(घोषित दि. 28.04.2014 व्दारा श्रीमती. रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदार हे व्यवसायाने डॉक्टर असून जालना येथे त्यांचे हॉस्पीटल आहे. कोलकत्ता येथे आयोजित परिसंवादात भाग घेण्यासाठी त्यांनी गैरअर्जदार यांच्या बरोबर संपर्क साधून टूर पॅकेजचा करार केला. परंतु गैरअर्जदार यांनी करारानुसार सुविधा न पुरविल्यामुळे तसेच उर्वरित रक्कम परत न केल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ते बालरोग तज्ञ असून त्यांचे जालना येथे हॉस्पिटल आहे. जानेवारी 2013 मध्ये त्यांना बालरोग तज्ञ म्हणून कोलकत्ता येथील परिषदेमध्ये, परिसंवादात भाग घेण्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते. त्यात भाग घेण्यासाठी व सहकुटूंब कोलकत्ता येथे जाण्यासाठी त्यांनी गैरअर्जदार यांच्या बरोबर दिनांक 17.05.2012 रोजी संपर्क साधला. गैरअर्जदार यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी टूर पॅकेज निश्चित केला. ज्यामध्ये परिषदे नंतरचा विस्तारीत कार्यक्रम होता. या टूर पॅकेजचा एकूण खर्च 1,50,000/- रुपये निश्चित करण्यात आला होता. यामध्ये औरंगाबाद पासून विमान प्रवास, पंचतारांकीत हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था व प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी टॅक्सी असे निश्चित करण्यात आले होते. टूर रद्द झाल्यास 100 टक्के रक्कम परत करण्यात येईल असे ठरले होते.
गैरअर्जदार यांच्या बरोबर वरील सर्व चर्चा झाल्यानंतर अर्जदाराने दिनांक 18.05.2012 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे स्टेट बॅंक ऑफ हैद्राबाद मार्फत ऑनलाईन 30,000/- रुपये वर्ग केले व 1,20,000/- रुपये अर्जदाराच्या एच.डी.एफ.सी बॅंकेच्या खात्यामध्ये जमा केले. गैरअर्जदार यांच्या तर्फे त्यांना IN 1205 B 13283 हा बुकींग क्रमांक देण्यात आला. त्यानंतर ऑक्टोबर 2012 मध्ये त्यांनी परिषदेनंतरचा विस्तारीत टूर कार्यक्रम रद्द करण्याची गैरअर्जदार यांना विनंती केली. गैरअर्जदार यांनी याबाबत कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी दिनांक 03.11.2012, 04.11.2012 रोजी गैरअर्जदार यांना ई-मेल व्दारे स्मरणपत्रे पाठविली. दिनांक 06.11.2012 रोजी गैरअर्जदार यांचे सेल्स अधिकारी श्री.दिपक कुल्लू यांनी सदरील टूर पॅकेजमध्ये बदल करण्यासाठी 31,914/- रुपये कपात करण्यात येतील असे कळविले. टूर कार्यक्रम रद्द झाल्यास किंवा त्यामध्ये बदल झाल्यास कॅन्सलेशन चार्ज लावण्यात येणार नाही असे ठरले असतना देखील गैरअर्जदार यांनी 31,914/- रुपये कपात करण्यात येईल असे कळविल्यामुळे अर्जदाराने पुन्हा याबाबत गैरअर्जदार यांच्या बरोबर ई-मेलव्दारे संपर्क केला. दिनांक 06.12.2012 रोजीच्या ई-मेल व्दारे गैरअर्जदार यांनी कळविण्यात आलेली कपात रक्कम चुकीची असल्याचे मान्य केले.
