श्रीमती स्मिता चांदेकर, मा. सदस्या यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये वि.प.च्या सेवेतील त्रुटीबाबत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे.
2. तक्रारकर्ते क्र. 1 ते 11 यांनी वि.प.क्र. 1 कडे दि.20.07.2013 ते 26.07.2013 पर्यंत कोलकता ते बँकॉक व परत कोलकाता अश्या सहलीचे बुकींग प्रत्येकी रु.27,000/- मध्ये केले होते. सदर पॅकेजमध्ये वि.प.क्र. 1 हे सहली दरम्यान दि. 20 जुलै,2013 ते 26 जुलै, 2013 पर्यंत तक्रारकर्त्यांकरीता राहण्याची सोय, हॉटेल, जेवण, विमान तिकिटे व तेथील पर्यंटन स्थळांचे दर्शन करविणे इ. सेवा पुरविणार होते. त्यानुसार वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्त्याचे जाण्या-येण्याचे विमान तिकिट वि.प.क्र. 2 कडून काढले होते. तक्रारकर्ते पुढे असे कथन करतात की, परतीच्या प्रवासाच्या वेळी बँकॉक विमानतळावर चेक इन काऊंटरवर तक्रारकर्त्यांना त्यांचे सामान सोबत नेऊ दिले नाही व ते बँकॉक विमानतळावर रोखून ठेवण्यात आले. तक्रारकर्त्यांच्या इकॉनॉमी श्रेणीतील इतर प्रवाश्यांना मात्र वि.प.क्र. 2 ने त्यांचे जास्त सामान नेण्यास परवानगी दिली. तक्रारकर्त्यांनी त्यांचे त्याच दिवशीचे नागपूरकरीता रेल्वेचे तिकिट असल्याचे सांगून वि.प.क्र. 2 ला सामान नेऊ देण्याकरीता विनंती केली. परंतू वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्यांना त्यांचे सामान सोबत नेऊ दिले नाही. अशाप्रकारे तक्रारकर्त्यांना त्यांच्या सामानाशिवाय बँकॉक ते कलकत्ता प्रवास करावा लागला व ते सकाळी 7.30 वा. 9W65 विमानाने कलकत्ता येथे पोहोचले. वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्यांना त्यांचे सामान एक वाजेपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासित केले. परंतू तक्रारकर्त्यांचे सामान तब्बल 8 तासानंतर 4.30 वा. कलकत्ता विमानतळावर पोहोचले. वि.प.क्र. 2 च्या असभ्य वागणूक तथा क्लीष्ट प्रक्रियेमुळे तक्रारकर्त्यांना त्यांचे सामान घेतल्याशिवाय विमानतळाच्या बाहेरदेखील जाता आले नाही. तक्रारकर्ते क्र. 8 ते 11 यांना हावडा-नागपूर ट्रेनने परत पाठविले. परंतू इतर तक्रारकर्त्यांनी त्यांची रेल्वे चुकल्यामुळे वातानुकुलीत तिकिटे रद्द केली व नागपूर येथे जाण्याकरीता इतर प्रवासाची सोय करावी लागली. नागपूरकरीता पुढील रेल्वेचे रीझर्वेशन उपलब्ध नसल्यामुळे तक्रारकर्त्यांना त्याचदिवशीच्या उपलब्ध इंडिगो कंपनीच्या विमानाचे रु.4,060/- प्रत्येकीप्रमाणे विमानाचे तिकिटाचा खर्च करुन नागपूरकरीता प्रवास करावा लागला. कलकत्ता विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सने तक्रारकर्त्याकडून टीव्हीकरीता प्रत्येकी रु.1,000/- प्रमाणे रु.4,000/- अतिरिक्त सामान खर्च लावला. तसेच तक्रारकर्त्यांनी नागपूर येथून हिंगणघाट येथे जाण्याकरीता टॅक्सी बुक केली होती, तीदेखील रद्द करावी लागली. तक्रारकर्ता पुढे असे कथन करतात की, वि.प.क्र. 2 ने जर तक्रारकर्त्यांना त्यांचे सामान प्रवासासोबत नेण्यास परवानगी दिली असती तर त्यांना वरीलप्रमाणे अतिरीक्त खर्च व शारिरीक, मानसिक त्रास झाला नसता. त्यामुळे वि.प.क्र. 1 व 2 दोघेही तक्रारकर्त्यांना झालेल्या गैरसोयीकरीता जबाबदार आहेत. म्हणून तक्रारकर्त्यांनी वि.