तक्रारदार : त्यांचे वकील श्री.संजय कुकरेजामार्फत हजर.
सामनेवाले : त्यांचे वकील श्री.प्रकाश कुमारमार्फत हजर.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*--
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 ही ईच्छुक प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन व व्यवस्था करणारी कंपनी आहे. तर सा.वाले क्र.2 हे विमान प्रवास सुविधा पुरविणारी कंपनी आहे. तक्रारदारांचे कथना प्रमाणे सा.वाले क्र.1 सा.वाले क्र.2 यांचे एजंट आहेत. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांचे मार्फत दिनांक 26.1.2009 रोजी तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्या विमान प्रवासाकरीता 11 तिकिटे आरक्षीत केली हेाती. तो विमानाचा प्रवास दिनांक 1.5.2009 रोजी सा.वाले क्र.2 विमान कंपनीचे कलकत्ता ते मुंबई असे करणार होते. त्या 11 तिकिटांपैकी 6 तिकिटे एका गटात होती. ज्याचा पीएनआर क्रमांक वेगळा हेाता तर इतर पाच तिकिटे ही दुस-या गटात होती. त्याचा पीएनआर क्रमांक वेगळा होता. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे काही आकस्मीत अडचणीमुळे दुस-या गटातील प्रवास करणारे श्री.जीत फुरीया यांचा प्रवास रद्द झाला. व तक्रारदारांनी दिनांक 16.4.2009 रोजी दुस-या गटातील श्री.जीत फुरीया यांचे तिकिट रद्द केले. व आरक्षण रद्द करण्याचे रु.1000/- इतकी रक्कम वगळत बाकी रक्कम रु.1,375/- तक्रारदारांचे क्रेडीट खात्यात सा.वाले यांनी जमा केली.
2. तक्रारदार पुढे असे कथन करतात की, दिनांक 1.5.2009 रोजी तक्रारदार व त्यांचे इतर नातेवाईक कलकत्ता विमानतळावर सा.वाले क्र.2 यांचे विमानात चढणेकामी पोहचले असता त्यांना असे सागण्यात आले की, दुस-या गटातील म्हणजे पाच तिकिटाचा पीएनआर क्रमांक हा रद्द झाला. त्यामुळे दुस-या गटातील शिल्लक चार प्रवासी हया विमानाचे प्रवास करु शकत नाहीत. तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 विमान प्रवास कंपनीचे अधिकारी यांची बरीच विनवणी केली परंतु तिकिटाचा पीएनआर रद्द झाल्यामुळे शिल्लक चार प्रवाशाकरीता विमान कंपनीने बोर्डींग पास वितरीत केला नाही. तक्रारदारांनी विमानतळावरुन सा.वाले क्र.1 यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सा.वाले क्र.1 यांनी त्यांना सहकार्य केले नाही. अंतीमतः तकारदारांनी इतर चार प्रवाशांकरीता विमानतळावरच त्या दिवसीचे दराने प्रति तिकिट 5,479/-एकूण रु.21,916/- अदा करुन 4 तिकिटे विकत घेतली. या प्रकारे सा.वाले क्र.2 यांचे विमानातून कलकत्ता ते मुंबई असा प्रवास केला.
3. तक्रारदारांनी प्रवास झाल्यानंतर सा.वाले यांना विमान तिकिटाचे ज्यादा खर्च झालेले रु.22,000/- तक्रारदारांना अदा करावेत अशी विनंती केली. तक्रारदारांनी दूरध्वनीव्दारे तसेच ई-मेल संदेश दिनांक 3.5.2009 व्दारे सा.वाले क्र.1 यांचेशी संपर्क साधला परंतु सा.वाले क्र.1 यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 9.5.2009 रोजी त्यांचे वकीलामार्फत सा.वाले क्र.1 यांना कायदेशीर नोटीस पाठविली व त्यामध्ये ज्यादा चार तिकिटाचे रु.21,916/-त्यावर 18 टक्के व्याज तसेच नेाटीसीचा खर्च रुपये 500 व नुकसान भरपाई रु.2 लाख अशी मागणी केली.
