न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदार यांचा सोडा विक्रीचा व्यवसाय असून सदर व्यवसाय करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. तक्रारदार यांनी एप्रिल 2015 मध्ये वि.प.क्र.1 यांचेकडे वि.प.क्र.2 कंपनीचे सोडा फिलींग मशिन व कार्बोनेटर अशा मशिनरी खरेदीबाबत मागणी केली. तक्रारदारांनी सदर मशिन खरेदीसाठीची रक्कम दि. 31/3/2015 रोजी रु. 3,78,000/- व दि. 15/4/2015 रोजी रु.17,65,000/- रोजी डीमांड ड्राफ्टद्वारे अदा केली आहे. परंतु मशिनरी प्लॅंट व इन्स्टॉलेशन करणेस वि.प. हे टाळाटाळ करु लागले. तक्रारदार यांनी वि.प. यांचे मागणीनुसार पार्ट खरेदी करुन वि.प. यांना दिले परंतु वि.प. यांनी तक्रारदारांना मशिन्स पूर्ववत इन्स्टॉल करुन दिलेले नाही. मशिनरीबाबतची तक्रारदारांची तक्रार ही वॉरंटी पिरेडमधील आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवेत त्रुटी दिली आहे. म्हणून तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले असे तक्रारदाराचे कथन आहे. प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस लागू झालेनंतर वि.प.क्र.1 यांनी हजर होवून म्हणणे दाखल केले. परंतु वि.प.क्र.2 यांनी याकामी हजर होवूनही विहीत मुदतीत म्हणणे दाखल केले नाही. सबब, वि.प.क्र.2 यांचेविरुध्द नो से आदेश करण्यात आला.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचा सोडा विक्रीचा व्यवसाय असून सदर व्यवसाय करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. वि.प.क्र.1 हे पिण्याचे पाण्याचे प्लँट व वॉटर सोल्युशन्स याबाबतीतील मशिनरी उत्पादनाचा व्यवसाय करतात. वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.1 चे डीलर आहेत. तक्रारदार यांनी एप्रिल 2015 मध्ये वि.प.क्र.1 यांचेकडे वि.प.क्र.2 कंपनीचे सोडा फिलींग मशिन व कार्बोनेटर अशा मशिनरी खरेदीबाबत मागणी केली. सदर प्रस्ताव वि.प. यांचेकडे Prices for semi-auto rinsing, capping MK, Inspection and SS and Heat Shrink Tunnel Machine या नावाखाली मशिनरी प्लँट खरेदी करणे व वि.प.क्र.1 व 2 यांनी सदर प्लँट सेटअप करुन तो पूर्णपणे चालू करुन देणेचे ठरले होते. तक्रारदारांनी सदर मशिन खरेदीसाठीची रक्कम दि. 31/3/2015 रोजी रु. 3,78,000/- व दि. 15/4/2015 रोजी रु.17,65,000/- रोजी डीमांड ड्राफ्टद्वारे अदा केली आहे. अॅडव्हान्स रक्कम पोहोचताच मशिनरी 6 ते 8 आठवडयात पोहोच करणेचे ठरले होते. परंतु वि.प. यांनी तक्रारदारांना मशिनरीची डिलीव्हरी 4 महिने उशिरा दिली. परंतु मशिनरी प्लॅंट व इन्स्टॉलेशन करणेस वि.प. हे टाळाटाळ करु लागले. तदनंतर द. 8/8/2015 रोजी वि.प. यांनी तक्रारदारांना दि. 20/8/2015 अखेर मशिन प्लांट करुन देणेचे आश्वासन दिले व तक्रारदारांना दिलेली मशिन्स फॉल्टी व जुनी असलेचे मान्य कले. तदनंतर त्यांनी तक्रारदारांना Shrink Tunel and Out corner हे पार्टस बाहेरुन आणण्यास सांगितले. जोवर मशीन पूर्णतः सुरु होत नाही व सदर पार्ट बदलणेकरिता वि.प. यांनी तक्रारदारांना चेक स्वरुपात 1 लाख रु. व इतर रक्कम रु.1,06,438/- अशी एकूण रु. 2,06,438/- परत अदा केली. तदनंतर तक्रारदार यांनी सदरचे पार्ट खरेदी करुन वि.प. यांना दिले परंतु वि.प. यांनी तक्रारदारांना मशिन्स पूर्ववत इन्स्टॉल करुन दिलेले नाही. याबाबत दि. 9/8/2016 रोजी वि.प. यांनी सदरची वस्तुस्थिती मान्य करुन मशिनरी रिपेअरी अथवा बदलून देण्याचे मान्य केले. मशिनरीबाबतची तक्रारदारांची तक्रार ही वॉरंटी पिरेडमधील आहे. तक्रारदारांनी सदर व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे. सदर कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्याने सदरचे खाते एन.पी.ए.मध्ये गेले आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवेत त्रुटी दिली आहे. सबब, तक्रारदारास नुकसानीपोटी रक्कम रु.18,00,000/-, आर्थिक, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.1,00,000/- देणेबाबत वि.प. यांना आदेश व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत युनियन बँकेचे पत्र, वि.प.क्र.2 यांचे कोटेशन, पार्ट खरेदी केलेचे बिल, बँक खाते उतारा, वि.प. यांनी दिलेले हमीपत्र, तक्रारदारांनी केलेले भाडेकरारपत्र, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.