प.क्र. 1 व 2 ला वकीलांमार्फत नोटीस पाठविला असता वि.प.क्र. 1 व 2 ने त्यांची जबाबदारी झटकण्याकरीता नोटीसला खोटे उत्तर पाठविले. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार दाखल केली असून वि.प.कडून कलकत्ता विमानतळावर खाद्यान्न व न्याहारीकरीता लागलेला खर्च एकूण रु.11,000/-, रेल्वेचे तिकिट रद्द करण्याचा खर्च रु.8,000/-, इंडिगो विमानाच्या तिकिटांची रक्कम रु.32,480/-, अतिरिक्त सामानाचा खर्च रु.4,000/-, टॅक्सीचा खर्च रु.2,000/-, रु.7,000/- नोटीस खर्च व मानसिक, शारिरीक त्रासाकरीता नुकसान भरपाई रु.1,00,000/- असे एकूण रु.11,69,840/- मिळण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
3. मंचाद्वारे पाठविलेला नोटीस प्राप्त होऊनही वि.प.क्र. 1 मंचासमक्ष हजर झाले नाही व आपले म्हणणे मांडले नाही. करीता वि.प.क्र. 1 विरुध्द एकतर्फी आदेश पारित करण्यात आला.
4. वि.प.क्र. 2 ने त्यांचे लेखी उत्तर नि.क्र.17 वर दाखल केले असून तक्रारकर्त्यांच्या तक्रारीस सक्त विरोध केला आहे. वि.प.क्र. 2 ने तक्रारीतील वि.प.क्र. 1 च्या संबंधातील कथनावर कोणतेही भाष्य केले नसून तक्रारकर्ता हे वि.प.क्र. 2 च्या कलकत्ता ते बँकॉक परतीसह प्रवासी होते हे अभिलेखाचा भाग म्हणून मान्य केले आहे. बँकॉक येथील वि.प.क्र. 2 च्या कर्मचा-यांनी इतर प्रवाश्यांना तक्रारकर्त्यांच्या सामानापेक्षा जास्त सामान नेण्यास परवानगी दिली होती ही बाब नाकारली असून तक्रारकर्ते हे वेगवेगळे वैयक्तीक प्रवास करीत असतांना देखील त्यांना गट प्रवासी गृहीत धरुन सामानाकरीता गट प्रवासाचे लाभ व प्राधान्य देण्यात आले, त्यामुळे वि.प.क्र. 2 ने 26.07.2013 रोजी तक्रारकर्त्यांना बँकॉकहून अतिरिक्त सामान नेण्यास परवानगी दिली नाही हे चुकीचे आहे असे वि.प.क्र. 2 ने नमूद केले आहे. वि.प.ने पुढे असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्यांपैकी दोन तक्रारकर्त्यांनी बँकॉकहून विमानात प्रवास केलेला नाही तरी देखील त्यांचेवतीने तक्रारीत दावा केलेला आहे. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्यांनी केलेला रेल्वे प्रवास हा वेगळया पध्दतीचा होता असे वि.प.ने नमूद केले आणि त्याबाबत वि.प.ला त्यांनी कधीही कळविले नव्हते. त्याचप्रमाणे पुढील प्रवासाकरीता बुक केलेली टॅक्सी ही तक्रारकर्ता प्रवीण गुरडे व हरीदास शेंडे यांच्याच मालकीच्या होत्या, त्यामुळे त्यांना टॅक्सी रद्द करण्याची रक्कम आधीच प्राप्त झालेली आहे. वि.प.ने पुढे असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्यांनी खोटे आणि दिशाभूल कथन करुन विचाराअंती तक्रार दाखल केलेली आहे. याऊलट, खरी बाजू अशी आहे की, 9W65 या विमानातील सामान बँकॉक येथे राखून ठेवण्यात आले होते व नंतर तेच पुढील 9W75 नंतरच्या विमानाने कलकत्ता येथे त्याच दिवशी पाठविण्यात आले होते. सदर सामान हे pay load restriction अंतर्गत तक्रारकर्त्याच्या सामानाकरीता लागणारी जागा व अतिरिक्त सामान यामुळे रोखून ठेवण्यात आले होते. तक्रारकर्ते हे त्यांच्यासोबत टीव्ही देखील नेणार होते. वि.प.