4. सा.वाले यांनी त्या नोटीसीला दिनांक 12.6.2009 रोजी उत्तर दिले व तक्रारदारांचे मागणीस नकार दिला. तथापी जून, 2009 मध्ये सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांच्या खात्यामध्ये रु.9500/- जमा केले. तक्रारदारांचे असे कथन आहे की, सा.वाले यांनी बाकी रक्कम रु.12,416/- त्यावरील व्याज व नोटीसीचा खर्च तक्रारदारांना अदा केला नाही. तक्रारदारांचे कथना प्रमाणे कलकत्ता विमान तळावर झालेल्या घटणेमुळे त्यांची मानहानी झाली, मानसिक त्रास, व कुचंबणा झाली व सा.वाले यांनी देऊ केलेली रक्कम ही नुकसानीच्या प्रमाणात पुरेशी नाही. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दोन्ही सा.वाले यांचे विरुध्द दाखल केली व त्यामध्ये सा.वाले यांचेकडून चार तिकिटाच्या ज्यादा रक्कमेपैकी शिल्लक रक्कम रु.12,416/- यावर 18 टक्के व्याज, नोटीस खर्च रु.500/- व नुकसान भरपाई रु.2 लाख अशी मागणी केली.
5. सा.वाले क्र.1 प्रवासी कंपनी यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये तक्रारदारांना दोन वेग वेगळे पीएनआर सा.वाले यांनी दिले होते व 11 तिकिटे खरेदी केली होती ही बाब मान्य केली. दिनांक 16.4.2009 रोजी तक्रारदारांच्या दूरध्वनीवरील सूचनेप्रमाणे एक तिकिट रद्द करण्यात आली व शिल्लक चार तिकिटांकरीता पीएनआर क्रमांक वेगळा र्निगमित करण्यात आला व तो तक्रारदारांना कळविण्यात आला. याप्रमाणे सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना विमान प्रवासाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास सा.वाले क्र.1 यांनी नकार दिला.
6. सा.वाले क्र.1 यांनी असेही कथन केले की, सा.वाले क्र.1 हे सा.वाले क्र.2 विमान प्रवास कंपनीचे एजंट नाहीत. तक्रारदारांनी तक्रारीत मागीतलेला नुकसान भरपाईचा आकडा हा अधिकचा आहे असेही सा.वाले यांनी कथन केले.
7. सा.वाले क्र.2 विमान प्रवास कंपनी यांनी आपली कैफीयत दाखल केली नाही. व त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा करण्यात आले.
8. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तसेच सा.वाले यांचे कैफीयतीस 31 पृष्टाचे प्रति उत्तरचे शपथपत्र दाखल केले. सा.वाले यांनी त्यांचे प्रतिनिधी यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी पत्र व्यवहाराच्या प्रती व आवश्यक ती कागदपत्रे दाखल केली. दोन्ही बाजुंनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला.
9. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले क्र.1 प्रवास कंपनी यांनी तक्रारदारांना दिनांक 1.5.2009 रोजी कलकत्ता ते मुंबई या विमान प्रवासाकामी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली हे तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2. | तक्रारदार सा.वाले यांचेकडून चार विमान तिकिटांची ज्यादा रक्कम व नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. परंतू अशतः |
3. | अंतीम आदेश ? | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
10. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांचेकर्वी दिनांक 1.5.2009 कलकत्ता ते मुंबई अशी 11 विमान प्रवासाची तिकिटे सा.वाले क्र.2 विमान कंपनी यांचे विमानाची आरक्षित केली या बद्दल वाद नाही. तक्रारदारांनी तक्रारीसोबत निशाणी 2 येथे आपल्या क्रेडीट कार्ड खात्याचा उतारा हजर केलेला आहे. त्यातील नोंदीवरुन असे दिसते की, दिनांक 26.1.2009 रोजी तक्रारदारांनी क्रेडीट कार्ड मार्फत सा.वाले क्र.1 यांचेकडे तिकिटाची रक्कम अदा करण्यात आली हेाती. यावरुन सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांकडून विमानाची तिकिटे काढण्याचे कामाच्या संदर्भात मोबदला मिळविला होता ही बाब सिध्द होते. विमानाच्या तिकिटाचे पैसे जर सा.वाले क्र.1 यांच्या खात्यामध्ये जमा होत असतील तर निश्चितच सा.वाले क्र.1 यांचेकडून ती रक्कम सा.वाले क्र.2 विमान कंपनी यांचेकडे हस्तांतरण होत असली पाहिजे. ही बाब हे दर्शविते की, सा.वाले क्र.1 हे सा.वाले क्र.2 चे एजंट आहेत. सा.वाले क्र.1 हे सा.वाले क्र.2 चे एजंट आहेत किंवा नाही हा मुद्दा गौण आहे. सा.वाले क्र.1 यांना विमान प्रवासाच्या तिकिटाची रक्कम प्राप्त झाली होती. यावरुन तक्रारदारांच्या नियोजित विमान प्रवासाच्या संदर्भात सा.वाले क्र.1 यांनी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढावा लागतो. या वरुन तक्रारदार हे सा.वाले 1 यांचे ग्राहक आहेत.
