(घोषित दि. 26.02.2013 व्दारा श्रीमती नीलीमा संत, अध्यक्ष)
शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई रुपये 50,000/- मिळण्यासाठीचा हा अर्ज आहे.
तक्रारदार आप्पासाहेब धोंडीबा कोरडे यांना दिनांक 01.03.2008 ला वाहन अपघात होवून 80 टक्के अपंगत्व आले. म्हणून शेतकरी विमा योजने अंतर्गत रुपये 50,000/- मिळण्यासाठी त्यांनी हा अर्ज केला आहे. अर्जासोबत त्यांनी एफ.आय.आर, घटनास्थळाचा पंचनामा आणि इतर कागदपत्रे तसेच 7/12 उतारा, व 8 अ प्रमाणपत्र, जमिनीचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र या गोष्टी दाखल केल्या. त्याच प्रमाणे शस्त्रक्रिया करताना उजव्या पाय गुडघ्याच्यावरुन कापावा लागला हे दाखविणारे वैद्यकीय कागदपत्र देखील दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 मंचासमोर हजर झाले. गैरअर्जदार क्रमांक 1 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस प्रा.लि. यांनी मंचासमोर लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यात त्यांनी स्वत: विमा प्रस्ताव दिनांक 08.07.2008 ला पोहोचल्याचे मान्य केले आहे. परंतू त्यात काही कागदपत्र अपूर्ण होती त्यांची मागणी करुन त्यांनी स्वत: दावा गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी प्रा.लि. यांच्याकडे पाठवला.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी मंचासमोर हजर होवून म्हणणे मांडले की त्यांना संपूर्ण कागदपत्रासह दावा मिळालेला नाही. तसेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र, शरीराचा भाग काढून टाकल्याचे प्रमाणपत्र, जमिनीचा फेरफार, इत्यादी कागदपत्र दाव्याबरोबर नव्हते. सबब तक्रार नामंजूर करावी अशी मागणी केली.
मंचाने अर्जदाराचे वकील श्री.आर.व्ही.जाधव तसेच गैरअर्जदार 2 यांचे वकील श्री.पी.एम.परिहार यांचा युक्तीवाद ऐकला. अर्जदाराच्या वकीलांनी अपंगत्व प्रमाणपत्र (झेरॉक्स प्रत) मंचासमोर दाखल केले. त्याची प्रत गैरअर्जदाराचे वकीलांना दिली. मुळ प्रमाणपत्र मंचाने बघितले.
वरील सर्व पुराव्यावरुन मंच खालील निष्कर्ष काढत आहे. अर्जदार आप्पासाहेब यांना दिनांक 01.02.2008 ला वाहन अपघात झाला. त्यात त्यांना 80 टक्के अपंगत्व आले. अर्जदार शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ धारक होता. इत्यादी गोष्टी अर्जदाराने सिध्द केलेल्या आहेत. त्यामुळे तो विमा रकमेस पात्र आहे, परंतू त्यावरील व्याज मिळण्यास तो पात्र नाही. कारण अपंगत्वाचे प्रमाणपत्र अर्जदाराने युक्तीवादाचे वेळी दाखल केले. त्याबाबत अर्जदाराला विलंब झाला आहे. म्हणूनच अर्जदार हे मानसिक अथवा शारीरीक त्रासासाठी कोणत्याही रकमेस पात्र नाही असे मंचाचे मत आहे. म्हणून अर्जदाराला केवळ रुपये 50,000/- ही विमा रक्कम देणे उचित होईल असे मंचाला वाटते.
आदेश
- अर्जदाराचा अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदारास विमा रक्कम रुपये 50,000/- (रुपये पन्नास हजार फक्त.) आदेश मिळाल्या पासून 30 दिवसाच्या आत अदा करावी.
- खर्चा बद्दल आदेश नाही.