दिनांक 07.12.2012 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिनांक 17.01.2013 ते 21.01.2013 या कालावधीसाठी कोलकत्ता येथील पंचतारांकीत “पार्क हॉटेल” येथे आरक्षण झाल्याचे कळविले. पण विमान प्रवासाच्या तिकीटा बद्दल काहीही न कळविल्यामुळे अर्जदाराने पुन्हा गैरअर्जदार यांच्या बरोबर संपर्क साधला. गैरअर्जदार यांनी दिनांक 08.12.2012 रोजी अर्जदारास दिनांक 21.01.2013 च्या ऐवजी 23.01.2013 व कोलकत्ता ऐवजी दिल्ली येथून परतीच्या विमान प्रवासाची तिकीटे पाठविली. अर्जदाराने या बाबत तक्रार केल्यानंतर गैरअर्जदार यांनी दिनांक 13.12.2012 रोजी पुन्हा एकदा दिनांक 21.01.2013 ऐवजी दिनांक 19.01.2013 व औरंगाबाद ऐवजी बागडोग्रा येथील परतीच्या प्रवासाची तिकीटे पाठविली. सततच्या पाठपुराव्या नंतर गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमान प्रवासाची योग्य तिकीटे पाठविली.
पण यानंतर या टूरमध्ये देण्यात येणा-या इतर सेवे बाबत गैरअर्जदार यांच्याकडून कोणताच खुलासा मिळत नसल्यामुळे व सततच्या मनस्तापामुळे अर्जदाराने दिनांक 29.12.2012 व 31.12.2012 रोजी ई-मेल व्दारे सदरील टूर रद्द करण्याबाबत गैरअर्जदार यांना कळवले व जमा केलेली रक्कम परत करण्याची मागणी केली. त्यानंतर गैरअर्जदार यांच्या तर्फे वरिष्ठ अधिकारी श्री. हरदिपसिंग यांनी अर्जदारास झालेल्या मनस्तापा बद्दल दिलगिरी व्यक्त करुन चांगली सेवा देण्याची तयारी दर्शविली. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार यांनी पंचतारांकीत हॉटेल ऐवजी चार तारांकीत हॉटेलमध्ये त्यांचे आरक्षण केले. गैरअर्जदार देत असलेल्या सेवेचा अनुभव घेतल्या नंतर व परिषदेस उपस्थित राहणे जरुरी असल्यामुळे अर्जदाराने स्वत:च पंच तारांकीत हॉटेलमध्ये आरक्षण केले व इतर खर्च केला. गैरअर्जदार यांच्यातर्फे त्यांनी फक्त विमान प्रवासाची सुविधा स्विकारली असल्याचे अर्जदाराने म्हटले आहे. अर्जदाराने विमान प्रवास वगळता उर्वरित रक्कम परत करण्याबाबत पाठपुरावा केला असता गैरअर्जदार यांनी 8,332/- रुपये दिनांक 29.01.2013 रोजी अर्जदाराच्या अस्तित्वात नसलेल्या क्रेडीट कार्डमध्ये जमा केले असल्याचे कळविले. अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीच्या प्रमुख अधिका-या बरोबर संपर्क साधून झाला प्रकार त्यांना कळविला. त्यानंतर गैरअर्जदार यांच्या तर्फे अक्षय मैनी यांनी त्यांना 61,432/- रुपये परत करण्यात येईल असे कळविले. कोणतेही विविरण न देता 61,432/- रुपये कसे होतात या बद्दल अर्जदाराने ई-मेल व फोन व्दारे विचारणा केली. परंतु त्यानंतर गैरअर्जदार यांनी अद्याप पर्यंत पैसेही परत केले नाही व तक्रारीची दखल ही घेतली नाही. त्यामुळे अर्जदाराने सेवेतील त्रुटी व गैरव्यवहारा बद्दल मंचामध्ये तक्रार दाखल केली असून गैरअर्जदार यांनी 1,50,000/- रुपये 18 टक्के व्याजासह परत करण्याची व सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्यामुळे 15,00,000/- रुपये देण्याबाबत आदेश देण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदाराने त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ अर्णब सरकार वि. सीमा ट्रॅव्हल्स, रिजिड ग्लोबल (इंडिया) वि. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लि, उषा कुमारी रानावत वि. एल.आय.सी इंडिया लि. साऊथ इन्टर्न कॅरिअर्स लि. वि. बी.राजेंद्र इत्यादि निवाडे दाखल केले आहेत.