11. तक्रारदारांनी एकदम 11 विमानाची तिकिटे घेतली होती. व त्यापैकी 6 तिकिटे ही एका गटामधील होती ज्याचा पीएनआर क्रमांक OZF8LV व बाकी 5 तिकिटे ही दुस-या गटात त्याचा पीएनआर क्रमांक WZGECV. तक्रारदारांनी आरक्षित केलेली दुस-या गटातील तिकिटापैकी काही आकस्मित कारणाने श्री.जीत फुरीया यांचे तिकिट रद्द करावे लागले. व तक्रारदारांनी दिनांक 16.4.2009 रोजी सा.वाले क्र.1 यांचे मार्फत ती कार्यवाही केली. व दुस-या गटातील पाच तिकिटामधील श्री.जीत फुरीया यांचे तिकिट रद्द केले. ते आरक्षित तिकिट रद्द होणेकामी रु.1000/- रद्द होण्याचे शुल्क तक्रारदारांना मोजावे लागले. व बाकी रक्कम रु.1,375/- सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांच्या क्रेडीट कार्ड खात्यामध्ये जमा केली. त्या बद्दल क्रेडीट कार्डचा उतारा तक्रारदारांनी निशाणी 3 कडे दाखल केलेला आहे. सा.वाले क्र.1 यांनी आपल्या कैफीयतीचे परिच्छेद क्र.2 मध्ये या सर्व बाबी मान्य केलेल्या आहेत.
12. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे तक्रारदार व त्यांचे नातेवाईक दिनांक 1.5.2009 रोजी सा.वाले क्र.2 यांच्या विमानाने प्रवास करणेकामी कलकत्ता विमानतळावर पोहचले परंतु विमानतळावरील सा.वाले क्र.2 यांच्या अधिका-यांनी तक्रारदारांना असे सांगीतले की, दुस-या गटाचा पीएनआर क्रमांक WZGECV हे रद्द झालेले आहे व त्यामुळे दुस-या गटातील सर्व बाकी 4 तिकिटे हीसुध्दा रद्द झालेली आहेत. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये तसेच पुराव्याच्या शपथपत्रात असे कथन केले आहे की, तक्रारदारांनी विमान तळावरील अधिका-यांची बरीच समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु त्यास यश आले नाही. सा.वाले क्र.1 यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना सहकार्य केले नाही. अंतीमतः तक्रारदारांनी रु.5479/- प्रति तिकिट एकूण रक्कम रु.21,916/- अदा करुन चार विमान प्रवासाची तिकिटे कलकत्ता विमानतळावर खरेदी केली. तो संपूर्ण प्रवास झाल्यानंतर तक्रारदार व सा.वाले यांचे दरम्यान पत्र व्यवहार सुरु झाला. तक्रारदारांना चार विमान प्रवासाची तिकिटे खरेदी करीता ज्यादा अदा करावी लागलेली रक्कम रुपये 21,916/- तसेच त्यावर व्याज अशी मागणी करणारा ई-मेल संदेश दिनांक 3.5.2009 रोजी पाठविला. या संदर्भात सा.वाले क्र.1 यांनी आपल्या कैफीयतीचे परिच्छेद क्र.2 मध्ये असे कथन केलेले आहे की, दिनांक 16.4.2009 रोजी दुस-या गटातील तिकिट रद्द करण्याची कार्यवाही बद्दल सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांच्या सूचनेवरुन केली. व हे एक तिकिट रद्द झाल्यानंतर शिल्लक चार तिकिटांकरीता नविन पीएनआर क्र. JIMKLP निर्माण झाला. तो तक्रारदारांना कळविण्यात आला होता. तक्रारदारांनी आपल्या प्रति उत्तराचे शपथपत्रात जे 31 पृष्ट संखेचे आहे. त्यामध्ये पृष्ट क्र. 11 मध्ये नविन पीएनआर क्रमांक निर्माण करण्यात आला होता व तो तक्रारदारांना कळविण्यात आला होता या सा.