4. वि.प. यांना नोटीस लागू झालेनंतर वि.प.क्र.1 यांनी आयोगासमोर हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले. वि.प. यांनी आपले लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे. वि.प. क्र.1 यांचे कथनानुसार, तक्रारदार व वि.प.क्र.1 यांचा दुरान्वयेही संबंध नाही. ते कधीही एकमेकांना भेटलेले नाहीत. वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.1 चे डीलर आहेत ही बाब तक्रारदाराने शाबीत करावी. वि.प.क्र.2 यांनी तक्रारदारांना दिलेल्या विनातारखेच्या कोटेशनमध्ये नमूद केलले मॅकमन ग्रूप ऑफ कंपनीजशी सुध्दा वि.प.क्र.1 यांचा काहीही संबंध नाही. वि.प.क्र.1 ही स्वतंत्र कंपनी आहे. वि.प.क्र.2 यांना वि.प.क्र.1 यांनी कधीही कोणत्याही प्रकारचे साहित्य पुरविलेले नाही. वि.प.क्र.2 यांनी दिलेल्या विनातारखेच्या कोटेशनमधील नामसाधर्म्यामुळे विनाकारण तक्रारदारांनी वि.प.क्र.1 यांना याकामी सामील केले आहे. तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचेकडूनच कोटेशन घेतलेले आहे. तसेच मशिनरी व साहित्य घेतलेले आहे. तसेच इनव्हॉईस सुध्दा वि.प.क्र.2 यांचेच आहे व तक्रारदारांनी दिलेल्या रकमा सुध्दा वि.प.क्र.2 यांना दिलेल्या आहेत. त्यामुळे तक्रारदाराचे तक्रारीशी वि.प.क्र.1 यांचा कोणताही संबंध नाही. वि.प.क्र.1 यांना याकामी विनाकारण पक्षकार केले आहे. सबब, तक्रारअर्ज वि.प.क्र.1 यांचेविरुध्द नामंजूर करावा अशी मागणी वि.प.क्र.1 यांनी केली आहे.
5. वि.प.क्र.1 यांनी याकामी वि.प.क्र.1 यांनी वि.प.क्र.2 यांची डिलरशीप रद्द केलेचे पत्र दाखल केले आहे. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. वि.प.क्र.2 यांनी याकामी विहीत मुदतीत म्हणणे दाखल केले नसल्याने त्यांचेविरुध्द नो से आदेश करण्यात आला आहे.
7. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प.क्र.1 यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
8. वि.प.क्र.1 हे पुणे येथील प्रसिध्द कंपनी असून त्यांचा पिण्याचे पाण्याचा प्लँट तसेच वॉटर सोल्युशन तसेच त्याबाबतीत मशिनरी उत्पादनाचा व्यवसाय आहे. तसेच वि.प.क्र.2 ही इचलकरंजी येथील रहिवाशी असून त्यांचा “ साईटेक वॉटर ट्रीटमेंट ” नावाने वॉटर प्लँट बसविणे तसेच त्याबाबत आवश्यक मशिनरी खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.1 कंपनीचे डीलर आहेत. तक्रारदार यांनी एप्रिल 2015 मध्ये वि.प.क्र.2 यांचेकडे वि.प.क्र.1 कंपनीचे सोडा फिलींग मशिन व कार्बोनेटर अशा मशिनरी खरेदीबाबत मागणी केली व सदर प्रस्ताव वि.प. यांचेकडे Prices for semi-auto rinsing, capping MK, Inspection and SS and Heat Shrink Tunnel Machine या नावाखाली मशिनरी प्लँट खरेदी करणे व वि.प.क्र.1 व 2 यांनी तो प्लँट सेटअप करुन देणेचे ठरले, मशिनरी खरेदी तसेच त्याबाबत इन्स्टॉलेशन व मशिनरी प्लॅंटबाबत एकूण रकमेच्या म्हणजे रु. 19,36,562/- चे निम्मी रक्कम म्हणजेच 50 टक्के ही अॅडव्हान्स स्वरुपात वि.प. यांना अर्जदार यांनी दिली होती व 50 टक्के रक्कम मशीनचे खरेदी बिल आलेनंतर देणेचे ठरले होते. मशिन खरेदीची सर्वच्या सर्व रक्कम तक्रारदार यांनी नमूद बँकेवरील डी.डी.क्र. 18679325 दि. 31/3/2015, व रक्कमरु. 3,78,000/- व डी.डी. क्र. 18679354 दि. 15/4/2015 रक्कम रु. 17,65,000/- या डी.डी. च्या माध्यमातून अदा केलेल्या आहेत. याबाबतच्या रिसीट्स तक्रारदार यांनी दाखल केलेल्या आहेत. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते प्रस्थापित झालेचे दिसून येते. सबब, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार वि.प. यांचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 ते 5
9. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे वर कलम 1 मध्ये नमूद केलेल्या डी.डी. ने सर्व रक्कम जमा केली आहे. सदरच्या डी.डी. च्या प्रती याकामी तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत दाखल केल्या आहेत. तक्रारदार यांना वि.प. यांनी सदरच्या मशिनरी 4 महिने उशिराने दिलेल्या आहेत म्हणजेच ऑगस्ट 2015 मध्ये दिल्या तसेच सदर प्लँटचे इन्स्टॉलेशन करणेस टाळाटाळ केली. मात्र तदनंतर तक्रारदार यांनी दिलेली सर्व मशिन्स फॉल्टी, मशिनरी नवीन नसून जुनी असलेचे मान्य व कबूल केले. वि.प. यांनी दि. 8/8/2015 रोजी Shrink Tunel and Out corner हे पार्ट्स तक्रारदार यांना बाहेरुन आणावे लागतील असे सांगितले. तक्रारदार यांचेकडून घेतलेली रक्कम रु. 2,06,438/- तक्रारदार यांना परत अदा केली. या संदर्भातील दोन्ही पार्ट्स तक्रारदार यांनी एच.टी.कन्स्लटन्सी, जयसिंगपूर यांचेकडून बिल नं. 32 अन्वये खरेदी केले. मात्र तरीही वि.प. यांनी तक्रारदार यांना प्लँटही सुरु करुन दिलेला नाही. दि. 9/8/2016 रोजी 100 रु. चे स्टँपवर वि.प. यांनी दिलेली मशिनरी नादुरुस्त असलेने मशिनरी रिपेअर करुन देणे, दि.25/8/2016 पर्यंत रिपेअरी करुन देईल व सदर मशिनरी रिपेअर होत नसेल तर तुम्हांस बदलून देईन असे स्पष्ट कथन केले आहे व मशिनरी वॉरंटी पिरिअडमधील आहे.
10. वि.प.क्र.1 यांनी वि.प.क्र.2 हे आपले डिलर असलेचे मान्य केले आहे. मात्र वि.प.क्र.2 यांचेकडून कोटेशन घेतलेले आहे. तसेच इन्व्हॉईस हे त्यांचेच असून बिलही त्यांनीचा अदा केलेले आहे असे कथन केलेले आहे.
11. वि.प.क्र.2 यांनी हजर होवूनही आपले म्हणणे दाखल केले नसलने त्यांचेविरुध्द “ नो से ” चे आदेश करणेत आले. तक्रारदार यांना व्हॉईस सॅम्पलची तपासणी करुन अहवाल देणेवर वारंवार संधी देवूनही तक्रारदारांनी अहवाल दाखल केलेला नाही.