अर्जदाराने तक्रारी सोबत खालील कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार यांच्या तर्फे पाठविण्यात आलेला ई-मेल वरील पत्र व्यवहार, चुकीची ई-मेल तिकीटे, चुकीच्या ई-मेल तिकीटा बद्दल ई-मेल वरील पत्र व्यवहार, चुकीची परतीची तिकीटे, त्या संदर्भातील पत्र व्यवहार, विमानाची योग्य तिकीटे, पुढील सर्व सुविधा नाकारल्या बाबतचा ई-मेल वरील पत्र व्यवहार, सी.ई.ओ यांना लिहीलेले पत्र, यांच्या तर्फे आलेले उत्तर, पैसे परत करण्याबाबत झालेला पत्र व्यवहार व इतर काही कागदपत्रे.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जबाबा नुसार अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ही मंचाच्या कार्यक्षेत्राबाहेर आहे. सदरील तक्रार त्यांचे मुख्य कार्यालय असलेल्या दिल्ली येथे दाखल करणे कायदेशीर आहे. गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानुसार ते ग्राहकांना फक्त सेवा देण्याचे काम करतात. विमान प्रवासात आरक्षणात होणारे बदल, हॉटेल्सची उपलब्धता, नैसर्गिक वातावरणातील बदल या सर्व बाबीमुळे सेवेत बदल करण्यात येतो, ज्यात त्यांचा कोणताही दोष नसतो. अशा वेळेस योग्य व चांगली सेवा देण्याचे त्यांचे ध्येय असते. ग्राहकांना कमी सुविधा देण्यात आल्यास रक्कम देखील परत करण्यात येते. अर्जदाराने दिनांक 18.05.2012 रोजी स्वत: पत्नीव दोन मुले यांच्या नावाने औरंगाबाद-कोलकत्ता व विस्तारीत टूरची त्यांच्याकडे नोंदणी केली व त्यापोटी 1,50,000/- रुपये जमा केल्याचे मान्य आहे. अर्जदारास विमा प्रवासाची, हॉटेल आरक्षणाची तसेच इतर सर्व सुविधेची पूर्ण माहिती ई-मेलव्दारे वेळोवेळी कळविण्यात आली असल्याचे गैरअर्जदार यांनी आपल्या जवाबात म्हटले आहे. अर्जदाराने दिनांक 17.01.2013 ते 21.01.2013 ची टूर 23.01.2013 पर्यंत वाढविण्यासाठी जून 2012 मध्ये त्यांच्या बरोबर संपर्क केला व अर्जदाराच्या विनंतीवरुन दार्जिलिंग व गंगटोक येथील हॉटेलचे आरक्षण करण्यात आले जे त्यांना दिनांक 13.06.2012 रोजीच्या ई-मेल व्दारे कळविण्यात आले. दिनांक 30.10.2012 रोजी अर्जदाराने पुन्हा त्यांच्या बरोबर संपर्क साधून नॉर्थ इस्ट दार्जिलिंग/गंगटोक येथील विस्तारीत टूर रद्द करण्याचे कळविले. अर्जदाराने विस्तारीत टूर रद्द केल्यामुळे विमान सेवा देणारी कंपनी व हॉटेल आरक्षणाच्या नियमानुसार टूर रद्द (Cancellation Charges) ची रक्कम अर्जदाराने भरलेल्या रकमेतून कमी करण्यात आली व ते योग्य असल्याचे गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे. विमान प्रवासाची तिकीटे देताना त्यांच्याकडून चूक झाली. परंतु ती चूक त्वरीत दुरुस्त करुन अर्जदारास त्यांनी विमान प्रवासाची तिकीटे उपलब्ध करुन दिली. अर्जदारास देण्यात आलेल्या विमान प्रवासाच्या चुकीच्या तिकीटामुळे त्यांनी त्यांचे एजंट श्री. दीपक कुल्लू यांना सेवेतून निलंबित केले.