च्या म्हणण्यानुसार pay load restriction च्या परीस्थितीत विमानात पूरेशी जागा नसल्यामुळे, तसेच परवानगीपेक्षा जास्त वजन झाल्यामुळे विमानाच्या उडाणात अडथळा येऊ शकतो, तसेच प्रवाशांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो याकरीता सामान रोखून ठेवणे DGCA च्या नियमानुसार त्याचे पालन करणे आवश्यक होते. pay load restriction चा प्रसंग हा नेहमीच उद्भवत असतो. सदर प्रसंगाबाबत तक्रारकर्त्यांना पूर्वीच कळविण्यात आले होते व सदर बाब तक्रारकर्त्यांनी कुठलाही आक्षेप न घेता मान्य केली होती. तक्रारकर्त्यांनी इंडिगो विमानाने केलेला प्रवास वि.प.क्र. 2 सोबत संबंधित नाही असेही त्यांचे म्हणणे आहे. वि.प.क्र. 2 हे तक्रारकर्त्यांनी केलेल्या कथीत प्रवासाशी संबंधित नाही. वि.प.ने तक्रारकर्त्याने पाठविलेल्या नोटीसला उत्तर देऊन संपूर्ण बाबींचे स्पष्टीकरण दिले होते व संपूर्ण प्रकरण परस्पर सोडविण्याचा प्रस्ताव दिला होता. तरीहीदेखील तक्रारकर्त्यांनी खोटी तक्रार दाखल केली असल्यामुळे ती खारीज करण्याची विनंती वि.प.क्र. 2 ने केलेली आहे.
5. सदर प्रकरणी उभय पक्षांचा युक्तीवाद त्यांचे वकीलांमार्फत ऐकला व दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
6. तक्रारकर्त्यांनी वि.प.क्र. 1 आयोजित कलकत्ता ते बँकॉक या सहलीचे बुकींग प्रत्येकी रु.27,000/- रक्कम देऊन केले होते. सदर सहली दरम्यान वि.प.क्र. 1 हे तक्रारकर्त्यांना राहण्याची सोय, जेवण, प्रवासाचे विमान टिकिट व पर्यटन स्थळांचे दर्शन इ. सेवा पुरवीणार होते. सदर व्यवहाराच्या अनुषंगाने वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्त्यांचे कलकत्ता ते बँकॉक परतीच्या प्रवासासह विमा टिकिटे वि.प.क्र. 2 कडून काढले होते. याबाबत उभय पक्षामध्ये वाद नाही. वरीलप्रमाणे सेवा वि.प.क्र. 1 व वि.प.क्र. 2 हे तक्रारकर्त्यास पुरविणार होते, त्यामुळे तक्रारकर्ते वि.प.क्र. 1 व 2 चे ग्राहक ठरतात.
7. तक्रारकर्त्यांची सहल ही दि.20 जुलै, 2013 ते 26 जुलै, 2013 पर्यंत होती. तक्रारकर्त्यांची मुख्य तक्रार ही बँकॉक ते कलकत्ता परतीच्या प्रवासा दरम्यानची असून तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार वि.प.क्र. 2 ने बँकॉक विमानतळावर त्यांना त्यांचे सामान त्यांच्यासोबत विमानातून परत आणण्याची परवानगी दिली नाही व त्यांचे सामान विनाकारण तेथेच रोखून ठेवण्यात आले. त्यामुळे तक्रारकर्त्यांना कलकत्ता येथे सामानाशिवाय पोहोचावे लागले व त्यानंतर त्यांचे सामान दुस-या विमानाने कलकत्ता येथे येईपर्यंत सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत कलकत्ता विमानतळावर अडकून राहावे लागले. त्यामुळे तक्रारकर्त्यांना नागपूर करीताच्या पुढच्या प्रवासाची दूपारी 2.00 च्या रेल्वेची तिकिटे तसेच टॅक्सी इ. रद्द करावी लागली व अतिरिक्त खर्च करुन इंडिगो विमानाने नागपूर येथे यावे लागले व तक्रारकर्त्यांच्या सामानामध्ये टी व्ही असल्यामुळे चार टी व्ही साठी प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे रु.4,000/- जास्त भरावे लागले. त्याचप्रमाणे संध्याकाळी त्यांचे सामान पोहोचेपर्यंत त्यांना कलकत्ता विमानतळावर थांबून राहावे लागले व खाण्या-पीण्याकरीता महागडा खर्च करावा लागला. तक्रारकर्त्याने त्यांचे लेखी युक्तीवादात असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्यांनी विनंती केल्यावरही वि.