वाले यांच्या कथनास नकार दिला. तथापी सा.वाले क्र.1 यांनी नविन पीएनआर क्रमांक निर्माण करण्यात आला होता व तो कळविण्यात आला होता यास बद्दल कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांच्या नेाटीसीला दिनांक 12.6.2009 रोजी जे उत्तर दिले त्यामध्ये देखील या बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तथापी सा.वाले यांचे त्यानंतरही पत्र दिनांक 28.12.2009 यामध्ये नविन पीएनआर बद्दल उल्लेख नाही. मुळतच नविन पीएनआर क्रमांक निर्माण करण्यात आला होता या बद्दल कुठलाही पुरावा नाही. शिल्लक चार तिकिटाकरीता नविन पीएनआर क्रमांक जर सा.वाले क.1 यांनी निर्माण केला असता व तक्रारदारांना कळविले असते तर तक्रारदारांची कलकत्ता विमानतळावर या प्रकारची कुचंबणा झाली नसती. या परिस्थितीमध्ये तक्रारदारांना नविन पीएनआर क्रमांक विमानतळावरील अधिका-यांनी लगेचच सांगीतला असता. परंतु तक्रारदार नविन पीएनआर क्रमांक बाकी चार तिकिटाकरीता देवू शकले नाही. व त्याच्यावर सा.वाले क्र.2 चे अधिका-यांनी तिकिटे खरेदी करण्याची सक्ती केली. येथे एक बाब नमुद करणे आवश्यक आहे की, सा.वाले क्र.1 असे कथन करतात की, तिकिटे रद्द करण्याची कार्यवाही सा.वाले क्र.1 यांच्या कर्मचा-यांनी सा.वाले क्र.2 यांच्या संकेत स्थळावर केली. ही वस्तुस्थिती असतीतर निश्चीतच सा.वाले क्र.2 यांच्याकडे नविन पीएनआर उपलब्ध झाला असता. परंतु तसा पीएनआर उपलब्ध होऊ शकला नाही. तथापी महत्वाची बाब म्हणजे दिनाक 1.5.2009 रोजी कलकत्ता विमानतळावर जेव्हा तक्रारदारांना नविन चार तिकिटाचे संदर्भात अडविण्यात आले तेव्हा तक्रारदार यांनी सा.वाले क्र.1 यांचेशी संपर्क प्रस्तापित केला होता असे तक्रारदारांचे कथन आहे. सर्वसामान्य परिस्थितीमध्ये या प्रकारची अडवणूक झालेली व्यक्ती निश्चीतच तिकिटे आरक्षीत करणा-या एजंटशी संपर्क प्रस्तापित करेल. कारण दुस-या गटातील एक तिकिट रद्द करण्याची कार्यवाही सा.वाले क्र.1 यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे. तक्रारदारांनी विमानतळावरुन सा.वाले यांचेशी संपर्क प्रस्तापित केल्यानंतर सा.वाले क्र.1 हे नविन पीएनआर क्रमांक तक्रारदारांना अथवा सा.वाले क्र.2 यांचे विमानतळावरील अधिकारी यांना सांगू शकले असते. परंतु त्या प्रकारची कार्यवाही सा.वाले क्र.1 यांच्या कर्मचा-यांनी केली असे सा.क्र.1 यांचे देखील कथन नाही. यावरुन नविन पीएनआर क्रमांक शिल्लक 4 तिकिटाकरीता निर्माण करण्यात आला, तर तो तक्रारदारांना कळविण्यात आला होता ही वस्तुस्थिती नसून केवळ स्वतःचा बचाव करण्याकरीता रचलेले कथानक आहे असा निष्कर्ष काढावा लागतो.