श्री.हरदिपसिंग यांनी जेव्हा अर्जदाराचे प्रकरण हाताळले तेव्हा त्यांना हॉटेल पार्क प्लाझा या पंच तारांकीत हॉटेलमध्ये अर्जदाराचे आरक्षण केले नसल्याचे आढळून आले. या हॉटेलमध्ये आरक्षण उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी अर्जदारास चार तारांकीत हॉटेलमध्ये आरक्षण उपलब्ध करुन देण्याचे अश्वासन दिले व फरकाची रक्कम परत करण्याचे अश्वासन दिले. अर्जदारास विमान सेवा, हॉटेल तसेच इतर सुविधा बाबत त्यांचे संबंधित एजंट जवाबदार असल्याचे सांगून चुकीची दुरुस्ती करुन योग्य सेवा अर्जदारास देण्याचा प्रयत्न केला असल्याचे गैरअर्जदार यांनी म्हटले आहे. त्यांनी अर्जदारांच्या क्रेडीट कार्डमध्ये 8,330/- रुपये जमा केले आहेत व उर्वरीत रक्कम जमा करण्यासाठी दिनांक 06.05.2013 रोजी अर्जदारास त्यांच्या बॅंक खात्याबाबत विचारणा करणारे पत्र ई-मेलव्दारा पाठविले आहे. अर्जदाराने नुकसान भरपाई म्हणून मागितलेली रक्कम चुकीची असल्याचे सांगून अर्जदाराने किती व कशा प्रकारे नुकसान झाले याचे विवरण न देता केलेली मागणी चुकीची असल्याचे सांगून सदरील मागणी रद्द करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार यांनी जवाबासोबत ई-मेलच्या प्रती, गंगटोक/दार्जिलिंगच्या हॉटेल आरक्षणाच्या ई-मेलच्या प्रती, त्यानंतर ई-मेलव्दारे केलेला पत्र व्यवहार, विमानाच्या तिकीटाचे आरक्षण त्यांच्या अटी व नियमाची प्रत इत्यादि कागदपत्रे दाखल केली आहेत.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणी वरुन असे दिसून येते की,
अर्जदार श्री.राजीव रामसुख जेथलिया हे व्यवसायाने डॉक्टर असून कोलकत्ता येथे आयोजित करण्यात आलेल्या बालरोग तज्ञ परिषदेत भाग घेण्यासाठी त्यांनी विमान प्रवास, हॉटेल आरक्षण व नॉर्थ ईस्टच्या काही स्थळासाठी गैरअर्जदार यांच्याकडे टूर पॅकेजची विचारणा करुन दिनांक 18.05.2012 रोजी नोंदणी केली असल्याचे नि.क्र. ए-31 वरुन दिसून येते व गैरअर्जदार यांना ही ते मान्य आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांच्या संमतीने टूर पॅकेज 1,50,000/- रुपयात निश्चित करण्यात आले ज्यामध्ये अर्जदार स्वत: त्यांची पत्नी व दोन मुलांचा समावेश होता. अर्जदाराने दिनांक 18.05.2012 रोजी जालना येथील स्टेट बॅंक ऑफ हैद्राबाद येथून गैरअर्जदार यांच्या खात्यात 30,000/- रुपये ऑनलाईन हस्तांतरीत केले व उर्वरीत 1,20,000/- रुपये गैरअर्जदार यांच्या एच.डी.एफ.सी बॅंकेतील खात्यात दिनांक 07.06.2012 रोजी जमा केले असल्याचे दिसून येते. (पान क्रं.31,32) गैरअर्जदार यांनीही 1,50,000/- रुपये त्यांच्याकडे जमा केले असल्याचे मान्य आहे.