प.क्र. 2 ने त्यांना सामान सोबत नेण्याकरीता परवानगी दिली नाही व सेवेत त्रुटी केली. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार वि.प.क्र. 2 ने इतर प्रवाश्यांना जास्तीचे सामान नेण्यास परवानगी दिली होती. तक्रारकर्त्याने त्याकरीता काही फोटोग्राफ अभिलेखावर दाखल केले आहेत. परंतू सदर फोटोग्राफवरुन ते प्रवासी त्याच विमानाने प्रवास करणारे होते व त्यांच्याजवळ वजन मर्यादेपेक्षा जास्त सामान होते ही बाब सदर फोटोंवरुन स्पष्ट होऊ शकत नाही. विमान प्रवासात कॅटेगरीनुसार प्रवाश्यांना सामान सोबत नेण्याची वजन मर्यादा ही कमी जास्त प्रमाणात असते. ईकॉनॉमी क्लासपेक्षा बीजनेस क्लासकरीता सामान नेण्याची वजन मर्यादा जास्त असते. त्यामुळे वि.प.क्र. 2 ने इतर व्यवसाय करणा-या प्रवाश्यांना जास्त सामान नेण्यास परवानगी दिली होती हे योग्य पुराव्याअभावी ग्राह्य धरता येणार नाही.
8. वि.प.क्र. 2 यांनी तक्रारकर्त्यांच्या कायदेशीर नोटीसला दिलेल्या उत्तरात तसेच तक्रारीला दिलेल्या लेखी उत्तरात असे नमूद केले आहे की, तक्रारकर्ते तसेच इतर प्रवाश्यांच्या समानापैकी अतिरिक्त असलेले सामान विमानातील जागेअभावी, तसेच प्रवाश्यांच्या सुरक्षिततेकरीता विमानातून उतरविण्यात आले व बँकॉक येथे रोखून पुढे लगेच येणा-या विमानाने कलकत्ता येथे पाठविण्यात आले. तक्रारकर्त्यांच्या सामानात टी व्ही सारख्या मोठया आकारमानाच्या वस्तू असल्यामुळे तक्रारकर्त्यांचे सामान रोखून ठेवलेल्या सामानात समावेश होता व तसे करणे pay load restriction मुळे नियमानुसार आवश्यक होते. तक्रारकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वि.प.क्र. 2 ने सर्व तक्रारकर्त्यांचे सामान हे वैयक्तीकरीत्या प्रवास करीत होते, तरीही गट प्रवासी प्रकारची सेवा देऊन सर्व तक्रारकर्त्यांचे सामान एकत्रितरीत्या ठेवले होते. जेणेकरुन सदर सामान प्राप्त करण्यास तक्रारकर्त्यांना सोईचे होणार होते. तक्रारकर्त्याने सदर बाब चुकीची व खोटी असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. परंतू ज्याअर्थी, तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार त्याच्यापैकी दोघे हे सामान न घेता रेल्वेने नागपूरला निघून गेले व त्यांचे सामान उर्वरित तक्रारकर्त्यांनी नेले त्याअर्थी, हे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्यांचे सामान हे गट प्रवासी योजनेनुसार एकत्रित ठेवण्यात आले होते. तसेच जर दोन तक्रारकर्ते रेल्वेने नागपूरला जाऊ शकले त्यानुसार इतरही काही तक्रारकर्ते रेल्वेने जाऊ शकले असते. तसेच सामान घेतल्याशिवाय वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्यांना कलकत्ता विमानतळावरच अडवून ठेवले व बाहेर निघू दिले नाही हे तक्रारकर्त्यांचे कथन फोल व तथ्यहीन असल्याचे यावरुन दिसून येते. वि.प.क्र. 2 ने बँकॉकहून निघणा-या नंतरच्या विमानाने तक्रारकर्त्यांचे सामान कलकत्ता येथे पाठविले होते व ते तक्रारकर्त्यांना प्राप्त झालेले आहे. तक्रारकर्त्यांना सामानाबाबत उशिरा प्राप्त झाले याशिवाय, दुसरी कुठलीही तक्रार नाही. परंतू त्यामुळे तक्रारकर्त्यांची पुढील प्रवासाकरीता असलेली रेल्वे सुटली व त्यांना रेल्वेची तिकिटे रद्द करावी लागली असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. परंतू तक्रारकर्त्यांनी रद्द केलेली तिकिटे अभिलेखावर दाखल केलेली नाहीत. तक्रारकर्त्यांनी दाखल केलेली रेल्वेची तिकिटे ही केवळ दोन प्रवाश्यांची आहेत. सदर रद्द केलेली तिकिटे ही वि.