11. वर नमूद तक्रारदार यांचे कारणांचा विचार करता, तक्रारदाराने युनियन बँकेचे टर्म लोन काढलेचे दिसून येते तसेच तक्रारदार यांना वि.प. यांनी परत केलेल्या काही रकमाही दिसून येतात. सदरच्या परत केलेल्या रकमा हया वि.प. यांनी तक्रारदार यांना मशिनरीचे काही पार्ट्स बाहेरुन विकत आणावयास सांगितलेल्या होत्या, त्या या रकमा आहेत. वि.प.क्र.2 हे आयोगासमोर हजर नसलेने त्यांना तक्रारअर्जातील सर्व कथने मान्य आहेत यावर हे आयोग ठाम आहे. तसेच वि.प.क्र.1 यांनी जरी आपली जबाबदारी नाही असे कथन केले असले तरीसुध्दा वि.प.क्र.1 हे उत्पादकच असलेने व वि.प.क्र.2 हे डीलर (विक्रेते) असलेने तक्रारदार यांना नादुरुस्त मशिनरी देवून सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच तक्रारदार यांनी दाखल केले दि. 9/8/2016 चे करारपत्रावरुन तसेच तक्रारदार यांनी दाखल केले H.T.C. Consultancy चे टॅक्स इन्व्हॉईसवरुन सदरची मशिनरीमध्ये उत्पादित दोष असलेचे स्वयंस्पष्ट आहे. वि.प.क्र.2 हे त्यांचे करारपत्रातच मशीन नादुरुस्त असलेचे व दुरुस्त न झालेस बदलून देणेचे मान्य करीत आहेत तसेच वादाकरिता वि.प. यांनी जरी नवीन मशिनरी दिली आहे असे मान्य केले तर त्यासाठी त्यासाठी H.T.C. Consultancy कडून नवीन पार्टस घेणेची गरजच नव्हती. वारंवार मशिनरी दुरुस्त करणे तसेच नवीन मशिनरी असूनही त्यामध्ये पुन्हा नवीन पार्ट्स बसविणे इतकेच नव्हे तर यासंदर्भातील तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकउे त्यासंदर्भात केलेला पत्रव्यवहार तसेच मशीन नादुरुस्त असलेने केलेला करार या सर्व बाबी मशीन नादुरुस्त असलेची बाब शाबीत करणा-या आहेत. यावरुन निश्चितच मशिनरीत दोष दिसून येतो व अशी मशीनरी योग्य त्या पध्दतीने दुरुस्त न करुन वि.प. कंपनीने निश्चितच तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेमध्ये त्रुटी केली आहे असे आयोगाचे स्पष्ट मत आहे. वि.प. यांनी त्या दुरुस्त करुन न दिलेने तक्रारदार यांना दि. 9/8/2016 चे कराराप्रमाणे सदरची मशिनरी बदलून द्यावी अथवा तसे जर करणे शक्य नसेल तर मशिनची रक्कम रु.18,00,000/- नुकसान भरपाई तक्रारदार यांना वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या अदा करावी तसेच तक्रारदार यांनी सदरचे प्लँटसाठी घेतलेले शेडचे करारपत्रही दाखल केले आहे. तक्रारदाराने यासाठी रक्कम रु.50,000/- डिपॉझीटही भरले आहे. तसेच युनियन बँकेचा दरमहा रक्कम रु.47,000/- चा हप्ताही भरत असलेचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. सबब, या सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदार यांनी मागितलेल्या मागण्या अंशतः मंजूर करणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तक्रारदाराने मागितलेली रक्कम रु. 1,00,000/- ची मागितलेली नुकसान भरपाई या आयेागास संयुक्तिक वाटत नसलेने त्यापोटी रक्कम रु. 50,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना अर्जात नमूद मशिनरी बदलून देणेचे आदेश करणेत येतात.
अथवा
जर ते शक्य नसेल तर नुकसान भरपाईची रक्कम रु.18,00,000/- देणेचे आदेश वि.प.क्र.1 व 2 यांना वैयक्तिक व संयुक्तिकरित्या करण्यात येतात. सदरची रक्कम तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याजदराने देणेचे आदेश करणेत येतात.
3. वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प. यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.