गैरअर्जदार यांनी अर्जदाराची तक्रार ही मंचाच्या कार्यक्षेत्राबाहेर असल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या करारामध्ये कोणताही वाद उद्भभवल्यास तो दिल्ली येथील न्यायालयातच चालू शकेल असे नमूद केलेले आहे. या संदर्भात गैरअर्जदार यांनी सोनिक सर्जिकल विरुध्द नॅशनल इन्शुरन्स कंपनी, मेक माय ट्रीप (इंडिया) विरुध्द राजीव घई, भारती निटींग कंपनी विरुध्द डि.एच.एल. वर्ल्ड वाईड एक्सप्रेस कोरियर या निवाडयांचे संदर्भ दाखल केले आहेत. परंतु प्रस्तुत प्रकरणात या निवाडयांचे संदर्भ लागू होत नाही. अर्जदाराने सदरील व्यवहार जालना येथील बॅंके मार्फत केला असल्यामुळे तसेच हा व्यवहार ऑन लाईन बुकींगमध्ये येत नसल्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक असल्याचे मंचाचे मत आहे. करारानुसार कोणताही वाद उद्भभवल्यास दिल्ली येथील न्यायलयातच दाखल करता येईल हे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार चुकीचे आहे. अर्जदाराने यासाठी ब्लेझ प्लॅश कारियर लि. वि. राहीत पालाडिया (I 2008 CPJ) साऊथ इस्टर्न कोरियर लि. वि. बी.राजेंद्र (II 2002 CPJ) रिलायन्स इंडस्ट्रीज लि. वि. सायमन मार्टीस (II 2005 CPJ) या निवाडयांचे संदर्भ दाखल केले आहेत, जे या प्रकरणात लागू पडतात.
अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे औरंगाबाद ते कोलकत्ता व नंतर दार्जिलिंग/गंगटोक व परत औरंगाबाद यासाठी दिनांक 17.01.2013 ते 21.01.2013 या कालावधीसाठी विमान प्रवास, हॉटेल, स्थानिक प्रवासासाठी टॅक्सी व इतर सुविधा मिळण्याबाबत गैरअर्जदार यांच्याकडे टूर पॅकेजची नोंदणी केल्यानंतर त्याना IN 1205 B 13283 हा नोंदणी क्रमांक देण्यात आला ज्याचा उल्लेख ई-मेल वरुन करण्यात आलेल्या पत्र व्यवहारात दिसून येतो. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे या टूर पॅकेजची नोंदणी दिनांक 18.05.2012 रोजी केली. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदाराने अनेकवेळेस विनंती करुनही टूर बाबत कोणतीही माहिती दिलेली दिसून येत नाही.
दिनांक 30.10.2012 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार यांना ई-मेलव्दारे त्यांचा विस्तारीत प्रवास दार्जिलिंग/गंगटोक रद्द करण्याबाबत कळविले व संपूर्ण टूरसाठी भरलेल्या रकमेतून ही रक्कम वजा करुन पाठविण्याची विनंती केलेली दिसून येते. (पान 33,34) परंतु गैरअर्जदार यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिलेला दिसून येत नाही. अर्जदाराने दिनांक 16.05.2012 रोजी नोंदणी केलेल्या टूर नंतर व दिनांक 30.10.2012 रोजी विस्तारीत टूर रद्द करण्याबाबत कळविलेल्या तारखेपर्यंत गैरअर्जदार यांनी अर्जदारास टूर कार्यक्रम, विमान प्रवास, हॉटेल आरक्षण इत्यादि बाबत काहीही कळविले नसल्याचे दोनही बाजूकडून दाखल करण्यात आलेल्या पत्र व्यवहारावरुन स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी अर्जदारास पाठविलेल्या अनेक ई-मेल मध्ये विलंबाबाबत क्षमायाचना व झालेल्या मनस्तापा बद्दल अर्जदाराची माफी मागितली असल्याचे दिसून येते. कस्टमर केअर सेंटरचे प्रतिनिधी श्री.अमित गोवानी यांनी देखील अर्जदारास झालेल्या गैरसोयीबाबत माफी मागितल्याचे दिनांक 06.12.2012 रोजीच्या ई-मेल वरुन दिसून येते. (पान क्रमांक 40)
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबात त्यांचे अधिकरी/एजंट श्री.दिपक कुल्लू यांनी पंच तारांकीत हॉटेलमध्ये अर्जदाराच्या नावे आरक्षण केले नसल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना नोकरीवरुन निलंबित करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच पंच तारांकीत हॉटेल पार्क प्लाझा मध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे चार तारांकीत हॉटेलमध्ये सुविधा देण्याबाबत व त्यास मान्यता आहे का याबाबत विचारणा केलेली गैरअर्जदार यांचे मॅनेजर श्री.हरदिप यांच्या ई-मेल वरुन दिसून येते. यावरुन गैरअर्जदार यांनी पाच महिन्यानंतर देखील अर्जदाराच्या नावे हॉटेलमध्ये रुमचे आरक्षण केले नसल्याचे स्पष्ट होते.
गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमान प्रवासाची तिकीटे पाठविण्या बाबत वारंवार ई-मेल केलेले दिसून येतात. दिनांक 08.12.2012 रोजी त्यांना ई-मेल तिकीटे पाठविण्यात आले ते चुकीच्या विमानाने, चुकीच्या स्थळाचे व चुकीच्या तारखेचे होते. (पान क्रमांक 43) व कोलकत्ता ऐवजी दिल्ली येथून परतीचा प्रवास दाखविण्यात आला. तसेच प्रवासाची तारीख देखील 21.01.2013 ऐवजी 23.01.2013 दर्शविण्यात आली. दिनांक 13.12.2012 रोजीच्या गैरअर्जदार यांच्या ई-मेल मध्ये विमान प्रवास परतीच्या तिकीटात औरंगाबाद ऐवजी बागडोग्रा असे नमूद करण्यात आले व तारीख देखील 21.01.2013 ऐवजी 19.01.2013 अशी दाखविण्यात आलेली दिसून येते. गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबात त्यांच्याकडून विमान प्रवास परतीची नोंदणी करताना दोनदा चूक झाल्याचे मान्य केले आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या जवाबात विमान प्रवासातील स्थळांचा व तारखेचा घोळ तसेच पंच तारांकीत हॉटेल मधील रुमच्या आरक्षणा बाबत झालेल्या चूका स्वत:च मान्य केल्या आहेत.
गैरअर्जदार यांच्या तर्फे देण्यात आलेल्या या मनस्तापामुळे अर्जदाराने पूर्ण टूर रद्द करण्याबाबत व पैसे परत करण्याबाबत गैरअर्जदार यांना कळविले असल्याचे दिनांक 29.12.2012, 31.12.2012 रोजीच्या ई-मेल वरुन दिसून येते. (पान क्रमांक 68,69) परंतु नंतर कंपनीचे अधिकारी श्री.हरदिप यांनी सर्व प्रकरणात लक्ष घालून अर्जदारास झालेल्या मनस्तापाबद्दल माफी मागितली व सर्व सुविधा पुरविण्याचे अश्वासन दिले. परंतू अर्जदाराने विमान प्रवास वगळता इतर सेवा न पुरविण्याबाबत ई-मेलव्दारे कळविले. गैरअर्जदार यांनी चार तारांकीत हॉटेल उपलब्ध असल्या बद्दल सांगितले. परंतू त्याचे व्हाऊचर, अर्जदारास पाठविले असल्याचे दिसून येत नाही. यावरुन अर्जदाराने विमान प्रवास वगळता बाकीचा खर्च स्वत:च केला असल्याचे स्पष्ट होते.
अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे टूरची नोंदणी केल्यानंतर त्यांना गैरअर्जदार योग्य प्रकारे सेवा देत नसल्याचे आढळून आल्यानंतर अर्जदाराने विमान प्रवासा व्यतिरिक्त इतर सेवा घेतलेल्या नाहीत. गैरअर्जदार यांच्या दिनांक 14.02.2013 च्या ई-मेलमध्ये विमान प्रवासाचा खर्च एकूण रुपये 61,568/- दर्शविण्यात आला असून कॅन्सलेशन चार्जेस 27,000/- दर्शवून अर्जदारास एकूण 61,432/- रुपये परत देण्याची तयारी दर्शविली आहे. अर्जदाराने देखील औरंगाबाद ते कोलकत्ता व परत असा एकूण विमान प्रवास खर्च किती आहे याबाबत पुरावा मंचात दाखल केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांनी दाखविलेला विमान प्रवास खर्च 61,568/- रुपये योग्य असल्याचे मंचाचे मत आहे.
गैरअर्जदार यांनी हॉटेल व इतर सेवेपोटी आरक्षण केल्याबाबत कोणताही पुरावा मंचात दाखल केलेला नाही. त्यामुळे आरक्षण केले नसतानाही कॅन्सलेशन चार्जेसची आकारणी करणे हे अनुचित व्यापार पध्दतीमध्ये मोडते. त्यामुळे गैरअर्जदार यांनी आकारलेले कॅन्सलेशन चार्जेस रुपये 27,000/- चुकीचे असल्याचे मंचाचे मत आहे.
गैरअर्जदार यांनी 8,332/- रुपये अर्जदाराच्या क्रेडीट कार्ड खात्यात जमा केल्याचे म्हटले आहे. परंतू या बाबतचा कोणताही पुरावा मंचात दाखल केलेला नाही. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे क्रेडीट कार्डची सुविधाच नाही.
अर्जदाराने त्यांना झालेला मनस्ताप व त्रासा बद्दल भरपाईची मागणी केली आहे. राष्ट्रीय आयोगाचा अर्णब सरकार वि. सीमा ट्रॅव्हल्स या निवाडयानुसार ग्राहक जेव्हा टूर ऑपरेटर बरोबर प्रवासाची आखणी करतो तेव्हा त्याला योग्य सेवा मिळाली व प्रवास सुखमय व्हावा व सुट्टीचा उपभोग घेता यावा अशी अपेक्षा असते. परंतू टूर ऑपरेटरने ठरेलेली रक्कम घेऊन ग्राहकास योग्य सुविधा/सेवा दिली नाही तर तो नुकसान भरपाईस पात्र ठरतो असे म्हटले आहे. सदरील निवाडा या प्रकरणास लागू पडतो. गैरअर्जदार यांनी रक्कम स्विकारुन अर्जदारास कोणतीही सेवा/सुविधा न देता भरपूर मानसिक त्रास दिलेला आहे हे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. अर्जदाराने 29.12.2012 व 31.12.2012 रोजी टूर रद्द करुन पैसे परत करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्या दिनांका पासून अर्जदारास व्याजासह पैसे देणे योग्य ठरेल. अर्जदाराची तक्रार मान्य करण्यात येत आहे.
आदेश
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास आकारलेली कॅन्सलेशन (Cancellation) रक्कम रुपये 27,000/- (अक्षरी रुपये सत्तावीस हजार फक्त) रद्द करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास देऊ केलेले रुपये 61,432/- (अक्षरी रुपये एकसष्ठ हजार चारशे बत्तीस फक्त) व रुपये 27,000/- (अक्षरी रुपये सत्तावीस हजार फक्त) असे एकूण रुपये 88,432/- (अक्षरी रुपये अठ्ठयाएैंशी हजार चाशशे बत्तीस फक्त) दिनांक 31.12.2012 पासून 12 टक्के व्याजासह 30 दिवसात द्यावे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 30,000/- (अक्षरी रुपये तिस हजार फक्त) व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्या बद्दल रुपये 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) 30 दिवसात द्यावे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास खर्चा बद्दल रुपये 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) 30 दिवसात द्यावे.