13. सा.वाले आपल्या लेखी युक्तीवादात परिच्छेद क्र.10 पृष्ट क्र.9 वर असे कथन करतात की, विशिष्ट प्रकारच्या पीएनआर मधील एखादे तिकिट रद्द केले गेले तर शिल्लक तिकिटांकरीता वेगळा क्रमांक विमान सेवा देणा-या कंपन्यांच्या संकेत स्थळावर आणणे आवश्यक होते. व तो विमान प्रवास करणा-या व्यक्तीस
ई-मेलचेव्दारे त्वरीत कळविला जातो. तसे केले नसेल व नवीन PNR निर्माण झाला नसेल तर विमान सेवा देणा-या कंपनीचे कर्मचारी ते करु शकतात. या संबंधीत तक्रारदारांची सर्व कथने विचारात घेतली तर असे दिसून येते की, नविन पीएनआर क्रमांक निर्माण करण्यात आला नसल्याने विमान तळावरील कर्मचारींनी तक्रारदारांना बोर्डींग पास दिला नाही. व तक्रारदारांना नविन तिकिटे खरेदी करावी लागली. सा.वाले क्र.2 यांच्या संकेत स्थळावर जर नविन पीएनआर कळविण्याबाबतचा निर्णय झाला असता तर ती परिस्थिती निर्माण झाली नसती. एकूणच सा.वाले यांचे या मु्द्यावरील कथनात तथ्य नाही असा निष्कर्ष काढावा लागतो.
14. तक्रारदारांनी विमानतळावर चार तिकिटे प्रत्येकी रु.5,479/- असे एकूण रुपये 21,916/- खर्च करणे भाग पडले. व त्यानंतर सा.वाले क्र.2 यांच्या विमानाने विमान प्रवास पूर्ण केला. या स्वरुपाचे कथन तक्रारदारांच्या तक्रारीत, शपथपत्रात व ई-मेल संदेशामध्ये करण्यात आलेले आहे. या प्रकारे तक्रारदारांनी चार ज्यादा तिकिट खरेदी करुन त्या बद्दल रु.21,916/- खर्च केला. तक्रारदारांना या प्रकारचा मानसिक त्रास, झाला व त्याच प्रमाणे आर्थिक र्भुदंड सोसावा लागला. ही सर्व परिस्थिती सा.वाले क्र.1 यांच्या कर्मचा-यांच्या चुकीमुळे निर्माण झाली. तक्रारदार हे जर प्रवासी होते व विमानाची तिकिटे विमानतळावर हजर करणे ही त्यांची जबाबदारी असेल तर सा.वाले क्र.1 यांचे कर्मचा-यांनी तक्रारदारांना विमानाचे तिकिट रद्द केल्यानंतर सा.वाले यांनी पीएनआर रद्द केला नंतर संपूर्ण पीएनआर रद्द झाला आहे परीणामतः शिल्ल्क 4 तिकिट रद्द झाल्या आहेत अशी कल्पना देणे आवश्यक होते. या प्रकारची कल्पना तक्रारदारांना नसल्याने ते अनभिज्ञ राहीले व विमानतळावर त्यांना नविन तिकिटे खरेदी करावी लागली. दरम्यान सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना या परिस्थितीत कल्पना दिली नाही. या सर्व परिस्थितीमध्ये सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढावा लागतो.
15. तक्रारदार व सा.वाले यांचे दरम्यान पत्र व्यवहार सुरु झाल्यानंतर सा.वाले क्र.1 यांनी दिनांक 12.6.2009 रोजी (निशाणी 7) पत्र पाठविले व त्यामध्ये शिल्लक चार तिकिटे रद्द झाल्याने रु.9,500/- परत करण्यात येत आहेत असे कथन केले. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांच्या क्रेडीट कार्ड खात्यामध्ये रु.9,500/- जमा केले आहेत ही बाब मान्य केलेली आहे. येवढेच नव्हेतर क्रेडीट कार्ड खात्याचा उतारा निशाणी 8 वर दाखल केलेला आहे. तथापी तक्रारदारांनी चार विमानाची तिकिटे खरेदी करणेकामी अधिकचे रु.21,916/- विमानतळावर खर्च केले. त्यापैकी सा.वाले क्र.1 यांचेकडून रु.9,500/- प्राप्त झाल्यानंतर शिल्लक रु.12,416/- सा.वाले क्र.1 यांचेकडून येणे बाकी राहीले. तक्रारदारांनी दिनांक 6.7.2009 (निशाणी 9) च्या पत्राव्दारे सा.वाले यांचेकडे शिल्लक रक्कम रु.12,416/- बँक शुल्क रु.329/- व नोटीस खर्च रु.500/- असे एकूण रु.13,245/- ची मागणी सा.वाले क्र.1 यांचेकडे केली. त्यानंतर सा.वाले यांनी त्यांचे पत्र दिनांक 6.7.2009 रोजी शिल्लक तिकिटे रद्द झाली होती ही बाब मान्य केली. त्यानंतर सा.वाले यांनी तक्रारदारांना दिनांक 28.7.2009 रोजी एक पत्र पाठविले ते मुळचे पत्र तक्रारदारांनी हजर केलेले आहे. त्या पत्राव्दारे सा.वाले यांनी तक्रारदारांना येणे बाकी रक्कम रु.12,416/- बँक शुल्क रु.329/- व नोटीस खर्च 5000/- असे एकूण रु.17,745/- देऊ केले. परंतु सा.वाले यांनी त्या पत्रामध्ये असे म्हटले आहे की, त्यांचे विरुध्द चूक नाही परंतु प्रकरण मिटविण्याचे दृष्टीने हा प्रस्ताव दिला जात आहे. असे कथन केले. तक्रारदारांनी तो प्रस्ताव स्विकारला नाही. तक्रारदार प्रस्तुत तक्ररीमध्ये येणे बाकी रक्कम रु.12,416/- त्यावर व्याज व नुकसान भरपाई रु.2लाख मागतात.
