर्षे धंदा कांही नाही
रा.खेड पो.केगांव ता.उ.सोलापूर जि.सोलापूर. ......तक्रारदार
विरुध्द
1) व्यवस्थापक,
परिवहन उपक्रम व वाहन व्यवहार
सोलापूर महानगरपालिका, सात रस्ता,सोलापूर.
2) मा.आयुक्त,
सोलापूर महानगरपालिका, सोलापूर. ......सामनेवाला नं.1व2
गणपुर्ती :- श्री.दिनेश रा.महाजन, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदारतर्फेअभियोक्ता: श्री.एस.एस.मचाले
सामनेवाला तर्फे अभियोक्ता :श्री.ए.एम.गोरे
निकालपत्र
श्री.दिनेश रा.महाजन, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी त्रुटीयुक्त सेवा दिल्यामुळे न मिळालेली भविष्य निधीची रक्कम व्याजासह परत मिळावी व नुकसान भरपाई मिळावी यासाठी दाखल केली आहे.
2. तक्रारदाराचे अर्जातील थोडक्यात कथन असे की, तक्रारदार हे सामनेवाला नं.1 या खात्याकडे वाहक म्हणून कायमस्वरुपी नोकरीस होते. व दिनांक 31/05/2011 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. सामनेवाला नं.1 हे सामनेवाला नं.2 यांचे अधिपत्याखाली कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या सेवानिवृत्तीचे वेळी त्यांचे भविष्य निर्वाह निधीच्या वैयक्तिक खात्यात रक्कम रु.2,42,957/- शिल्लक होती व ती सामनेवाला नं.1 यांचेकडून देय होती.
(2) 135/2012
3. सदरची रक्कम तक्रारदारास न मिळाल्याने सदरची रक्कम व त्यावर द.सा.द.शे 18 टक्के व्याज देण्याचा सामनेवाला यांचेविरुध्द आदेश होण्यासाठी तसेच त्रुटीयुक्त सेवा दिल्याबद्दल रु.10,000/- नुकसान भरपाई मिळणेसाठी सदरची तक्रार दाखल केली आहे.
4. सामनेवाला यांनी तक्रारदार त्यांचेकडे वाहक म्हणून नोकरीस होता ही बाब नाकारली नाही. परंतू तक्रारदार व सामनेवाला यांचेतील नातेसंबंध मालक व नोकर असे होते. व ग्राहकाचे नव्हते, त्यामुळे सदरचे प्रकरण दिवाणी, सहकार व कामगार न्यायालयाचे कार्यक्षेत्रात येत असल्याने या न्यायालयास प्रकरण दाखल करणेचा व चालवण्याचा हक्क व अधिकार नाही. तसेच तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडले नाही, तक्रार मुदतबाहय आहे या कारणास्तव तक्रार रद्द करण्याची मागणी केली आहे.
5. सामनेवाला यांचे म्हणण्याप्रमाणे सेवानिवृत्तीनंतरच्या काळात भविष्य निर्वाह निधीची रक्कम हप्त्या हप्त्याने दिलेली आहे. तक्रारदाराचे सेवानिवृत्तीचे वेळी त्यांचे भविष्य निर्वाह निधी खात्यात रक्कम रु. 2,42,957/- एवढी रक्कम शिल्लक होती हे सामनेवाला यांनी नाकारले आहे. तसेच या रक्कमेपोटी तक्रारदारास रक्कम रु.15,000/- दि.07/05/2012 चा धनादेश क्र.138393 हा दिलेला असूनही तक्रारदराने जाणून बुजून त्याबाबत अर्जात नमुद केलेले नाही. सामनेवाला यांचे कथनानुसार सामनेवाला नं.1 ही संस्था गेल्या 10 वर्षापासून आर्थिक संकटात सापडल्याने त्यांना त्या काळात कर्मचा-यांना वेळेवर पगार देता आला नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराची रक्कम जाणीवपूर्वक आडविलेली नाही. म्हणून सामनेवाला यांनी सेवेमध्ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. सबब तक्रारदाराचा अर्ज निकाली करणेची विनंती सामनेवालांनी केलेली आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, तक्रारदाराने दाखल केलेली कागदपत्रे, तक्रारदारानी दाखल केलेला लेखी युक्तीवाद, सामनेवाला यांचे लेखी बयाण,लेखी युक्तीवाद व कागदपत्रे इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले, त्याचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1. सामनेवाला यांनी त्रुटीयुक्त सेवा दिली आहे का ? होय
2. तक्रारदार भविष्य निर्वाह निधीची थकीत रक्कम
मिळणेस पात्र आहे का ? होय
3. काय आदेश ? अंतीम आदेशाप्रमाणे
(3) 135/2012
निष्कर्ष
7. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार हे सामनेवाला नं.1 या संस्थेत वाहक म्हणून कायमस्वरुपी नोकरीस होते व दि.31/05/2011 रोजी सेवानिवृत्त झाले. तसेच सामनेवाला नं.1 ही संस्था/ खाते सामनेवाला नं.2 यांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे याबाबत विवाद नाही. तक्रारदाराने तक्रार दाखल करतांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम रु.2,42,957/- सामनेवालाकडे येणे होती असा उल्लेख केला आहे. परंतू तक्रारदार यांचे विधिज्ञांनी दाखल केलेल्या लेखी युक्तीवादात दि.07/05/2012 चा रक्कम रु.15,000/- चा धनादेश सामनेवाला नं.1 कडून मिळाल्याचे कबूल केले असून थकीत रक्कम रु.2,27,957/- बाबत आदेश पारीत होण्याची विनंती केलेली आहे. सामनेवाला यांनी मुळ थकीत रक्कम रु.2,42,957/- नाकारली आहे व वेळोवेळी ती रक्कम परत केल्याचा उल्लेख केला आहे.
8. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे माहितीचा अधिकार कायद्याखाली देय रक्कमेबाबत माहिती मागविली होती, त्यावेळी सामनेवाला नं.1 चे जनमाहिती अधिकारी यांनी दि.27/04/2012 रोजी पत्र पाठवून भविष्य निर्वाह निधीची रक्कम रु.2,42,957/- देय असल्याचे कळविले होते. त्यानंतर दि.20/06/2012 रोजी तक्रारदार यांनी सदरची तक्रार या मंचासमोर दाखल केली. सामनेवाला यांचे कैफियतीत नमूद केल्याप्रमाणे दि.07/05/2012 चा 15,000/- रुपयाचा धनादेश तक्रारदार यांना तक्रार दाखल केल्यानंतर मिळाला असावा म्हणून त्याबाबतचा उल्लेख तक्रारीत नाही. परंतू त्यांचे विधिज्ञांनी लेखी युक्तीवादात सदरची रक्कम कबूल केली आहे. सामनेवाला यांनी त्यापूर्वी किंवा त्यानंतर भविष्य निर्वाह निधीच्या थकीत रक्कमेपैकी काही रक्कम दिली असल्यास त्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही. सामनेवाला नं.1 यांचे जनमाहिती अधिकारी यांचे दि.27/04/2012 चे पत्राप्रमाणे त्यादिवसापर्यंत तक्रारदाराची रक्कम रु.2,42,957/- सामनेवाला यांचेकडे देय होती. 15,000 रुपये वजा जाता सामनेवाला यांचेकडे रक्कम रु.2,27,957/- आजही देय आहे. सामनेवाला ही संस्था गेल्या 10 वर्षापासून आर्थिक संकटात आहे. म्हणून रक्कम देऊ शकली नाही हे स्विकारता येत नाही. तक्रारदार दि.31/05/2011 रोजी निवृत्त झाल्यानंतर त्यांची संपुर्ण रक्कम परत करणे आवश्यक होते. त्यामुळे सामेनवाला नं.1 व 2 यांनी त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे हे सिध्द होते. थकीत रक्कमेवर कमीतकमी द.सा.द.शे 9 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहे. तसेच सदरच्या तक्रारी खर्चापोटी काही रक्कम देणे योग्य वाटते.
9. सदरची तक्रार रद्द करण्यासाठी सामनेवाला यांनी दिलेली तक्रार मुदतबाहय आहे, तक्रारदार ग्राहक नाही, सदरची तक्रार या न्यायालयाचे कार्यक्षेत्राबाहेर आहे इत्यादी कारणे उचीत नाही. तक्रारदार सामनेवाला यांचे सेवेत असल्याने तो त्यांचा ग्राहक आहे. त्यामुळे तक्रार या न्यायालयाचे कक्षेत आहे. तसेच सेवानिवृत्त झाल्यानंतर दोन वर्षाचे कालावधीत दाखल केली असल्याने ती मुदतीत आहे. सबब तक्रारदार थकीत देय रक्कम मिळणेस पात्र
(4) 135/2012
आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन अंतीम आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. सामनेवाला नं.1 व 2 यांनी तक्रारदार यांच्या भविष्य निर्वाह निधीची थकीत रक्कम 2,27,957/- सेवानिवृत्तीपासून म्हणजे दि.31/05/2011 पासून द.सा.द.शे 9 टक्के व्याजासह परत करावी.
3. तसेच सामनेवाला नं.1 व 2 यांनी सदरच्या तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- तक्रारदारास द्यावी.
4. उपरोक्त आदेशाची पुर्तता सामनेवाला नं.1 व 2 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तीकरित्या या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
5. उभय पक्षकारांना या निकालाची साक्षांकित प्रत नि:शुल्क देण्यात यावी.
6. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दिलेले सदस्यांचे सेट 30 दिवसांचे आत घेऊन जावे अन्यथा सदरचे सेट नष्ट करण्यात येतील.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री.दिनेश रा.महाजन)
सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
--0DPSO0407130----