प.क्र. 2 ने कथन केल्यानुसार बँकॉकवरुन विमानात न बसलेल्या दोन प्रवाश्यांची असावित असे ग्राह्य धरल्यास वावगे होणार नाही कारण सर्व 11 प्रवाश्यांनी विमानात प्रवास केला होता हे त्यांचे बोर्डींग पासेस दाखल करुन तक्रारकर्त्यांना सिध्द करता आले असते. केवळ विमानाचे तिकिट बुक असणे म्हणजे सदर प्रवाश्याने विमानात प्रवास केला होता असे म्हणता येणार नाही. तक्रारकर्त्यांनी दाखल केलेल्या इंडिगो विमानाचे तिकिटांवरुन एकूण आठ तक्रारकर्त्यांनी मागून उशिराने इंडिगो विमानाने नागपूरकरीता प्रवास केला हे जरी सिध्द होत असले तरीही संपूर्ण तक्रारकर्ते वि.प.क्र. 2 चे विमानातून बँकॉकहून कलकत्ता येथे आले होते व वि.प.क्र. 2 चे विमानात दोन तक्रारकर्ते बँकॉकहून विमानात बसले नाहीत हे खोटे आहे ही बाब तक्रारकर्त्यांनी योग्य पुराव्यासह सिध्द केलेली नाही.
9. वास्तविकतः तक्रारकर्त्यांचे सामान हे मर्यादित वजनापेक्षा अतिरिक्त नसते किंवा टी व्ही सारखे जास्त आकारमानाचे नसते तर तक्रारकर्त्यांचे सामान pay load restriction नुसार रोखण्यात आले नसते. जे की, कायदेशीररीत्या व नियमानुसार करण्यात आले होते व सदर बाबीची कल्पना तक्रारकर्त्यांना देण्यात आली होती. अशा परिस्थितीत तक्रारकर्त्यांच्या पुढील वेगळया प्रवासाकरीता वि.प.क्र. 2 ला जबाबदार धरता येणार नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. वि.प.क्र. 2 ने तक्रारकर्त्याचे सामान pay load restriction नुसार रोखले होते व ते लगेच नंतरच्या पहिल्या विमानाने कलकत्ता येथे पाठविलेले आहे. त्यामुळे वि.प.क्र. 2 ने सेवेत त्रुटी केली आहे असे म्हणता येणार नाही. पुढील प्रवासात आलेल्या अडचणी व आर्थिक खर्चास वि.प.क्र. 2 ला जबाबदार धरता येणार नाही, म्हणून सदर तक्रार वि.प.क्र. 2 विरुध्द खारीज होण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत मंच येते. तसेच तक्रारकर्त्यांनी सदर प्रकरणात दाखल केलेले निवाडे तक्रारीतील वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याने ते या प्रकरणात लागू पडत नाही.
10. सदर प्रवासाचे तिकिट बुकींग हे वि.प.क्र. 1 मार्फत केल्यामुळे वि.प.क्र. 1 यांनादेखील जबाबदार धरण्यात यावे असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे असले तरी सहलीचे कार्यक्रम पत्रिकेत नमूद असल्यानुसार वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्त्यांना बँकॉक येथे विमानतळावर पोहोचवून दिलेले आहे. प्रवासा दरम्यान उद्भवलेल्या प्रसंगाकरीता वि.प.क्र. 1 ला जबाबदार धरता येणार नाही. सबब तक्रारकर्त्यांची तक्रार वि.प.क्र. 1 व 2 विरुध्द खारीज होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
1) तक्रारकर्त्यांची वि.प.क्र. 1 व 2 विरुध्द असलेली तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा.
3) आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.