16. वर नमुद केल्याप्रमाणे तक्रारदारांना झालेले आर्थिक नुकसानीपैकी रु.9500/- सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना पूर्वीच अदा केलेले आहेत. त्यावरुन आर्थिक नुकसानीच्या संदर्भात रु.12,416/- ही रक्कम येणे बाकी आहे.
17. तक्रारदारांनी नुकसान भरपाई बद्दल दोन लाखाची मागणी केलेली आहे. व तक्रारदार असे कथन करतात की, सा.वाले क्र.2 यांचे कर्मचा-यांनी तक्रारदारांच्या नातेवाईकांना बोर्डींग पास न दिल्याने तक्रारदारांची अवहेलना झाली व अपमान झाला. विमान तळावर हा सर्व प्रकार घडल्याने वाद विवाद व चर्चा देखील झाली असेल. तक्रारदार यांना त्या बद्दल मानसिक त्रास व कुचंबणा देखील झाली असेल. तथापी तक्रारदार मागीत असलेले रु.2 लाख ही रक्कम खुपच ज्यादा वाटते. या प्रकारची प्रवासात कुचंबणा होणे ही घटणा विमानतळावर सर्वसामान्यपणे घडत असतात, व त्यामुळे माणसाची अप्रतिष्टा होते असा निष्कर्ष काढता येणार नाही. तथापी विमान प्रवास रद्द झाल्याने गैर सोय व कुचंबणा निश्चितच झाली, त्यातही सा.वाले क्र.2 विमान कंपनीच्या त्याच विमानाची चार तिकिटे उपलब्ध झाल्याने तक्रारदारांच्या विमान प्रवासाच्या कार्यक्रमामध्ये अडथळा उत्पन्न झाला नाही. थोडक्यात तक्रारदार आर्थिक नुकसान, मानसिक त्रास, कुचंबणा या बद्दल नुकसान भरपाई मागू शकतात. तक्रारदारांनी वर नमुद केल्याप्रमाणे आर्थिक नुकसानीपैकी रु.12,416/- अद्यापही सा.वाले यांचेकडून येणे बाकी आहे. त्यानंतर तक्रारदार मानसिक त्रास, व कुचंबणा या बद्दल नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. प्रकरणातील सर्व कथनांचा व घडलेल्या घटनेची पार्श्वभुमी, त्यात सा.वाले क्र.1 यांची त्या संदर्भातील भूमिका, तक्रारदार व त्याचे नातेवाईक यांना झालेला मानसिक त्रास व कुचंबणा या सर्व बाबींचा विचार एकत्रित विचार करता मंचाचे असे मत झाले आहे की, सा.वाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रु.40,000/- अदा करणे योग्य व न्याय राहील.
18. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 685/2009 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना दिनांक 1.5.2009 चे विमान प्रवास
संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई बद्दल एकत्रितपणे रु.40,000/-अदा करावेत असा आदेश देण्यात येतो.
4. या व्यतिरिक्त सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- अदा करावेत असा आदेश देण्यात येतो.
5. सामनेवाले क्र.1 यांनी वरील रक्कम आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यापासून आठ आठवडयात तक्रारदारांना अदा करावी, अन्यथा नुकसान भरपाई रक्कमेवर विहीत मुदत संपल्यापासून 9 टक्के दराने व्याज अदा करावे.
6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.