(घोषित दि. 28.06.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदाराचे पती उध्दव आटोळे यांचा मृत्यू दिनांक 28.05.2011 रोजी आजारपणामुळे झाला. त्यांनी दिनांक 12.03.2009 रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा क्रमांक 95 जे औरंगाबाद येथे 196 योजने अंतर्गत जीवन वर्षा पॉलीसी काढली होती तिचा क्रमांक 985360156 असा होता. या पॉलीसी अंतर्गत त्यांनी रुपये 1,00,000/- चा विमा उतरवलेला होता. तक्रारदारांच्या पतीच्या मृत्यूनंतर तक्रारदारांनी विमा दावा कंपनीकडे दाखल केला. परंतू गैरअर्जदारांनी दिनांक 22.09.2010 रोजी तक्रारदारांनी विमा पॉलीसी पुनरुज्जीवित करताना स्वत:च्या प्रकृतीबाबत खोटी माहिती दिली. या कारणावरुन विमा दावा नामंजूर केला. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांच्या इतर दोन पॉलीसीचा विमा मंजूर केला आहे. परंतू सदर पॉलीसीचा दावा मात्र अयोग्य कारणे देवून नामंजूर केला आहे. म्हणून तक्रारदारांची तक्रार आहे. तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत गैरअर्जदारांनी दावा नाकारल्याचे पत्र, पॉलीसीची प्रत, मृत्यूची खबर, नॉमिनेशन फॉर्म, दवाखान्यातील उपचारा संबंधी प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, स्वत:च्या प्रकृतीबद्दलचे तक्रारदारांचे पॉलीसी पुनरुज्जीवित करताना केलेले निवेदन, कमलनयन बजाज हॉस्पिटलची उपचारा संबंधी कागदपत्रे अशी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदार मंचासमोर हजर झाले. त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या जबाबाप्रमाणे सदरची पॉलीसी हप्ते न भरल्यामुळे रद्द झालेली होती. परंतू पुनरुज्जीवन करुन घेण्याच्या योजने अंतर्गत दिनांक 22.09.2010 रोजी तिचे पुनरुज्जीवन केले गेले व विमा धारक व्यक्ती दिनांक 28.05.2011 रोजी मृत झाली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांतच “दावा नाकारल्याचे पत्र” आहे. त्यावरुन मयताने पॉलीसीचे पुनरुज्जीवन करताना खोटी माहिती दिल्याचे उघड होते. पुनरुज्जीवनाच्या वेळीच विमाधारक व्यक्तीचे प्रकृतीमान सामान्य नव्हते. परंतू ही गोष्ट त्यांनी दडवून ठेवली आहे. मयत उध्दव यांना Cronic lymphocytic leukemia with severe bone marrow depression (C L L) हा आजार एक वर्ष पूर्वी पासून होता असे कमलनयन बजाज हॉस्पिटलच्या कागदपत्रांवरुन दिसते व ही गोष्ट मयत उध्दव यांनी लपविली व पॉलीसीचे पुनरुज्जीवन करुन घेतले. त्यामुळे गैरअर्जदारांनी त्यांचा विमा प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळे सेवेतील कमतरतेचा प्रश्न उदभवत नाही त्यामुळे तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.आर.व्ही.जाधव व गैरअर्जदारांचे विद्वान वकील श्री.एस.बी.किनगावकर यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला.
मयत उध्दव हे एका प्रकारच्या रक्ताच्या कर्करोगाने मरण पावले हे कागदपत्रांवरुन दिसते. यातील हॉस्पिटल ट्रीटमेंट सर्टिफिकेट वर “First time treatment as an out patient oradmission” हि तारीख 14.02.2011 अशी आहे. तर “Date of discharge” 16.02.2011 अशी आहे. गैरअर्जदारांच्या विद्वान वकीलांनी त्या प्रमाणपत्रावरील 5 (c) व (e) कलमांकडे मंचाचे लक्ष वेधले. त्यात मयताला या आजाराची लक्षणे एक वर्षापासून होती असे म्हटले आहे. परंतू मयताने कॅन्सरसाठी पूर्वी कधी कमलनयन हॉस्पिटलमध्ये अथवा इतर कोणत्याही रुग्णालयात उपचार घेतल्याचा कोणताही पुरावा गैरअर्जदारांनी मंचासमोर आणलेला नाही. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन दिनांक 14.02.2011 पूर्वी कधीही मयताला बजाज हॉस्पिटलला उपचारासाठी नेल्याचे दिसत नाही. अशा परिस्थितीत स्वत:च्या प्रकृतीविषयी निवेदन करताना दिनांक 22.09.2010 रोजी मयत उध्दव यांनी तुम्हाला मधुमेह, अंडाशयजलवृध्दी, कर्करोग आहे का ? याचे उत्तर नाही लिहीले आहे व सध्याचे प्रकृतीमान चांगले आहे असे लिहीले होते. म्हणजे आपला आजार त्यांनी लपवून ठेवला होता असे म्हणणे योग्य ठरणार नाही. दाखल कगदपत्रांवरुन कोठेही मयत उध्दवला स्वत:ला कॅन्सर झाला आहे याची जाणीव होती असे दिसत नाही.
मयत उध्दवला ल्युकेमिया झालेला आहे असे निदान करणारे मयताचे रक्त तपासणी अहवाल, औषधोपचाराची यादी इत्यादी कमलनयन बजाज हॉस्पिटलची कागदपत्रे दिनांक 14.02.2011 ची आहेत. त्यात डॉक्टरांनी 1 वर्षापासून त्याला हा आजार होता असे लिहीले असले तरी त्या कागदांवरुन या आजाराची मयताला कल्पना होती अथवा त्यासाठी दिनांक 14.02.2011 पूर्वी त्याने उपचार घेतले होते ही गोष्ट सिध्द होत नाही. त्यामुळे मयताला पॉलीसीचे पुनरुज्जीवन करण्याआधी पासूनच कॅन्सर झालेला होता व मयताने आपल्या आजाराची माहिती जाणीपूर्वक लपवून ठेवली हे गैरअर्जदार सिध्द करु शकलेले नाहीत असा निष्कर्ष मंच काढत आहेत. विमा अटींचा भंग केला असे कारण दाखवून गैरअर्जदारांनी तक्रारदारांचा विमा प्रस्ताव नाकारला ही सेवेतील त्रुटी आहे आणि तक्रारदार तिच्या पतीच्या मृत्यूमुळे विमा पॉलीसी क्रमांक 985360165 अंतर्गत विमा रक्कम रुपये 1,00,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाला वाटते.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारास विमा रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) हा आदेश प्राप्त झाल्यापासून तीस दिवसांच्या आत द्यावेत.
- गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारास वरील रकमेवर दावा नाकारल्याच्या दिवसा पासून (दिनांक 29.02.2012) तक्रारदारास रक्कम प्राप्त होईपर्यंत 9 टक्के दाराने व्याज द्यावे.
- खर्चाबद्दल आदेश नाही.